(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 03/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.04.02.2012 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याचा कॉम्प्यूटरसाठी लागणारा कागद तयार करण्याचा व्यवसाय असुन तो लघुउद्योग श्रेणीमध्ये मोडतो. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्र.1 कंपनीचा एजंट गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे त्याचे कारखान्यातील मोटर व इतर उपकरणांचा विमा दि.09.07.2003 उतरविण्याकरीता त्यांनी कारखान्यातील उपकरणांची पाहणी केली व सदर विमा प्रस्तावाचा फॉर्म भरला त्यामधे मोटारींचे व इतर साहीत्यांचा उल्लेख प्रस्ताव फॉर्ममधे केला. तक्रारकर्त्याने सदर फॉर्मवर पुन्हा सही केली व प्रिमीयमपोटी एक कोरा धनादेश गैरअर्जदार क्र.1 यांना अदा केला. सदर धनादेशावर गैरअर्जदार क्र.2 यांनी रु.3,000/- ची रक्कम लिहून गैरअर्जदार क्र.1 यांना दिला . गैरअर्जदारांनी सदर मशिनरीजचा दि.10.10.2009 ते 09.10.2010 या कालावधीकरीता पॉलिसी काढली तिचा क्र.281800/44/09/5200000029 असुन त्यात 4 इलेक्ट्रीक मोटर व इतर साहीत्याचा उल्लेख आहे. जूलै-2010 मधे विमा उतरविलेल्या मोटर पैकी 1 मोटर ना-दुरुस्त झाल्या बाबतची सुचना तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांना दिली, गैरअर्जदार क्र.2 यांच्या सुचनेनुसार सदर दुरुस्तीच्या खर्चाचे कोटेशन तक्रारकर्त्याने घेतले, त्याप्रमाणे रु.12,847/- एवढा खर्च करुन सदर मोटर दुरुस्त करुन घेतली व दावा फॉर्मसह दि.27.07.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दाखल केला. गैरअर्जदारांनी दावा देण्यांस अगोदर टाळाटाळ केली व त्यानंतर इलेक्ट्रीक मोटारचा क्रमांक पॉलिसीमधे नसल्याच्या कारणास्तव दावा देण्यांस नकार दिला. सदर विमा पॉलिसीमध्ये 4 इलेक्ट्रीक मोटारींचा उल्लेख आहे, असे असतांना देखिल गैरअर्जदारांनी केलेच्या चुकीचा गैरफायदा घेऊन तक्रारकर्त्याचा दावा दावण्याचा प्रयत्न दोघांनीही केला, ही गैरअर्जदारांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार या मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 12 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदार क्र. 1 यांचे कथनानुसार सदरची तक्रारीस व्यावसायीक तत्वाची बाधा येते, त्यामुळे ती मंचास चालवणे योग्य नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याने सदरची पॉलिसी काढल्याचे मान्य केलेले असुन इतर आरोप अमान्य केले आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथनानुसार तक्रारकर्त्याने त्यांचेकडे सदर पॉलिसी काढल्यानंतर पॉलिसीत नमुद केलेल्या मोटारींकरीता पॉलिसी निर्गमीत करण्याची विनंती तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना केली असता त्यांनी पॉलिसीच्या अटी, शर्तीं व मर्यादांच्या अधीन राहून पॉलिसी निर्गमीत केलेली आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे कधीही तक्रार केलेली नाही व सदर दाव्यासंबंधी दि.02.08.2010 रोजी केवळ सुचना दिली परंतु कुठलेही दस्तावेज सादर केलेले नाही व त्या संबंधाने वेळोवेळी दिलेल्या दस्तावेजांची छाननी व पडताळणी केल्यानंतर असे आढळून आले की, सदर नादुरुस्त मोटर क्र.93107603 चा विमा पत्रात अंतर्भाव नाही व ती उपरोक्त विमापत्रात संरक्षीत नाही. म्हणून अर्जदाराचा विमा दावा दि.13.10.2010 रोजी नामंजूर करुन निकाली काढण्यांत आला. गैरअर्जदारांचे कार्यपध्दतीनुसार श्री. संतोष कुलकर्णी या परवानाधारक सर्व्हेअरची नेमणूक केली होती, व त्याने क्षतिग्रस्त मोटारची रितसर तपासणी व निरीक्षण केल्यानंतर नुकसानीचे मुल्यांकन रु.9,938/- एवढे केले व अहवालात असेही नमुद केले आहे की, सदर मोटारचा विमापत्रा अंतर्भाव नसुन ती सुरक्षीत नाही.
5. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कोणतीही कमतरता नसल्यामुळे तक्रारकर्त्याने बेकायदेशिरपणे लाभ घेण्याचे हेतुने सदरची तक्रार दाखल केलेली असुन ती खर्चासह खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे.
6. गैरअर्जदार क्र.2 यांनी ते गैरअर्जदार क्र.1 चे एजंट असल्याचे मान्य केलेले असुन तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे कथनानुसार तक्रारकर्त्याने स्वतःच परिस्थितीची माहीती घेऊन त्यांच्या अटी व शर्तीं समजुन घेऊन पॉलिसी निर्गमीत करण्याची विनंती केलेली आहे. तक्रारकर्त्याने या आधी “The New India Ass.Co. Ltd.”, यांचेकडे सदर मशीन/यंत्राकरीता पॉलिसी काढलेली होती. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गैरअर्जदार क्र.2 ची कधीही तक्रार केली नाही. तक्रारकर्त्याने केवळ खोटी तक्रार दाखल करुन मंचाची दिशाभुल करण्याचे हेतुने दाखल केलेली आहे, त्यामुळे वरील सर्व बाबी लक्षात घेता सदर तक्रार खारिज करावी अशी गैरअर्जदार क्र.2 ने मंचास विनंती केलेली आहे.
7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.14.02.2012 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर, मंचाने उभय पक्षांचा त्यांचे वकीलामार्फत युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
8. वरीष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निवाडयांचा विचार करता सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे व दाखल दस्तावेज पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 कडे पॉलिसी क्र.281800/44/09/5200000029 दि.10.10.2009 ते दि.09.10.2010 पर्यंतचे कालावधीकरीता त्याचे कारखान्यातील काही मशीन व इतर साहित्यांकरीता काढली होती. त्याच प्रमाणे जुलै-2010 मधे विमा उतरविलेल्या इलेक्ट्रीक मोटारपैकी एक मोटार नादुरुस्त झाली व त्याकरीता सदर पॉलिसी अंतर्गत त्याने गैरअर्जदारांकडे विमादावा दाखल केलेला होता. परंतु सदर दावा गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.03.10.2010 रोजी नादुरुस्त झालेल्या मोटारकरीता केला त्या मोटारीचा विमापत्रात उल्लेख नव्हता व ती सदर पॉलिसी अंतर्गत सुरक्षीत नव्हती या कारणास्तव नाकारण्यात आला असे दिसुन येते.
9. तक्रारकर्त्याचे मते सदरची चुक ही गैरअर्जदार क्र.1 चे एजंट गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून झालेली असुन त्यांनी सदर फॉर्ममधे केवळ किर्लोस्कर कंपनीच्या मोटारी व इतर साहीत्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचे चुकीचा फायदा गैरअर्जदार कंपनीने घेऊन तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला ही गैरअर्जदारांची कृति अयोग्य आहे. परंतु या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने आपल्या शपथेवरील कथनात असे म्हटले आहे की, विमा काढलेल्या मोटरपैकी एक मोटर नादुरुस्त झाली, त्यानंतर शपथपत्रात असे नमुद केले की, सदरच्या नादुरुस्त मोटरचा क्रमांक 931076-03 असा आहे. परंतु विमापत्रात संरक्षीत केलेल्या माटारींमधे सदरच्या क्रमांकाची मोटर दिसुन येत नाही. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदारांच्या एजंटने सदर विमा प्रस्तावात मोटर नंबर टाकले नाही, त्यांनी को-या प्रस्ताव फॉर्मवर सही घेतली व त्यावर तक्रारकर्त्यासारख्या व्यावसायीक फर्मने सही केली हे म्हणणे या मंचाचे पचती पडत नाही. त्यामुळे विमापत्रामधे उल्लेख केलेली मोटार व नादुरुस्त असलेली मोटर ही एक आहे, हे या मंचास पुराव्या अभावी मान्य करता येत नाही. तसेच दाखल पुराव्यावरुन हे दिसुन येते की, सदरची चुक तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे निदर्शनास आणून दिलेली नाही.
10. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता दिली असे म्हणता येणार नाही, करीता सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. वरील निरिक्षणासह सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.