(मंचाचे निर्णयान्वये,श्री. मिलींद बी. पवार(हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक: 17.07.2013)
1. सदर तक्रार त.क.ने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केले आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. त.क.हे महादेवपुरा, वर्धा येथील कायमचे रहिवासी असून फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून चार चाकी पिक अप-407 हे वाहन टाटा कंपनीचे जायका मोटर्स, वर्धा येथून दि. 10.06.2006 रोजी विकत घेतले. सदर वाहन त.क. ने मॅग्मा फिन कार्पोरेशन लि. नागपूर यांच्याकडून कर्ज-रक्कम घेवून खरेदी केले होते व त्याचा वि.प. या विमा कंपनी कडून कॉम्प्रेसिव इन्श्युरन्स पॉलिसी क्रमांक .150100/31/10/6300019910 ही दि. 21.06.2010 ते 20.06.2011 या कालावधीकरिता घेतली होती. दि. 20.10.2010 रोजी म्हणजेच विमा कालावधीत सदर वाहनाचा पुलगाव वर्धा रोडवर दहेगांव रेल्वेजवळ अपघात झाला व त्यात वाहनाचे बरेच नुकसान झाले.
3 सदर अपघाताबाबत त.क. ने वि.प. यांना तात्काळ कळविले. त्याप्रमाणे वि.प. यांचे सर्व्हेअर यांनी घटनास्थळी येवून निरीक्षण केले व अहवाल सादर केला. त.क. ने वि.प.यांच्या सूचनेप्रमाणे सदर वाहन दुरुस्तीसाठी कंपनीचे अधिकृत गॅरेज मध्ये नेले. वाहन दुरुस्तीसाठी रु.3,40,000/- एवढा खर्च आला व त्यानंतर त.क. ने वि.प.च्या मागणीप्रमाणे सर्व पावत्या वि.प.चे सर्व्हेअर श्री. रावल यांना दिले व त्यानंतर त.क. ने वि.प.यांच्याकडे विमा दावा क्लेमची मागणी केली व त्यासोबत वि.प.च्या मागणीप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त.क. यांनी वि.प. यांच्याकडे वारंवांर विमा क्लेम मिळण्याबाबत विनंती केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन ही वि.प. यांनी विमा दावा क्लेम देण्यास टाळाटाळ केली ही वि.प. यांच्या सेवेतील न्यूनता असून दोषपूर्ण सेवा आहे असे त.क. चे म्हणणे आहे. तसेच वारंवांर विनंती करुन ही विमा क्लेम न मिळाल्यामुळे त्याला वकिलामार्फत नोटीस पाठवावी लागली. त्यावर ही वि.प. यांनी दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव त.क. यानां मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले.
4 त.क. ने आपल्या तक्रारीत वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.3,40,000/- व त्यावरील व्याज , तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान तसेच तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. त.क. ने आपल्या तक्रार अर्जासोबत नि.क्रं. 10 वर एकूण 11 कागदपत्रे व नि.क्रं. 12 वर एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहे.
5 प्रस्तुतची तक्रार पंजीबध्द करुन वि.प. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आल्या. त्याप्रमाणे वि.प. 1 व 2 हे आपल्या वकिला मार्फत प्रस्तुत कामी हजर झाले व नि.क्रं.9 वर आपले लेखी म्हणणे सादर केले. वि.प. यांनी त.क. यांचे विमा पॉलिसी फक्त मान्य करुन तक्रारीमधील इतर विपरीत विधाने अमान्य केली आहे.
6. वि.प. यांचे म्हणण्यानुसार त.क. यांच्या गाडीचा अपघात झाला यात वाद नाही. सर्व्हेअर श्री. रावल यांची घटनास्थळावर जावून अपघातग्रस्त वाहनाची पाहणी व चौकशी करण्याकरिता नियुक्ती केली होती तर सर्व्हेअर श्री. अनिल एस. साखरकर यांची अपघातग्रस्त वाहनाचे किती नुकसान झाले आहे व ते नुकसान विमा पॉलिसीच्या नियम व अटी अनुसार किती येते व वाहनाचे निरीक्षण करुन त्यांना अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी दि. 22.10.2010 रोजी वि.प.कडे अहवाल सादर केला. त्यानंतर पुन्हा सर्व्हेअर, श्री. रावल यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती झाली आहे कां व त्या दुरुस्तीकरिता विमा पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे किंती रक्कमेचे भुगतान करण्याचे आहे हयाबाबत अहवाल मागविला होता व त्याप्रमाणे श्री.रावल सर्व्हेअर यांनी दि. 26.01.2011 रोजी आपला अंतिम अहवाल दिला. अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती झाल्यानंतर वि.प. वाहनाचे पुन्हा निरीक्षण करण्यासाठी श्री. अजय शेंडे यांची नियुक्ती केली. त्याप्रमाणे श्री. शेंडे यांनी दि. 19.01.2011 रोजी निरीक्षण केले व दि. 04.02.2011 रोजी वि.प. कंपनीकडे अहवाल पाठविला. त्यानंतर वि.प. कंपनीने त.क. यांना दि. 9.12.2011 व 5.1.2012 रोजी पत्रे पाठवून कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत कळविले. तरी ही त.क. यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दि. 25.02.2012 रोजी त.क. ला पत्र पाठवून नुकसान भरपाईचा दावा नामंजूर करण्यात येत असल्याचे कळविले. वि.प.यांनी नियमाप्रमाणे त.क. यांची वाट पाहून त.क. यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त.क. चा विमा दावा नामंजूर करण्यात आला. त.क. हे वि.मंचाची दिशाभूल करीत आहे त्यामुळे त.क. यांचा दावा खर्चासह खारीज करण्यात यावा अशी वि.प.ने मागणी केली आहे.
7 वि.प.ने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.क्रं. 11 वर एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहे. तसेच नि.क्रं. 18 वर लेखी उत्तरास लेखी युक्तिवाद समजण्यात यावा व आणखी ज्यादा पुरावा द्यावयाचे नाही अशी पुरसीस दिली.
- तक्रारकर्त्याची तक्रार व सोबत दाखल केलेले दस्ताऐवज, पुराव्याचे शपथपत्र तसेच वि.प. यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे या सर्वांचे अवलोकन करुन प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
उभय पक्षांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद व दाखल लेखी युक्तिवाद याचे अवलोकन करता खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
9 त.क. यांनी त्यांचे वाहन एमएच 32 क्यु 1177 चा पॉलिसी क्रं. 150100/31/10/6300019910 हा विमा काढला होता व तो दि. 20.06.2010 ते 20.06.2011 या कालावधीचा होता हे नि.क्रं. 4/5 आणि नि.क्रं. 11/1 वरील विमा पॉलिसी वरुन दिसून येते. सदर विमा पॉलिसी बाबत त.क. व वि.प. यांचेमध्ये वाद नाही. त.क. यांचे तक्रारीनुसार दि. 20.10.2010 रोजी सदर वाहनास अपघात झाला. त्यानंतर त.क. यांनी वि.प.यांना तात्काळ कळविले. त्याप्रमाणे अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे झाला व त्यानंतर वाहन दुरुस्तीसाठी त.क. यांना रु.3,40,000/- एवढा खर्च आला. त.क. यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे वि.प.यांचे सर्व्हेअर श्री. रावळ यांना दिली आहेत. तरी ही अनेक वेळा विनंती करुनही वि.प.यांनी त्यांचा अपघात विमा मंजूर केला नाही. वि.प.यांचे लेखी उत्तरानुसार त.क. यांनी अपघात विमा मंजुरीसाठी आवश्यक असे सर्व कागदपत्रे त.क. यांनी पुरविली नाहीत, त्याकरिता वि.प.यांनी त.क. यांना नि. 11/3 नुसार दि. 9.12.2011 रोजी व नि.क्रं. 11/4 नुसार दि.05.01.2012 रोजी पत्र पाठविले व कागदपत्राची मागणी केली. तरीही त.क. यांनी कागदपत्रे पुरविली नाही. त्यामुळे नि.क्रं. 11/5 नुसार दि. 25.02.2012 रोजी पत्र पाठवून वि.प.यांनी त.क. यांचा विमा क्लेम नाकारला हे नि.क्रं. 11 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु वि.प. यांनी नि.क्रं. 11/3 व 11/4 ची पत्रे त.क. यांना पाठविल्याबाबतची पोस्टाच्या पोच-पावत्या पुरावे म्हणून दाखल केलेले नाहीत परंतु त.क. हे वि.प.यांचे सतत संपर्कात होते म्हणून त.क. यांनी वि.प. यांचे मागणीप्रमाणे त.क. यांनी वेळोवेळी सर्व कागदपत्रे वि.प. यांचे सर्व्हेअर यांना दिली आहेत. तसेच वि.प.यांचे कलकत्ता येथील मुख्य कार्यालय तसेच मॅग्मा फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला सुध्दा दिली आहे. याबाबत त.क. यांनी नि.क्रं. 12 वर काही कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याप्रमाणे नि.क्रं. 12/1 ते 12/7 यांचे अवलोकन करता वि.प. यांच्या मागणीप्रमाणे त.क. यांनी रजि. पत्राद्वारे वि.प. यांना कागदपत्रे पुरविलेली आहेत हे स्पष्ट दिसून येते. कारण सदर नि.क्र. 12 वरील पोस्टाच्या पोच पावती वरुन वेळोवेळी त.क. यांनी कागदपत्रे पाठविलेली आहे हे दिसून येते. नि.क्रं. 12/8 वरील त.क. यांचे दि.9.9.2011 रोजीची नोटीस मध्ये ही त.क. यांनी सर्व कागदपत्रे पुरविल्याचे व क्लेम भरपाई मागितल्याचे स्पष्ट कथन आहे. तरी देखील वि.प. ही कागदपत्रे मिळाली नाही असा कंगावा करुन त.क. यांचा क्लेम नाकारला आहे.
10 वि.प. यांचे नि.क्रं. 11/3 व 4 चे कागदपत्र मागणी पत्राचे अवलोकन करता त्यामध्ये प्रामुख्याने परमिट , फिटनेस व आर.सी.इ. कागदपत्रे त.क. यांना मागितली याचा समावेश आहे. परंतु प्रस्तुत कामी वि.प.यांनी नि.क्र.11 वर दाखल केलेल्या त्यांचे नि.क्रं. 11/6 कडील सर्व्हेअर श्री. साखरकर व नि.क्रं. 11/7 कडील श्री. रावळ यांचे रिपोर्टमध्ये गाडीची सर्व माहिती नमूद आहे व त्यामध्ये गाडीबद्दल लिहिलेली माहिती आर.सी.बुकाचे आधारेच लिहिलेले असणार तसेच फिटनेस व परमिटबाबतची अचूक माहिती सुध्दा लिहिलेली दिसत आहे यावरुन सदर आर.सी.बुक, परमिट व फिटनेस प्रमाणपत्र असल्या शिवाय सदर माहिती भरणे केवळ अशक्य ठरते म्हणजेच सर्व्हेअर यांचेकडे ते कागदपत्रे उपलब्ध होते हे सुर्य प्रकाशा इतके स्पष्ट आहे व ती कागदपत्रे त.क. यांनी सर्व्हेअर यांना दिलेली होती हे स्पष्ट होते. शिवाय वेळोवेळी वि.प. यांचे कार्यालयानां ती पाठविली सुध्दा होती हे नि.क्रं. 12 कडील कागदपत्रावरुन स्पष्ट दिसून येते. तरी देखील वि.प. यांनी सदर कागदपत्रे मिळाली नाहीत हे कारण सांगून त.क. यांचा विमा क्लेम नाकारला हे पूर्णतः बेकायदेशीर ठरते व ही वि.प. यांच्या सेवेतील गंभीर त्रृटी आहे.
11 विमा काढण्यासाठी वि.प. यांचे एजंट त.क. यांचे सारखे ग्राहकांचे शोधात असतात. वेगवेगळी आश्वासने व विमा पॉलिसीबद्दल माहिती सांगून ग्राहकांना भूरळ पाडतात व विमा पॉलिसी घेण्यास भाग पाडतात. ग्राहक सुध्दा भविष्याची चिंता यांचा विचार करुन वेळ प्रसंगी विमा उपयोगी पडेल याचा विचार करुन मोठया रक्कमेचा विमा हप्ता भरुन विमा पॉलिसी घेतो. परंतु ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी त्यांना विमा पॉलिसीचा खूप मोठा आधार वाटतो. मात्र वि.प. सारख्या विमा कंपन्या काही तरी कारणे व सबबी सांगून विमा धारकांना वेठीस धरतात व विमा प्रस्ताव नाकारतात. पर्यायाने विमा धारकांना न्यायालयाचे दार ठोठावे लागते. अशाप्रकारे विमा कंपनीची नितिमुल्य ही लोक कल्याणकारी शासन व्यवस्थमध्ये नक्कीच चुकिची व अन्यायकारक ठरते.हे प्रस्तुत प्रकरणातून दिसून येते. त्यामुळे वि.प. यांनी विमा धारकास दिलेली त्रृटीच्या व दुषित सेवेसाठी नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित ठरेल असे या मंचास वाटते.
12 प्रस्तुत प्रकरणी त.क. यांना अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी रु.3,40,000/- एवढा खर्च आला आहे व तेवढी मागणी वि.प. यांचेकडून केली आहे व त्याचे पृष्ठयर्थ त्यांनी नि.क्रं. 4/7 ते 4/11 कडे खर्चाचे पावत्या हजर केलेल्या आहेत. तसेच वि.प. यांनी नि.क्रं. 11/7 ची सर्व्हेअर श्री. आर.व्ही.रावळ यांचा रिपोर्ट हजर केलेला आहे. त्यामध्ये सर्व्हेअर श्री. रावळ यांनी सुध्दा सदर वाहनाचे इस्टीमेट रु.3,69,196 असे दाखवून पुढे नेट असेसमेंट म्हणून रु.3,06,640/- एवढी रक्कम दाखविली आहे. यावरुन त.क. यांनी केलेला खर्च व सर्व्हेअर यांचा रिपोर्ट यामध्ये फारशी तफावत दिसून येत नाही. त्यामुळ त.क. यांची मागणी व सर्व्हेअर यांचा रिपोर्ट याचे अवलोकन करुन त.क. यांना सदर वाहनाच्या दुरुस्तीपोटी रु.3,40,000/- मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचास वाटते.
13 त.क. यांनी आपला विमा क्लेम मिळविण्यासाठी वकिलामार्फत दोन वेळा वि.प.यांना नोटीसा पाठविल्या. हे नि.क्रं. 4/1 व नि. 12/8 वरील नोटीसावरुन दिसून येते. तरीही त्यास वि.प.यांनी कोणतेही उत्तर दिले नाही व उलटपक्षी कागदपत्रे पुरविली नाही म्हणून त.क. यांचा विमा प्रस्ताव नाकारला यावरुन वि.प.यांची ग्राहकांबद्दलची नकारात्मक मानसिकता स्पष्ट दिसून येते.
14 यावरुन त.क. हे आपल्या न्याय हक्कासाठी व विमा रक्कम मिळविण्यासाठी किती झगडत आहेत हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त.क. यांचे वाहन दुरुस्तीला आलेला खर्च रु.3,40,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे 10% दराने व्याज देणे न्यायोचित ठरेल असे या वि.मंचास वाटते.
15 त.क. यांनी आपल्या वाहनाचा विमा उतरविला व अपघातानंतर ती विमा रक्कम त्यांना वेळेत उपयोगी पडली नाही. त्यामुळे त्यांना पैश्याची जुळवाजुळव लोकांकडून, नातेवाईंक यांचेकडून उधार उसणवार करुन सदर अपघातग्रस्त गाडी दुरुस्त करावी लागली. एवढेच नव्हेतर सदर अपघात विमा मिळविण्यासाठी वारंवांर वि.प. यांचेकडे हेलपाटे मारावे लागले, वकिलामार्फत नोटीसा पाठवाव्या लागल्या व अखेर वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली. यावरुन गाडीचा विमा काढूनही त्याच्या उपभोगापासून त.क. यांना वंचित राहावे लागले. त्यामुळे त.क. यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3000/- त.क. यांना मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचास वाटते.
16 एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या त.क. यांचे वाहन क्रं. MH 32 Q-1177 या वाहनाच्या अपघात विम्याची रक्कम रु.3,40,000/- व सदर रक्कमेवर त.क. ला प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 10% दराने व्याज अदा करावे..
(3) वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये
10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3000/- अदा करावे.
वरील आदेशाची अंमलबजावणी वि.प. 1 व 2 यांनी आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावी.
(4) आदेशाची प्रत संबंधितानां पाठविण्यात यावी.