तक्रारकर्त्यांनी (शंकराबाई विधवा रामलु गोडसेलवार व गजानन ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था, तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी) सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत विरूध्द पक्ष यांच्या विरोधात दाखल केलेली असून मंचास मागणी केली की, तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीची जनता व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत असलेली विमा रक्कम रू. 1,00,000/- त्यांच्या मृत्यु तारखेपासून 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रू. 10,000/- मिळावे अशीही मागणी केली आहे.
तक्रारकर्त्यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः-
1. तक्रारकर्ती क्र. 1 ही मृतक रामलु बैलया गोडसेलवार यांची विधवा पत्नी असून तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीने तक्रारकर्ता क्र. 2 सहकारी पत संस्थेकडून रू. 1,00,000/- चे कर्ज घेतले होते. तक्रारकर्ता क्र. 2 ने सदर कर्जाच्या सुरक्षिततेकरिता संस्थेच्या 428 ग्राहकांचा विमा काढला होता. त्यामध्ये तक्रारकर्तीच्या पतीचे नाव समाविष्ट आहे. तक्रारकर्ता क्र. 2 ने जनता व्यक्तिगत अपघात विमा उतरविण्याकरिता तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीच्या खात्यातून रू. 240/- घेऊन वि. प. ने विमा पॉलीसी क्र. 281303/47/07/9600000958 दिला होता. सदर विम्याचा कालावधी हा दिनांक 14/12/2007 ते 13/12/2008 पर्यंत होता व त्यात तक्रारकर्ती क्र. 1 हिच्या पतीचा विमा रू. 1,00,000/- चा होता.
2. दिनांक 25/03/2009 ला तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशामुळे झाला म्हणून विरूध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. परंतु तक्रारकर्ती क्र. 1 ची मागणी खारीज केली. तक्रारकर्ती क्र. 1 चे पती हे ब्राम्हणी येथे फिरत असतांना त्यांना विषारी सर्पदंश झाल्यामुळे प्रथमोपचाराकरिता रूग्णालयात नेत असतांना रात्री 9.00 वाजता त्यांचा मृत्यु झाला. त्याबाबतची सूचना पोलीस स्टेशन पवनी, ता. जिल्हा भंडारा येथे देण्यात आली. पोलीस स्टेशन पवनी यांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला व त्याच्या आकस्मित मृत्युची नोंद ए.डी. क्रमांक 13/2009 कलम 174 सीआरपीसी अन्वये करून सर्व कागदपत्रे तयार केली. त्यामध्ये मृत्यु हा विषारी अनोळखी जंतू (साप) चावल्याने झाला असल्याचे नमूद आहे. तसेच मृतकाचे शव विच्छेदन सुध्दा करण्यात आले व सर्पदंश झालेल्या ठिकाणच्या त्वचेचे व रक्ताचे नमुने केमिकल अनालाईझर टेस्टकरिता रिजनल फॉरेन्सिक सायन्स लेबोरेटरी यांच्याकडे पाठविण्यात आले. सदर अहवालानुसार ‘’त्यामध्ये त्वचा तसेच रक्ताच्या नमुन्यात विष नसल्याचे दर्शविलेले आहे’’. केमिकल अनालायझरचा अहवाल गृहित धरून विरूध्द पक्ष यांनी ‘’मृतकाचा मृत्यु सर्प दंशाने नसल्यामुळे मृत्युचे कारण हे स्पष्ट नाही, याकरिता सदर मृत्यु हा अपघात समजल्या जाऊ शकत नाही’’ या कारणास्तव तक्रारकर्ती क्र. 1 चा विमा दावा खारीज केला. तक्रारकर्ती क्र. 1 नुसार तिचा विमा दावा नाकारणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहे. तक्रारकर्ती क्र. 1 ने आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ एकूण 12 दस्तऐवज अनुक्रमे पृष्ठ क्र. 11 ते 51 वर दाखल केलेले आहेत.
3. विरूध्द पक्ष यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः-
विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा मृत्यु विषारी सर्पदंशाने झाला हे नाकारले. तक्रारीच्या परिच्छेद क्र. 2 पूर्णपणे मान्य केला. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 3 च्या उत्तरात नमूद केले आहे की, ‘’पोलीसांनी आपल्या चौकशीमध्ये खोटे लिहिले आहे की, मृतक रामलु याचा मृत्यु सर्पदंशामुळे झाला व तो अपघात आहे’’. विरूध्द पक्ष यांच्यानुसार रासायनिक विश्लेषणात कुठेच विष आढळले नाही व म्हणून मृत्यु हा अपघात नाही असे कथन केले. विरूध्द पक्ष यांनी पुन्हा म्हटले आहे की, तक्रारकर्ती क्र. 1 ही आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत पुरविण्यात असमर्थ राहिली तसेच मयत रामलु बलैया गोडसेलवार याचा मृत्यु सर्पदंशामुळे म्हणजेच अपघाती झाला हे दाखविण्यास असमर्थ राहिली. करिता विमा रक्कम मिळण्यास तक्रारकर्ती क्र. 1 ही अपात्र आहे व तिची तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
4. मंचाने दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. तसेच तक्रारीसोबत असलेली संपूर्ण कागदपत्रे व दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले. त्यावरून मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-ः निष्कर्ष ः-
5. तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीने तक्रारकर्ता क्र. 2 पत संस्थेमार्फत जनता व्यक्तिगत अपघात विमा पॉलीसी काढली होती हे दस्तऐवज क्र. 12 तसेच दस्तऐवज क्र. 19 (लिस्टमधील अ.क्र.201) यावरून स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 1 ही विरूध्द पक्ष यांची लाभार्थी म्हणून ग्राहक ठरते. पृष्ठ क्र. 32 वरील इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, ‘’प्रेताचे दोन्ही पाय सरळ असून दोन्ही पायांचे निरीक्षण केले असता उजवे पायाचे गुडघ्याजवळ साप चावल्यासारखे दाताचे 4 निशान दिसत असून रक्त सुकलेले दिसत आहे’’. तसेच पंचनाम्याचे व तपासणी अधिका-यांचे अहवालामध्ये सुध्दा मृतकचे पायाला साप चावल्याने मृत्यु झाला असावा असे नमूद आहे. पृष्ठ क्रमांक 33वर (Crime Details Form मध्ये) देखील विषारी अनोळखी जंतू (साप) चावल्याने मृत्यु असे नमूद केले आहे. तसेच पृष्ठ क्रमांक 35 वर ‘’अंदाजे 8.30 वाजताचे दरम्यान सापाने उजवे पायाला गुडघ्याजवळ चावल्याने रक्त लागले होते’’ असे स्पष्टपणे नमूद आहे. त्याचप्रमाणे पवनी येथील सरकारी रूग्णालयात उपचाराकरिता नेल्याचे नमूद आहे. पृष्ठ क्रमांक 38 वरील ग्रामीण रूग्णालय, पवनी यांच्या नोंदीवरून सुध्दा मृतकाच्या पायास चावा घेतलेला असून निष्कर्षात, “Bite mark are consistent with snake bite” असे स्पष्टपणे नमूद आहे तसेच साप चावल्याची लक्षणे सुध्दा नमूद केलेली आहेत. त्यात change in voice occurs Blurring vision इत्यादी नमूद आहे. अनुक्रमे पृष्ठ क्र. 42 वरील (शव विच्छेदन अहवालामध्ये) परिच्छेद क्र. 17 मध्ये i) Bite mark on Rt. Leg above ankle Jt. असे स्पष्टपणे नमूद आहे.
वरील सर्व दस्तऐवजातील विवरणावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ती क्र. 1 हिच्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला असतांना सुध्दा विरूध्द पक्ष यांनी निव्वळ रिजनल फोरेन्सिक लेबोरेटरीच्या रासायनिक विश्लेषण अहवालात विष आढळले नाही या एकमेव कारणाकरिता तक्रारकर्ती क्र. 1 चा विमा दावा दिनांक 06/03/2010 रोजीच्या (पृष्ठ क्र. 51) पत्रान्वये नाकारला तसेच त्यास अपघात म्हणता येणार नाही असे गृहित धरले.
8. युक्तिवादाच्या दरम्यान विरूध्द पक्ष यांच्या वकिलांनी स्पष्टपणे नमूद केले की, पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ती क्र. 1 चा विमा दावा नाकारण्यात आलेला आहे. त्यावर मंचाने पॉलीसीच्या अटी व शर्तींबाबत विचारणा केली असता विरूध्द पक्ष यांचे वकील निरूत्तर झाले तसेच अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 12 वरील पॉलीसी प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता अटी व शर्तीं संदर्भात कोणताही दस्तऐवज किंवा नोंद नाही. तसेच विरूध्द पक्ष यांनी सुध्दा योग्य न्यायनिवाड्याकरिता पॉलीसीच्या अटी व शर्ती मंचासमोर दाखल न केल्यामुळे विरूध्द पक्ष अटी व शर्तींचे कारण पुढे करून तक्रारकर्ती क्र. 1 चा विमा दावा नाकारू शकत नाहीत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. ज्याअर्थी विरूध्द पक्ष यांनी पॉलीसीच्या अटी व शर्ती तक्रारकर्त्यांना कळविल्याच नाहीत तर अशा अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा मृत्यु हा अपघात ठरत नसून विमा दावा नाकारणे ही पूर्णतः चुकीची व खोडसाळपणाची कृती आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व विरूध्द पक्ष हे त्याकरिता त्याचा फायदा घेऊ शकत नाही. मंचाने माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या खालील निकालपत्राला आधारभूत मानलेले आहे.
Supreme Court 2000 (I) CPJ-1 – M/s Modern Insulators v/s Oriental Insurance Co. Ltd.
वरील विवेचनावरून व सरकारी कागदपत्रातील दस्तऐवजांतील नोंदीनुसार तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीच्या उजव्या पायाला गुडघ्याच्या वरील भागास साप चावल्याच्या खुणा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशाने झाला हे स्पष्ट होते. तसेच सर्पदंश होणे ही घटनाच पूर्णतः आकस्मिक स्वरूपाची असते, त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा झालेला मृत्यु हा अकस्मात मृत्यु या सदरात मोडतो. मंचास हे स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते की, सर्पदंशानंतर रासायनिक विश्लेषणात प्रत्येक वेळी विष निघेलच असे म्हणता येत नाही. त्या व्यतिरिक्त साप चावल्यानंतर ब-याच इतर कारणाकरिता मृत्यु होऊ शकतो असे Dr. A. C. Mohanty’s Legal Medicine by Dr. S. C. Mahapatra & Dr. D. V. Kulkarni यांच्या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 136 वर परिच्छेद-7 - Causes of death या सदरात Neurogenic shock असे नमूद आहे. तसेच परिच्छेद क्रमांक 10- Medico-Legal Importance या सदरात e) Poisoning by snake bite is mostly accidental, people dying from fear and neurogenic shock from non-poisonous snake bite or without even any bite is not uncommon असे तसेच i) Every bite by a poisonous snake is not envenomation असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे मंचाने माननीय राष्ट्रीय आयोग यांच्या 2009 सीटीजे 1004 – श्रीमती गंगोत्रीदेवी विरूध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच माननीय राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांच्या अपील नंबर 764/2002, आदेशित दिनांक 16/02/2005 – लक्ष्मण माणिकराव गव्हाणे विरूध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या दोन निकालपत्रांना सुध्दा आधारभूत मानलेले आहे.
वरील विवेचन, लिगल मेडिसिन या पुस्तकाचे वरील पुरावे, वरील निकालपत्रे यावरून स्पष्ट होते की, तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा झालेला मृत्यु हा सर्पदंशाने झालेला असून अपघाती झालेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व विरूध्द पक्ष यांचे म्हणणे वरील विवेचनावरून तथ्यहीन असल्यामुळे मंचाने नाकारले. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 25/03/2009 रोजी सर्पदंशाने अपघाती झाल्यामुळे विमा दावा दाखल केल्यानंतर सर्व्हेअरचा रिपोर्ट/इन्वेसटीगेशन नसल्यास दावा एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढणे विरूध्द पक्ष यांच्यावर बंधनकारक होते. असे असतांना सुध्दा पाच महिन्याच्या कालावधीनंतर दिनांक 6/3/2010 ला तो खारीज करण्यात आला ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील गंभीर स्वरूपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
विरूध्द पक्षाने आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ विश्वसनीय वस्तुनिष्ठ दस्तऐवज मंचासमोर दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सुध्दा विरूध्द पक्ष यांचे म्हणणे तथ्यहीन ठरते व विमा दावा खोडसाळपणाने उपलब्ध वस्तुनिष्ठ दस्तावेजांची शहानिशा न करता खारीज करून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे मंचाचे स्पष्ट मत आहे . मंचाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खालील निकालपत्रास आधारभूत मानले आहे.
Supreme Court of India – 2009 CTJ – 1187 – Oriental Insurance Co. Ltd. Vs. Ozma Shipping Co. Ltd.
Insurance Companies should not adopt an attitude of avoiding payments of the genuine and bona fide claims of the insured on one pretext or the other. This attitude puts a serious question mark on their credibility and trustworthiness. By adopting an honest approach, they can save enormous litigation cost and interest liability.
तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचा सर्पदंशाने झालेला मृत्यु हा अकस्मात झालेला मृत्यु या सदरात मोडत असल्याने तक्रारकर्ती क्र. 1 ही जनता व्यक्तिगत अपघात विमा दावा रक्कम रू. 1,00,000/- मृत्यु दिनांक 25/03/2009 पासून 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
करिता खालील आदेश.
आदेश
तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1. विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी जनता व्यक्तिगत अपघात विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- दि.26.03.2009 पासून रक्कम तक्रारकर्ती क्र. 1 च्या हातात पडेपर्यंत 9 टक्के व्याजासह अदा करावी.
2. विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारकर्ती क्र. 1 हिला तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.2,000/- द्यावेत.
3. विरुद्ध पक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.