1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार ही तारसा (बुज) पो.विठ्ठलवाडी, ता.गोंडपिपरी, जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून तिचे पती श्री.शंकर उध्दव दरेकर यांची तारसा (बुज) पो.विठ्ठलवाडी, ता.गोंडपिपरी, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र.385 ही शेतजमीन असून त्यांचा व्यवसाय शेती हा होता. शेतीतील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे विमा कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 3 हे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे वतीने अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. अर्जदाराच्या पतीचा रू.2,00,000/- चा विमा शासनाच्या वतीने उतरविला होता. अर्जदाराचे पती दिनांक 29/2/2016 रोजी श्री.खेत्री वाघधरकर यांच्या शेतातून आपल्या शेतात जात असतांना त्यांच्या शेताभोवती लावलेल्या तारांमधील विद्युत करंट लागून त्यांचा मृत्यु झाला. मयत श्री.शंकर उध्दव दरेकर यांचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्रमांक एक यांचेकडे विमा उतरविला असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे अर्ज केला व दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु त्यानंतर वारंवार विनंती करूनही वि.प.क्र.1 व 2 कडून दाव्याबद्दल काहीही न कळविल्यामुळे अर्जदार हिने दिनांक 7/10/2017 रोजी माहितीच्या अधिकाराखाली कृषी आयुक्त, महाराष्ट्र यांना अर्ज केला असता अर्जदाराचा दावा ‘’रिजेक्टेड डयू टू अदर रिझन’’ असा शेरा देऊन खारीज करण्यांत आल्याची माहिती दिली. गैरअर्जदाराच्या कृतीमुळे अर्जदार व कुटूंबियांना त्रास सहन करावा लागला. गैरअर्जदारांनी सेवेत कसूर केल्यामुळे अर्जदार हिने सदर तक्रार गैरअर्जदारांविरुद्ध दाखल केली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदाराला विमादाव्याची रक्कम रू.2 लाख, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.15,000/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावेत. 3. अर्जदार यांची तक्रार दाखल करून गैरअर्जदार क्र.1,2 व 3 हयांना नोटीस पाठविण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांना प्रकरणात नोटीस प्राप्त होऊन देखील ते मंचात उपस्थित न झाल्यामुळे त्यांचेविरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 30/8/2018 रोजी पारीत करण्यांत आला. 4. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी प्रकरणात उपस्थीत राहून आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये अर्जदार चे म्हणणे खोडून काढीत नमूद केले की, अर्जदाराचे पती मयत उध्दव दरेकर याचा मृत्यु अपघाती नसल्यामुळे पोलीस स्टेशन, गोंडपिपरी यांनी भा.द.वी.कलम 304 (2) व भारतीय विद्युत अधिनियम. 2003 च्या कलम 140 अन्वये श्री.खेत्री वाघधरकर यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले. शेती सभोवती लावलेल्या तारांचा करंट लागल्यामुळे हा मृत्यु झालेला असून हा अपघाती मृत्यु नसल्यामुळे शेतकरी विमा पॉलिसीअंतर्गत गैरअर्जदार हे शेतकरी विमा योजनेची रक्कम अर्जदार हयांना देण्यांस जबाबदार नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजांवरून विमाधारकाचा मृत्यु हा अपघाती नसून गुन्हयातून घडलेला असल्यामुळे सदर मृत्यु हा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत येत नाही व त्याबाबत गैरअर्जदार यांचेकडून नुकसान भरपाई मागता येत नाही. अर्जदाराचे झालेले नुकसान हे वैयक्तीक नुकसान असल्यामुळे वैयक्तीक नुकसान भरपाईच्या कायद्यानुसार त्यांनी दाद मागावयास हवी होती. सबब अर्जदार हे झालेल्या घटनेमुळे ग्राहक या संज्ञेत येत नसल्यामुळे गैरअर्जदाराने सदर दावा योग्यरीत्या कारणांसह खारीज केलेला आहे. सबब सदर तक्रार विद्यमान मंचासमक्ष चालू शकत नाही व ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
5. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 2 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष (1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय. (2) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 3 यांचा ग्राहक आहे काय ? नाही. (3) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत :- 6. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचे पती श्री.शंकर उध्दव दरेकर यांचे नांवे तारसा (बुज) पो.विठ्ठलवाडी, ता.गोंडपिपरी, जि.चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 385 ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक श्री.शंकर उध्दव दरेकर हे शेतकरी होते व शेतीतील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. शासन निर्णयानुसार अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पतीचा 2015-16 या कालावधीकरता रू.2,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी असून सदर विम्याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. 2 बाबत :- 7. गैरअर्जदार क्रं. 3 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता गैरअर्जदार क्र. 3 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 3 यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 3 बाबत..
8. सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत विमाधारकाची सन 2015-16 करीता विमा पॉलिसी काढण्यांत आलेली असून सदर योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्र.1 व 2 हे जोखीम स्विकारतात. अर्जदाराचे निवेदन तथा त्याने नि.क्र.4 वर दाखल केलेले शवविच्छेदन अहवाल व घटनास्थळ पंचनामा या दस्तऐवजांवरून असे स्पष्ट दिसून येते की अर्जदाराचे पती श्री.शंकर उध्दव दरेकर दिनांक 29/2/2016 रोजी श्री.खेत्री वाघधरकर यांच्या शेतातून स्वतःच्या शेतात जात असतांना श्री.वाघधरकर यांच्या शेताभोवती त्यांनी लावलेल्या तारांमधील विद्युत करंट लागून त्यांचा मृत्यु झाला. सदर बाब नि.क्र.4 च्या दस्त क्र.4 एफ आय आर तसेच नि.क्र.5 वरील विद्युत निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांना दिलेल्या पत्रावरून सिध्द होत आहे. गै.अ.क्र.2 हयांनी त्यांच्या उत्तरात नमूद केले आहे की अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती नसून गुन्हयाचे परिणामस्वरूप आहे. सबब अर्जदार ही विमादावा मिळण्यांस पात्र नाही. मात्र विमाधारकाचा मृत्यु हा त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेला नसून सदर मृत्यु होण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागही नाही. सदर मृत्यु हा अन्य व्यक्तीवर दाखल गुन्हयाच्या परिणामस्वरूप घडला असला तरीदेखील विमाधारक तसेच सदर विम्याअंतर्गत त्याचे लाभार्थी कुटूंबीय यांच्या दृष्टीकोनातून सदर मृत्यु हा आकस्मीकरीत्या घडलेला अपघातच आहे. मा.राष्ट्रीय आयोगाने रॉयल सुंदरम अलायंस इंश्युरंस कं.लि. विरूध्द पवन बलराम मुलचंदानी FA No.1357/2016 या प्रकरणात दिनांक 25/9/2018 रोजी दिलेल्या निवाडयात, मा.राष्ट्रीय आयोगानेच तत्पूर्वी मायादेवी विरूध्द एलआयसी ऑफ इंडिया या प्रकरणात दिलेला निवाडा तसेच त्यात हॉल्सबरी लॉ ऑफ इंग्लॅंड मधून “अॅक्सीडेंट” या संज्ञेच्या व्याख्येचा घेतलेला संदर्भ यांचा उल्लेख करीत खालीलप्रमाणे न्यायतत्व विषद केले,
“It is reasonable and logical to conclude that a person takes personal accident shield insurance policy to insure himself against accidental injury resulting in death caused by an unexpected and unintentional incident and even wilful murder may be accidental as far as the victim is concerned”, the commission had held in Maya Devi’s case that the death of the insured was accidental, because the immediate cause of injury was not the result of any deliberate or wilful act of the insured and the untoward event that had occurred was not expected or designed by the insured” . 9. मा.राष्ट्रीय आयोगाच्या मायादेवी वि. एलआयसी या प्रकरणातील वरील न्यायतत्व, मा. उच्चतम न्यायालयाने SLP (Civil) No.34115 of 2010 या अपील प्रकरणात अधोरेखीत केल्याचे मा.राष्ट्रीय आयोगाने नमूद केले आहे. मा.राष्ट्रीय आयोगाने, असे असंख्य निवाडे पारीत झाल्यानंतरही विमा कंपन्यांकडून खुनाच्या गुन्हयातून उद्भवलेली विमादावा प्रकरणे खारीज करण्यांत येवून त्याबाबत सातत्याने दावे दाखल करण्यांत येत असल्याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असून सदर बाब अनुचीत व्यापार पध्दतीमध्ये मोडते असा निर्वाळा दिला व विमा कंपन्यांनी तात्काळ सदर अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करण्यापासून परावृत्त व्हावे असे कडक निर्देश ही मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेले आहेत. 10. मा.राष्ट्रीय आयोगाने निर्धारीत केलेले वरील न्यायतत्व प्रस्तूत प्रकरणी लागू होते. प्रस्तूत प्रकरणातदेखील विमाधारकाचा मृत्यु गुन्हयातून घडलेला असल्यामुळे अपघात या संज्ञेत बसत नाही या सबबीखाली गैरअर्जदार क्र.1 व 2 विमा कंपनीने अर्जदाराचा दावा नाकारला आहे. त्यामुळे मा.राष्ट्रीय आयोगाने निर्धारीत केलेल्या न्यायतत्वानुसार अर्जदाराचा विमादावा उपरोक्त कारणास्तव विमा दावा नामंजुर करुन गैरअर्जदार विमाकंपनीने अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला असून अर्जदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली. त्यामुळे अर्जदार विम्याच्या लाभापासून वंचित राहिली व त्यामुळे तिला आर्थीक नुकसान तसेच शारिरीक व मानसीक त्रास सहन करावा लागला. सबब अर्जदार विमादाव्याची रक्कम सव्याज मिळण्यांस तसेच शारिरीक व मानसीक त्रासाबाबत उचीत नुकसानभरपाई मिळण्यांस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 4 बाबत :- 11. उपरोक्त मुद्दा क्र.1 ते 3 च्या विवेचनावरून मंच खालील आदेश पारित करीत आहे. अंतीम आदेश (1) अर्जदाराची तक्रार क्र.208/2017 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या अर्जदारांस शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमादाव्याची रक्कम रू.2,00,000/- त्यावर तक्रार आदेश दिनांक 13/12/2018 पासून रक्कम अर्जदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याजासह अर्जदारांस द्यावी. (3) गैरअर्जदार क्र.1 व 2 विमा कंपनीने भविष्यात उपरोक्त अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करण्यापासून परावृत्त व्हावे. (4) गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द कोणताही आदेश नाही. (5) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासाचे नुकसान भरपाईपोटी रू.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. (6) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक – 13/12/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |