(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 09.08.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत 12 सह 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार ही मौजा घोडपेठ येथे राहाते. गैरअर्जदार क्र.1 ही राष्ट्रीय नामाकिंत विमा कंपनी आहे. अर्जदाराला अपुर्व नावाचा 8 वर्षाचा 1 मुलगा होता. अपुर्व हा गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे 2 वर्गात शिकत होता. गैरअर्जदार क्र.2 ही शाळा आहे. शासनाच्या धोरणानुसार राजीव गांधी विमा योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे जिवन विमा सुरक्षीत करण्यात आले आहे व योजना प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. या विमा योजनेचा विमा कालावधी 28.8.09 ते 27.8.10 पर्यंत होता. गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसी क्र.260600/09/950000087 काढली होती. या पॉलिसी प्रमाणे विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रुपये 30,000/- त्याचे वारसानांना विमा रक्कम म्हणून विमा कंपनी देणार असे ठरले होते. 2. अर्जदाराचा मुलगा अपुर्व आपल्या आजोबा सोबत दि.17.1.11 ला बगीच्यात फिरायला जात असतांना मागून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्याचा अपघाती मृत्यु झाला. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गैरअर्जदार क्र.2 आणि गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, भद्रावती यांचे माध्यमातून सर्व आवश्यक कागदपञासह विमा रक्कम मिळण्याकरीता क्लेम फार्म पाठविला होता. परंतु, गैरअर्जदार क्र.1 ने दि.15.10.10 चे पञ पाठवून क्लेम रद्द केला. गैरअर्जदार क्र.1 ने क्लेम रद्द करण्याचे कारण दिले की, पोलीस पेपर्स वाचण्यास योग्य नाही, पी.एम.रिपोर्ट मेडिकल ऑफीसर सिव्हील हॉस्पीटल सांक्षाकीत नाही, शाळा सोडल्याचा मुळ दाखला नाही, हजेरी पटाचा दाखला नाही. अर्जदाराने जे दस्तऐवज पाठविले होते ते वाचनीय आहे. अर्जदाराला जे दस्तऐवज प्राप्त झाले तेच दस्तऐवज गैरअर्जदार क्र.1 ला देण्यात आले. गैरअर्जदाराने दस्तऐवज अपूर्ण आहे याबद्दल कोणतीही मागणी अर्जदाराकडे केली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने विमा क्लेम रद्द करण्याकरीता दिलेले कारणे हे अयोग्य व चुकीचे आहे. गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराला विमा क्लेम रक्कम रुपये 30,000/- द्यावी लागेल म्हणून खोटे व चुकीचे कारण तयार करुन क्लेम रद्द केला आहे. अर्जदाराने अपुर्व यांचे शिक्षणाकरीता गैरअर्जदार क्र.2 कडे शिक्षण शुल्क भरलेले आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ने विद्यार्थ्यांचे विमा संरक्षण करण्याकरीता विमा प्रिमीयम घेवून विमा पॉलिसी काढली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचा विमा क्लेम दि.15.10.2010 चे पञानुसार रद्द करुन न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. गैरअर्जदाराच्या या कृत्यामुळे अर्जदाराला शारीरिक व मानसिक ञास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, गैरअर्जदारांनी अर्जदाराला दिलेली सेवा न्युनतापूर्ण आहे असे घोषीत करावे. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला विमा क्लेम रक्क्म रुपये 30,000/- दि.15.10.2010 पासून संपूर्ण विमा क्लेम रक्कम परतफेड होईपर्यंत 12 टक्के व्याजाने द्यावे. अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये 10,000/- व तक्रार खर्च रुपये 5000/- गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराला द्यावे, अशी मागणी केली आहे. 3. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ निशाणी क्र.4 नुसार 11 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन गैरअर्जदार क्र.1 ने निशाणी क्र.15 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने निशाणी क्र.12 नुसार लेखी उत्तर व निशाणी क्र.13 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. 4. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, मृतक अपुर्वचा मृत्यु दि.17.1.11 रोजी घडलेल्या मोटार अपघातात झाला ही जरी वस्तुस्थिती असली तरी तो अपघात दोन्ही वाहनांच्या चालकांच्या संयुक्तीक चुकीने घडलेला आहे. सदर अपघाताबाबत अर्जदाराने मो.अ.क्र.25/2010 अन्वये केस दाखल केली होती व ती केस लोक अदालत मध्ये रुपये 1,70,000/- रकमेच्या तडजोडी प्रमाणे निकाली निघालेली आहे. त्यामध्ये, अर्जदार ही मृतक अपुर्वच्या अपघाती मृत्युची नुकसान भरपाई भरुन पावलेली आहे. म्हणून, एकाच कारणासाठी अर्जदार वारंवार नुकसान भरपाई मागू शकत नाही, अथवा क्लेम करु शकत नाही. म्हणून या कारणाने अर्जदाराची केस मधील नुकसान भरपाई पूर्णतः आयोग्य व बेकायदेशीर आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खरे आहे की, दि.15.10.11 रोजी पञ पाठवून पञात नमूद करण्यासाठी क्लेम रद्द केला. अर्जदाराची प्रस्तूत तक्रार व त्यामधील मागणी अयोग्य व बेकायदेशीर आहे.
5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, सदर प्रकरणात वाद अर्जदाराने स्वतः उत्पन्न केला आहे. कारण, अर्जदाराने रेकॉर्डवर गैरअर्जदाराच्या दि.15.10.10 च्या पञातील नमूद कागदपञे, जसे पी.एम.रिपोर्ट सिव्हील ऑफीसरकडून साक्षांकित नाही, हजेरीपटाचा दाखला, शाळा सोडल्याचा मुळ दाखला सादर केलेला नाही. तसेच, अर्जदाराचा मृतकासोबत नाते संबंधी कोणताही दस्ताऐवज दाखल केलेला नाही. एकंदरीत, अर्जदाराचा क्लेम उपरोक्त कागदपञांचे अभावी अपूर्ण होता व आहे म्हणून त्याची पुर्तता करण्यात आलेली नाही. वरील कारणाने अर्जदाराचा क्लेम नाकारलेला होता व ती कारणे न्यायसंगत आहे. तक्रार ही मुळातच बेकायदेशीर व अदखलपाञ असून खर्चासह खारीज करण्यांत यावी. 6. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराचा मुलगा अपुर्व हा 2 वर्गात गैरअर्जदार क्र.2 कडे शिकत होता यात वाद नाही. अपुर्व यांचा दि.17.1.2010 रोजी अपघाती मृत्यु झाला. राजीव गांधी विमा योजने अंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे विमा पॉलिसी शासनाने गैरअर्जदार क्र.1 कडून काढली होती. प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ने काढला होता. विमा कालावधी व पॉलिसी क्रमांक यात वाद नाही. गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराकडून प्राप्त झालेले सर्व कागदपञ गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविलेले होते. गैरअर्जदार क्र.2 चा विमा काढण्याचा कोणताही व्यवसाय नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी क्लेमसाठी आवश्यक सर्व कागदपञे गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती भद्रावती यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविली होती. गैरअर्जदार क्र.1 कडून कागदपञात कोणतीही ञुटी असल्याबाबत कोणतेही मागणीप्रत गैरअर्जदार क्र.2 ला आले नाही. गैरअर्जदार क्र.1 ने, गैरअर्जदार क्र.2 ला हजेरी पटाचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखल्याची मुळप्रत मागीतली नाही. गैरअर्जदार क्र.2 ला हजेरी पटाचा दाखला गैरअर्जदार क्र.1 ला न देण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.1 सुध्दा हजेरी पटाचे प्रत्यक्ष शाळेत येवून पाहणी व चौकशी करु शकत होते. परंतु, चौकशी न करता व कागदपञांची मागणी न करता एकतर्फा अर्जदाराचा विमा क्लेम दि.15.10.10 ला रद्द केले हे चुकीचे आहे. त्याकरीता, गैरअर्जदार क्र.2 ला दोषी धरणे योग्य ठरणार नाही. 7. अर्जदार यांनी निशाणी क्र.16 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने, गैरअर्जदाराचे लेखी उत्तर शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस निशाणी क्र.17 नुसार दाखल केली. गैरअर्जदार क्र.2 ने, गैरअर्जदाराचे लेखी उत्तर शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस निशाणी क्र.18 नुसार दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी उत्तर, शपथपञ व उभय पक्षांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 8. अर्जदाराने अपघात विमा दावा गैरअर्जदार क्र.1 ला, गैरअर्जदार क्र.2 च्या वतीने दाखल केलेला होता. सदर दावा गैरअर्जदार क्र.1 ने हे म्हणून खारीज केलेला आहे की, दाव्या सोबत दस्ताऐवज बरोबर दाखल केलेले नाही, अर्जदाराने दाखल केलेले गैरअर्जदार क्र.1 चे दस्ताऐवज अ-9 प्रमाणे, परंतु अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 मार्फत अ-9 मध्ये उल्लेखीत सर्व दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.1 ला दिलेले आहे, असे शपथपञावर म्हटले आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ने मागीतलेल्या दस्ताऐवजाच्या गैरअर्जदार क्र.1 चे दावा फार्म अ-6 मध्ये कुठेही उल्लेख नाही किंवा त्या दावा फार्ममध्ये असा कोणताही रकाना नाही ज्या मध्ये गैरअर्जदार क्र.1 ला दावा निकाली काढण्यासाठी लागणारे दस्ताऐवजाची यादी दिलेली असेल. 9. अर्जदाराने विमा दावा सोबत शाळेच्या हेडमास्तरचा पञ गट शिक्षाधिकारी च्या नावाने व गटशिक्षणाधिकारी चा पञ गैरअर्जदार क्र.1 च्या नावाने दाखल असतांना, तसेच, सदर पञावर स्पष्ट शाळेचा विद्यार्थी असून, दुस-या वर्गात शिकत होता याबाबत नमूद असून सुध्दा शाळेचा दाखला, हजेरी पटाचा दाखला नाही हे गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे गृहीत धरण्या सारखे नाही. 10. गटशिक्षणाधिकारी च्या पञात अपघाती मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याबाबत दुसरा वर्गात शिकत असल्याबाबत, तसेच अपघाताबाबत नमूद असून व सदर विद्यार्थ्यांना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी शिफारस असून सुध्दा गैरअर्जदार क्र.1 ने, गटशिक्षणाधिकारी किंवा गैरअर्जदार क्र.2 कडून कुठलेही अपूर्ण दस्ताऐवजाची मागणी न करता सरळ विमा दावा अपूर्ण दस्ताऐवज अभावी रद्द म्हणून पञ देणे, ही न्युनतापूर्ण सेवा असून, गैरअर्जदार क्र.1 ने, अयोग्य कारणाने दावा नाकारला, असे या न्यायमंचाचे मत आहे. 11. गैरअर्जदाराचे हे ही म्हणणे संयुक्तीक नाही की, विमा दावा सोबत दाखल पोलीस रिपोर्ट वाचनीय नाही कारण ती पोलीस व्दारा दिलेली रिपोर्ट असून त्यावर अर्जदाराचा कोणताही अधिकार नाही, ती रिपोर्ट जसेच्या तसे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला दिला असून, त्याबाबत अर्जदारास तक्रार करणे हे उचीत नाही. 12. गै.अ.क्र.1 चे हे ही म्हणणे संयुक्तीक नाही की, सदर अपघाताबाबत अर्जदाराने मो.अ.क्र.25/10 नुसार लोक अदालत मध्ये रुपये 1,70,000/- नुकसान भरपाई घेतलेली आहे. कारण, सदर दावा मो.अ.क्र.25/10 हा दुस-या विमा कंपनी सोबत होता, तसेच तो अपघात झालेल्या ट्रक मालका विरुध्द होता. सदर विमा दावा हा गैरअर्जदार क्र.1 विरुध्द असून हा विमा दावा शासना व्दारे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेली योजना अंतर्गंत असून, यासाठी शासनाने वेगळा विमा प्रिमीयम भरला आहे, तसेच दोन्ही विमा कंपनी वेग-वेगळी असल्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 चे सदर मो.अ.क्र.25/10 बाबत कथन ग्राह्य धरता येत नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले न्यायनिवाडे या तक्रारीला लागू पडत नाही.
13. गैरअर्जदार क्र.2 ने, राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळावे, यासाठी वेळेत सर्व दस्तावेज सोबत विमा दावा गैरअर्जदार क्र.1 कडे गटशिक्षणाधिकारी मार्फत दाखल केला असल्यामुळे, गैरअर्जदार क्र.2 ने कुठलीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही म्हणून, त्याचे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. 14. एकंदरीत, गैरअर्जदार क्र.1 ने कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना, अर्जदाराचा विमा क्लेम रद्द करुन अर्जदारास न्युनता पुर्ण सेवा दिली आहे, असे या न्यायमंचाचे मत असून, हे न्यायमंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास विमा दावा रुपये 30,000/- तक्रार दाखल केल्याचा दिनांकापासून म्हणजे 30/4/2011 पासून पदरी पडेपर्यंत 9 % व्याजाने द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास मानसिक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- द्यावे. (4) गैरअर्जदार क्र.2 विरुध्द तक्रार खारीज. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |