नि.23 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 178/2010 नोंदणी तारीख – 28/7/2010 निकाल तारीख – 3/11/2010 निकाल कालावधी – 95 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री शितल लक्ष्मण जाधव रा.पुसेगाव ता.खटाव जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता स्वाती जाधव) विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कं.लि. मॅनेजर किरण बोबे, 3, मिडिलटन स्ट्रीट, पोस्ट बॉक्स नं.2999, कोलकत्ता – 700 071 तर्फे विभागीय मॅनेजर, नॅशनल इन्शुरन्स कं.लि. गणेशचंद्र चेंबर्स, आय.डी.बी.आय.बँकेशेजारी, पोवई नाका, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एस.बी.गोवेकर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी टूरीस्ट वाहतुकीचे व्यवसायासाठी पॅसेंजर बस खरेदी केली. सदरचे वाहनाचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविला होता. सदरचे वाहनास दि. 21/2/2008 रोजी पहाटे 3.15 चे सुमारास अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले. सदर नुकसानीची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी अर्जदार यांचा विमा दावा नाकारला. तसेच अर्जदार यांनी मागणी करुनही जाबदार यांनी मूळ कागदपत्रे अर्जदार यांना परत दिलेली नाहीत. सबब वाहनाचे नुकसानीची रक्कम रु.4,63,100/- व्याजासह मिळावी, मूळ कागदपत्रे जाबदार यांनी हजर करावीत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 15 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. सदरच्या व्यवसाय सुरु करणेपूर्वी अर्जदार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून मोटार वाहन कायद्यातील संबंधीत तरतुदींनुसार परमिट घेणे आवश्यक आहे. अर्जदार यांचे वाहनाने दि. 21/2/2008 रोजी प्रवास करण्यापूर्वी अर्जदारने रुट परमीट घेतलेले नव्हते. अशा प्रकारे अर्जदार यांनी पॉलिसीचे अटी व शर्तीप्रमाणे कराराचा भंग केला आहे. त्यांनी विनापरमिट वाहनातून प्रवासी वाहतूक केली आहे. अर्जदार यांनी अपघात झालेनंतर दि.22/2/2008 रोजी सातारा आर.टी.ओ. ऑफिसमधून रुट परमिट घेतलेले आहे. म्हणून जाबदार यांनी योग्य कारणासाठी अर्जदारचा दावा नाकारला आहे. सर्व्हेअर यांचे अहवालानुसार नुकसान भरपाई रक्कम रु.1,84,500/- होत आहे, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री जाधव यांनी व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री गोवेकर यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांनी त्यांचे प्रवासी वाहतुकीच्या बसची अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई जाबदार यांचेकडून मिळावी म्हणून तक्रारअर्ज दाखल केला आहे. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांचे वाहनाने दि. 21/2/2008 रोजी प्रवास करण्यापूर्वी अर्जदारने रुट परमीट घेतलेले नव्हते. त्यांनी अपघातादिवशी विनापरमिट वाहनातून प्रवासी वाहतूक करुन पॉलिसीचे अटी व शर्तीप्रमाणे कराराचा भंग केला आहे. अर्जदार यांनी अपघात झालेनंतर दि.22/2/2008 रोजी सातारा आर.टी.ओ. ऑफिसमधून रुट परमिट घेतलेले आहे. म्हणून जाबदार यांनी योग्य कारणासाठी अर्जदारचा दावा नाकारला आहे. जाबदार यांनी त्यांचे सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.18 सोबत प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी अर्जदार यांना दिलेले परमिट दाखल केले आहे. सदरचे परमीट हे दि.22/2/2008 ते 23/2/2008 या दोन दिवसांसाठी असल्याचे दिसून येते. परंतु अर्जदारचे वाहनास दि.21/2/2008 रोजी अपघात झालेला आहे. अपघातसमयी म्हणजे दि.22/2/2008 रोजी अर्जदार यांनी त्यांचे वाहनाचे कोणतेही वैध परमिट याकामी हजर केलेले नाही. सदरची बाब विचारात घेता अपघाताचे दिवशी अर्जदारचे प्रवासी वाहतुक करणा-या वाहनास परमिट नव्हते ही बाब स्पष्ट होते. सबब अर्जदार यांचा विमादावा परमिट नसल्याचे कारणावरुन नाकारणेचा जाबदार यांचा निर्णय योग्य, संयुक्तिक व कायदेशीर आहे असे या मंचाचे मत आहे. 6. अर्जदारने त्यांचे तक्रारअर्जात जाबदार यांना दिलेली वाहनाची मूळ कागदपत्रे परत मिळावीत अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी त्यासाठी नि.5 सोबत जाबदार यांचे दि.19/7/10 चे पत्र दाखल केले आहे. सदरचे पत्र पाहता अर्जदार यांची संबंधीत क्लेमबाबतची मूळ कागदपत्रे जाबदार यांचेकडे असल्याचे स्पष्ट दिसते. तसेच जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये अर्जदार यांची मूळ कागदपत्रे त्यांनी अर्जदारास दिलेली नाहीत ही बाब नाकारली नाही. सबब न्यायाच्या दृष्टीने सदरची कागदपत्रे जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावीत असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांचे वाहनाची सर्व मूळ कागदपत्रे अर्जदार यांना द्यावीत. 3. जाबदार यांनी अर्जदार यांना अर्जाचे खर्चापोटी रु.500/- द्यावेत. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 3/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |