::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या
१. तक्रारकर्ती, रा. नवखळा तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तिच्या मुलाची एकनाथ उर्फ सचिन मुरलीधर निकुरे याच्या मालकीची मौजा नवखळा तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 173 ही शेत जमीन आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही विमा कंपनी असून विरुद्ध पक्ष क्रमांक 2 हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक 3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तिच्या मुलाचा रुपये दोन लाखांचा विमा शासनामार्फत उतरविला होता. दिनांक 29.5.2016 रोजी तक्रारकर्तीच्या मुलाचा मृत्यू सरकारी बसने जात असताना एका ट्रकने बसला धडक दिल्याने जखमी होऊन झाला. मुलाच्या आकस्मिक मृत्यूने तक्रारकर्तीला मानसिक धक्का बसला. परंतु शासनातर्फे मुलाचा अपघात विमा काढलेला असल्यामुळे व तो मुलगा अविवाहित असल्याने तक्रारकर्ती ही विरुद्ध पक्षांकडून विमा रक्कम घेण्यास पात्र आहे. सबब तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक 3 कडे दिनांक 27.6.16 रोजी विमा रक्कम मिळण्यास रीतसर अर्ज केला, व आवश्यक दस्तावेज पुरविले. रीतसर दावा विरुद्ध पक्षाकडे सादर करूनही दावा मंजूर वा नामंजूर न केल्याने तक्रारकर्तीने कृषी आयुक्तालय महाराष्ट्र यांचेकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली तेव्हा तक्रारकर्तीला त्याचा दावा फेटाळल्याचे रिजेक्ट लिस्ट वरून कळले. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्तीला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने तक्रारकर्तीने सदरचा अर्ज विरुद्ध पक्षांविरुद्ध दाखल केला असून तक्रारकर्तीची मागणी आहे की वि. पक्षाने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये दोन लाख विरुद्ध पक्षाकडे प्रस्ताव दिल्यापासून म्हणजेच दिनांक 27 6 2016 पासून दर साल दर शेकडा 18 टक्के दराने व्याजासह देण्यात यावे तसेच मानसिक-शारीरिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 15,000/- देण्याचा आदेश व्हावा.
2. तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्षांना नोटीस काढण्यात आले. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी लेखी उत्तर दाखल करून तक्रार करत याचे म्हणणे खोडून काढले आहे. आपल्या विशेष कथनात नमूद केले की विरुद्ध पक्ष क्रमांक एक यांना दाव्याचे पूर्ण दस्तावेज मिळाले नाहीत. तसेच मृतकाच्या नावाबद्दल स्पष्टता नव्हती. त्याच प्रमाणे 7/12 व पटवारी दस्तावेजांचे अवलोकन केले असता शेतीचा मालक म्हणून सचिन मुरलीधर निकुरे चे नाव होते परंतु पोलिस चौकशी ऑफिसरने एकनाथ उर्फ सचिन मुरलीधर निकुंरे असे नोंदविले आहे त्याचप्रमाणे इन्क्वेस्ट पंचनामा मध्येही नोंदविली असून पि.एम. रिपोर्टमध्येही तेच नाव दर्ज आहे. या सर्व दस्तावेजां वरून असे दिसून येत आहे की एकनाथ व सचिन हे दोन्ही एकच आहेत. तसेच तक्रार कर्तीची मयत मुलाला रामभाऊ विदुरे यांच्याकडून ओळखले गेले. तसेच गिताबाई यांनी शपथपत्रावर जाहीर केले की दोन्ही नावं ही त्यांच्या मयत मुलाचीच आहेत. सदर तक्रार ही अयोग्य असल्यामुळे खारीज होण्यास पात्र आहे. तसेच विरुद्ध पक्ष यांना दाव्याचे दस्तावेज पूर्णपणे मिळाली नसल्यामुळे सदर दावा विरुद्ध पक्षाने कायदेशीररीत्या नाकारलेला आहे. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
३. विरुद्ध पक्ष क्रमांक 3 यांनी सदर तक्रार अर्ज वर उत्तर दाखल करून नमूद केले की तक्रारकर्तीने दिनांक 12/7/2016 रोजी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून दिनांक 20/7/2016 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला व त्यांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीस सादर केला. प्रस्तावाची छाननी विमा कंपनी करते. विमा मंजूर करण्याचा अधिकार अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना नसून विमा कंपनीस आहे.
४.. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व वि.प. क्र. 1, 2 व 3 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद व विरूध्द पक्ष क्र.1 यांचे पुरसीस यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. वि.प. क्र. १ व 2 यांनी तक्रारकर्तीस सेवासुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय
2. वि.प. क्र. १ व 2 तक्रारकर्तीस नुकसान भरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रमांक एक व दोन बाबत ः-
५. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीतील कथनावरून व दस्तावेजां वरून ही बाब स्पष्ट होत आहे की तक्रार करण्याच्या मुलगा नाव एकनाथ उर्फ सचिन मुरलीधर निकुरे याच्या मालकीची मौजा नवखळा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 173 ही शेतजमीन आहे. त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक 1 कडून वि.प. क्रमांक 3 मार्फत शासनाच्या योजनेंतर्गत विमा उतरविला होता. परंतु दिनांक 29/05/2016 रोजी तिचा मुलगा एकनाथ उर्फ सचिन मुरलीधर निकुरे याचा सरकारी बसने जात असताना जखमी होऊन मृत्यू झाला ही बाब तक्रारीत दाखल एफ आय आर व इतर पोलिस दस्तावेजां वरून स्पष््ट होत आहे. तसेच निशाणी क्रमांक ४ वरील दस्त क्र. ६ वर तक्रार करती ने तिचा मुलगा एकनाथ मुरलीधर निकुरे याचे मृत्युपत्र दाखल केले असून दस्त क्रमांक सात वर तक्रारकर्तीने शपथपत्र दाखल केले की एकनाथ मुरलीधर निकुरे ह्याचा मृत्यू दिनांक 29. 5. 2016 रोजी झाला असून एकनाथ व सचिन ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. विरुद्ध पक्ष यांनी त्यांच्या उत्तरात आक्षेप घेतला तक्रारकर्तीचा मुलगा एकनाथ व सातबारा उतारा असलेले नाव सचीन या भिन्न व्यक्ती असून पोलीस दस्तावेज अनुसार एकनाथ उर्फ सचिन मुरलीधर निकुरे हा अपघातात मरण पावला. सबब तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तावेज योग्य नसल्यामुळे दावा नामंजूर करण्यात आला. परंतु सदर बाब सिद्ध करण्यासाठी विरुद्ध पक्षाने कोणतेही दस्तावेज तक्रारीत दाखल केलेले नाहीत. मंचाच्या मते महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यू बाबत काढलेल्या शेतकरी अपघात विमा पॉलिसी बाबतच्या शासन निर्णयांवरून सदर पॉलिसीमध्ये तांत्रिक बाबींना जास्त वाव दिलेला नाही. अशा प्रकरणांमध्ये केवळ तांत्रिक बाबी उपस्थित करून विरुद्ध पक्षाने तक्राकर्तीचा दावा विना कारण नामंजूर केलेला आहे. विरुद्ध पक्षाची सदर कृती ही सेवेतील त्रुटी दर्शविते. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्ती चा विमा दावा केव्हा नामंजूर केला याबद्दलचे ना मंजुरीचे पत्र देखील मंचाच्यासमोर दाखल केलेले नाही किंवा तसा उल्लेखही लेखी उत्तरात नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक एक व दोन यांनी तक्रारकर्तीस विमादावा सेवेबाबत अटी व शर्तींचे पालन न केल्याची बाब सिद्ध झाल्याने तसेच तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत वादकथनाला लागू होत नसल्यामुळे मंचाच्या मतानुसार तक्रारकर्ती विरुद्ध पक्षांकडून विमा दावा मिळण्यास पात्र आहे.
६. विरुद्ध पक्ष क्रमांक 3 ह्यांनी तक्रार कर्तीकडून कोणतेही शुल्क न आकारल्यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
मुद्दा क्रमांक 1 व 2 च्या विवेचनावरून खालील आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 ह्यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या शेतकरी अपघात विमा दावा रक्कम रुपये 2,00,000/- तक्रारकर्तीने विमा रकमेकरीता तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18.01.2018 पासून तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत दरसाल दर शेकडा 9 टक्के सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आंत द्यावी.
३. तक्रार कर्तीला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या रुपये 10000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5000/-द्यावे.
३. विरुद्ध पक्ष क्रमांक 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
४. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ देण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष