::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 04/01/2016 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ता क्र. 1 यांच्या मालकीची मौजे भेंडीसुत्रक ता. बार्शिटाकळी येथील 1 हे. 61 आर शेत जमिन असून तक्रारकर्ता क्र. 2 यांच्या मालकीची 80 आर शेत जमिन आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2013 -2014 या वर्षाच्या खरीप हंगामात त्यांच्या शेतीत सोयाबीन, तुर आणि तिळ तसेच मुग या पिकाची पेरणी केली. योग्य ती मशागत केल्यानंतर पिकाची वाढ उत्तम प्रकारे झाली. तक्रारकर्त्यांनी दि. 26/08/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानातून विरुध्दपक्ष क्र. 1 कंपनीचे उत्पादन “ अल्फा सल्फान” नावाची एक लिटर व 500 मी.ली. अशा दोन बॉटल औषधी आपल्या शेतातील पिकावर फवारणी करिता विकत घेतल्या, त्याचे बिल क्र. 2377 आहे. पिक फुलोऱ्यावर असतांना दि. 30/08/2014 रोजी सदर औषधाची फवारणी पिकावर केल्यानंतर सदर पिक काही तासातच जळून गेले. या बाबतची तक्रार दि. 01/09/2014 रोजी तालुका तक्रार निवारण समितीकडे केली, त्या अनुषंगाने समितीने दि. 10/09/2014 रोजी तक्रारकर्त्याच्या शेतातील पिकाच्या अवस्थेची पाहणी करुन पंचनामा केला. सदर समितीने जळालेल्या पिकाच्या पानासह अवशेषाचे नमुने घेतले, त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने फवारणी केलेले, विरुध्दपक्ष क्र. 1 चे कंपनीच्या औषधाचे अंदाजे 50 मी.ली औषध तपासणी करिता प्रयोग शाळेमध्ये पाठविले. सदर नमुना औषधीचा अहवाल दि. 14/10/2014 रोजी समितीला प्राप्त झाला असून त्या अहवालावरुन असे स्पष्ट झाले की, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या किटक नाशक औषधातील “अल्फा सायफर” चे प्रमाणे 1 टक्का असायला पाहीजे होते, परंतु सदर प्रमाण हे 3.43 टक्के आढळले व त्यामुळे संपुर्ण पिक जळाले असून पिकाचे 100 टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. यावरुन सिध्द झाले की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले किटक नाशक हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. यामुळे तक्रारकर्त्याचे अंदाजे रु. 3,00,000/- इतक्या सोयाबिन पिकाचे, रु. 40,000/- इतक्या तुर पिकाचे व रु. 40,000/- इतक्या मुग पिकाचे तसेच रु. 30,000/- इतक्या तिळ पिकाच्या उत्पादनाचे नुकसान झाले. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर करण्यात यावी व पिकांच्या नुकसान भरपाई पोटी एकूण रु. 4,10,000/- , शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 40,000/- व रु. 20,000/- तक्रार व इतर खर्चाबद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्याकडून व्याजासह मिळावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 12 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लेखी जवाब दाखल केला असून, त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारीतील बहूतांश आरोप नाकबुल केलेले आहेत व अधिकचे कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने संपुर्ण खोटी तक्रार दाखल केली असून, अल्फा सल्फान या औषधाच्या पाकीटावर, सदर औषधाबाबत संपुर्ण माहीती दिली आहे, या पाकीटावर स्पष्ट उल्लेख केलेला आहे की, सदर औषध हे फक्त कपाशी या पिकावर डेडू सुंडी या किटकावर फवारणीसाठी आहे. तक्रारकर्ता यांनी बेजबाबदारपणे सोयाबीन या पिकावर सदर औषधाची फवारणी केली असल्याने, त्याच्या झालेल्या नुकसानास सर्वस्वी तक्रारकर्ताच जबाबदार आहे. विरुध्दपक्ष यांनी किटकनाशक उत्पादक कायदा 1968 च्या कलम 9(4) प्रमाणे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. तक्रारकर्त्याने नमुद केल्याप्रमाणे त्याने अल्फा सल्फान सोबत बुमफ्लावर हे औषध मिसळून फावरणी केली होती, बुम फ्लावर या औषधाच्या वापरावर व विक्रीवर महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांनी बंदी आणली आहे. या प्रकरणात बुम फ्लावर उत्पादक कंपनीला पक्ष करणे आवश्यक होते. किटक नाशक कायदा 1968 नुसार नमुना काढतेवेळी नमुना फक्त सीलबंद बॉटल मधून घेणे आवश्यक असते, सदर नमुना हा केवळ 50 मी.ली. शिल्लक राहीलेल्या व वापरलेल्या बॉटल मधून घेण्यात आला व तक्रारकर्त्याने फवारणीच्या वेळी दुसरे औषध मिसळून फवारणी केली होती. तक्रारकर्ता व पंचकमीटी यांनी अल्फा सल्फानची 50 मी.ली. किटकनाशक नमुना प्रयोगशाळा अमरावती यांच्याकडे तपासणीसाठी पाठविले व त्यांनी दिलेल्या अहवालानुसार क्लोरफायरीफॉस 16 टक्के अधिक अल्फा सल्फान 3 टक्के असे प्रमाण आढळले, तसेच बाजारात या किटकनाशकापेक्षा जास्त घटक असलेले कलोरोपायरीफॉस 50 टके अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के व अल्फा सायपरमेथ्रीन 10 टक्के पिकावर फवारणी केल्यास कोणतेही विपरीत परिणाम पिकावर आढळत नाही. तक्रारकर्ता यांनी दिलेल्या दि. 1/9/2014 च्या तक्रारीमध्ये कुठेही शेताचा सर्वे नंबर तसेच क्षेत्राचा उल्लेख नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे कडून विरुध्दपक्ष क्र. 2 यांना अंदाजे 200 लि. अल्फा सल्फान ही औषधी विकली असून, तक्रारकर्ता यांचे व्यतीरिक्त इतर कोणत्याही शेतकऱ्याची अशा बद्दलची किंवा कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच तक्रार समितीच्या अहवालामध्ये फक्त सोयाबीन पिकाची तपासणी झाली असल्याचे नमुद आहे, पण तक्रारकर्त्याने तुर, मुग व तिळ या पिकांची सुध्दा नुकसान भरपाई मागीतली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची संपुर्ण तक्रार खोटी व चुकीची असल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार विरुध्दपक्ष बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके विक्रीचा व्यवसाय करतात, किटक नाशक औषधी, कंपनीकडून सिलपॅकच खरेदी करुन शेतकऱ्याला सिलपॅकच विक्री करण्यात येते. तक्रारकर्ते यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना अल्फासल्फान औषधी दिलेली आहे. अल्फासल्फान ही औषधी नॅशनल पेस्टीसाईड ॲन्ड केमिकल्स, अमरावती यांच्याकडून 120 लिटर खरेदी केले होते व तक्रारकर्ता वगळता ती इतर शेतकऱ्यांना सुध्दा सदर औषधाची विक्री करण्यात आली व त्यांच्या शेतातील पिक टवटवीत व हिरवेगार झालेले आहे. विरुध्दपक्ष किटकनाशक औषधीचा उत्पादक नसुन फक्त विक्रेता आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा दाखल केला. तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतीउत्तर, विरुध्दपक्ष क्र. 1 चा पुरावा व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे..
सदर प्रकरणात उभय पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानातून विरुध्दपक्ष क्र. 1 उत्पादीत “ अल्फासल्फान” नावाचे किटकनाशक औषध, त्यांच्या शेतातील पिकावर फवारणी करण्याकरिता विकत घेतले होते. तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत, या बद्दलचा आक्षेप विरुध्दपक्षास नाही.
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, सदर अल्फासल्फान किटकनाशकाची फवारणी त्यांच्या शेतातील सोयाबीन, तुर, तीळ तसेच मुंग या पिकांवर केली असता काही तासातच पिक जळुन खाक झाले होते, त्यामुळे तक्रारकर्ते यांचे आर्थिक नुकसान झाले. या बद्दलची तक्रार तालुका तक्रार निवारण समितीकडे केली असता, त्यांनी शेताचा पंचनामा केला व सदर किटकनाशक औषध प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले. तपासणीचा अहवाल, समितीला प्राप्त झाला, त्यानुसार सदर किटक नाशक औषधात अल्फासायफरचे प्रमाण 1 टक्का असायला पाहीजे तर ते 3.43 टक्के आढळले, त्यामुळे संपुर्ण पिक जळाले व 100 टक्के नुकसान झाले, त्याबद्दलचा समितीचा अहवाल तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केला.
यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दस्तऐवज दाखल करुन, असा युक्तीवाद केला की, विरुध्दपक्षाचे अल्फासल्फान हे किटकनाशक औषध फक्त कपाशी या पिकावर डेंडु सुंडी किटकावर फवारणीसाठी आहे व तक्रारकर्ते यांनी ते कपाशी पिकावर न वापरता सोयाबीन पिकावर वापरले, यात विरुध्दपक्ष क्र. 1 चा दोष नाही. तसेच तक्रारकर्ते यांनी या औषधाबाबत दुस-या कंपनीचे बुम फ्लावर या औषधाचा उपयोग केला, जे वापरण्यावर बंदी आहे, त्यामुळे तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मंचात स्वत: हजर होवून असे सांगितले की, ते किटक नाशकाची विक्री, परवान्यानुसार करतात. तक्रारकर्ते यांच्या मागणीनुसार सदर किटकनाशक औषध सिलपॅक अवस्थेत विरुध्दपक्षाने त्यांना दिले होते. ते उत्पादक नसल्यामुळे त्यांची जबाबदारी येत नाही.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, दाखल दस्त तपासले असता, असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी जरी शेतातील सोयाबीन, तुर, तिळ व मुंग पिकाचे नुकसान झाले, असे कथन केले तरी तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल व पंचनामा, या दस्तावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी अल्फासल्फान व बुमफ्लावर ही एकत्रित किटकनाशक फवारणी फक्त सोयाबिन पिकावर केली होती व सोयाबीन पिक जळाले होते. तक्रारकर्ते यांनी तक्रारीत बुमफ्लावर या किटकनाशकाच्या उत्पादीक कंपनीला पक्ष केलेले नाही, तसेच त्याबद्दल तक्रारही केली नाही. त्यामुळे फक्त अल्फासल्फान बद्दलचा अहवाल गृहीत धरता येणार नाही. समितीने अल्फासल्फान हे किटकनाशक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते, असे अहवालावरुन समजते. समितीने अहवालात असेही नमुद केले की, प्रयोगशाळेतील अहवलानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 च्या किटकनाशक औषधातील अल्फा सायपर चे प्रमाण 1 टक्का असायला पाहीजे, ते 3.43 टक्के आढळले, त्यामुळे सोयाबीन पिक जळाले. परंतु विरुध्दपक्षाने अल्फासल्फानचे लिफलेट फॉरमेट, लेबल ईत्यादी दस्तऐवज मंचात दाखल केले आहे. त्यातील माहीतीवरुन असे आढळते की, सदर अल्फासल्फान हे किटकनाशक औषध कपाशी या पिकावर “डेडु सुंडी” या किटकावरील फवारणीसाठी आहे. तक्रारकर्ते यांनी ते सोयाबिन या पिकावर वापरल्यामुळे तक्रारकर्ते यांची हानी झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्र. 1 ची सेवा न्युनता गृहीत धरता येणार नाही. दाखल केलेल्या दस्तांवरुन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी किटकनाशक उत्पादक कायदा 1968 च्या कलम 9 (4) नुसार प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, असे दिसते.
सबब तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंजुर करता येणार नाही, म्हणून अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाही.
सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.