(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 16/04/2019)
तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे आहे..
2. तक्रारकर्तीचा मय्यत मुलगा शेषराव हा शेतकरी होता व तक्रारकर्तीसुध्दा शेतकरी आहे. त्यांचे मालकीची मौजा पिपरी देशपांडे येथे स.क्र.260 ही शेतजमीन आहे. महाराष्ट्र शासनाकडून 2016-2017 या कालावधीकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र.2 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडे तक्रारकर्तीच्या मुलाचा रू.2,00,000/- चा विमा उतरविण्यांत आला होता. मय्यत विमाधारक शेषराव दिनांक 8/1/2016 रोजी ट्रॅक्टरमध्ये बसून नांदगांवला जात असतांना ट्रॅक्टरचा अपघात होवून त्यात त्याचा अपघाती मृत्यु झाला. मृतक हा शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्तीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्रमांक 2 याचेमार्फत विरूध्द पक्ष क्र.1 कडे आवश्यक दस्तावेजांसह विमा रक्कम मिळण्यासाठी रीतसर अर्ज दाखल केला व तो वि.प.क्र.1 यांचेकडे 280405/42/16/82/90000089 प्रमाणे पंजीकृत करण्यांत आला होता. वि.प.क्र.1 यांनी दि.26/7/2016 चे पत्रान्वये तक्रारकर्तीस फॉर्म क्र.6क व 6 ड व विसेरा रिपोर्ट या दस्तावेजांची मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने फॉर्म क्र.6क व 6 ड हे दस्तावेज वि.प.क्र.2 मार्फत वि.प.क्र.1 ला सादर केले परंतु विसेरा रिपोर्ट न मिळाल्यामुळे तो दिला नाही. मात्र दस्तावेजांची पुर्तता करूनही विरूध्दपक्षाकडून विमादावा अर्ज निकाली न काढून तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली. तक्रारकर्तीने दिनांक 8/9/2016 रोजी वि.प.क्र.1 यांना पत्र पाठवून विमादावा रकमेची मागणी केली, परंतु वि.प.क्र.1 ने प्रतिसाद दिला नाही. विमा रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करून त्यात अशी मागणी केली आहे की विरूध्द पक्षांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रुपये दोन लाख, त्यावर दि.8/1/2016 पासून 12 टक्के व्याजासह देण्याचे तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- देण्याचे आदेश व्हावे अशी विनंती केली.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करून विरूध्द पक्ष क्र.1 व 2 हयांना नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी मंचासमक्ष हजर होवून त्यांची लेखी उत्तरे दाखल केली.
4. वि.प.क्र.1 यांनी लेखी कथन दाखल करून त्यामध्ये तक्रारकर्तीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्रमांक 2 याचेमार्फत विरूध्द पक्ष क्र.1 कडे मयत शेषराव ची अपघाती मृत्यु विमा दावा रक्कम मिळण्यासाठी अर्ज दाखल केला व तो वि.प.क्र.1 यांचेकडे पंजीकृत करण्यांत आला होता. वि.प.क्र.1 यांनी दि.26/7/2016 चे पत्रान्वये तक्रारकर्तीस फॉर्म क्र.6क व 6 ड व विसेरा रिपोर्ट या दस्तावेजांची मागणी केली होती या बाबी मान्य केल्या असून तक्रारकर्तीचे उर्वरीत कथन नाकबूल करून आपल्या विशेष कथनात नमूद केले की शवविच्छेदनाचे वेळी मृतकाचे पोटात दारूचा वास येणारी द्रव्ये दिसून आलीत व त्यामुळे मृतकाच्या पोटाचा व्हिसेरा तज्ञांकडे तपासणी करून अहवाल सादर करण्याकरीता पाठविला होता. यावरून घटनेच्या वेळी मृतक हा दारूच्या नशेत होता हे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होते तसेच पोलीस दस्तावेजांवरून मृतक घटनेच्या वेळी ट्रॅक्टर क्र.एमएच-34/ए.पी. 2942वर बसून जात असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून खाली रोडवर पडल्याने अपघात होवून तो मरण पावला. यावरून मृतक हा स्वतःच अपघाती मृत्युस जबाबदार होता असे दिसून येते. वि.प.क्र.1 यांनी पत्रान्वये तक्रारकर्तीस फॉर्म क्र.6क व 6 ड व विसेरा रिपोर्ट या दस्तावेजांची मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने वि.प.क्र.2 मार्फत त्याची पुर्तता केली होती याबाबत कोणताही पुरावा सादर केला नाही. याशिवाय तलाठी पिपरी देशपांडे यांनी दिनांक 15/11/2016 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार स.क्र.260 व 208 ची नोंद गाव नमूना 6 (ड) नविन उपविभाग नोंदवही मध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने स.क्र.260 चा दाखल केलेला 7/12 उतारा हा अनधीकृत आहे. यावरून मृतक हा घटनेच्या वेळी शेतकरी नव्हता हे स्पष्ट होते. उपरोक्त कारणांस्तव तक्रारकर्ती ही शासकीय योजनेअंतर्गत विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई मागण्यांस कायदेशीररीत्या पात्र नाही. वि.प.ने कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
5. विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी लेखी कथनामध्ये नमूद केले की तक्रारकर्तीने सादर केलेला विमादावा वि.प.क्र.2 ने वि.प.क्र.1 विमा कंपनीस सादर केला असून तसे पत्र प्रकरणात दाखल केले आहे. विमाप्रस्ताव प्राप्त झाल्याचे वि.प.क्र.1 ने मान्य केले असून तक्रारकर्तीचा विमादावा नामंजूर करुन तसे वि.प.क्र.1 ने तक्रारकर्तीस कळविले आहे. प्रस्तावाची छाननी विमा कंपनी करते. विमा मंजूर वा नामंजूर करण्याचा अधिकार वि.प.क्र.2 ला नसून विमा कंपनीस आहे. या प्रकरणाशी वि.प.क्र.2 चा काहीही संबंध नसल्यामुळे त्यांचेविरूध्द तक्रार खारीज करण्यांत यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
6.. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, रिजॉईंडर, लेखी युक्तीवाद, वि.प. क्र. 1, यांचे लेखी म्हणणे, लेखी उत्तरामधील मजकुरालाच रिजॉईंडर समजण्यांत यावे अशी नि.क्र.17 वर पर्सीस दाखल, लेखी युक्तीवाद व विरूध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी कथन व उभय पक्षांचे तोंडी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ती ही वि.प. क्र. 1 यांची ग्राहक आहे काय ? होय
2. तक्रारकर्ती ही वि.प. क्र. 2 यांची ग्राहक आहे काय ? नाही
3. वि.प. क्र. 1 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण सेवा
दिल्याची बाब तक्रारकर्ती सिद्ध करतात काय ? होय
4. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रमांक 1 बाबत ः-
7. तक्रारकर्तीने नि.क्र.4 वर दाखल केलेल्या दस्त क्र.2,3 व 8 सातबारा, गाव नमूना आठ ‘अ’ व गाव नमूना 6(क) या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की तक्रारकर्तीचा मुलगा मय्यत शेषराव तुकडोजी मशाखेत्री याचे नांवे मौजा पिपरी देशपांडे, तह.पोंभुर्णा, जि.चंद्रपूर येथे स.क्र.208,260 ही शेतजमीन आहे. तलाठी, पिपरी देशपांडे यांनी दिनांक 15/11/2016 रोजी स.क्र.260 व 208 ची नोंद गाव नमूना 6 (ड) नविन उपविभाग (हिस्से) नोंदवही मध्ये नोंद उपलब्ध नाही असे प्रमाणपत्र दिले असले तरीही उपरोक्त दस्तावेजांवरून तक्रारकर्तीचा मृतक मुलगा हा घटनेच्या वेळी शेतकरी होता हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्तीने स.क्र.260 चा दाखल केलेला 7/12 उतारा हा अनधीकृत आहे व मृतक हा घटनेच्या वेळी शेतकरी नव्हता हे विरूध्द पक्षाचे म्हणणे मंचास ग्राहय धरण्यायोग्य वाटत नाही. शासनाकडून 2016-2017 या कालावधीकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र.2 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडे तक्रारकर्तीच्या मुलाचा रू.2,00,000/- चा विमा काढला होता व तक्रारकर्ती ही मय्यत विमाधारक शेतक-याची आई असून सदर विम्याची लाभधारक असल्याने तक्रारकर्ती ही वि.प.क्र.1 यांची ग्राहक आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत ः-
8. विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचा विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता वि.प.क्र.2 यांनी विनामोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही वि.प.क्र.2 यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत ः-
9. तक्रारकर्तीचा मय्यत मुलगा शेषराव तुकडोजी मशाखेत्री हा दिनांक 8/1/2016 रोजी ट्रॅक्टरमध्ये बसून नांदगांवला जात असतांना ट्रॅक्टरचा अपघात होवून त्यात त्याचा अपघाती मृत्यु झाला. यासंदर्भात तक्रारकर्तीने अंतिम अहवाल नमूना (एफ.आय.आर), शवविच्छेदन अहवाल व मृत्युचा दाखला दाखल केलेले आहेत.
10. सदर अपघाताचा दाखल एफ.आय.आर.चे अवलोकन केले असता त्यात, ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीपणे भरधाव चालविल्यामुळे मृतक शेषराव खाली पडून त्यात त्याचा मृत्यु झाला अशी स्पष्ट नोंद आहे.
शवविच्छेदन अहवालामध्ये कॉलम नं.5 मध्ये, “As per police inquest report, the supposed cause of death is death due to head injury due to fall from Tractor” असे नमूद आहे.
11. गैरअर्जदाराने, सदर विमादावा मृतक हा अमली पदार्थाच्या अंमलाखाली असल्यामुळे ट्रॅक्टरवरून पडून मृत्यु पावला असून असा मृत्यु विमा पॉलिसी कव्हरअंतर्गत येत नाही त्यामुळे तक्रारकर्तीचा विमादावा नामंजूर केला असे नमूद केले आहे. याकरीता विरूध्द पक्षाने शवविच्छेदन अहवालाचा आधार घेतला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालामधील पान क्र.6 वर Stomach and its contents या कॉलमसमोर संबंधीत वैद्यकीय अधिका-याने, “Intact, contain undigested food partical, no smell of alcohol” असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. यावरून मृतक हा अपघाताचे वेळी कोणत्याही अंमली पदार्थाचे अंमलाखाली नव्हता हे सिध्द होते. त्यामुळे विरूध्द पक्षाने केवळ काल्पनीक बाबींच्या आधारे तक्रारकर्तीचा विमादावा नाकारून तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत ः-
मुद्दा क्रमांक 1 ते 3 च्या विवेचनावरून खालील आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा दावा
योजनेअंतर्गत विमादावा रक्कम रुपये 2,00,000/- तक्रारकर्तीस द्यावी.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 2 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ देण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.