1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार श्रीमती शारदा प्रमोद मोहुर्ले ही गाव हुंडेश्वरी पोस्ट नवेगाव हुंडे तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून अर्जदाराचे पती श्री प्रमोद दत्तु मोहुर्ले यांच्या मालकीची मौजा नवेगांव हुंडेश्वरी, तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्र.७४/२ ही शेतजमीन होती. अर्जदाराचे पती हे शेतीव्यवसाय करुन शेतीतील उत्पन्नावर कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. गैर अर्जदार क्र. 1 व 2 ही विमा कंपनी असून गैरअर्जदार क्र. 3 शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू शेतात काम करीत असताना विषारी साप चावून झाला. शासनाच्या वतीने गैरअर्जदारातर्फे सदर विमा योजनेअंतर्गत अर्जदाराच्या पतीचा २,००,०००/-विमा उतरविण्यात आला होता. विमा शासनाच्यावतीने उतरवण्यात आला असला तरी अर्जदार ही मयत प्रमोद दत्तू मोहुर्ले यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. सदर दाव्याचा प्रस्ताव विरुद्ध पक्ष क्र. 3 तर्फे सर्व कागदपत्रांची शहानिशा करून सर्व प्रस्ताव बरोबर आहे हे पाहून गैरअर्जदार क्र. 1 व 2 दिला जातो व गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे सदर विमा रकमेचे भुगतान करतात. अर्जदाराच्या पतीचा व्यक्तिगत अपघात विमा काढला असल्याने व अर्जदाराच्या पतीचा अपघातात मृत्यू झाल्याने तिने गैरअर्जदार क्र. 3 कडे वेळोवेळी विरुद्ध पक्षाने क्र.1 व 2 ने मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतरही गैरअर्जदार क्र. 1व 2 ने अर्जदार यांच्या पतीचा दाव्याबद्दल काहीही न कळवील्याने अर्जदारांचे वकील यांनी दिनांक 7.10.2017 रोजी माहिती अधिकार कायद्याखाली कृषी आयुक्त महाराष्ट्र यांना अर्ज केला असता अर्जदाराचा दावा rejected due to other reason असा शेरा असल्याचे माहिती देऊन कळविले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा अकारण फेटाळून अर्जदाराची फसवणूक केलेली आहे. दाव्याची रक्कम मिळालेली नसल्यामुळे त्यावरील व्याजालाही अर्जदाराला मुकावे लागले. त्यामुळे आवश्यक नसलेले कागदपत्रे मागवून गैरअर्जदार हे अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करीत आहेत. सबब गैरअर्जदार यांनी अर्जदाराला न्यूनतापूर्ण सेवा दिलेली असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदारांविरुद्ध मंचात दाखल केलेली आहे. 3. अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदाराची तक्रार मंजूर होऊन गैर अर्जदाराने अर्जदाराला द्यावयाची विमादाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- विरुद्ध पक्षाकडे प्रस्ताव दिल्यापासून म्हणजेच दिनांक 21. 12 .2016 पासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराला दाव्याची रक्कम न दिल्याने झालेल्या मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास पोटी 30,000/- व सदर तक्रारीच्या खर्चापोटी 15,000/- देण्याचे आदेश व्हावेत.
4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे संयुक्त लेखी उत्तर तक्रारीत दाखल केले, व त्यात अर्जदाराने तक्रारी केलेल्या विधानाचे खंडन करीत विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराने व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत सादर केलेला दावा रीतसर कारणाने अदखलपात्र आहे, कारण सदर योजनेत अंतर्गत दिलेल्या नियमांचे पालन अर्जदाराने केले नाही असे रेकॉर्डवरील अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. या प्रकरणी अर्जदाराने विमादावा गैीअर्जदार क्र. 1 व 2 कडे सादर केल्याचे कोणताही दस्तावेज रेकॉर्डवर नाही तसेच अर्जदाराने सदर तक्रारींमध्ये गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध लावलेले संपूर्ण आरोप खोटे व काल्पनिक आहेत. याप्रकरणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार हिने दाव्या बद्दल कोणतीही दस्तावेज गैरअर्जदाराकडे सादर केलेले नाहीत. एकंदरीत या प्रकरणी गैरअर्जदार क्र. 3 तर्फे कृषी आयुक्त महा शासन पुणे यांच्यासोबत गैरअर्जदार यांनी पत्रव्यवहार केल्याचे दिसून येते मात्र अर्जदार हिने तक्रारींमध्ये दिनांक ७.१०.१७ च्या पत्रासोबत दिलेल्या माहितीसंबंधाने समर्थनार्थ कोणताही समाधानकारक पुरावा सादर केलेला नाहीत. या प्रकरणी बजाज कॅपिटल इन्शुरन्स लिमिटेड यांच्यासोबत झालेला पत्रव्यवहार दाखल करण्यात आलेला आहे, परंतु सदर कंपनीला या प्रकरणात पार्टी बनवण्यात आले नाही. या कारणाने प्रस्तुत तक्रार आवश्यक पार्टीच्या अनुपस्थित बेकायदेशीर आहे. एकंदरीत या प्रकरणी अर्जदार तक्रारदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध लावलेले सर्व आरोप सकृद्दर्शनी खोटे आहेत सबब गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध दाखल केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. 5. गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदर प्रकरणात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की अर्जदाराने दिनांक १७.११.१६ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून दिनांक २३.११.१६ ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांना सादर केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीला सादर केला. सदर प्रस्तावाची विमा कंपनी छाननी करते. विमा मंजूर करण्याचा अधिकार या कार्यालयास नसून विमा कंपनीस आहे त्यामुळे सदर प्रकरणातून गैरअर्जदार क्र. 3 यांची मुक्तता करण्याबाबत त्यांनी प्रार्थना केली आहे.
6. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष (1) अर्जदार गैरअर्जदार क्रं.1 व 2यांचा ग्राहक आहे काय ? होय. (2) अर्जदार गैरअर्जदार क्रं .3 ग्राहक आहे काय ? नाही. (3) गैरअर्जदार क्रं. 1व २ यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांस मुद्दा क्र. 1 व 2 बाबत ः- 7. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीतील कथना तसेच सोबत जोडलेल्या दस्तावेजांवरून ही बाब स्पष्ट होत आहे की तक्रारकर्तीचे पती प्रमोद दत्तू मोहुर्ले यांच्या मालकीची मौजा नवेगाव हुंदेश्वरी तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र.74/2 ही शेतजमीन आहे. शासनाच्या योजनेंतर्गत त्याचा विरुद्ध पक्ष क्र. 1 कडून वि.प. क्र. 3 मार्फत २.००,०००/- विमा उतरविला होता. परंतु अर्जदाराच्या पतीचा शेतात काम करीत असताना साप चावल्याने मृत्यू झाला. ही बाब तक्रारीत दाखल एफ.आय.आर, अकस्मात मृत्यू खबर व इतर पोलिस दस्तावेजांवरून स्पष््ट होत आहे. तसेच निशाणी क्र. ४ वरील दस्त क्र. ७ वर तक्रारकर्तीने तिचा पती प्रमोद दत्तू मोहुर्ले याचे मृत्युपत्र दाखल केले. विरुद्ध पक्ष यांनी त्यांच्या उत्तरात आक्षेप घेतला की तक्रारकर्तीचा पतीच्या अपघात विमा योजनेंतर्गत अर्जदाराने नियमांचे पालन केले नाही, तसेच अर्जदाराच्या पतीचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झाला असे तक्रारीत व दस्तएवजात नमूद आहे, परंतु विषारी सर्प चावला त्या बाबतचा रासायनिक अहवाल अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेला नाही. परंतु मंचाच्या मते रासायनिक अहवाल नसला तरी अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रावरून व वस्तुस्थितीवरून असे सिद्ध होते कि अर्जदाराच्या पतीचा मृत्यू विषारी साप चावल्याने झाला. गैरअर्जदाराने आक्षेप घेतला आहे की तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तावेज योग्य नसल्यामुळे दावा नामंजूर करण्यात आला, परंतु सदर बाब सिद्ध करण्यासाठी विरुद्ध पक्षाने कोणतेही दस्तावेज तक्रारीत दाखल केलेले नाहीत. मंचाच्या मते महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात काढलेल्या शेतकरी अपघात विमा पॉलिसी बाबत निर्गमीत केलेल्या शासन निर्णयांवरून, सदर पॉलिसीमध्ये तांत्रिक बाबींना जास्त वाव दिलेला नाही. अशा प्रकरणांमध्ये केवळ तांत्रिक बाबी उपस्थित करून विरुद्ध पक्षाने तक्राकर्तीचा दावा विनाकारण नामंजूर केलेला आहे. विरुद्ध पक्षाची सदर कृती ही सेवेतील त्रुटी दर्शविते. विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस विमादावा सेवेबाबत अटी व शर्तींचे पालन न केल्याची बाब सिद्ध झाल्याने तसेच तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत वादकथनाला लागू होत नसल्यामुळे मंचाच्या मतानुसार तक्रारकर्ती विरुद्ध पक्षांकडून विमा दावा मिळण्यास पात्र आहे. 8. विरुद्ध पक्ष क्र. 3 ह्यांनी तक्रार कर्तीकडून कोणतेही शुल्क न आकारल्यामुळे विरुद्ध पक्ष क्र. 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरून खालील आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 ह्यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या शेतकरी अपघात
विमा दावा रक्कम रुपये 2,00,000/- तक्रारकर्तीस द्यावी. ३. विरुद्ध पक्ष क्र. 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत. ४. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ देण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |