निकालपत्र :- (दि.23.09.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 6, 7, 9, 10 व 11 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.5 यांनी स्वतंत्र म्हणणे दाखल केले आहे. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेव पावतीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | मुदतपूर्ण तारीख | 1. | 195 | 12000/- | 26.07.2008 | 2. | 198 | 3000/- | 16.08.2008 |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार तोंडी व लेखी मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सामनेवाला यांचेशी ठेव पावत्या मिळणेकरिता केलेला पत्रव्यवहार इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.2, 6, 7, 9, 10 व 11 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार हे समीर शहाबुद्दीन पथरवट या कर्जदाराने दि.08.09.2004 रोजी घेतलेल्या रक्कम रपये 3,500/- इतक्या कर्जास जामीनदार असून सदर कर्ज थकित आहे. दि.30.06.2008 रोजीअखेर सदर कर्ज खातेवर रुपये 8,369/- येणेबाकी आहे. कर्जदार व जामीनदार यांना तोंडी सुचना देवूनसुध्दा काहीही रक्कम जमा केलेली नाही. सदरचे कर्ज भागविणेस कर्जदार व जामीनदार हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. तसेच, रुपये 3,000/- ची ठेव पावती क्र.198 तक्रारदारांचे नांवे नसलेमुळे ती तक्रारदारांना मागणी करता येणार नाही. सबब तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.2, 6, 7, 9, 10 व 11 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत कर्जरोखा, प्रॉमिसरी नोट, कर्ज मागणी अर्ज, कर्ज खाते उतारा इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) सामनेवाला क्र.5 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत नमूद ठेवी तक्रारदारांच्या नांवे नसल्याने त्या मागणेचा अधिकार तक्रारदारांना नाही. तक्रारदारांनी ठेव ठेवली त्यावेळी प्रस्तुत सामनेवाला हे संचालक नव्हते. तसेच ते तदनंतर स्विकृत संचालक म्हणून होते व आहेत. तशा कागदोपत्री नोंदी आहेत. सामनेवाला संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व अन्य संचालक यांनी हितसंबंधीत नातेवाईकांना नियमबाहय कर्जवाटप केलेने कर्जे थकित आहेत. त्यामुळे सदर रक्कम देणेसाठी संबंधित संचालक, कर्जदार यांचेवर कार्यवाही होणे जरुरीचे आहे. तक्रारदार हे समीर शहाबुद्दीन पाथरवट यांचे कर्जास जामीनदार असून सदरचे कर्ज रुपये 8,369/- थकित आहे. ते भागविणेची जबाबदारी तक्रारदारांनी कागदोपत्री स्विकारली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (8) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदार हे समीर शहाबुद्दीन पाथरवट यांच्या कर्जास जामीन असून सदरचे कर्ज थकित असल्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या ठेव रक्कमेची मागणी करता येणार नाही असे कथन केले आहे. सदर कथनाच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी कर्जरोखा, प्रॉमिसरी नोट, कर्ज मागणी अर्ज, कर्ज खाते उतारा इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार हे समीर पाथरवट यांनी दि.08.09.2004 रोजी घेतलेल्या रक्कम रपये 3,500/- इतक्या कर्जास जामीनदार असून सदर कर्ज थकित असल्याचे दिसून येते. तथापि, सामनेवाला यांनी सदर कर्ज प्रथम कर्जदाराकडून वसुल करणेकरिता कार्यवाही करणे आवश्यक आहे व कर्ज वसुली झाली नाही तर जामीनदाराविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन कर्ज वसुली करणे आवश्यक आहे. परंतु, सामनेवाला यांनी तशी प्रथम कर्जदार यांचेविरुध्द व त्यानंतर जामीनदार यांचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. तसेच, तक्रारीत नमूद ठेव पावत्या या सदर कर्जास तारण ठेवलेबाबतही कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सदर ठेव पावत्या कर्जदार, समीर पाथरवट यांच्या कर्जास तारण नसल्याने सामनेवाला यांना तक्रारदारांच्या ठेव रक्कमा नाकारता येणार नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच सामनेवाला यांचे सदरचे कथन फेटाळून लावत आहे. (9) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात ठेव पावती क्र.198 ही तक्रारदारांच्या नांवे नसल्याने तक्रारदारांना सदर पावतीवरील रक्कमेची मागणी करता येणार नाही असे कथन केले आहे. सदर ठेव पावती क्र. 198 ही पावती कु.इरमतयब्बा हाऊण भालदार यांच्या नांवे असल्याचे दिसून येते. सदर ठेवीदार हे तक्रारदार म्हणून प्रस्तुत कामी सामिल नाहीत. तक्रारदारांना इतर ठेवीदारांच्या ठेव रक्कमा मागणीबाबत वैध स्थिती (Locus-standi)येत नाही. त्यामुळे तक्रारदारांना इतर ठेवीदारांच्या ठेव रक्कमांची मागणी करता येणार नाही. सबब, तक्रारदार, शहाबुद्दीन बापूलाल जमादार हे केवळ त्यांचे नांवे असलेल्याच ठेव पावतीची रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1, 2, 4 ते 12 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.3 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावती क्र.195 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावती ही दामदुप्पट ठेवीची असून तिची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर दामदुप्पट ठेव पावतीवरील मुदतपूर्ण रक्कम रुपये 24,000/- मुदत संपलेल्या तारखेपासून (दि.26.07.2008) द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1, 2, 4 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.3 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.195 वरील दामदुप्पट रक्कम रुपये 24,000/- (रुपये चोवीस हजार फक्त) द्यावी. सदर रक्कमांवर दि.26.07.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र.1, 2, 4 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.3 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |