नि. 20
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल – रजेवर
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2149/2009
तक्रार नोंद तारीख : 01/10/2009
तक्रार दाखल तारीख : 14/10/2009
निकाल तारीख : 03/07/2013
------------------------------------------------
फासणे टेस्ट इक्विपमेंट प्रा.लि.
के.55, एम.आय.डी.सी. एरिया
कुपवाड ब्लॉक सांगली तर्फे
श्री विठ्ठल विनायक पाटील
रा.मगदुम मळा, मिरज ता.मिरज जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
जैन बोर्डींग कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड,
सांगली 416 410 ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एन.पी.मेडसिंगे
जाबदारतर्फे : अॅड श्री पी.डी.कुलकर्णी
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली दाखल करुन, जाबदार विमा कंपनीने त्यास दिलेल्या सदोष सेवेबद्दल रक्कम रु.76,265/- व त्यावर द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज याची मागणी केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने उत्पादित केलेली फासणे मेक डायनॅमिक हार्डनेस टेस्टर Model DHT6, Sr.No. 540/2008 ही मशिन मे. रॉकवेल हार्डनेस टेस्टींग, दिल्ली या ठिकाणी पाठविण्याकरिता XPS Cargo Services सांगली-कोल्हापूर रोड, अंकली यांचेमार्फत दि.30/1/08 रोजी तक्रारदाराने पाठविली. सदर मशिनची किंमत रु.53,265/- इतकी होती. सदर मशिनच्या वाहतुकीमधील सुरक्षिततेकरिता तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे पॉलिसी नं.270802/21/07/4400000001 Declaration Cover Note No.019 दि.30/1/08 अन्वये विमा उतरविला होता. सदरची मशिन दिल्ली येथील पत्त्यावर मिळाली नाही. त्याबाबत सदर ट्रान्स्पोर्ट कंपनीला तक्रारदाराने वारंवार कळविले होते. तसेच जाबदार विमा कंपनीला दि.22/2/08 रोजी कळविले होते. दि.10/6/08 रोजी तक्रारदाराने विमा कंपनीमार्फत आलेल्या पत्रानुसार सर्व उपलब्ध कागदपत्रांची पूर्तता करुन विमा दावा दाखल केला. दि.4/10/8 व 14/10/08 रोजी जाबदार विमा कंपनीने मागितल्याप्रमाणे जादा कागदपत्रेदेखील विमा कंपनीस सादर केली. सदरची मशिन अद्यापही प्राप्त झालेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम मंजूर होऊन त्यास मशिनची किंमत रु.53,265/- मिळण्यास तक्रारदार कायदेशीररित्या पात्र आहेत. तक्रारदाराने XPS Cargo Services या वाहतुकदाराविरुध्द ग्राहक मंच, सांगली येथे योग्य ती सेवा न दिल्याने नुकसान भरपाईकरिता अर्ज दाखल केला असता त्याकामी XPS Cargo Services यांनी तक्रारदारास रक्कम रु.58,000/- इतकी दिली. त्यामुळे ती तक्रार निकाली झाली. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास दि.6/4/09 रोजी पत्र पाठवून नॉन-डिलीव्हरी सर्टिफिकेट आणि कोर्ट केस पेपर्स सादर न केल्याने क्लेम नामंजूर केला आहे असे कळविले.
3. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण उपलब्ध कागदपत्रांची पूर्तता करुन देखील केवळ तक्रारदाराचे कायदेशीर देणे बुडविण्याकरिता जाबदाराने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यास दूषित सेवा दिली आहे. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवादार असे नाते होते व आहे. दि.30/4/09 रोजी तक्रारदाराने वकीलामार्फत जाबदारास नोटीस पाठवून रक्कम रु.53,265/- ची मागणी केली. ती नोटीस जाबदारास मिळून देखील जाबदार यांनी रक्कम न देता त्या नोटीसीस दि.19/5/09 रोजी खोटे व चुकीचे उत्तर दिले आहे व त्यास दूषित सेवा दिली आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने गहाळ झालेल्या मालाची किंमत रु.53,265/- अधिक त्यास झालेल्या शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.20,00/- व नोटीस खर्च रु.1,000/- आणि तक्रारअर्जाचा खर्च रु.20,000/- अशी एकूण रु.76,265/- ची मागणी केली आहे व त्यावर नमूद केल्याप्रमाणे रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 16 टक्के व्याजाची मागणी केली आहे
4. आपल्या तक्रारअर्जाच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.3 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.5 च्या फेरिस्तसोबत एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. सदरकामी जाबदार विमा कंपनीने नि.11 ला आपली लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदाराची मागणी अमान्य केली आहे. कलम 1 व 2 मधील कथने जाबदार विमा कंपनीने मान्य केली आहेत. त्यात सदरची मशिन सुखरुपपणे दिल्ली येथील पत्त्यावर पाठविण्याकरिता तक्रारदाराने विमा पॉलिसी घेतली होती ही बाब जाबदार विमा कंपनीने मान्य केली आहे. तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा जाबदार विमा कंपनीने अमान्य केली ही बाब देखील जाबदार कंपनीने मान्य केली आहे. तथापि जाबदार विमा कंपनीचे मुख्य म्हणणे असे आहे की, जोपर्यंत सदर मशिनरीची डिलीव्हरी दिलेल्या पत्त्यावर झालेली नाही हे शाबीत करणारे नॉन-डीलीव्हरी सर्टिफिकेट जाबदार विमा कंपनीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत तक्रारदाराचा क्लेम मंजूर करुन देणे केवळ अशक्य होते. सदरचे नॉन-डिलीव्हरी सर्टिफिकेट तक्रारदाराने हजर न केल्याने, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता तक्रारदाराने न केल्याने, जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला व जाबदार विमा कंपनीची ही कृती योग्य व कायदेशीर होती. ज्या ज्या वेळेला तक्रारदारतर्फे विमा दाव्यासंबंधी जाबदार विमा कंपनीकडे विचारणा करण्यात आली होती, त्या त्या वेळी जाबदार विमा कंपनीने सर्वप्रथम नॉन-डिलीव्हरी सर्टिफिकेट हे क्लेम फॉर्मसोबत दाखल करणे आवश्यक आहे असे सांगितले होते. तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता न केल्यानेच तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे. तक्रारदाराने वाहतुकदाराविरुध्द सदर घटनेकरिता नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रार दाखल केली होती व त्याकामी तक्रारदारास रक्कम रु.58,000/- इतकी देण्यात आलेली होती. त्यामुळेच एकाच घटनेबाबत अर्जदारास दुस-यांदा क्लेम दाखल करता येत नाही व तो कायद्याने चालत नाही. वाहतुकदाराविरुध्द दाखल केलेल्या तक्रारअर्जात तक्रारदाराने हेतुपुरस्सर प्रस्तुत जाबदार म्हणजेच विमा कंपनीला जाबदार म्हणून सामील केले नव्हते कारण एकाच घटनेबाबत दोन निरनिराळे दावे दाखल करुन दुहेरी फायदा घेण्याचा तक्रारदाराचा इरादा आहे. तक्रारदारास त्याने दिलेल्या नोटीशीस समर्पक उत्तर जाबदार विमा कंपनीने दिले आहे. त्याहीउपर तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार लबाडीने दाखल करुन कायद्याचा गैरवापर करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास कोणताही मानसिक शारिरिक त्रास दिलेला नाही. नॉन डिलीव्हरी सर्टिफिकेटची मागणी करणे हे कोणत्याही परिस्थितीत त्रास देणारे कृत्य होऊ शकत नाही. तक्रारदारास तक्रार दाखल करण्याकरिता कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराने दि.3/10/08 रोजी लिहून दिलेल्या Letter of Subrogation मधील शर्ती व अटींचे पालन केलेले नाही. याही कारणावरुन तक्रारदाराचा अर्ज चालण्यास पात्र नाही. या व अशा कथनांवरुन जाबदार विमा कंपनीने तक्रार खर्चासह फेटाळून लावावी अशी मागणी केली आहे.
6. जाबदार विमा कंपनीने आपल्या लेखी कैफियतीचे पुष्ठयर्थ आपले शाखाधिकारी चंद्रकांत शामराव कुलकर्णी यांचे शपथपत्र नि.12 ला दाखल केले असून नि.13 या फेरिस्तसोबत एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
7. दोन्ही पक्षकारांतर्फे कोणीही सदर प्रकरणात तोंडी पुरावा दिलेला नाही. उभय पक्षकारांच्या विद्वान वकीलांनी आपापला लेखी युक्तिवाद अनुक्रमे नि.15 व 16 ला दाखल केला आहे.
8. प्रस्तुत प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे ग्राहक होतात काय ? होय.
2. जाबदेणार विमा कंपनीने त्यास दूषित सेवा दिली
हे तक्रारदाराने शाबीत केले आहे काय ? नाही.
3. तक्रारदारास अर्जात मागणी केल्याप्रमाणे रक्कम मिळणेस ते
पात्र आहेत काय ? उद्भवत नाही.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
9. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
10. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडून सदरची मशिनरी सुरक्षित वाहतुकीकरिता व दिल्ली येथील पत्त्यावर सुरक्षितरित्या पोचती करण्याबाबत जाबदार विमा कंपनीकडून विमा घेतला होता ही बाब जाबदारांनी नाकारलेली नाही. दोन्ही पक्षकारांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये संबंधीत विमा पॉलिसी दाखल केली आहे. त्यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणारे असे नाते होते व आहे ही बाब आपोआपच सिध्द होते. करिता मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल तसे ते आम्ही दिले आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
11. प्रस्तुत प्रकरणातील बहुतांशी बाबी (facts) या जाबदार विमा कंपनीने मान्य केल्या आहेत. तक्रारदाराने संबंधीत वाहतुकदारास सोपविलेली मशिनरी दिल्ली येथे पोचती झाली नाही असे कथन केले आहे व ते कथन जाबदार विमा कंपनीने माहिती अभावी अमान्य केलेले आहे. तक्रारदाराने जाबदार विमा कंनीने वेळोवेळी मागणी केलेप्रमाणे नॉन-डिलीव्हरी सर्टिफिकेट जाबदार विमा कंपनीस सादर केलेले नाही ही बाब तक्रारदाराने अमान्य केलेली नाही. जाबदार विमा कंपनीतर्फे त्यांचे विद्वान वकील श्री पी.डी. कुलकर्णी यांनी जोपर्यंत विमाकृत वस्तू गंतव्यस्थानावर पोचली नाही हे शाबीत करणारा दस्तऐवज तक्रारदार विमा कंपनीसमोर हजर करीत नाहीत, तोपर्यंत तक्रारदारास विमा पॉलिसीची रक्कम देता येत नाही असे प्रतिपादन या मंचासमोर केले. तक्रारदार जाबदार विमा कंपनीचे मागणीप्रमाणे नॉन-डिलीव्हरी सर्टिफिकेट विमा कंपनीस सादर करु शकत नाहीत हे तक्रारदाराचे दि.4 ऑक्टोबर 2008 चे पत्रावरुन आपोआपच सिध्द होते. सदरचे पत्र तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस पाठविलेले असून त्यात वाहतुकदार नॉन-डिलीव्हरी सर्टिफिकेट देत नसल्याने तक्रारदार ते सर्टिफिकेट हजर करु शकत नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. कारणे काहीही असोत, पण जर तक्रारदार जाबदार विमा कंपनीस योग्य वाटणारा व त्यांचा संदेह दूर करणारा पुरावा सादर करुन सदरचा विमाकृत माल गंतव्यस्थानावर पोचलेला नाही हे दाखवू शकत नाहीत, तोपर्यंत जाबदार विमा कंपनी दावा मंजूर करु शकत नाहीत ही बाब जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास आपल्या दि.20/3/09 च्या पत्राने (नि.13/5) मध्ये नमूद केले आहे. किंबहुना तक्रारदाराने या मंचासमोर देखील सदरची वस्तू वाहतुकीदरम्यान गहाळ झाली व ती गंतव्यस्थानापर्यंत पोचू शकली नाही ही बाब कोणा साक्षीदारास तपासून सिध्द केलेली नाही. त्यामुळे जाबदारांचे म्हणणे की, जोपर्यंत संबंधीत वस्तू ही गंतव्यस्थानावर पोचली नाही हे यथायोग्यरित्या शाबीत होत नाही, तोपर्यंत त्यास तक्रारदाराचा विमादावा मंजूर करता येत नाही, हे योग्य वाटते. त्यामुळे तक्रारदाराचा विमादावा नाकारुन जाबदर विमा कंपनीने त्यास कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही या निष्कर्षास हे मंच आलेले आहे.
12. जाबदार विमा कंपनीतर्फे त्यांचे विद्वान वकील श्री पी.डी.कुलकर्णी यांनी तक्रारदाराने वाहतुकदाराविरुध्द दाखल केलेला ग्राहक तक्रारअर्ज व त्यांचे झालेले निर्गत व त्या प्रकरणात तक्रारदारास मिळालेली एकूण रक्कम रु.58,000/- याकडे या मंचाचे लक्ष वेधून असे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला की, एकाच घटनेबाबत तक्रारदाराने दोन प्रकरणे दाखल करुन नुकसान भरपाई मागितली असल्याने त्या कारणावरुन देखील प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. म्हणून ती नामंजूर करावी असे प्रतिपादन केले. तथापि विद्वान वकीलांच्या या युक्तिवादाचा आमच्या मते काही उपयोग नाही कारण जाबदार विमा कंपनीविरुध्द निर्माण झालेले दाव्याचे कारण आणि वाहतुकदाराविरुध्द निर्माण झालेले दाव्याचे कारण या दोन्ही गोष्टी अत्यंत भिन्न होत्या व या दोन दाव्यांच्या कारणांची सरमिसळ करणे योग्य नाही. करिता केवळ त्या कारणावरुन तक्रारदाराची तक्रार फेटाळून लावणे हे योग्य नाही. तथापि वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदारानेच ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत, त्या त्रुटींमुळे तक्रारदाराचा विमा दावा जाबदार विमा कंपनी मंजूर करु शकत नव्हती आणि म्हणून त्यांचा विमा दावा फेटाळल्याने विमा कंपनीने दूषित सेवा तक्रारदारास दिलेली नाही या निर्णयास हे मंच आलेले आहे. सबब वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
13. ज्याअर्थी तक्रारदारास जाबदार विमा कंपनीने कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही, त्याअर्थी तक्रारदारास तक्रारअर्जामध्ये नमूद केलेली कोणतीही मागणी मिळण्यास तक्रारदार पात्र नाही. सबब प्रस्तुतची तक्रार ही खर्चासह नामंजूर करावी लागेल या निर्णयास हे मंच आले आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर वर नमूद केल्याप्रमाणे देवून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत येत आहेत.
2. प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.500/- तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस द्यावेत.
सांगली
दि. 03/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष