(घोषित दि. 23.01.2012 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने त्याचे वाहन क्रमांक एम.एच.21 सी- 2427 चा गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 13.07.2010 ते 12.07.2011 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता. विमा कालावधीमध्येच दिनांक 11.05.2011 रोजी त्याच्या वाहनाचा अपघात झाला आणि अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले. म्हणून त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांसह रुपये 1,30,179/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला. परंतू त्यानंतर विमा कंपनीने त्यास विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली व त्याचा विमा दावा प्रलंबित ठेवला. म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, त्यास विमा कंपनीकडून रुपये 1,30,179/- व्याजासह द्यावेत.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर विमा दावा दाखल केला होता. तक्रारदाराचा विमा दावा प्राप्त झाल्यानंतर सर्वेअर मार्फत वाहनाची पाहणी करण्यात आली. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी करण्यात आली. त्यावेळी असे निदर्शनास आले की, तक्रारदाराच्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्याच प्रमाणे तक्रारदाराने त्याचे खाजगी वाहन भाडे तत्वावर लग्नासाठी दिले होते. अशा प्रकारे तक्रारदाराने पॉलीसीतील अटीचे उल्लघंन केले. म्हणून तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. त्यामुळे तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.अविनाश वायाळ आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.पल्लवी किनगावकर यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराच्या वाहनाचा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 13.07.2010 ते 12.07.2011 या कालावधीसाठी विमा उतरविण्यात आला होता आणि विमा कालावधीमध्येच दिनांक 11.05.2011 रोजी त्याच्या वाहनाचा अपघात झाला होता व अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले म्हणून त्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता, या विषयी वाद नाही. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, अपघाताच्या वेळी तक्रारदाराच्या वाहनामध्ये 12 प्रवासी होते आणि त्याच्या वाहनामध्ये 10 प्रवासी नेण्याची परवानगी असुन, त्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून पॉलीसीतील अटीचे उल्लघंन केलेले आहे. त्याच प्रमाणे अपघाताच्या वेळी त्याचे वाहन भाडे तत्वावर दिलेले होते. सदर बाब देखील पॉलीसीतील अटीचे उल्लघंन असल्यामुळे तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही.
तक्रारदाराच्या वाहनामध्ये अपघाताच्या वेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, ही बाब विमा कंपनीने योग्य पुरावा देवून सिध्द् केलेली नाही. अपघाताबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये तक्रारदाराच्या वाहनामध्ये अंदाजे 12 प्रवासी होते, असे नमूद केल्यावरुन विमा कंपनीने त्याच्या वाहनामध्ये 12 प्रवासी होते असा निष्कर्ष काढल्याचे दिसते. वास्तविक फिर्यादीमध्ये तक्रारदाराच्या वाहनातील प्रवाशांची नेमकी संख्या किती होती हे नमूद केलेले नाही. फिर्यादीमध्ये नमूद केलेली प्रवाशांची संख्या अंदाजे नमूद केलेली आहे. त्याच प्रमाणे तक्रारदाराच्या वाहनामध्ये अपघाताच्या वेळी बसलेल्या प्रवाशांची नावे विमा कंपनीने सांगितलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराच्या वाहनामध्ये अपघाताच्या वेळी 12 प्रवासी होते, हा विमा कंपनीने काढलेला निष्कर्ष आधारहिन असल्यामुळे विश्वास पात्र नसून विमा कंपनीने कोणताही सक्षम पुरावा नसतांना चुकीचा निष्कर्ष काढून तक्रारदाराला विमा रक्कम देण्यास नकार दिल्याचे स्पष्ट दिसते. त्याच प्रमाणे तक्रारदाराने त्याचे वाहन भाडे तत्वावर दिले होते. हा विमा कंपनीने केलेला दुसरा आरोप देखील आधारहिन आहे. कारण त्याबाबत कोणताही पुरावा विमा कंपनीने दिलेला नाही. विमा कंपनीने अशा प्रकारे तक्रारदाराला विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करुन निश्चितपणे त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
तक्रारदाराने त्यास वाहन दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम रुपये 1,30,179/- विमा कंपनीकडून मिळावेत अशी मागणी केलेली आहे. परंतू तक्रारदाराने वाहन दुरुस्तीसाठी रुपये 1,30,179/- खर्च झाल्याचे सिध्द् करण्यासाठी योग्य पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या मेसर्स हर्षवर्धन अटो बोअरींग वर्क्स व जयभारत अटोमोबाईल्स या दुकानांच्या पावत्या संशायस्पद आहेत. कारण त्यावरील तारखांमध्ये खाडाखोड असुन, मेसर्स हर्षवर्धन अटो बोअरींगच्या पावतीवर खर्चाबाबत कोणतेही विवरण नसुन सदर पावतीवर कोणाचेही नाव नाही किंवा वाहनाचा क्रमांक नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या इतर पावत्या पाहील्या तर त्यामध्ये सुटया भागांच्या खर्चापोटी रुपये 19,700/- आणि लेबर चार्जेस म्हणून रुपये 47,700/- दर्शविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विमा कंपनीने नेमलेल्या सर्वेअरच्या अहवालानुसार तक्रारदाराला विमा कंपनीने नुकसान भरपाई देणे योग्य ठरते. विमा कंपनीच्या सर्वेअरने दिलेला अहवाल विमा कंपनीने दाखल केलेला नाही. परंतू विमा कंपनीने लेखी जवाबामध्ये परिच्छेद क्रमांक 12 मध्ये तक्रारदाराच्या वाहनाच्या नुकसानीची रक्कम रुपये 38,300/- अशी सर्वेअरने निश्चित केल्याचे नमूद केले आहे. म्हणून तक्रारदारास विमा कंपनीने रुपये 38,300/- नुकसान भरपाई म्हणून देणे योग्य राहील.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास रुपये 38,300/- (रुपये अडोतीस हजार तिनशे फक्त) दिनांक 11.07.2011 पासून पूर्ण रक्कम देई पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह निकाल कळाल्या पासून एक महिन्याच्या आत द्यावेत.
- गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.