::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 10/09/2018)
तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे मयत पती श्री. मारोती बापू टेकाम यांच्या मालकीची मौजा टेंबूरवाही, ता.राजूरा, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. 305 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व शेतातील उत्पन्नावरच कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू.2,00,000/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीचे पतीचा दि. 12/08/2016 रोजी सर्पदंश झाल्याने अपघाती मृत्यु झाला.
2. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीची मनस्थिती ठिक नसल्याने तिने दि. 23.09.2017 रोजी तक्रारकर्ता क्र.2 मुलातर्फे विरूध्द पक्ष क्रं. 3 मार्फत वि.प.क्र.1 व 2 विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीने रीतसर अर्ज व आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीच्या पतिचा मृत्युदावा दिनांक 12/09/2017 रोजी वयाचा दाखला 6क व 6 ड न दिल्याने दावा नामंजूर असे कळविले. त्यामुळे तक्रारकर्तीला मंचासमक्ष् तक्रार दाखल करण्याव्यतिरीक्त पर्याय उरला नाही. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-यांच्या कुटूंबाकरीता ही योजना सुरू केली त्या उद्देशालाच विरूध्द पक्ष तडा देत आहे. विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी सदर विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारून् तक्रारकर्तीला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, विरूध्द पक्षांनी विमा दाव्याची रक्कम रु. 2,00,000/- व त्यावर दिनांक 23/03/2017 पासून 18 टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे आदेश व्हावे, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 30,000/- व तक्रारीचा खर्च रु. 15,000/- विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. 1 ते 3 हजर होवून त्यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले.
5. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी विमा पॉलीसी मान्य केली परंतु तक्रारकर्तीचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून लेखी कथनामध्ये नमूद केले की, तक्रारकर्तीने अॅग्रीकल्चरल कमीशनर, पुणे व मेसर्स बजाज कॅपीटल इंश्युरंस ब्रोकींग लि.न्यु दिल्ली यांना प्रकरणात पक्षकार न केल्यामुळे सदर तक्रार आवश्यक पक्षाअभावी खारीज होण्यांस पात्र आहे. वि.प.क्र.1 व 2 यांना तक्रारकर्तीचा विमादावा अर्ज आवश्यक दस्तावेजांसह ब्रोकींग एजंन्सीमार्फत प्राप्त झाला नाही व तक्रारकर्तीने तालुका कृषि अधिका-याकडे विमादावा अर्ज दिनांक 12/8/2016 रोजी कारण घडल्यापासून 90 दिवसांत दाखल केला नसून तो दिनांक 21/12/2017 रोजी दाखल केला असल्याने मुदतबाहय आहे. तक्रारकर्तीने विमादावा अर्जनिकाली काढण्याकरीता आवश्यक दस्तावेज जमा केले नाही. वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीला पत्रान्वये मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता ही तक्रारकर्तीने सदर पत्र प्राप्त झाल्यानंतरही केली नाही तसेच त्यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही त्यामुळे या सर्व कारणांस्तव विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ने तक्रारकर्तीचा विमादावा अपु-या दस्तावेजांस्तव नामंजूर करून तसे तक्रारकर्तीस दिनांक 22/9/2017 रोजी सुचीत केले. या सर्व कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे.
6. विरूध्द पक्ष क्रं. 3 ने हजर होवून त्यांनी आपले म्हणणे दाखल केले. त्यामध्ये त्यांनी नमुद केले की, तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा बाबतचा सादर केलेला प्रस्ताव तपासून त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांना सादर केला. दिनांक 6/12/2016 रोजी बजाज कॅपीटल इंश्युरंस ब्रोकींग यांनी त्रुटीपुर्ततेबाबत पाठविलेले पत्र प्राप्त झाल्यानंतरदिनांक 20/12/2016 व दिनांक 6/3/2018 नुसार त्रुटीची पुर्तता करणेबाबत संजय टेकाम यांना कळविले. बजाज कॅपीटल इंश्युरंस ब्रोकींग यांचे दिनांक 6/12/2016 चे पत्राची पुर्तता करून तसे दिनांक23/3/2017 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चंद्रपूर यांना पत्र सादर केले. त्यानंतर दिनांक 14/11/2017 रोजी जिल्हा अधिक्षक यांचे सुचनेनुसार श्री.संजयटेकाम यांच्या प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता जावक क्र.1581 दिनांक 15/11/2017 नुसार जिल्हा अधिक्षक यांना सादर केले. प्रस्तूत प्रकरणी विरूध्द पक्ष क्र. 3 चे सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार त्यांचेविरूध्द खारीज होण्यांस पात्र आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच विरूध्द पक्ष क्रं 1 ते 3 यांचे लेखीउत्तर, वि.प.क्र.1 व 2 चे शपथपत्र व लेखी युक्तिवाद, तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांची ग्राहक आहे काय ? होय.
(2) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. 3 यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(3) विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत :-
8. तक्रारकर्तीने नि.क्र.4 वर दाखल केलेल्या दस्त क्र.4, 7/12 व वि.प.क्र.3 यांनी नि.क्र.17 लेखी कथनासोबत सादर केलेल्या दस्तावेज, 7/12 उतारा, गांव नमूना आठ अ, गांव नमूना सहा ‘क’ यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की यामध्ये तक्रारकर्तीचे पती मयत मारूती टेकाम यांचे नांवाचा उल्लेख आहे. यावरून तक्रारकर्तीचे मयत पती हे शेतकरी होते हे सिध्द होते. तक्रारकर्ती क्र.1 ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी व तक्रारकर्ता क्र.2 हा मुलगा म्हणून सदर विम्याचे लाभधारक असल्याने तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे वि.प.क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत :-
9. विरूध्द पक्ष क्रं. 3 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता विरूध्द पक्ष क्र. 3 ने विना मोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र. 3 यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत :-
10. तक्रारकर्तीचे मयत पती श्री. मारोती टेकाम यांचा दि. 12/08/2016 रोजी सर्पदंशाने अपघाती मृत्यु झाला. या सदंर्भात तक्रारकर्तीने अकस्मात मृत्यु खबरी बुक, मृत्युचा दाखला, शवविच्छेदन अहवाल व इतर दस्तावेज दाखल केलेले आहे. शवविच्छेदन अहवालाची पडताळणी करतांना असे निर्देशनास आले की, त्यामंधे मृत्युचे कारण “ Postmortem findings are consistent with death due to Snake bite “ असे नमुद आहे. रासायनीक विश्लेषणाचा अहवाल जरी नसला तरी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या शव विच्छेदन अहवाल व इतर दस्तावेजावरुन तक्रारकर्तीचे पतीचा सर्पदंशाने अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होते. तक्रारकर्तीच्या मुलगा संजय याने वडिलांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर दि. 6.12.2016 रोजी विरूध्द पक्ष क्रं. 3 मार्फत विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. सदर अर्ज वि.प.क्र.3 यांनी नि.क्र.17 लेखी कथनासोबत प्रकरणात दाखल आहे. परंतु विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा वयाचा दाखला 6 अ व 6क व 6 ड हे दस्तावेज दाखल न केल्यामुळे या कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला व तसे विरूध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस दिनांक 12/9/2017 रोजी पत्रान्वये सुचीत केले होते. परंतु वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीचा विमादावा नामंजूर करण्यापूर्वी उपरोक्त दस्तावेजांची मागणी केली होती, व तिला ते पत्र प्राप्त झाले होते यासंदर्भात पत्र पाठविल्याची पावती, पत्र मिळाल्याची पोचपावती इत्यादि दस्तावेज दाखल केले नाहीत. वि.प.क्र.3 यांनी नि.क्र.17 लेखी कथनासोबत दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता त्यामध्ये त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांनी अनुक्रमे दिनांक 10/3/2017 व दिनांक 23/3/2017 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात मारूती टेकाम यांचा अपघात विमा प्रस्तावातील त्रुटीची पुर्तताकरून सदर प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे मंजूरीस सादर करण्यांत येत आहे असे कळविले आहे. तसेच त्यानंतर दिनांक 15/11/2017 रोजीच्या पत्रामध्ये सदर त्रुटीची पुनःश्च पुर्तता केल्याचे नमूद आहे. यावरून तक्रारकर्त्यांनी त्रुटीची पुर्तता केली होती हे सिध्द होते. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असुनदेखील विरूध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमादावा खारीज करून तक्रारकर्त्यांप्रति न्युनतम सेवा दर्शविली असे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. विरूध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीस विमादाव्याची रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्तीला शारिरीक व मानसीक त्रास झालेला आहे व त्यामुळे तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडून विमादाव्याची रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
11. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.20/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रु. 2,00,000/- व त्यावर तक्रार दाखल झालेल्या दिनांक 18/1/2018 पासुन तक्रारकर्तीच्या हातात रक्कम पडे पर्यन्त 9 टक्के व्याजासह दयावी.
(3) विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- दयावी.
(4) विरूध्द पक्ष क्रं. 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 10/9/2018
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.