सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 51/2012
तक्रार दाखल दि.03-04-2012.
तक्रार निकाली दि.20-08-2015.
श्री. रामचंद्र अंकुश नावाडकर,
रा.सोनापूर,पो.नागठाणे,
ता.जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. नॅशनल इन्श्यूरन्स कं.लि.,,
सातारा शाखा,
पत्ता- ‘गणेशचंद्र चेंबर्स’, 172-क,
रविवार पेठ,पोवई नाका, सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.आर.ए.मुलाणी.
जाबदारतर्फे– अँड.एस.बी.गोवेकर.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे रा.सोनापूर पो.नागठाणे ता.जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदाराने महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीची मॅक्स मॉडेलची काळी-पिवळी जीप क्र.एम.एच.12-एम 859 ही खरेदी केली आहे. प्रस्तुत गाडीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला असून याचा पॉलीसी नं. 270104/31/06/6300010670 असा असून सदरचा विमा कालावधी दि.16/2/2007 ते दि.15/2/2008 असा असून अपघात तारखेस म्हणजेच दि.23/12/2007 रोजी तो चालू होता. तक्रारदाराचे वर नमूद जीपचा परवाना नंबर एमएच/160/जीप/टॅक्सी हा दि.17/3/2009 पर्यंत ग्राहय होता. तक्रारदार दि. 23/12/2007 रोजी त्याचे नमूद जीप घेवून सातारा येथून नागठाणे यागावी पुणे-बेंगलोर हायवे वरुन निघाला असता प्रस्तुत गाडीत 4 ते 5 प्रवासी होते. तसेच सदर गाडी रस्त्याचे डावे बाजूने जात असता मागील बाजूकडून अचानक सदर जीपला एक कार नं. यूपी-78/ एबी-7916 हीने भरधाव वेगात येवून पाठमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघात होवून तक्रारदाराची जीप रस्त्याच्या कठडयाला धडकून जागेवरच पलटी झाली व सदर अपघात गाडीतील प्रवासीही जखमी झाले. प्रस्तुत अपघातात तक्रारदाराचे जीपचे चॅसी, पाटे, इंजिन, कलर, काच, बोनेट, कुशन याचे सुमारे रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) चे नुकसान झाले आहे. प्रस्तुत अपघातानंतर झालेल्या नुकसान भरपाईसाठी तक्रारदाराने जाबदार यांचेकडे क्लेमफॉर्म सादर केला व मागणीप्रमाणे सर्व कागदपत्रांची जाबदार विमा कंपनीत पूर्तता केली. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा क्लेमची रक्कम अदा केली नाही व जाबदाराने तक्रारदारास दि. 26/3/2010 रोजी पत्र पाठवून प्रस्तुत क्लेम निकाली काढलेबाबत कळविले. वास्तविक तक्रारदाराने विमा पॉलीसीतील कोणत्याही अटी/शर्तींचा भंग केलेला नाही तसेच जाबदाराचे मागणीप्रमाणे सर्व कागदपत्रांची तक्रारदाराने पूर्तता करुनही जाबदाराने विमाक्लेमची रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही. तर ‘claim not perused by claimant’ असे कारण देवून क्लेम तक्रारदाराला विमा रक्कम अदा केली नाही व प्रस्तुत विमा क्लेमची फाईल No-Claim म्हणून बंद केली आहे. ही सेवेतील त्रुटी असलेने तक्रारदाराने प्रस्तुत विमा कंपनीकडून विमा क्लेमची सर्व रक्कम वसूल होवून मिळणेसाठी सदर तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून जीप नं.एम.एच.-12-एम-859 चे दि.23/12/2007 रोजी झाले अपघातामुळे झालेली नुकसानभरपाईची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) वसूल होवून मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदारकडून रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त ) व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) वसूल होवून मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/11 कडे अनुक्रमे प्रस्तुत गाडीच्या अपघाताचा खबरी जबाब, घटनास्थळ पंचनामा, गाडीचे आर.सी.टी.सी.बुक, तक्रारदाराचे ड्रायव्हींग लायसन्स, गाडीचे परमीट, फिटनेस सर्टीफिकेट, ड्रायव्हरचा बॅचची व पी.यू.सी.ची नक्कल, गाडीच्या विमा पॉलीसीची नक्कल, तक्रारदाराने जाबदाराकडे भरुन दिलेले क्लेमफॉर्मची नक्कल, जाबदाराने तक्रारदाराला पाठविले पत्राची मूळ प्रत, तक्रारदाराचे सदर जीपची दुरुस्तीची खर्चाची बिले, नि. 21 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 24 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. जाबदाराने प्रस्तुत कामी नि. 19 कडे म्हणणे/कैफीयत, नि. 20 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 23 कडे प्रस्तुत कामी जाबदाराने दाखल केलेले म्हणणे व म्हणण्याचे अँफीडेव्हीट हाच पुरावा समजणेत यावा म्हणून पुरसीस, नि. 25 कडे प्रस्तुत कामी जाबदाराने दाखल केली कैफीयत अँफीडेव्हीट व कागदपत्रे हाच जाबदार यांचा लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणन पुरसीस, नि.26 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांचे म्हणणे/कैफीयत मध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला नव्हता व नाही. परंतू तक्रारदार यांना जाबदार यानी कागदपत्रांची वारंवार मागणी करुनही तक्रारदार यांनी जाबदारांकडे कागदपत्रांची पूर्तता केली नसलेने तक्रारदाराचा विमा क्लेम ‘Claim is not Pursued by the applicant’ म्हणून दिलेला नाही. त्यामुळे प्रस्तुत क्लेम दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथनास कोणाही कायदेशीर कागदपत्रांचा आधार नाही तरी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा. जाबदाराने याकामी 2003 CPJ 442 Hemlal N. Ratan V/s. New India Assurance Co. Ltd. हा मे. राज्य आयोग, मुंबई यांचा न्यायनिवाडा दाखल केला आहे. तसेच प्रस्तुत कामी तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम एक लाख ही अवास्तव व अवाजवी आहे. तसेच जाबदार यांचे कंपनीचे सर्व्हेअर यांचा व्हॅल्यूएशन रिपोर्ट तक्रारदाराने मंचात दाखल केलेला नाही. तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा क्लेम न देवून
तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने त्यांचे मालकीच्या महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीच्या मॅक्स मॉडेलची जीप रजि.नं. एम.एच. 12 एम.859 या गाडीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला आहे. त्याचा पॉलीसी नंबर 270104/31/06/6300010670 असा असून सदर विमा पॉलीसीचा कालावधी दि.16/2/2007 ते दि.15/2/2008 असा होता. तक्रारदाराचे गाडीला दि.23/12/2007 रोजी अपघात झाला या बाबी जाबदाराने मान्य व कबूल केल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद सत्य आहे. तसेच सदरचा अपघात झालेनंतर तक्रारदाराला सदर गाडीला अपघातामुळे झालेली नुकसानभरपाई मिळणेसाठी जाबदार विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म व सोबत सर्व कागदपत्रे जोडून सादर केला. परंतू जाबदार विमा कंपीनीने तक्रारदाराचा विमा क्लेम तक्रारदाराने मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली नाही. म्हणून “Claim not Pursued by Claimant” म्हणून ‘तक्रारदाराचा विमा क्लेमची फाईल बंद केली’ असे तक्रारदाराला दि.26/3/2010 चे पत्राने कळविले व तक्रारदाराची विमा क्लेम रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही ही बाब दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. तसेच जाबदाराने ही प्रस्तुत बाब मान्य केली आहे. जाबदाराने त्यांचे म्हणण्यामध्ये घेतले आक्षेपाप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराचे मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली नाही हे जाबदाराने सिध्द केलेले नाही. कारण जाबदाराने तक्रारदाराला कागदपत्रांची मागणी केलेचे पत्र किंवा इतर कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदाराने मे मंचात दाखल केलेला नाही. तसेच जाबदाराने त्यांचे म्हणण्यात म्हटलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार कंपनीच्या सर्व्हेअरचा सर्व्हे रिपोर्ट मे मंचात दाखल केलेला नाही. परंतू तक्रारदाराने विमा क्लेम जाबदाराकडे दाखल केलेवर किंवा अपघाताची घटना जाबदाराला समजताच जाबदाराने त्यांचे सर्व्हेअरमार्फत अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करणे जाबदार यांचेवर बंधनकारक असतानाही जाबदारानेच या गोष्टींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने सर्व्हे रिपोर्ट/व्हॅल्यूएशन रिपोर्ट दाखल केला नाही. तक्रारदाराने दुरुस्तीस आले खर्चाच्या पावत्या मंचात दाखल केल्या आहेत. त्यामुळे याबाबत जाबदाराला आक्षेप घेता येणार नाही असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारदाराने जाबदाराचे मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केलेली नव्हती ही बाब जाबदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे कथनाप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम न देवून/विमा क्लेमची फाईल बंद करुन तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे याकामी जाबदाराने दाखल केलेला केस-लॉ लागू होत नाही. सबब तक्रारदार यांना त्यांचे जीपचे अपघातात झाले नुकसानीबाबत नुकसानभरपाईचा विमा क्लेम जाबदारकडून मिळणे न्यायोचीत वाटते. सबब प्रस्तुत विमा क्लेमपोटी जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला त्याचे जीपचा दि. 23/12/2007 रोजी झाले अपघातामुळे झालेली नुकसानभरपाईची रक्कम अदा करणे न्यायोचीत होईल असे मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला त्याची जीप रजि.नं.एम.एच.12 एम.859 या गाडीचा दि. 23/12/2007 रोजी झाले अपघातामुळे झाले नुकसानभरपाईची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) अदा करावी. प्रस्तुत विमा क्लेम रकमेवर जाबदाराने दि.26/3/2010 रोजी पासून म्हणजेच तक्रारदाराची विमा क्लेम फाईल बंद केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रारदाराला अदा करावे.
3. तक्रारदार यांना झाले मानसिक त्रासासाठी रक्कम व अर्जाचे खर्चापोटी
म्हणून जाबदार विमा कंपनीने रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र)
तक्रारदाराला अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसांचे आत करावे.
5. विहीत मुदतीत जाबदाराने आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक
संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची
मुभा राहील.
6. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.20-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.