1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार हा राहणार मानोरा, ता.भद्रावती,जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मयत विमाधारक दादा देवाजी भरडे हा त्यांचा मुलगा आहे. दादा देवाजी भरडे याची मानोरा, ता.भद्रावती,जिल्हा चंद्रपूर येथे शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 हे विमा कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 2 हे विमा सल्लागार आहेत. गैरअर्जदार क्रमांक 3 हे गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांचे वतीने दावे स्वीकारतात. अर्जदाराचा मुलगा दादा दवाजी भरडे हा दिनांक 3.3.2016 रोजी सकाळी 1.30 चे दरम्यान शेताला पाणी देण्याकरीता इलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यांस गेला असता करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. मयत दादा देवाजी भरडे याचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्रमांक एक यांचेकडे विमा उतरविला असल्यामुळे अर्जदाराने दिनांक 24/5/2016 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे दस्तावेजांसह विमा दावा दाखल केला. परंतु त्यानंतर वारंवार विनंती करूनही दाव्याची रक्कम न मिळाल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदारांविरुद्ध दाखल केली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदाराला विमादाव्याची रक्कम रू.2 लाख, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- मिळण्याचे आदेश व्हावेत. 3. अर्जदार यांची तक्रार दाखल करून गैर अर्जदार क्र.1,2 व 3 यांचेविरुद्ध नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना मंचाचा नोटीस प्राप्त होऊन देखील ते मंचात उपस्थित न झाल्यामुळे त्यांचेविरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 12/7/2018 रोजी पारीत करण्यांत आला. 4. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये अर्जदार चे म्हणणे खोडून काढले. त्यांनी आक्षेप घेतला की विमा करार हा त्रिपक्षीय करार असूनही अर्जदाराने कृषी आयुक्त पुणे यांना सदर तक्रारीत पक्ष न केल्यामुळे आवश्यक पक्षकाराअभावी तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच अर्जदाराच्या मुलाचा करंट लागून अपघाती मृत्यू झाला असे तक्रारीत नमूद केले असले तरी दस्तऐवजांनुसार ते खरे नाही. तसेच मृतक दादाजी यांच्या मृत्युनंतर त्याचे वारसांनी त्याचे नांव फेरफार नोंदींवर चढविले. त्याबद्दल दस्तावेज दाखल आहे. परंतु सदर केस ही दिनांक 6/10/2017 रोजी दाखल केली. सबब सदर तक्रार ही मुदतबाहय असून खारीज करण्यांत यावी. सदर तक्रारीचे कारण दिनांक 2/3/2016 रोजी घडल्यामुळे अर्जदाराने सदर विमादावा दस्तावेजांसह कृषी अधिका-याकडे 90 दिवसांचे आंत दाखल करावयास हवा होता. परंतु त्याबाबत कोणताही पुरावा दस्तावेज तक्रारीत दाखल नाही. तसेच गैरअर्जदार क्र.2 हयांना गैरअर्जदार क्र.1 कडून त्याकरिता ब्रोकरेज चार्जेस मिळतात, परंतु गैरअर्जदार क्र.2 हयांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. नियमानुसार गैरअर्जदार क्र.2 कडून विमादावा हा आवश्यक दस्तऐवजांसह 90 दिवसांचे मुदतीत गैरअर्जदार क्र.1 कडे यावयास हवा. परंतु तो मुदतीत दाखल न झाल्यामुळे सदर दावा अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे नाकारण्यांत आला. सबब सदर तक्रार मुदतबाह्य असून खारीज करण्यात यावी.
5. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष (1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 यांचा ग्राहक आहे काय ? होय. (2) अर्जदार गैरअर्जदार क्रं.2 व 3 यांचा ग्राहक आहे काय ? नाही. (3) गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत :- 6. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेल्या दस्त क्र.9 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचा मुलगा दादा देवाजी भरडे याचे नांवे चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 297 ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक दादा देवाजी भरडे हा शेतकरी होता व शेतीतील उत्पन्नावर तो कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. शासन निर्णयानुसार अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे मुलाचा 2015-16 या कालावधीकरता रू.2,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. तक्रारकर्ता हा मयत विमाधारक शेतक-याचे वडील असून सदर विम्याचे लाभधारक आहेत. सबब अर्जदार हा गैरअर्जदारक्र.1 चा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. 2 बाबत :- 7. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार हा विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 3 बाबत..
8. सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत विमाधारकाची सन 2015-16 करीता विमा पॉलिसी काढण्यांत आलेली आहे. अर्जदाराचे निवेदन तथा त्याने नि.क्र.4 वर दाखल शवविच्छेदन अहवाल व घटनास्थळ पंचनामा या दस्तऐवजांवरून असे स्पष्ट दिसून येते की अर्जदाराचा मुलगा श्री दादा देवाजी भरडे हा हा दिनांक 3.3.2016 रोजी सकाळी 1.30 चे दरम्यान शेताला पाणी देण्याकरीता इलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यांस गेला असता करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. त्याचे वारस वडिलांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेला विमा दावा गैरअर्जदार क्र.1 ला प्राप्त झाला हे त्यांनी मान्य केले आहे. सदर योजनेअंतर्गत शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शेतक-याचा विमा कालावधीत मृत्यु झाल्यास विमा कालावधीत किंवा विमा कालावधी संपल्यापासून 90 दिवसाचे आंत विमा प्रस्ताव गैरअर्जदाराकडे दाखल करावयास पाहिजे, तसेच गैरअर्जदार क्र.2 कडे ज्या तारखेला विमादावा दाखल केला त्याच दिवशी तो गैरअर्जदार क्र.1 कडे दाखल झाला असे समजण्यांत यावे अशीदेखील त्यात तरतूद आहे. सदर प्रकरणात मंचातर्फे गैरअर्जदार क्र.2 व 3 हयांना नोटीस बजावण्यांत येवूनही ते मंचासमक्ष उपस्थीत झाले नाहीत व त्यांनी आपले उत्तर दाखल केलेले नाही. सबब गैरअर्जदार क्र.2 हयांना विमादावा केंव्हा प्राप्त झाला त्याबद्दल कोणताही खुलासा होत नाही. गैरअर्जदार क्र.2 व 3 हयांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नाही असे दर्शविणारा कोणताही पुरावा दाखल करण्यांस गैरअर्जदार क्र.1 असमर्थ ठरले. सबब अर्जदाराचा विमादावा योग्यरीत्या दाखल झाला असून त्यांनी आवश्यक दस्तावेजांची पुर्तता केली आहे मात्र असे असूनही गैरअर्जदार क्र.1 ने, आवश्यक दस्तावेजांची पुर्तता केली नाही या कारणास्तव सदर विमा दावा नामंजुर करणे व अर्जदाराला विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे न्यायोचीत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांची कृती ही न्यूनता पूर्ण सेवा या संज्ञेत मोडते व ते अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम व्याजासह देण्यास जबाबदार ठरतात.
मुद्दा क्र. 4 बाबत :- 9. सबब उपरोक्त विवेचनावरून मंच खालील आदेश पारित करीत आहे. आदेश (1) अर्जदाराची तक्रार क्र.172/2017 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांस गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत विमादाव्याची रक्कम रू.2,00,000/- त्यावर तक्रार दाखल दिनांक 5/10/2017 पासून रक्कम अर्जदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याजासह अर्जदारांस द्यावी. (3) गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्द कोणताही आदेश नाही. (4) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासाचे नुकसान भरपाईपोटी रू.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक – 14/11/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |