(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांचे विरुध्द नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांची मौजे पिंपळगांव लांडगा ता.नगर जि.अहमदनगर येथील सर्व्हे नं.116 क्षेत्र 0 हे.93 आर ही त्यांचे वडीलोपार्जीत विहीर बागायत शेतजमीन आहे. सदर जमीनीमध्ये कांदा, सोयाबीन, भाजीपाला अशी पिके घेत असतात. सामनेवाला नं.1 ही नवजीवन हायब्रीड सीडस कार्पोरेशन यांचा बियाणे उत्पादन करुन विक्री करण्याचा व्यवसाय आहे. सामनेवाले नं.2 यांचा बी बियणे विक्रीचा व शेती उपयुक्त खते विक्रीचा व्यवसाय आहे.
3. तक्रारदार यांना चालु वर्षाचे रब्बी हंगामामध्ये त्यांचे सदर गट नं.116 मध्ये 60 आर क्षेत्रात त्यांना कांद्याचे पीक करावयाचे असल्यामुळे त्यांनी सामनेवाले नं.2 यांचेकडून सामनेवाला नं.1 या कंपनीचे गावरान (लाईट रेड) कांदा बियाणे अतिशय उत्तम असलेचे सांगितले. व ते बियाणे खरेदी केले. सदरचे कांदा बी बॅच नं.605 चे प्रत्येकी 500 ग्रॅम वजनाचे 16 पॅक पुडे दिनांक 12.08.2014 रोजी व 1 पुडा दिनांक 11.09.2014 रोजी विकत घेतले. त्यानंतर तक्रारदार यांनी 16 पुडयातील सदरचे बी दिनांक 11.10.2014 रोजी गादी वाफ्यामध्ये टाकुन त्यांचे शास्त्रशुध्द पध्दतीने रोपे तयार केली व सदरची रोपे त्यांनी त्यांचे शेतजमीन गट नं.116 या जमीनीमध्ये 0 हे. 60 आर क्षेत्रामध्ये लावले. व शिल्लक राहिलेला 1 पुडा तक्रारदार यांचेकडे आहे. तक्रारदार यांनी या पिकास आवश्यकतेनुसार रासायनिक खते दिली. तसेच बुरशीनाशके, टॉनिक व किटकनाशकांच्या फवारण्या केल्या. संपुर्ण काळजी घेऊनसुध्दा तक्रारदाराचे पिकांची वाढ झाली नाही. पिकाचे वाढीमध्ये सुध्दा एकसुत्रीपणा नव्हता. कांदयामध्ये काही डेंगळा जातीचे कांदे, काही जोड कांदे, काही पांढरे कांदे, काही नाशिक लाल व काही गावरान (लाईट रेड) अशा वेगवेगळया प्रकारची कांदे असल्याचे आढळून आले. तक्रारदार यांनी त्यानंतर याबाबत जिल्हा परिषदेचे नगर तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीस अनुसरुन तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारदार यांचे जमीनीस दिनांक 11.02.2015 रोजी समक्ष भेट देऊन त्यामधील कांदा पिकांची पाहाणी केली. सदरच्या समितीने जमीनीस भेट देण्या अगोदर बियाणे उत्पादन कंपनी म्हणुन सामनेवाले नं.1 व बियाणे विक्रेते म्हणुन सामनेवाले नं.2 यांना कळवले. दिनांक 11.02.2015 रोजी समक्ष पाहाणीचे वेळी हजर राहाणेस सांगितले. सामनेवाले नं.1 कंपनीने मात्र त्यांचा प्रतिनिधी सदर भेटीचे दरम्यान पाठविला नाही. परंतू सामनेवाला नं.2 दुकानदार विक्रेते एजन्सी यांचे वतीने श्री.सुमित श्याम राठोड हे पाहाणीचे वेळी उपस्थित होते. सदर पिकांची प्रत्यक्षात पाहाणी करुन पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये खालील प्रकारची भेसळ आढळून आली. डेंगळा कांदा- 30 टक्के, जोड कांदा- 12 टक्के, चांगला कांदा- 57 टक्के. अशा प्रकारे सामनेवाला नं.1 व 2 यांनी दिलेल्या कांदयाचे बियाणामध्ये फक्त 57 टक्के कांदा हा गावरान (लाईट रेड) या जातीचे बी होते. व उर्वरीत 43 टक्के बी हे डेंगळा कांदा, जोड कांदा असे होते. या सर्वांमध्ये 20 टक्के पांढरा कांदा व डार्क रेड कांदा अशी एकंदर बियाणामध्ये भेसळ असलेचे आढळुन आले. त्यानंतर तक्रार निवारण समितीने पंचनामा केल्यावर त्याबाबतचा पाहाणी अहवाल दिला. सदरचा अहवाल प्रकरणात दाखल केला आहे. अशा प्रकारे सामनेवाला यांनी निकृष्ट दर्जाचे भेसळयुक्त बियाणे तक्रारदाराला विकल्यामुळे भेसळयुक्त पिक आले. यामुळे संपुर्ण कांदयाचे पीक हे भेसळयुक्त आल्यामुळे साठवण करुन ठेवता येणार नाही व या कांदयाची विक्री त्वरीत करावी लागणार आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे जवळपास 1,50,000/- चे नुकसान झाले. सदरचे नुकसान भरपाईपोटी सामनेवाला नं.1 व 2 हेच जबाबदार आहेत. त्यांना दिनांक 05.03.2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. परंतू त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदाराला दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद क्र.16 प्रमाणे मागणी केली केली आहे.
4. सामनेवाला नं.1 यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.15 वर दाखल केली आहे. त्यामध्ये यांनी असे कथन केले की, सामनेवाला नं.1 ही बियाणे उत्पादन करणारी कंपनी असून ती डीलरमार्फत बियाणे विक्री करण्याचा व्यवसाय करते. सामनेवाला नं.1 यांनी सामनेवाला नं.2 हे अहमदनगर येथील डीलर मार्फत त्यांचकडे विक्रीसाठी बियाणे पाठविलेली आहेत. सदरचे तक्रार अर्जात नमुद केलेला दिनांक 11.02.2015 चा तालुकास्तरीय समितीचा अहवाल व पंचनामा हा या सामनेवालास मान्य नाही. त्यांनी पुढे असे कथन केले आहे की, सदरचा अहवाल हा महाराष्ट्र सरकारचे परिपत्रकाप्रमाणे नाही. कांदा पिकास डेंगळे येण्याची व जोडकांदा येण्याची कुठलिही कारणे समितीने दिलेली नाहीत. कांदा पिकास डेंगळा येणे व जोडकांदा येणे हे बियाणावर अवलंबून नसते. त्यासाठी बियाणे जबाबदार नसते. कांदास डेंगळा कांदा येणेस व जोडकांदा येणेस पुर्णपणे हवामान, तापमान, जमीनीचा पोत, कांदा बि-बियाणे लावणेची पध्दत, रोपांचा कालावधी, दोन रोपामधील अंतर, दोन रोपांचे ओळीमधील अंतर, खतांचे प्रमाण, किटकनाशके, पाण्याचा अनियमितपणा इत्यादी घटकावर अवलंबून असते. या सर्व गोष्टींची तक्रारदारास कल्पना आहे. तरीही तक्रारदाराने तालुकास्तरीय बियाणे निवारण समितीस हाताशी धरुन खोटया मजकुराचा अहवाल व पंचनामा तयार केलेला आहे. सबब सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी विनंती केली आहे.
5. सामनेवाला नं.2 यांना प्रकरणाची नोटीसची बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही. त्यामुळे सामनेवाला नं.2 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला.
6. तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र तसेच त्यांचे विद्वान वकील श्री.गुगळे यांनी केलेला युक्तीवाद व प्रकरणात दाखल केलेला लेखी युक्तीवाद यांचे वाचन करण्यात आले. सामनेवाला नं.1 यांनी दाखल केलेली कागदपत्रे, कैफियत व सामनेवाला नं.1 यांचे वकील श्री.तिपोळे यांचा युक्तीवादाचे अवलोकन केले. व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय.? | ... होय. |
2. | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळण्या पात्र आहेत काय.? | ... होय. |
3. | आदेश काय? | ...अंमिम आदेशाप्रमाणे |
का र ण मि मां सा
7. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार हे मौजे पिंपळगांव लांडगा ता.नगर जि.अहमदनगर येथील रहिवासी असून त्यांनी त्यांचे शेतजमीन सर्व्हे नं.116 क्षेत्र 0 हे. 93 आर ही त्यांचे वडीलोपार्जीत विहीर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीमध्ये तक्रारदाराने कांदा, सोयाबीन, भाजीपाला अशी पिके घेतात. त्यामुळे तक्रारदाराने चालू वर्षाचे रब्बी हंगामामध्ये त्यांचे शेतजमीनीत कांदा पिक घेण्यासाठी गावरान (लाईट रेड ) जातीचे कांदाचे बियाणाची आवश्यकता होती. म्हणून सामनेवाला नं.2 यांचेकडून सामनेवाला नं.1 यांचे कंपनीचे बियाणे खरेदी केले. सदरचे कांदा बियाणाचे बॅच नं.605 असून त्याचे प्रत्येकी 500 ग्रॅम वजनाचे 16 पॅक पुडे दिनांक 12.08.2014 रोजी सामनेवाला नं.2 यांचे दुकानातून खरेदी केले. त्याबाबतचे बिल तक्रारदार यांनी निशाणी 6/2, निशाणी 6/3 प्रमाणे प्रकरणात दाखल केलेले आहे. त्या बिलाचे अवलोकन केले असता, त्यावर तक्रारदाराचे नाव नमुद आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
8. मुद्दा क्र.2 – तक्रारदार यांनी सदरचे कांदा बियाणांची लागवड केल्यानंतर त्याची रोपे ही त्यांचे गट नंबर मधील शेतजमीनीमध्ये लावलेली आहेत. व तक्रारदार यांनी या पिकास आवश्यकतेनुसार रासायनिक खते दिली. तसेच बुरशीनाशके, टॉनिक व किटकनाशकांच्या फवारण्या केल्या. संपुर्ण काळजी घेऊनसुध्दा तक्रारदाराचे पिकांची वाढ झाली नाही. पिकाचे वाढीमध्ये सुध्दा एकसुत्रीपणा नव्हता. कांदयामध्ये काही डेंगळा जातीचे कांदे, काही जोड कांदे, काही पांढरे कांदे, काही नाशिक लाल व काही गावरान (लाईट रेड) अशा वेगवेगळया प्रकारची कांदे असल्याचे आढळून आले. तक्रारदार यांनी त्यानंतर याबाबत जिल्हा परिषदेचे नगर तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीस अनुसरुन तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारदार यांचे जमीनीस दिनांक 11.02.2015 रोजी समक्ष भेट देऊन त्यामधील कांदा पिकांची पाहाणी केली. सदरच्या समितीने जमीनीस भेट देण्या अगोदर बियाणे उत्पादन कंपनी म्हणुन सामनेवाले नं.1 व बियाणे विक्रेते म्हणुन सामनेवाले नं.2 यांना कळवले. दिनांक 11.02.2015 रोजी समक्ष पाहाणीचे वेळी हजर राहाणेस सांगितले. सामनेवाले नं.1 कंपनीने मात्र त्यांचा प्रतिनिधी सदर भेटीचे दरम्यान पाठविला नाही. परंतू सामनेवाला नं.2 दुकानदार विक्रेते एजन्सी यांचे वतीने श्री.सुमित श्याम राठोड हे पाहाणीचे वेळी उपस्थित होते असे तक्रारदाराने कथन केले. सदर पिकांची प्रत्यक्षात पाहाणी करुन पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये खालील प्रकारची भेसळ आढळून आली. डेंगळा कांदा- 30 टक्के, जोड कांदा- 12 टक्के, चांगला कांदा- 57 टक्के. असे नमुद करण्यात आले. अशा प्रकारे सामनेवाला नं.1 व 2 यांनी दिलेल्या कांदयाचे बियाणामध्ये फक्त 57 टक्के कांदा हा गावरान (लाईट रेड) या जातीचे बी होते व उर्वरीत 43 टक्के बी हे डेंगळा कांदा, जोड कांदा असे होते. या सर्वांमध्ये 20 टक्के पांढरा कांदा व डार्क रेड कांदयाची भेसळ होती. त्यामुळे सदरचे आर्थिक नुकसान झाले आहे असे नमुद करण्यात आले आहे. तक्रारदाराने खते, पाणी इतर मशागत कशी केली आहे याबाबत सुध्दा नमुद केले आहे. तसेच सामनेवाला यांनी सदरचे तक्रारदाराचे कथनास असा बचाव घेतला आहे की, जोड कांदा येणे, डेंगळा कांदा येणे यासाठी बियाणे जबाबदार नाही. संपुर्ण हवामान जबाबदार आहे. परंतू सदरचे पाहाणीप्रमाणे ही बाब स्पष्ट होते की, केवळ डेंगळा किंवा जोडकांदा असल्याचे आढळलेले नसल्याने पांढरा किंवा लाल हासुध्दा कांदा आलेला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी घेतलेला बचाव ग्राहय धरता येणार नाही. डेंगळा कांदा येणे हे जरी सामनेवाला यांनी दाखल केलेले लिटरेचरप्रमाणे हवामानावर अवलंबून असले तरी पांढरा कांदा येणे ही बाब निश्चीतच बियाणामध्ये भेसळ होती असे स्पष्ट होते. व पाहाणी अहवालामध्ये सुध्दा बियाणामध्ये भेसळ आहे असे नमुद केलेले आहे. तसेच पाहाणी करताना सामनेवाला नं.1 या कंपनीचे प्रतिनिधी हजर नव्हते. मात्र सामनेवाला नं.2 दुकानदार यांचे मार्फत श्री.सुमित श्याम राठोड हे पाहाणीचे वेळी उपस्थित होते. त्यांचे नाव व सही पाहाणी अहवालात नमुद आहे. व डीलर हा सामनेवाला नं.1 कंपनीचा व्यक्ती आहे. त्यामुळे सामनेवाला नं.1 यांनी घेतलेला बचाव कंपनीला कळविला नाही असे ग्राहय धरता येणार नाही. तसेच सदरचा अहवाल हा परीपत्रकाप्रमाणे नाही असे त्यांचे लेखी कैफियतीमध्ये सामनेवाला नं.1 यांनी नमुद केले, मात्र सदरचा अहवाल हा तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेला आहे. त्यावेळी जे लोक उपस्थित होते त्यांची नांवे व सहया नमुद आहे. तसेच तक्रारदाराने सदर पिकापोटी घेतलेली काळजी याबाबत सुध्दा त्यामध्ये नमुद केलेले आहे. कांदा पाहाणी अहवालात कांदे वेगवेगळे कशा प्रकारे आले आहेत त्याचा पुराव्यानिशी अहवालामध्ये नमुद आहे. यावरुन ही बाब स्प्ष्ट होते की बियाणामध्ये भेसळ होती तसेच तक्रारदार यांनी तोंडी युक्तीवादातील सदर 16 पुडयापैकी 1 पुडा जो शिल्लक आहे तो मंचासमोर सादर केलेला आहे व तो पुडा सामनेवाला नं.1 कंपनीचाच आहे व त्याचे नाव पुडयावर नमुद आहे ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. प्रकरणात तक्रारदाराने नमुद केलेले बियाणे हे सामनेवाले नं.1 या कंपनीने उत्पादन केलेले आहे व सामनेवाला नं.2 हे कंपनीचे डीलर आहेत. सामनेवाला नं.2 यांनी सदर बियाणाची विक्री केलेली आहे ही बाब तक्रारदाराने सिध्द केलेली आहे. पंचनाम्याची पाहाणी केली असता, सदर बियाणामध्ये भेसळ होती ही बाब स्पष्ट होते. सबब भेसळयुक्त बियाणे सामनेवाला नं.1 कंपनीचे सामनेवाला नं.2 दुकानदारामार्फत विकले आहेत. सदरच्या बियानाचे पिक हे भेसळयुक्त आले आहे व त्याबाबत पाहणी अहवालात नमुद केले आहे. यावरुन तक्रारदारप्रति सामनेवाला यांची सेवेत त्रुटी केली आहे असे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. तक्रारीत दाखल केलेल्या पाहाणी अहवालावरुन कांदे हे जोडकांदे, डेंगळयास्वरुपाचे कांद, डार्क रेड कांदे व गावरान (रेड लाईट) कांदे, पांढरे कांदे असे भेसळयुक्त कांदे आले आहेत. सामनेवालाने दाखल केलेल्या दस्तावरुन वातावरण, हवामान यानुसार कांदे डेंगळे, जोडकांदे येऊ शकतात. मात्र पांढरा कांदा येणे ही बाब भेसळ असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांना कांदयाचे पिक मिळाले परंतू सदरचा पांढरा कांदा हा विकला, पण किती किंमतीला विकला याबाबत पुरावा दाखल केला नाही. ज्या प्रमाणात पिकाचे उत्पन्न मिळायला पाहिजे होते तेवढे उत्पन्न मिळाले नाही. त्यावेळी बाजारभाव काय होता हे स्पष्ट करणारा दस्त दाखल नाही. त्यामुळे निश्चीत नुकसान किती झाले हे स्पष्ट होत नाही. मात्र तक्रारीमध्ये तक्रारदाराने कथन केले की, संपुर्ण नुकसान रु.1,50,000/- झालेले आहे. त्यामध्ये जे पिक आले ते तक्रारदाराने विकले आहे. त्याला भाव कमी मिळाला परंतु त्याचा पुरावा दाखल नाही. मात्र 20 टक्के कांदा पांढरा आला, त्यामुळे या कांदयाचा भाव काय मिळाला याबाबत पुरावा दाखल नाही. मात्र पांढरा कांदा 20 टक्के आला आहे ही बाब पाहाणी अहवालवरुन स्पष्ट होते. त्यामुळे संपुर्ण रकमेमधुन 20 टक्के रक्कम तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणुन देण्याचे मंचाचे मत ठरले आहे. तसेच जे बियाणे तक्रारदाराने खरेदी केले ते भेसळयुक्त होते, त्यामुळे सदर बियाणांच्या बिलाची रक्कम रु.16,800/- निशाणी 6/2 व 1050/- निशाणी 6/3 अशी एकुण बिलाची रक्कम रुपये 17,850/- तक्रारदाराला परत करण्यात यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब तक्रारदाराला रक्कम रुपये 30,000/- रक्कम नुकसान भरपाई पोटी देण्यात येत आहे. तसेच बियाणे खरेदी केल्याची रक्कम रुपये 17,850/- तक्रारदाराने सामनेवाला नं.2 कडून खरेदी केली. त्यामुळे सदरची रक्कम सामनेवाला नं.1 व नं.2 यांनी तक्रारदाराला परत करण्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
10. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श -
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला नं.1 व नं.2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना भेसळयुक्त बियाणांमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रु.30,000./- (रक्कम रुपये तीस हजार फक्त ) व बियाणांच्या खरेदी बिलाची रक्कम रुपये 17,850/- (रक्कम रुपये सतरा हजार आठशे पन्नास फक्त) या आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावी. मुदतीत रक्कम न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्के दराने संपुर्ण रक्कम फिटेपावेतो व्याज द्यावे.
3) सामनेवाला नं.1 व नं.2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- [रक्कम रुपये पाच हजार फक्त] व या तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- [रक्कम रुपये पाच हजार फक्त] तक्रारदार यांना दयावा.
4) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क दयावी.
5) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तास परत दयावी.