::: निकालपञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-२८/१०/२०२१)
- तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
- तक्रारकर्तीचे मयत पती श्री.रामदास आनंदराव बुरांडे यांच्या मालकीची सुशीदावगांव, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. ४/१ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व शेतातील उत्पन्नावरच कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरूध्द पक्ष क्रं. १ व २ कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू. १,००,०००/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीचे पतीचा दि. ८/११/२००६ रोजी मोटरसायकल वरुन जात असतांना टाटा इंडिका गाडीने धडक दिल्याने जखमी होऊन अपघाती मृत्यु झाला.
- तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीने दि. ३०/११/२००६ रोजी विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरुध्द पक्ष १ व २ विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता रीतसर अर्ज केला, तसेच विरूध्द पक्षांनी मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीने रीतसर अर्ज व आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी दाव्याबाबत काहिही माहिती न दिल्यामुळे तक्रांरकर्तीने दिनांक ०२/०२/२०१८ रोजी त्यांना कायदेशीर नोटीस दिला. परंतु त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्तीला आयोगासमक्ष तक्रार दाखल करण्याव्यतिरीक्त पर्याय उरला नाही. विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी सदर विमादावा निकाली न काढून तक्रारकर्तीला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्तीने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्षांनी विमा दाव्याची रक्कम रु. १,००,०००/- व त्यावर तक्रार दाखल दिनांका पासून १८ टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत, तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रु. २०,०००/- विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
- तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं १ ते ३ यांना आयोगातर्फे नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. १ व २ ने आयोगासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारीतील कथन अमान्य करुन पुढे आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, शासकीय परिपत्रकानुसार विमादावा दाखल करण्याचे मुदतीत तक्रारकर्तीने विमादावा दाखल केलेला नाही किंबहूना तक्रारकर्तीने आजतागायत स्वतंत्रपणे वा इतरांमार्फत विमादावा वि.प.१ व २ कडे दाखल केलेला नाही तसेच असा कोणताही तथाकथीत दावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीने मयत श्री.रामदास यांचे कथीत अपघाती मृत्युचे समर्थनार्थ प्रथम खबरी बुक,पि.एम.रिपोर्ट, मृत्युचा दाखला हे दस्तावेज तक्रारअर्जातदेखील दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्तीने वि.प.क्र.१ व २ कडे विमादावा दाखल केला व तो वि.प.कडे प्रलंबीत असल्याबाबत तक्रारकर्तीने कोणताही पुरावा दस्तावेज दाखल केलेले नाहीत. सबब तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली असल्याने खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
- विरूध्द पक्ष क्रं. ३ यांनी तक्रारीला दाखल केलेल्या उत्तरात शासनाचे शेतकरी विमा योजनेअंतर्गतविमादावेवि.प.क्र.३ मार्फत स्विकारले जातात. २००५-०६ या कालावधीमध्ये तक्रारकर्तीचे पतीचा वाहन अपघातात मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीकडून विमादावाअर्ज प्राप्त झाला असता वि.प.क्र.३ यांनी त्याची पडताळणी व आवश्यक दस्तावेजांची पुर्तता करुन तो अर्ज जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत वि.प.क्र.१ व २ विमाकंपनीला पाठविला. मात्र त्यानंतर विमा कंपनीने तो स्विकारणे वा नाकारणे हा त्यांचा अधिकार असून त्याबाबत त्यांनी वि.प.क्र.३ यांना आजतागायत काहिही कळविलेले नाही. वि.प.३ ने त्यांचेशी निगडीत कार्यवाही शासननिर्णय क्र.टीएआयएस-१२०५/प्र.क्र.३१०/११-अे दिनांक ७/७/२००६ अन्वये विनाविलंब पूर्ण केली असून त्यांचे स्तरावर कोणतीही कार्यवाही प्रलंबीत नसल्यामुळे कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. सबब वि.प.क्र.३ ला प्रस्तूत प्रकरणातून वगळण्यांत यावे अशी त्यांनी आयोगांस प्रार्थना केलेली आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच विरूध्द पक्ष क्रं १ व २ यांचे लेखी कथन, लेखी उत्तरालाच शपथपत्र असे समजण्यात यावे अशी पुरसिस, लेखी युक्तिवाद तसेच वि.प.क्र.३ चे लेखी कथन आणि उभय पक्षांचे तोंडी युक्तिवाद यातील परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांची ग्राहक आहे काय ? होय.
(2) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. ३ यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(३) विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे काय ? होय
(४) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्रं. १बाबत :-
7. तक्रारकर्तीने तक्रारीत नि.क्र. ४ वर दाखल केलेल्या दस्त क्र. ३, ७/१२ उतारा, गांव नमुना ८, फेरफार या दस्तावेजांवर तक्रारकर्तीचे पती मयत रामदास यांचे नावाची नोंद आहे यावरून तक्रारकर्तीचे मयत पती शेतकरी होते व तक्रारकर्ती ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी म्हणून सदर विम्याची लाभधारक असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांची ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २ बाबत :-
8. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीचे शेतकरी पतीचा विमा काढण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ या शासकीय कार्यालयाने विना मोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ३ बाबत :-
9. तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्तीचे मयत पती श्री.रामदास आनंदराव बुरांडे यांच्या मालकीची सुशीदावगांव, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. ४/१ ही शेतजमीन आहे.महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरूध्द पक्ष क्रं. १ व २ कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू. १,००,०००/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीचे पतीचा दि. ८/११/२००६ रोजी मोटरसायकल वरुन जात असतांना एका टाटा इंडिका गाडीने धडक दिल्याने जखमी होऊन त्यांचा अपघाती मृत्यु झाला. तक्रारकर्तीने दि. ३०/११/२००६ रोजी विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरुध्द पक्ष १ व २ विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता रीतसर अर्ज केला. परंतु विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी दाव्याबाबत काहिही कळविले नाही. तक्रारकर्तीने प्रकरणात मयत रामचंद्र हे शेतकरी असल्याबाबतचे महसूली दस्तावेज तसेच त्यांचा अपघाती मृत्यु झाल्याबाबत प्रथम खबरी रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा आदी दस्तावेज दाखल केलेले आहेत. विरूध्द पक्ष क्रं. ३ यांनी देखील तक्रारीला दाखल केलेल्या उत्तरात, शासनाचे शेतकरी विमा योजनेअंतर्गत विमादावे वि.प.क्र.३ मार्फत स्विकारले जातात व २००५-०६ या कालावधीमध्ये तक्रारकर्तीचे पतीचा वाहन अपघातात मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीकडून विमादावाअर्ज प्राप्त झाला असता वि.प.क्र.३ यांनी त्याची पडताळणी व आवश्यक दस्तावेजांची पुर्तता करुन तो अर्ज जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत वि.प.क्र.१ व २ विमाकंपनीला पाठविला परंतु त्यांचेकडून दावा निकाली काढण्याबाबत कोणतीही सुचना प्राप्त झाली नसल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले असल्याने तक्रार मुदतीत आहे. आयोगाच्या मते तक्रारकर्तीने आवश्यक दस्तावेजांसह वि.प.क्र.३ मार्फत विहीत मुदतीत विमादावा दाखल केल्यानंतर देखील वि.प.क्र.१ व २ यांनी सदर विमादावा निकाली न काढून तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवा दिलेली असल्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडून विमा दाव्याची रक्कम, शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रं. ३ चे उत्तर हे तदनुषंगाने नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ४ बाबत :-
10. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार क्र.१८/४९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या विमा दाव्याची रक्कम रु. १,००,०००/- तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. ५,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ५,०००/- तक्रारकर्तीला दयावी.
- विरूध्द पक्ष क्रं. ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
- तक्रारकर्ती यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.