:: नि का ल प ञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 17/ 02/2021)
1. तक्रारकर्ती ही नवखळा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तिचे पती श्री. अशोक सिताराम नान्हे हे शेतीचा व्यवसाय करुन शेतीच्या उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. त्यांच्या नावे मौजा नवखळा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र. 396 ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 11/11/2006 रोजी तलावात आंघोळ करीत असताना पाय घसरून पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा महाराष्ट्र सरकारतर्फे रु. 1 लाख चा शेतकरी अपघात विमा काढण्यात आला होता. शासनाच्या सदर विमा योजनेप्रमाणे तक्रारकर्ती ही मयत विमाधारकाची पत्नी व वारस असल्याने सदर विम्याची लाभार्थी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने पतीचा शेतकरी अपघात विमा लाभ मिळण्यासाठी विरूध्द पक्ष क्र. 3 कडे रीतसर अर्ज सादर केला. तक्रारकर्तीने, विरूध्द पक्ष क्र. 3च्या मागणी नुसार तक्रारकर्तीने कागदपत्राची पूर्तता केली. परंतु त्यानंतर तिच्या दाव्या संदर्भात विरूद्ध पक्षांकडून कोणतीही माहिती तक्रारकर्तीला मिळाली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 16/2/2018 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 व 3 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुद्धा तक्रारकर्तीला विमा दावा रक्कम मिळाली नाही तसेच नोटीसचे उत्तरही विरुद्ध पक्षांनी दिले नाही. सबब तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्तीची मागणी अशी आहे की विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रु. 1 लाख, दावा दाखल झाल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे तसेच झालेल्या मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रू.30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 20,000/- देण्याचा आदेश देण्यात यावा.
2. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करण्यात येऊन विरूध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांना नोटीस काढण्यात आले.
विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारीत उपस्थित होऊन तक्रारीला प्राथमिक आक्षेप दाखल करीत त्यात नमूद केले की प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत विहित कालावधीत दाखल करण्यात आलेली नसल्यामुळे मुदत बाह्य असून तक्रारकर्तीला कायदेशीर वैधता नाही सबब ती खारीज करण्यात यावी अशी त्यांनी आयोगास विनंती केली.
विरुद्ध पक्ष क्रमांक एक व दोन यांनी घेतलेल्या प्राथमिक आक्षेपांचे अनुषंगाने आयोगाने उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून सदर मुद्दे निकाली काढण्याकरिता प्रकरणाच्या प्राथमिक अवस्थेत पुरेसे दस्तावेजी पुरावे उपलब्ध नसल्यामुळे सदर मुद्दे तक्रारीच्या अंतिम निवाडयाचे वेळी विचारात घेतले जातील असे मत नोंदवून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 ने दाखल केलेला प्राथमिक आक्षेपांचा अर्ज खारीज केला.
विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की, तक्रारकर्तीच्या तक्रारीला कोणतेही कारण घडलेले नाही. तसेच सदर तक्रार खोडसाळपणे व वाईट हेतूने प्रेरित होऊन दाखल केलेली असून दाखल केलेली तक्रार ही मुदतबाह्य आहे. विरूद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांच्या प्राथमिक आक्षेपाच्या अर्जातील कायदेशीर आक्षेपांचा लेखी उत्तरात पुनरूच्चार करून त्याआधारे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे नमूद केले आहे
3. विरूध्द पक्ष क्र. 3 ह्यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यानी प्रकरणात हजर होऊन त्यांच्या वतिने तालूका कृषी अधिकारी, नागभीड हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून तक्रार चालवतील असा अर्ज दाखल केला. परतु त्यानंतर विरुद्ध पक्ष क्रमांक तीन वा त्यांचे तर्फे प्रतिनिधी हे प्रकरणात हजर झाले नाहीत तसेच त्यांनी तक्रारीला लेखी उत्तरही दाखल केलेले नाही.
4 तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे लेखी कथन, लेखी उत्तर हाच पुरावा समजण्यात यावा अशी दि. 16/9/19 ला पुरसिस दाखल तसेच लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 1 व 2 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
5. प्रस्तुत तक्रारीतील उभय पक्षाचे कथन व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की तक्रारकर्तीचे पती श्री. अशोक सिताराम नान्हे यांच्या नावे मौजा नवखळा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे शेतजमीन होती व तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 11/11/2006 रोजी तलावात आंघोळ करीत असताना पाय घसरून पाण्यात बुडून अपघाती मृत्यु झाला. शासनामार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र. 1 यांचेकडून तक्रारकर्तीच्या मय्यत पतीचा रू.1 लाखाचा विमा काढलेला असल्यामुळे पतीचे मृत्युनंतर तक्रारकर्तीने सदर विमादाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरुद्ध पक्ष क्रमांक 3 कडे दस्तावेजांसह रितसर अर्ज केला असे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे. मात्र या कथनाचे पुष्ट्यर्थ विमा दावा अर्जाची नक्कल वा कोणताही पुरावा तक्राकर्तीने प्रकरणात दाखल केलेला नाही. शिवाय विरुद्ध पक्ष क्रमांक 3 यांनी प्रकरणात लेखी उत्तरच दाखल केले नसल्यामुळे याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाही. असे असूनही विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 च्या लेखी उत्तरात ही बाब स्पष्टपणे नाकारलेली नसल्यामुळे तक्रारकर्तीने विमादावा दाखल केला असे गृहीत धरले तरीदेखील तक्रारकर्तीचे कथनानुसार विरूध्द पक्षांनी तिचा विमादावा अद्याप निकाली काढलेला नसल्यामुळे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे हे तिचे म्हणणे ग्राह्य धरता येत नाही. कारण आयोगाच्या मते विमा योजनेअंतर्गत मृत्युदावा दाखल करणारी कोणतीही लाभार्थी व्यक्ती, ही दावा प्राप्त करण्यासाठी कोणताही पाठपूरावा न करता तब्बल 12 वर्षे वाट पाहणार नाही आणी दावा रक्कम मिळण्याकरिता तिचे सतत प्रयत्न सुरु राहतील. परंतु तक्रारकर्तीने प्रस्तुत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केला हे कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत असून त्यामुळे तक्रार मुदतबाह्य नाही हे तक्रारकर्तीचे म्हणणे ग्राह्य धरण्यायोग्य नाही. शिवाय तब्बल 12 वर्षानंतर म्हणजे दिनांक 16/2/2018 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविल्यामुळे तक्रारीला नवीन कारण उद्भवत नाही. सबब आयोगाचे मते सदर तक्रार विहीत मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.51/2018 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती कल्पना जांगडे(कुटे))(श्रीमती किर्ती वैदय(गाडगीळ))(श्री अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, चंद्रपूर.