न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून कॅटल इन्शुरन्स पॉलिसी नं. 270800/47/18/10000118 ता. 5/9/18 ते 4/9/19 या कालावधीकरिता रक्कम रु.3 लाख या रकमेची घेतलेली होती. सदरहू पॉलिसीत तक्रारदार यांच्या पाच गायींचा विमा घेतला होता. प्रत्येक गायीची विमा रक्कम रु.60,000/- अशी होती. तक्रारदार यांच्या गायीच्या कानातील बिल्ला पडल्यामुळे ता. 8/3/19 रोजी त्यांनी वि.प. यांचेकडे नवीन बिल्ला मिळणेसाठी अर्ज केला. वि.प. यांनी त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून वस्तुस्थिती पाहून तक्रारदार यांचे गायीच्या कानात बिल्ला क्र. 80348 मारुन वि.प. यांना माहिती दिली. परंतु वि.प. यांनी ता. 13/3/19 च्या पत्राने सदरचा नवीन बिल्ला नोंद करणेस नकार दिला व वि.प. यांनी गाय आजारी आहे व गायीचे वार्णन जुळत नाही असे सांगितले. तक्रारदार यांची गाय दि.16/3/2019 रोजी मयत झाली. त्यांनतर तक्रारदार यांनी वि.प. यांना क्लेमला लागणारी सर्व कागदपत्रे देवून रक्कम रु.60,000/- रकमेचा क्लेम केला. तसेच तक्रारदार यांनी दि.18/6/19 रोजी खुलासा पत्र दिले. तथापि वि.प. यांनी सदर क्लेमची दखल न घेता तक्रारदार यांना सदरचा क्लेम मंजूर अथवा नामंजूर याबाबत काहीही कळविले नाही. सबब, तक्रारदारांना रक्कम रु.60,000/- मिळावेत, सदर रकमेवर 18 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, तक्रारदार यांचे टॅग नोंदणीबाबतचे पत्र, जनावर हेल्थ सर्टिफिकेट, वि.प. यांचे पत्र, मयत गायीचे फोटो, गायीची खरेदीपावती, गावकामगार पाटील यांचा दाखला, पंचनामा, डेअरीचा दाखला, डॉक्टरांचे सर्टिफिकेट, तक्रारदार यांचे पत्र, खुलासा पत्र, तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारीतील मजकूर परिच्छेदनिहाय नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदारांनी त्यांचे गायीच्या कानात बिल्ला क्र. 270800/80348 मारुन वि.प. यांना कळविले. तथापि वि.प. कंपनीचे प्रतिनिधी श्री सुभाष काकडे यांना प्रत्यक्ष जागेवरील वस्तुस्थिती व गायीची तपासणी करणेकरिता पाठविले असता त्यांना गाय बिल्ला नं. 270800/80348 ही आजारी असून बसून आहे व तिच्यावर डॉ नाईक, डॉ मगदूम व डॉ जाधव यांचे उपचार चालू आहेत व टॅगींग केलेले गाईला शिंगे नाहीत. तथापि पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या गायीचे वर्णनात गायीला शिंगे आखूड आहेत असा उल्लेख आहे. सबब, पॉलिसीत नमूद केले गायीचे वर्णन जुळत नाही व गायीचे टॅगींग केले वेळेचे आजारपण या दोन्ही कारणांसाठी नवीन बिल्ल्याची नोंद करता येत नाही असे वि.प. कंपनीने तक्रारदारास कळविले. तक्रारदाराची गाय दि. 16/3/19 रोजी मयत झाली. तथापि मयत गायीचे वर्णन पॉलिसीत नमूद वर्णनाशी मिळत नसलेने व सदर गाय ही रिटॅगींग केले वेळी आजारी असलेने वि.प. कंपनीने तक्रारदारास टॅगची नोंद घेता येत नसलेचे दि. 13/3/2019 चे पत्राने कळविले व तक्रारदाराचा क्लेम नो टॅग नो क्लेम या कारणासाठी नामंजूर केला व तक्रारदारास त्यांचे बँकर कॅनरा बँक, कोल्हापूर यांना दि. 9/4/2019 चे पत्राने कळविले. वि.प. यांची सदरील कृती ही पूर्णपणे योग्य व कायदेशीर असून वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून कॅटल इन्शुरन्स पॉलिसी नं. 270800/47/18/10000118 ता. 5/9/18 ते 4/9/19 या कालावधीकरिता रक्कम रु.3 लाख या रकमेची घेतलेली होती. सदरहू पॉलिसीत तक्रारदार यांच्या पाच गायींचा विमा घेतला होता. प्रत्येक गायीची विमा रक्कम रु.60,000/- अशी होती. सदर पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांच्या गायीच्या कानातील बिल्ला पडल्यामुळे ता. 8/3/19 रोजी त्यांनी वि.प. यांचेकडे नवीन बिल्ला मिळणेसाठी अर्ज केला. वि.प. यांनी त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून वस्तुस्थिती पाहून तक्रारदार यांचे गायीच्या कानात बिल्ला क्र. 270800/80348 मारुन वि.प. यांना माहिती दिली. परंतु वि.प. यांनी ता. 13/3/19 च्या पत्राने सदरचा नवीन बिल्ला नोंद करणेस नकार दिला व वि.प. यांनी गाय आजारी आहे व गायीचे वार्णन जुळत नाही असे सांगितले. तक्रारदार यांची गाय दि.16/3/2019 रोजी मयत झाली. त्यांनतर तक्रारदार यांनी वि.प. यांना क्लेमला लागणारी सर्व कागदपत्रे देवून रक्कम रु.60,000/- रकमेचा क्लेम केला. तसेच तक्रारदार यांनी दि.18/6/19 रोजी खुलासा पत्र दिले. तथापि वि.प. यांनी सदर क्लेमची दखल न घेता तक्रारदार यांना सदरचा क्लेम मंजूर अथवा नामंजूर याबाबत काहीही कळविले नाही असे तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केले आहे. प्रस्तुत कामी वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे रक्कम रु.3 लाख रकमेची विमा पॉलिसी घेतली होती ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार यांची तक्रार वि.प. यांनी नाकारली आहे. वि.प. कंपनीचे प्रतिनिधी श्री सुभाष काकडे यांनी प्रत्यक्ष जागेवरील वस्तुस्थिती व गायीची तपासणी करता पाठविले असता त्यांना गाय बिल्ला नं. 270800/80348 ही आजारी असून बसून आहे व तिच्यावर डॉ नाईक, मगदूम व जाधव यांचे उपचार चालू आहेत व टॅगींग केलेले गाईला शिंगे नाहीत. तथापि पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या गायीचे वर्णनात गायीला शिंगे आखूड आहेत असा उल्लेख आहे. सबब, पॉलिसीत नमूद केले गायीचे वर्णन जुळत नाही व गायीचे टॅगींग केले वेळेचे आजारपण या दोन्ही कारणांसाठी नवीन बिल्ल्याची नोंद करता येत नाही असे वि.प. कंपनीने तक्रारदारास कळविले. तक्रारदाराची गाय दि. 16/3/19 रोजी मयत झाली. तथापि मयत गायीचे वर्णन पॉलिसीत नमूद वर्णनाशी मिळत नसलेने व सदर गाय ही रिटॅगींग केले वेळी आजारी असलेने वि.प. कंपनीने तक्रारदारास टॅगची नोंद घेता येत नसलेचे दि. 13/3/2019 चे पत्राने कळविले व तक्रारदाराचा क्लेम नो टॅग नो क्लेम या कारणासाठी नामंजूर केला व तक्रारदारास त्यांचे बँकर कॅनरा बँक, कोल्हापूर यांना दि. 9/4/2019 चे पत्राने कळविले असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. सबब, वि.प. यांनी सदर कारणास्तव तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सबब, वि.प. यांचे म्हणणे तसेच तक्रारदार यांची तक्रार या अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.1 ला विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. अ.क्र.2 ला तक्रारदार यांनी वि.प. यांना टॅग नोंदणीबाबतचे पाठविलेले पत्र दाखल केले आहे. सदर पत्राचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी पाच गायींचा विमा दि.5 सप्टेंबर 2017 मध्ये उतरवून दि.05/09/18 रोजी नूतनीकरण करुन दोन हप्ते भरलेले होते. सदर गायींमधील दोन गायी गाभण गेलेल्या नाहीत व तीन गायी गाभण होत्या, त्यातील एक गाय व्याली आहे, दुसरी गाय 15 दिवसांपूर्वी व्याली आहे. परंतु सदर गायीच्या कानातील बिल्ला पडला आहे, तो आपणाकडून घेवून दि.04/03/19 रोजी डॉक्टरांनी टोचला आहे, त्याचे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे. तरी सदर गायीचा बिल्ला आपणाकडे नोंदविणेत यावा, असे पत्र तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेले आहे. सदरचे पत्र वि.प. यांचे इन्व्हेस्टीगेटर सुभाष काकडे यांनी स्वीकारलेची सही आहे. सदरच्या पत्रासोबत तक्रारदार यांनी गायीचा फोटो, विमा पॉलिसी व डॉक्टरांचे प्रमाणपत्र देखील जोडले आहे. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. तसेच तक्रारदार यांनी अ.क्र.3 ला दि.04/03/2019 रोजीचे डॉक्टर आर.बी.नाईक यांचे मयत जनावराचे हेल्थ सर्टिफिकेट जोडले आहे. सदर सर्टिफिकेटचे अवलोकन करता
Is animal in sound health in good condition and free from the vices ? -Yes.
Are the stable condition good and conductive to good health – Yes.
सदरचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट वि.प. यांनी नाकारलेले नाही. सबब, सदरचे Animal Health Certificate वरुन मयत गायीची तब्येत ता. 4/03/2019 रोजी चांगली होती ही बाब सिध्द होते.
8. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, मयत गायीचे फोटो व सदरची मयत गाय खरेदी केलेची पावती दाखल केलेली आहे. ता. 25/3/19 रोजीचा गावकामगार पोलिस पाटील यांचा दाखला दाखल केलेला आहे. तसेच दि.17/3/2019 रोजीचा मयत गायीचा पंचनामा दाखल केला आहे. सबब, तक्रारदार यांनी दाखल केलेले क्लेम फॉर्मस, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, व पंचनामा यांचे अवलोकन करता सदर मयत गायीच्या वर्णनामध्ये
गायीचे वय 7 वर्षे, रंगाने काळी पांढरी, कपाळावर पांढरा ठसा, आखूड शिंगे, शेपूट गोंडा पांढरा असे नमूद असून तिच्या कानातील बिल्ल्याचा नंबर 270800/80348
असे नमूद आहे. सबब, सदर कागदपत्रांवरुन वि.प. कथन करतात त्याप्रमाणे गायीला शिंगे नाहीत असे दिसून येत नाही तथापि सदर कागदपत्रांवरुन मयत गायीच्या वर्णनामध्ये आखूड शिंगे असे नमूद आहे ही बाब कागदपत्रांवरुन सिध्द होते.
9. वि.प. यांनी सदर गाय ही रिटॅगींग केलेवेळी आजारी असलेने वि.प. कंपनीने टॅग नोंद घेतलेली नाही असे कथन केलेले आहे. तथापि दाखल कागदपत्रांवरुन व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या डॉक्टराच्या आर.बी.नाईक यांच्या अॅनिमल डेथ सर्टिफिकेटवरुन सदरची गाय ही आजारी नसून सदरच्या मयत गायीचे आरोग्य (Health condition) हे उत्तम स्थितीत होते ही बाब सिध्द होते. केवळ सदरची मयत गायीवर डॉ ए.ए. जाधव यांनी उपचार केले या कारणास्तव वि.प. यांनी कथन केलेप्रमाणे सदरची मयत गाय ही आजारी होती ही बाब सिध्द होत नाही. तसा सदर डॉक्टरांनी कोणताही वैद्यकीय दाखला प्रस्तुतकामी दिलेला नाही अथवा वि.प. यांनी दाखल केलेला नाही.
10. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदार यांनी त्यांच्या गायीच्या कानातील बिल्ला पडल्यामुळे वि.प. यांचेकडे अर्ज करुन सदरच्या गायीच्या कानात बिल्ला मारुन घेतला. त्यावेळी सदरची मयत गाय ही आजारी होती तसेच सदर गायीचे वर्णन हे जुळत नाही ही बाब वि.प. यांनी पुराव्यानिशी शाबीत केलेली नसलेने व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सदरची गाय ही आजारी नसून सदरच्या गायीचे वर्णन ही पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या गायीशी जुळत असताना देखील वि.प. यांनी पॉलिसीचा हेतू विचारात न घेता तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
11. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी श्री महालक्ष्मी सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. बाळेघोल ता. कागल, जि कोल्हापूर यांचा ता. 25/3/19 रोजीचा डेअरीचा दाखला दाखल केलेला आहे. सदरचा दाखला वि.प. यांनी नाकारलेला नाही. वि.प. यांनी विमा रक्कम देखील नाकारलेली नाही. सबब तक्रारदार हे वि.प. यांचेकडून कॅटल पॉलिसी अंतर्गत मयत गायीचा विमा रक्कम रु.60,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/12/19 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
12. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसी नं. 270800/47/18/10000118 अंतर्गत विमा रक्कम रु. 60,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/12/19 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|