::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 15/07/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्त्याच्या मालकीचे वाहन क्र.एम एच- 34, एम-9166 विरूध्द पक्ष यांचेकडे दि.17/3/2014 ते दिनांक 16/3/2015 या कालावधीकरीता विमाकृत केले व त्याचा पॉलिसी क्रमांक 281801/31/13/63/00005003 हा होता. तक्रारदाराचे सदर वाहन दिनांक 21/12/2014 रोजी गडचिरोली ते चंद्रपूर मार्गाने जात असतांना रात्रीचे वेळी रस्त्यावर अचानक जंगली जनावर वाहनासमोर आले व त्याला वाचविण्यासाठी वाहनचालकाने वाहन बाजूला घेतले असता ते एका झाडावर जोरदार आदळल्याने अपघात होवून सदर वाहनाचे नुकसान झाले. अपघाताचे वेळी सदर वाहन हे तक्रारकर्त्याचे वाहनचालक श्री.रविंद्र मारूती बेंदे हे चालवीत होते व त्यांच्याकडे सदर वाहन चालविण्याचा वैध परवाना होता. सदर घटनेची तक्रारकर्त्याने संबंधीत पोलीस स्टेशनला लगेच तक्रार दिली तसेच विरूध्द पक्ष विमा कंपनीलादेखील घटनेची सूचना देण्यांत आली. त्यानंतर विमा कंपनीने त्यांच्या सर्व्हेयर मार्फत
वाहनाची तपासणी करून अहवाल तयार केला. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे आवश्यक कागदपत्रांसह विमादावा सादर केला. परंतु सदर क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानभरपाईकरीता तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे सतत पाठपूरावा करूनही विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे मागणीची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 18/6/2015 रोजी गैरअर्जदाराला नोटीस पाठविली. त्यानंतर दिनांक 25/6/2015 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराला पत्र पा्ठवून सुचीत केले की घटनेचे वेळी तक्रारकर्त्याचे वाहन चालकाजवळ सदर वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता व या कारणाने तक्रारकर्त्याचा विमादावा नाकारण्यांत येत आहे. यानंतर तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दि.25/8/2015 रोजी नोटीस पाठवून विमादावा नाकारण्याचा निर्णय रद्द करून विमादावा मंजूर करण्यांत यावा अशी विनंती केली. परंतु सदर नोटीसला गैरअर्जदारांनी उत्तरही दिले नाही व त्याची पुर्ततादेखील केली नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचाविमादावा नामंजूर करून तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने दि.25/6/2015 रोजीचे पत्राद्वारे तक्रारकर्त्याचा विमादावा नामूंजूर करून न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, विमा कराराप्रमाणे तक्रारकर्त्याच्या क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान-भरपाईची रक्कम रू.1,50,000/- त्यावर घटनेची तारीख 21/11/2014 पासून पूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावी तसेच मानसीक व आर्थीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.25,000/- व तक्रारीचा खर्च रू.5000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी दिनांक 7/7/2016 रोजी नि.क्र.9 वर आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात कबूल केले आहे की, तक्रारकर्त्याचे सदर वाहन गैरअर्जदारांकडे विमाकृत होते आणि तक्रारकर्त्याने क्षतीग्रस्त वाहनाचा नुकसान भरपाई विमा दावा दाखल केला होता व तो दावा दि.25/6/2015 च्या पत्राद्वारे नामंजूर केला होता. आपल्या विशेष कथनात पुढे नमूद केले की तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे विमादाव्यासोबत दाखल केलेल्या दस्तावेजांची पडताळणी करूनच सदर विमादावा दि.25/6/2015 रोजी नामंजूर केला आणी तसे तक्रारकर्त्यांस सूचीत केले. अपघाताचे वेळी तक्रारकर्त्याचे सदर वाहन क्र.एम एच- 34, एम-9166 हे श्री.रविंद्र बेंदे हे चालवीत होते परंतु सदर वाहनचालक रविंद्र बेंडे यांच्याकडे अपघाताच्या वेळी सदर वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तक्रारकर्त्याचे सदर वाहन हे एम.जी.व्ही. श्रेणीतील असून सदर वाहनचालकाकडे एल.एम.व्ही श्रेणीचे वाहन चालविण्याचा परवाना होता. सदर वाहन चालकाकडे तक्रारकर्त्याचे सदर वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमादावा नामंजूर करण्यांत आला. तक्रारकर्त्याला संपूर्ण बाबीची माहिती असूनसुध्दा त्यानी विमापॉलिसीची कोणतीही पडताळणी न करता विद्यमान मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रार खोटी असल्याने रू.50000/- दंडासह खारीज करण्यात यावी तसेच गैरअर्जदाराला सदर तक्रार लढण्यासाठी लागलेला खर्च रू.10,000/- तक्रारकर्त्यावर बसविण्यांत यावा अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तरालाच रिजॉईंडर समजण्यात यावे अशी नि.क्र.12 वर दाखल केलेली पुरसीस, लेखी युक्तिवाद, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा : नाही
अवलंब केला आहे काय ?
3) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ? नाही
4) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
5. तक्रारदाराच्या मालकीचे वाहन क्र.एम एच- 34, एम-9166 तक्रारदाराने विरूध्दपक्ष यांचेकडे विमाकृत केले होते. सदर बाब विरूध्द पक्षांसदेखील मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. तक्रारकर्त्याचे वाहन क्र.एम एच- 34, एम-9166 हे दिनांक 21/12/2014 रोजी चंद्रपूर मार्गाने गडचिरोली येथे जात असतांना अपघात होवून क्षतीग्रस्त झाले. घटनेचे वेळी सदर वाहन हे तक्रारकर्त्याचे वाहनचालक श्री.रविंद्र मारूती बेंडे चालवीत होते. सदर घटनेची सूचना तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष विमा कंपनीला दिली व विमादावा दाखल केला याबाबत उभय पक्षात वाद नाही. त्यानंतर विमा कंपनीने त्यांच्या सर्व्हेयर मार्फत वाहनाची तपासणी केली व दिनांक 25/6/2015 रोजीचे पत्रान्वये, घटनेच्या वेळी तक्रारकर्त्याच्या वाहन चालकाजवळ सदर वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता या कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमादावा नाकारल्याचे कळविले. तक्रारकर्त्याने नि.क्र.4 वर दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस आले की, पॉलिसीमधील ड्रायव्हर्स क्लॉज यामध्ये ‘विमाकृत वाहनाचे अपघाताचे वेळी सदर वाहनाच्या चालकाकडे त्या प्रकारचे वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे बंधनकारक असल्याचे नमूद आहे’. तसेच दस्त क्र.अ-2 वर सदर वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट संदर्भातील दस्तावेजामध्ये तक्रारकर्त्याचे विमाकृत टाटा 909 हे वाहन एम.जी.व्ही. श्रेणीतील असल्याचे नमूद आहे व सदर वाहनाच्या अपघाताचे वेळी वाहन चालवित असलेले वाहनचालक श्री.रवींद्र मारूती बेंडे यांचा वाहन परवाना दस्त क्र.अ-4 नुसार सदर वाहनचालकाकडे एलएमव्ही श्रेणीचे वाहन चालविण्याचा परवाना होता असे दिसून येते. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट संदर्भातील दस्तावेजावरून तक्रारकर्त्याचे सदर वाहन हे एम.जी.व्ही.(Medium Goods Vehicle) श्रेणीतील आहे. परंतु सदर वाहनचालकाकडे एम.जी.व्ही.(Medium Goods Vehicle) श्रेणीतील वाहन चालविण्याचा परवाना नसून एलएमव्ही श्रेणीचे वाहन चालविण्याचा परवाना होता हे वाहन परवाना दस्त क्र.अ-4 वरून सिध्द होते. ‘मा.राष्ट्रीय आयोग यांनी रिलायन्स जनरल इन्श्युरंस कं.लि. विरूध्द जिवाभाई मालदेभाई गोधनिया, 2017 (2) सीपीआर 581 या प्रकरणात दिनांक 9/5/2017 रोजी दिलेल्या निवाडयातील पॉलिसीमधील अटी व शर्तींच्या भंगाबाबतचे न्यायतत्व प्रस्तूत प्रकरणांत लागू होते. प्रस्तूत प्रकरणात वाहनचालकाकडे अपघाताच्या वेळी एलएमव्ही श्रेणीचे वाहन चालविण्याचा परवाना असला तरी विमाकृत एम.जी.व्ही. (Medium Goods Vehicle) श्रेणीतील वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे तक्रारकर्त्याने पॉलिसी अटींचा भंग केलेला आहे हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याचा विमादावा पॉलिसीतील अटींचा भंग केल्याचे कारणास्तव नामंजूर करून अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब वा सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.24/2015 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 15/07/2017