::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 06/09/2021)
अर्जदार वरील पत्त्यावरील रहिवासी असून अर्जदार क्र.1 चे पती श्री. बालाजी जगन्नाथ् दरेकर यांच्या मालकीची मौजे मोहाळ रैत, तह. पोंभूर्णा, जिल्हा चंद्रपूर. येथे भुमापन 97 ही शेतजमीन आहे. अर्जदाराचे पती शेतीचा व्यवसाय करुन कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ही विमा कंपनी असून गैरअर्जदार क्र. 3 शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. शासनाच्या वतीने विरुद्ध पक्ष क्र.3 तर्फे अर्जदार क्र.1 चे पतीचा रु.2,00,000/-चा शेतकरी अपघात विमा उतरवला होता. अर्जदार क्र.1 व 2 हे सदर विमाधारकाचे अनुक्रमे पत्नी व मुलगा असल्याने सदर योजनेचे लाभधारक आहेत. अर्जदाराचे पती दिनांक 28/10/2016 रोजी शेतात काम करीत असतांना त्यांचा विषारी साप चावल्याने विषबाधा होऊन अपघाती मृत्यू झाला. शासनातर्फे अर्जदार महिलेच्या पतीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने अर्जदारांनी विमा रक्कम रु.2,00,000/-मिळण्यासाठी आवश्यक दस्तावेजसह गैरअर्जदार क्र. 3 कडे अर्ज केला व वेळोवेळी विरुद्ध पक्ष विमा कंपनीने मागितलेल्या दस्तावेजांची पूर्तता केली. परंतु बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारांचे विमादाव्याबाबत काहीही न कळविल्यामुळे अर्जदारांनी वकिलामार्फत दिनांक 17/11/2017 रोजी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविली असता अन्य कारणासाठी दावा नामंजूर केल्याचे कळविण्यांत आले. गैरअर्जदार यांनी बेकायदेशीररीत्या दावा नामंजूर केला असून सेवा देण्यास कसूर केलेली असल्यामुळे अर्जदार हिने विद्यमान आयोगासमक्ष तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांची मागणी अशी आहे की गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा रक्कम रु. 2,00,000/- प्रस्ताव दाखल केल्यापासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक मानसिक आर्थिक नुकसानापोटी रु.30,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्याचे आदेश व्हावेत.
2. तक्रार दाखल करून घेवून गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल केले. तक्रारीत नमूद केलेले म्हणणे खोडून काढत लेखी उत्तरातील विशेष कथनात त्यांनी नमूद केले की विमाधारकाचे मृत्यूनंतर पोलीस स्टेशन, पोंभूर्णा यांचेकडे दाखल फौजदारी गुन्हा क्र 8/2016 नुसार पोलीस तसेच उविभागीय दंडाधिकारी, गोंड़पिपरी यांनी केलेल्या चौकशीत, मृतक बालाजीचे वैद्यकीय अधिकारी, शासकीय प्राथमीक स्वास्थ्य केंद्र, पोंभूर्णा मार्फत करण्यांत आलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हे Cardio Respiratory Arrest due to snake bite नमूद असले तरीही त्यात मृत्यूचे कारण विषबाधा असल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालातील नमूद साप चावल्याचा उल्लेख विवादीत ठरतो. परिणामता: विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती नसून हार्ट अटॅकने नैसर्गीकरीत्या झालेला असल्यामुळे विमादावा देय नाही. सबब अर्जदाराचा दावा नामंजूर करून तसे अर्जदाराला रीतसर कळविण्यांत आले. शिवाय सदर विवाद हा सखोल चौकशीनेच सोडविणे गरजेचे असल्याने ग्राहक आयोगाचे मर्यादीत अधिकारक्षेत्रात तो सोडविला जाऊ शकत नाही. त्यामुळे वि. प. क्र.1 व 2 चे सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. सबब तक्रार खारीज करण्यात यावी अशी त्यांनी आयोगास विनंती केली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 3 प्रकरणात उपस्थीत होवून दाखल केलेल्या लेखी उत्तरात, अर्जदाराकडून दाखल झालेला विमादावा तसेच विमा कंपनीचे निर्देशांनुसार अर्जदाराने केलेल्या पूर्तता विनाविलंब विमा कंपनीकडे सादर केल्या आहेत. सबब त्यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नसून त्यांचेविरूध्द तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे असे त्यांनी नमूद केले आहे.
4. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व गैर अर्जदार क्र. 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 3 यांचा ग्राहक आहे काय ? नाही.
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांस त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय? होय.
4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 बाबत ः-
5. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने तक्रारकर्तीच्या ग्राहकत्वाबाबत विवाद उपस्थीत केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.1 व 2 ची निर्विवाद ग्राहक आहे. मात्र गैरअर्जदार क्र.3 हे शासकीय कार्यालय असून शेतकरी विमा योजनेसंबंधी शासनाने निर्धारीत किंवा विहीत करून दिलेली कार्ये विनामोबदला पार पाडतात. त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 3 चे संदर्भात ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर त्यानुषंगाने देण्यात येत आहे.
मुद्दा क्र. 3 बाबत ः-
उपरोक्त तक्रारीतील दोन्ही पक्षाचे कथन व दस्तेवज वरून असे दिसून येत कि अर्जदाराचे पतीचा मृत्यु दि. 28/10/2016 रोजी साप चावल्याने आकस्मितरीत्या झाला असून तसा स्पष्ट उल्लेख पोलीस स्टेशन, पोंभूर्णा यांचेकडील दाखल फौजदारी गुन्हा क्र 8/2016 मध्ये आहे. सदर प्रकरणात पोलीस तसेच उविभागीय दंडाधिकारी, गोंपिंपरी यांनी केलेल्या चौकशीतील, मृतक बालाजीचे वैद्यकीय अधिकारी, शासकीय प्राथमीक स्वास्थ्य केंद्र, पोंभूर्णा मार्फत करण्यांत आलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण Cardio Respiratory Arrest due to snake bite असे नमूद आहे. मात्र शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण सर्पदंशाने विषबाधा असल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालातील नमूद साप चावल्याचा उल्लेख विवादीत ठरतो. परिणामता: विमाधारकाचा मृत्यू हा अपघाती नसून हार्ट अटॅकने नैसर्गीकरीत्या झालेला असल्यामुळे विमादावा देय नाही असे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत तक्रारकर्तीने दिनांक 10/4/2019 रोजी तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजातील पॉलिसीची प्रत व त्रीपक्षीय करार यांचे अवलोकन केले असता त्यातील निर्देश क्र.VI मधील clause J मध्ये स्पष्ट निर्देश देण्यांत आले आहेत की, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद असेल तर त्याबाबत सविस्तर विसेरा रिपोर्टचा आग्रह विमा कंपनीने धरु नये. शिवाय प्राधिकृत वैद्यकीय अधिका-याने दिलेल्या स्पष्ट अहवालाला नाकारण्यांचे विमा कंपनीला काहीच कारण नाही आणी सदर अहवाल चुकीचा असल्याचे वि.प.क्र.1 व 2 यांनी कोणत्याही पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. अशा परिस्थीतीत वि.प.क्र.1 व 2 यांनी कोणत्याही सबळ आधाराशिवाय तक्रारकर्तीचा विधीग्राहय विमादावा नाकारुन तक्रारकर्तीप्रती त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचा निष्कर्ष निघतो. परिणामत: तक्रारकर्ती विमादाव्याची रक्कम रु.2 लाख तसेच तिला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल रु.5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5000/-मिळण्यांस पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. 3 चे उत्तर त्यानुषंगाने देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.120/2018 अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) वि. प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा सामुहीकरीत्या तक्रारकर्तीस
विमादाव्याची रक्कम रु.2,00,000/- दयावी
(3) वि. प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा सामुहीकरीत्या तक्रारकर्तीस
शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई दाखल रु.5000/-
व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5000/- दयावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ विनामुल्य पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.