आदेश (पारीत दिनांक : 18 फेब्रुवारी, 2012 ) श्री मिलींद रामराव केदार, मा.सदस्य यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा,1986 चे कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क. यांची प्रतिज्ञालेखावरील मुख्य तक्रार अशी आहे की, ते उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून व्यवसाय करतात. त्यांनी स्वतःचे कौटूंबिक वापरा करीता सन 2007 मध्ये टाटा इंडीका कार विकत घेतली. सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक- MH-32/C-1865 असा असून, वाहनाचा विमा वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून काढला. वि.प.क्रं 2 टाटा मोटर्सचे अधिकृत विक्रेता व दुरुस्तीचे काम करतात. 2. वाहनाचा विमा अस्तित्वात असताना, त.क.कडील वाहन चालक दिनांक 14.07.2008 रोजी सदर वाहनाने त.क.चे कुटूंबातील सदस्यांना जालना येथे पोहचवून, जालन्या वरुन वर्धे कडे कमी वेगाने परतताना, जालन्या पासून 300 क्वॉर्टर अंतरावर अचानक एक मुलगा कार पुढे आला व त्याला वाचविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते ईमारतीचे पिल्लरवर आदळून अपघात झाला. सदर अपघातामध्ये वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. 3. अपघाता नंतर त्वरीत पोलीस स्टेशन जालना व वि.प.क्रं 1 विमा कंपनीस सुचित करण्यात आले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री महेश नाकडे यांनी त्याच दिवशी घटनास्थळावर येऊन पाहणी केली व वाहन दुरुस्त करण्यास सुचित केले. त्यावरुन वाहन दुरुस्तीसाठी नागपूर येथे आणले असताना वि.प.क्रं 2 यांनी दिनांक 28.07.2008 रोजी दुरुस्तीचे रुपये-2,51,931.14/- एवढया रकमेचे अंदाजपत्रक दिले. 4. त.क.यांनी क्लेम फॉर्म , दुरुस्ती अंदाजपत्रक वि.प.क्रं 1 चे नागपूर येथील कार्यालयात सादर केले व मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवज पुरविण्यात आले. त्यानंतर वि.प.क्रं 1 चे सर्व्हेअर श्री सुभाष चोपडे यांनी दिनांक 05.08.2008 रोजी वाहनाचा अंतिम सर्व्हे केला व वाहन दुरुस्त करुन घेण्या बाबत सुचित केले असता वि.प.क्रं 2 यांचें कडून वाहन दुरुस्त करुन घेण्यात आले. त्यानंतरही
CC/96/2011 वि.प.क्रं 1 विमा कंपनीने श्री मनोज राठी सर्व्हेअर यांना वाहन पुर्नतपासणी करीता दिनांक 25.09.2008 रोजी वि.प.क्रं 2 यांचेकडे जाऊन पाहणी केली व तसे वि.प.क्रं 1 विमा कंपनीला कळविले.
5. वाहन दुरुस्ती नंतर वाहनाचे बिल रुपये-1,78,724/- चे त.क.यांनी वि.प.क्रं 2 यांना दिनांक 05.01.2009 रोजी अदा केले व बिलाची प्रत वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे वर्धा येथील कार्यालयात सादर केली.
6. त्यानंतर वेळोवेळी क्लेम संबधाने त.क.यांनी चौकशी केली असता, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दिनांक 09.06.2009 रोजी संपूर्ण व अंतिम क्लेम रुपये-81,000/- मंजूर करण्यात आल्याचे कळविले. सदर मंजूरीची रक्कम आणि प्रत्यक्ष्य खर्च यामध्ये बरीच तफावत असल्याने त.क.यांना धक्का बसला. त.क.यांनी वकिलाचे मार्फतीने उभय वि.प.नां दिनांक 16.07.2009 रोजी नोटीस पाठवून क्लेम व दस्तऐवजाची मागणी केली. सदर नोटीस उभय वि.प.नां मिळूनही काहीही कार्यवाही केली नाही व दिनांक 27.08.2009 रोजी खोटे उत्तर पाठविले. तसेच विमा क्लेम मंजूरीची रक्कम रुपये-81,000/- सुध्दा वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.यांना दिली नाही. म्हणून शेवटी वि.न्यायमंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल केल्याचे त.क.नमुद करतात. 7. त.क.यांनी वि.प.विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात- त.क. उभय वि.प.चे ग्राहक असून, उभय वि.प.नीं त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करावे. विमाकृत वाहन दुरुस्तीसाठी लागलेला खर्च रुपये-1,78,724/-, दि.05.01.2009 ते 05.09.2011 पर्यंत सदर रकमेवर वार्षिक 12 टक्के दराने व्याज रुपये-57,191/-, मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल नुकसान भरपाई रुपये-25,000/- तसेच नोटीसखर्च व तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- असे एकूण रुपये-2,65,915/- मिळावेत व पुढील कालावधी करीता प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो 12 टक्के दराने व्याज मिळावे इत्यादी स्वरुपाच्या मागण्यांसह प्रस्तुत तक्रार दाखल केली.. 8. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे मार्फतीने उभय पक्षांना नोंदणीकृत पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली. 9. वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे न्यायमंचा समक्ष लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल करण्यात आला. त्यांचे लेखी जबाबा प्रमाणे त.क.यांनी वि.प.क्रं 2 विरुध्द
CC/96/2011 केलेल्या कथनाशी त्यांचा संबध येत नाही. दिनांक 14.07.2008 रोजी त.क.यांनी वाहनाचा अपघात झाल्याची सुचना दिल्या नंतर त्यांनी श्री महेश नाकडे सर्व्हेअर यांची नियुक्ती केली असता अधिकृत सर्व्हेअर यांनी प्रत्यक्ष्य घटनास्थळावर जाऊन क्षतीग्रस्त वाहनाची पाहणी केली, छायाचित्रे काढली व त्यासह अहवाल दिनांक 18.07.2008 रोजी सादर केला. विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्तीसाठी वि.प.क्रं 2 कडे नेण्यास सांगितले होते ही बाब वादातील नाही मात्र त्याचवेळी वि.प.विमा कंपनीचे अधिका-यांनी त.क.यांना स्पष्ट सांगितले होते की, ते यथाशिघ्र पुन्हा अधिकृत सर्व्हेअरची नियुक्ती करतील व सर्व्हेअर हे विमा पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे किती खर्च येईल याची माहिती वि.प.क्रं 1 विमा कंपनीस देतील आणि त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम निश्चीत करण्यात येईल. 10. त.क.यांनी दिनांक 28.07.2008 रोजी दुरुस्तीचे जे अंदाजपत्रक दिले ते अवास्तव, जास्त रकमेचे व चुकीचे म्हणजे रुपये-2,51,931.14 पैसे एवढया रकमेचे दिले व ते वि.प.क्रं 1 विमा कंपनीस मान्य नव्हते. सदर अंदाजपत्रकाची प्रत वि.प.क्रं 1 विमा कंपनीने अधिकृत सर्व्हेअर श्री सुभाष चोपडे यांचेकडे देऊन पुन्हा वाहनाची तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली. त्यानुसार दिनांक 05.08.2008 रोजी सायंकाळी श्री चोपडे यांनी वि.प.क्रं 2 चे गॅरेज मध्ये जाऊन क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाची तपासणी केली व पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वि.प.क्रं 1 विमा कंपनीस कळविली व त्यानंतर पुन्हा श्री चोपडे यांनी वि.प.क्रं 2 चे गॅरेज मध्ये अंतिम सर्व्हे केला व दिनांक 15.02.2009 रोजी वि.प.क्रं 1 कडे सर्व्हे अहवाल सादर केला.(सदर वि.प.यांनी सदरचे लेखी जबाबामध्ये सर्व्हेअर श्री चोपडे यांनी अहवाल सादर करण्याच्या तारखा हया दिनांक 15.02.2009 व दिनांक 15.02.2008 अशा नमुद केल्यात ) सर्व्हेअर श्री चोपडे यांनी त्यांचे सर्व्हे अहवाला मध्ये विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार दुरुस्तीचे खर्चाची जास्तीत जास्त रुपये-83,444/- एवढी रक्कम व त्यामधून सॉल्व्हेज रक्कम रुपये-1500/- वजा करुन उर्वरीत रक्कम त.क.यांना देय असल्याचे नमुद केले. 11. वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे असेही नमुद करण्यात आले की, वि.प.क्रं 2 यांनी क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाचे जे बिल दिले, त्यामध्ये अपघातातून झालेल्या भागाचे नुकसानी सोबत, अपघातात न झालेल्या बाबीचे नुकसान भरपाईचे बिल दिले, जे स्विकारण्या योग्य नाही कारण त्याचा अपघाताशी कोणताही संबध
CC/96/2011 येत नाही व त्यामुळे वि.प.क्रं 2 यांनी दिलेले बिल, जसेच्या तसे, वि.प.क्रं 1 विमा कंपनी स्विकारु शकत नाही व ते पॉलिसीचे अटी व शर्ती मध्ये बसत नाही. त्यानंतर सर्व्हेअर श्री मनोज राठी यांनी पुनः वाहनाचे परिक्षण करुन दिनांक 24.03.2009 चा अहवाल दिला व त्यामध्ये श्री चोपडे सर्व्हेअर यांचे अहवालास दुजोरा दिलेला आहे. दिनांक 23.04.2009 रोजी वि.प.क्रं 2 यांनी दिलेली दुरुस्तीचे बिले त.क.यांनी वि.प.क्रं 1 यांचे कार्यालयात सादर केल्याची बाब मान्य केल्याचे नमुद केले. त.क.यांचा दावा, दाखल दस्तऐवज, तीनही सर्व्हेअर यांचे अहवाल यावरुन वि.प.चे अमरावती येथील मंडळ कार्यालयास सादर करण्यात आले व श्री चोपडे सर्व्हेअर यांचा अहवाल मान्य करुन, त.क.यांना वाहनाची नुकसान भरपाई रुपये-81,000/- देण्यात यावी अशी मंडळ कार्यालय अमरावती यांनी लेखी सुचना दिली. 12. त्यावरुन त.क.यांना दिनांक 09.06.2009 रोजीचे पत्राद्वारे फुल फायनल सेटलमेंट म्हणून रुपये-81,000/- देण्यास तयार असल्याचे लेखी कळविण्यात आले व तसे त.क.यांनी लेखी कळवावे असेही सुचित करण्यात आले. परंतु त.क.यांनी मौखीक अथवा लेखी स्विकृती दिली नाही, त्यामुळे सदर रक्कम त.क.यांना देता आली नाही. सदर रक्कम ते आजही देण्यास तयार आहेत. त.क.चे दिनांक 16.07.2009 चे नोटीसला त्यांनी दिनांक 27.08.2009 रोजी लेखी सविस्तर उत्तर दिले. नुकसान भरपाईची रक्कम निश्चीत करताना वाहनाचा घसारा, सॉल्व्हेज व्हॅल्यु इत्यादीचा विचार करण्यात आलेला आहे. त्यांनी त.क.यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही, सबब, वि.प.क्रं 1 विमा कंपनी विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, असा उजर वि.प.क्रं 1 यांनी घेतला. 13. वि.प.क्रं 2) यांना न्यायमंचा तर्फे त्यांचे नागपूर येथील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता, सदर नोटीस त्यांना दिनांक 16.11.2011 रोजी प्राप्त झाल्या बद्यल संबधिताचे सही व स्वाक्षरीची पोच प्रकरणातील अभिलेखावर उपलब्ध आहे. परंतु अशी नोटीस प्राप्त होऊनही वि.प.क्रं 2 तर्फे शेवट पर्यंत कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी जबाबही दाखल केला नाही म्हणून वि.प.क्रं 2 विरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने दिनांक-20/12/2011 रोजी प्रकरणात पारीत केला. CC/96/2011 14. त.क.यांनी पान क्रं 9 वरील यादी नुसार एकूण 9 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये सर्व्हेअर श्री नाकडे यांचा अहवाल, वि.प.क्रं 2 चे अंदाजपत्रक, सर्व्हेअर श्री राठी यांचा सर्व्हे अहवाल, वि.प.क्रं 2 चे वाहन दुरुस्तीची बिले, वि.प.नां पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती, पोच पावती, वि.प.क्रं 1 यांनी क्लेम संबधाने पाठविलेले पत्र, त.क.यांनी वि.प.क्रं 1 यांना पाठविलेले पत्र इत्यादीचा समावेश आहे. 15. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने लेखी जबाबा सोबत अन्य कोणतेही दस्तऐवज सादर केले नाहीत. 16. त.क.यांची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचा प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित होण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) त.क.यांना विमाकृत वाहना संबधाने दुरुस्तीची कमी रक्कम मंजूर करुन वि.प.ने दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. व त्यासाठी कोण वि.प.जबाबदार आहे? वि.प.क्रं 1 (2) जर होय, तर, त.क. कोणाविरुध्द काय दाद मिळण्यास पात्र आहे? काय आदेश? अंतीम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 17. तक्रारदार यांनी, वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून, त्यांचे मालकीचे वाहन टाटा इंडीका कार, नोंदणी क्रमांक-MH-32/C-1865 चा विमा काढला होता, ही बाब दाखल दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते व सदर बाब उभय पक्षांनाही मान्य आहे. यावरुन तक्रारदार हे वि.प.विमा कंपनीचे ग्राहक ठरतात.
18. तक्रारकर्ता यांचे विमाकृत वाहनाचा अपघात झाल्या नंतर, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दिलेल्या सुचने वरुन, सदर विमाकृत वाहन, वि.प.क्रं 2 यांचेकडे दुरुस्तीसाठी पाठविले होते. यावरुन तक्रारकर्ता हे वि.प.क्रं 2 चे सुध्दा लाभधारक व सेवाधारक ग्राहक ठरतात.
CC/96/2011 19. तक्रारकर्ता यांचे विमाकृत वाहनाचा अपघात दिनांक 14.07.2008 रोजी झाला, ही बाब सुध्दा वि.प.क्रं 1 विमा कंपनीस मान्य आहे. सदर वाहनास अपघात झाल्या नंतर, त्याची सुचना त.क.यांनी, वि.प.क्रं 1 यांना दिली होती. त्यानुसार वि.प.क्रं 1 विमा कंपनीने सर्व्हेअर श्री महेश नाकडे यांची नियुक्ती केली होती, ही बाब वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तिचे लेखी जबाबात मान्य केलेली आहे. श्री महेश नाकडे यांनी, वि.प.क्रं 1 विमा कंपनीला अंदाजीत नुकसान झाल्या बाबत कळविल्याचेही वि.प.क्रं 1 विमा कंपनीने लेखी जबाबात मान्य केलेले आहे. 20. तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तिचे लेखी जबाबातील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये, वि.प.क्रं 1 यांनीच, तक्रारदार यांना विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्ती करीता, वि.प.क्रं 2 यांचेकडे घेऊन जाण्यास सांगितल्याचे नमुद केलेले आहे. 21. तक्रारकर्ता यांनी त्यांचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहन, वि.प.क्रं 2 यांचेकडे दुरुस्ती करीता आणले असता, वि.प.क्रं-2 यांनी रुपये-2,51,931.14 पै.अंदाजे दुरस्ती खर्च अपेक्षीत असल्याचे तक्रारकर्ते यांना सांगितले होते व ही बाब तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दस्तऐवज क्रमांक 2 वरुन सुध्दा स्पष्ट होते.
22. प्रत्यक्षात विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्तीचा खर्च हा तक्रारकर्ता यांचे म्हणण्या नुसार रुपये-1,78,724/- आल्याचे तक्रारकर्ता यांनी आपले तक्रारीत नमुद केलेले आहे व ही बाब सिध्द करण्या करीता तक्रारकर्ता यांनी मंचा समक्ष, वि.प.क्रं 2 चे दस्तऐवज दाखल केलेले आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी जबाबात सदर बाब अमान्य केलेली आहे परंतु ही बाब अमान्य करण्या करीता, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने सर्व्हेअर श्री सुभाष चोपडे यांचे सर्व्हे अहवालाचा आधार घेतलेला आहे व त्यानुसार वि.प.क्रं 1 यांनी, तक्रारकर्त्यांना फक्त रुपये-81,000/-विमा राशी पोटी देण्याचे मान्य केलेले आहे.
23. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने मंचा समक्ष दाखल केलेल्या सर्व्हेअर श्री चोपडे यांचे सर्व्हे अहवाला नुसार जवळपास रुपये-1,26,150/- रकमेचे वाहनाचे भागाची (Parts) रक्कम त्यांनी सर्व्हे अहवालात घेतलेली नाही वा त्या बाबत कोणताही स्पष्ट निष्कर्ष अथवा कारण सुध्दा श्री चोपडे, सर्व्हेअर यांनी अहवालात नमुद केलेले नाही अथवा वि.प.क्रं 1 विमा कंपनीने सुध्दा दिलेले नाही. तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीने सदर सर्व्हेअर यांचा प्रतिज्ञालेख सुध्दा सदर प्रकरणी दाखल केलेला नाही. त्यामुळे सर्व्हेअर यांनी केलेले सर्व्हेक्षण हे कोणत्या आधारावर केले? व ते
CC/96/2011 सर्व्हेक्षण करीत असताना तक्रारकर्ता व वि.प.क्रं 2 यांना सुचित केले होते काय? या बाबी सुध्दा मंचा समक्ष प्रतिपादीत केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे सदर श्री चोपडे सर्व्हेअर यांचा सर्व्हे अहवाल हा ग्राहय धरण्या योग्य नाही, असे वि.न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
24. वि.प.क्रं 1 यांनी, तक्रारकर्ते यांना, क्षतीग्रस्त विमाकृत वाहन, वि.प.क्रं 2 यांचेकडे दुरुस्ती करीता घेऊन जाण्यास सांगितले व ही बाब वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी जबाबातच मान्य केलेली आहे. यावरुन वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांचे व्यवसायिक संबध आहेत व अशा परिस्थितीमध्ये वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, वि.प.क्रं 2 यांनी दिलेल्या वाहन दुरुस्तीचे खर्चाची चौकशी करणे ही वि.प.क्रं 1 ची जबाबदारी होती. मुद्या क्रं-2 25. तक्रारकर्ता यांनी, वि.प.क्रं 2 यांनी वाहन दुरुस्तीचा खर्च रुपये-1,78,724/- दिल्याचे नमुद केलेले आहे , त्यामुळे प्रत्यक्ष्य वाहनास तेवढा दुरुस्तीचा खर्च लागल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे आणि म्हणून तक्रारदार हे विमाकृत वाहनाचे नुकसान भरपाई पोटी वाहन दुरुस्तीचा खर्च रुपये-1,78,724/- मधून घसारा व साल्वेजची रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र ठरतात. सदरचे विमाकृत वाहन हे फेब्रुवारी, 2007 मध्ये नोंदणीकृत करण्यात आलेले आहे. तसेच वाहनास अपघाताची घटना ही जुलै, 2008 मधील आहे. म्हणून विमा दावा रक्कम मंजूर करताना जुने बदलेले वा खराब पार्टस (Salvage) व घसारा (Deprecation) ची रक्कम एकत्रित वजा करुन, उर्वरीत रक्कम त.क.यांना, वि.प.क्रमांक 1 ने देण्याचे आदेशित करणे न्यायोचित राहिल.
26. प्रस्तुत प्रकरणातील विमाकृत वाहनास, त्याचे खरेदी दिनांका पासून जवळपास दिड वर्षा नंतर अपघात झालेला दिसून येतो. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी Salvage Value स्पष्ट काढलेली दिसून येत नाही. परंतु वाहनाचे दुरुस्तीचे बिला नुसार, लावलेले पार्टस कशा प्रकारे आवश्यक नव्हते? असा कुठेही खुलासा वि.प.क्रं 1 ने दिलेला नाही. म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 2 ला, त.क.ने वाहन दुरुस्तीपोटी दिलेली रक्कम, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, त.क.ला Salvage व Deprecation पोटी 15 टक्के कमी करुन, म्हणजे ( वाहन दुरुस्ती करीता आलेला एकूण खर्च रुपये-1,78,724/- (-) साल्वेज व घसारा रक्कम रुपये-26,808/- (=) रुपये-1,51,915/- एवढी रक्कम त.क.ला देण्याचे कायदेशीर व न्यायोचित राहिल. CC/96/2011 27. तक्रारकर्ता यांना सदर विमा रक्कम न देणे ही वि.प.क्रं 1 विमा कंपनीची सेवेतील त्रृटी असल्याचे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमाकृत वाहनाचे नुकसान भरपाईची रक्कम, सदर आदेश प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत न दिल्यास, तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दंडनीय व्याजासह त.क.यांना रक्कम देण्यास वि.प.क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहील.
28. तक्रारकर्ते यांनी आपले तक्रारीत रुपये-57,191/- एवढी व्याजाची मागणी केलेली आहे परंतु सदर मागणी करीत असताना तक्रारकर्त्यानी ही बाब सिध्द करणे गरजेचे होते की, त्यांना विमाकृत वाहनाचे दुरुस्तीची रक्कम वि.प.क्रं 2 यांना देण्या करीता वि.प.क्रं 1 विमा कंपनीनेच सांगितले होते, ही बाब जर तक्रारकर्त्यांनी सिध्द केली असती तरच त.क. व्याज मिळण्यास पात्र ठरले असते. परंतु तक्रारकर्त्यानी ही बाब सिध्द न केल्यामुळे ते व्याज मिळण्यास पात्र ठरत नाही.
29. तक्रारकर्त्यानी शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये-25,000/-ची मागणी केली आहे. सदर मागणी ही अवास्तव असल्याने न्यायदृष्टया तक्रारकर्ता हा रुपये-5000/- तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- वि.प.कडून मिळण्यास पात्र ठरतो.
30. प्रस्तुत प्रकरणात वि.प.क्रं 2 विरुध्द एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला होता. परंतु वि.प.क्रं 2 विरुध्द त.क.ची कोणतीही मागणी नसल्यामुळे वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 31. वरील सर्व विवेचना वरुन, वि.जिल्हा न्यायमंच, प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) त.क.ची तक्रार, वि.प.क्रं 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, त.क.चा विमा क्लेम निश्चीत न करुन त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. 3) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.चे विमाकृत वाहन क्र- MH-32/C-1865 चे नुकसान भरपाई पोटी विमा रक्कम रुपये-151,915/-(अक्षरी रुपये- एक लक्ष एकावन्न हजार नऊशे पंधरा फक्त ) सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत त.क.यांना देय करावी.
CC/96/2011 4) विहित मुदतीत सदर रक्कम न दिल्यास,रुपये-1,51,915/- रक्कम तक्रार दाखल दि-30.09.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दराने दंड व्याजासह त.क.ला रक्कम देण्यास वि.प. क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल. 5) त.क.ला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-5000/ (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) वि.प. क्रं 1 विमा कंपनीने, सदर आदेश प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत त.क.ला देय करावे. 6) वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 7) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. ( रामलाल भ. सोमाणी ) अध्यक्ष ( सौ.सुषमा प्र.जोशी ) ( मिलींद रामराव केदार) सदस्या सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वर्धा
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |