निकालपत्र
( पारीत दिनांक :18/02/2013 )
( द्वारा अध्यक्ष(प्रभारी)श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे) )
1. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- ही
12 टक्के व्याजदराने द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.50,000/- व
नोटीसचा खर्च रु.1000/- तसेच ईतर खर्च द्यावे.
अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
2. अर्जदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.3 हे विमा एजंट असुन गैरअर्जदार क्र.1 व 2 ही विमा कंपनी आहे. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.3 कडुन गैरअर्जदार क्र.1 व 2 या कंपनीची मेडीक्लेम पॉलीसी काढली होती जिचा क्रमांक 28050/48/09/8500001745 असा आहे व सदर पॉलीसीचा फॉर्म भरीत असतांना गैरअर्जदार क्र.3 यांच्या सांगण्यानुसार फॉर्मवर फक्त सही केली व गैरअर्जदार क्र.3 ला विमा प्रिमीयमची रक्कम दिली. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, जानेवारी 2011 ला झोपेचत झाती दुखत असल्यामुळे त्यांना डॉ.सरोदे यांचे दवाखान्यात भरती केले व नंतर ‘अवंती हॉस्पीटल’ नागपुर येथे पुढील योग्य उपचाराकरीता भरती करण्यात आले व तेथे दिनांक 13/1/2011 रोजी एन्जीयोग्राफी व एन्जीयोप्लास्टी करण्यात आली व त्यामुळे दिनांक 12/01/2011 ते 17/01/2011 पर्यंत ‘अवंती हॉस्पीटल’ नागपुर येथे भरती होते व त्याकरीता एकुण सर्व खर्च मिळुन रु.1,77,430/- चे बिल भरण्यात आले.
अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, दिनांक 14/1/2011 रोजी त्यांच्या भावाने व दिनांक 1/12/2011 रोजी त्याने स्वतः गैरअर्जदार क्र.1 कडे विमा रक्कम मिळण्याकरीता अर्ज सादर केला असता गैरअर्जदार क्र.1 यांनी, आजपर्यंत मुळ कागदपत्रे मिळाली नाही तसेच आधिच्या आजारपणाची माहिती दिली नसल्याचे कारण सांगुन विमा दावा फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे, गैरअर्जदार क्र.1 यांनी चुकीच्या कारणाने तसेच सर्व मुळ दस्तावेज दिल्यानंतरही विमा दावा फेटाळण्यात आल्याची तक्रार केली. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी सुध्दा अर्जदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले व परत संपुर्ण कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीची मागणी केली. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे संपुर्ण कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्यावर सदर दस्तावेज गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे पाठविण्यात आली. परंतु दिनांक 10/2/2012 रोजीच्या पत्रान्वये परत अर्जदाराचा विमा दावादिनांक 10/1/2012 रोजी विमा दावा नाकारल्याचे पत्रा प्रमाणे जुनिच भुमिका घेवुन नाकारण्यात आला. त्यामुळे अर्जदार यांनी दिनांक 9/3/2012 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस गैरअर्जदार यांना पाठविण्यात आला.
अर्जदार यांनी तक्रारीत नमुद केले आहे की, त्यांना आलेला ह्रदयविकाराचा झटका व डिसेंबर 2009 मध्ये त्याच्यावर झालेल्या उपचाराचा कोणताही संबंध नाही व तसे त्याच्यावर उपचार करणारे डॉ.माहुरकर यांनीही सांगीतले, सदर बाबींची सखोल चौकशी ही गैरअर्जदार यांनीही करणे न्यायोचित होते, परंतु गैरअर्जदार यांनी तसे न करता विमा दावा एकतर्फा फेटाळण्यात आला व हि बाब गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब करणारी आहे. त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारीतील विपरित विधाने/ आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, प्रपोजल फॉर्म मध्ये स्पष्ट नमुद केले आहे की, पॉलिसी धारकाने पॉलिसी काढण्याअगोदर त्याला कोणता आजार आहे काय किंवा होता काय व त्यासंबंधात कोणती शस्त्रक्रिया झाली आहे काय ही बाब सविस्तर लिहीने गरजेचे होते. परंतु अर्जदार यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रीया झालेली नव्हती असे स्पष्ट लिहीले होते, जेंव्हा की डिसेंबर 2009 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती व त्याला सरवाईकल लॅमिनेकटॉमिया झाला होता. परंतु हेतुपूरस्सर अर्जदार यांनी सदर आजाराची बाब विमा प्रपोजल पत्र भरतांनी लपवुन ठेवली व त्यामुळे अर्जदार यांनी विमा नियम व अटींचा भंग केल्यामुळे त्याचा विमा दावा नामंजुर करण्यात आला. तसेच गैरअर्जदार यांनी त्याच्यावर झालेल्या ह्रदविकाराबाबतचे सर्व दस्तावेज व बिलांची वारंवार मागणी करुनही अर्जदाराने सदर बाबींची पुर्तता केली नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांच्याकडुन सेवे मध्ये कोणतीही टाळाटाळ किंवा दिरंगाई करण्यात आलेली नाही. विमा अटी व शर्तीच्या अधिन राहुनच त्यांनी अर्जदाराचा विमा दावा नामंजुर केला असल्यामुळे, अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र.3 यांनी तक्रारीतील विपरित विधाने/ आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, तो फक्त एक अभिकर्ता म्हणुन कार्य करतो, दावा मंजुर करणे किंवा फेटाळणे हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे आहे. अर्जदार यांनीच विमा प्रपोजल पत्र भरुन दिले होते. पॉलिसी धारकाने पॉलिसी काढण्याअगोदर त्याला कोणता आजार आहे काय किंवा होता काय व त्यासंबंधात कोणती शस्त्रक्रिया झाली आहे काय ही बाब सविस्तर लिहीने गरजेचे होते. परंतु अर्जदार यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रीया झालेली नव्हती असे स्पष्ट लिहीले होते, जेंव्हा की डिसेंबर 2009 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती, परंतु हेतुपूरस्सर अर्जदार यांनी सदर आजाराची बाब विमा प्रपोजल पत्र भरतांना लपवुन ठेवली व त्यामुळे अर्जदार यांनी विमा नियम व अटींचा भंग केल्यामुळे त्याचा विमा दावा नामंजुर करण्यात आला. त्यांच्या विरुध्दची अर्जदाराची प्रस्तुत तक्रार चालु शकत नसल्यामुळे खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.3 यांनी केली आहे. विमा अटी व शर्तीच्या अधिन राहुनच अर्जदाराचा विमा दावा नामंजुर केला असल्यामुळे, अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार 3 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
5. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत माहिती पत्र, विमा फॉर्म, गैरअर्जदाराला पाठविलेले पत्र, डॉक्टरचे प्रमाणपत्र, कायदेशीर नोटीस इत्यादी एकुण 26 दस्तावेंजांच्या छायांकीत प्रती तसेच लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
6. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला असुन लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्र.3 यांनी यांनी त्यांचा लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला आहे.
7. प्रस्तुत प्रकरणातील अर्जदार यांचा तक्रार अर्ज गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे तक्रार अर्जाला दिलेले उत्तर दाखल कागदपत्रे, दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन व पडताळणी केली असता खालील मुद्दे आदेश विचारार्थ उपस्थित झाले.
मुद्दे उत्तर
1) अर्जदार यांचा विमा दावा फेटाळुन गैरअर्जदार
क्र.1 यांनी सेवेत त्रुटी केली आहे का ? ...... होय
2) अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन विमा दाव्याची
रक्कम मिळण्यास पात्र आहे काय ? ...... होय
3) काय आदेश अंतिम आदेशानुसार
4) मुद्दा क्र.1 व 2 ः अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे कडुन मेडीक्लेम पॉलिसी काढली होती तीचा क्रमांक 28050/48/09/8500001745 असा आहे हे नि.क्र.10/1 ते 10/4 वरील विम्याचे पॉलिसी व दाखल कागदपत्रांवरुन दिसुन येते व ही बाब गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना मान्य आहे. पॉलिसी संदर्भात उभयंतामध्ये वाद नाही. वाद आहे तो पॉलिसी अंतर्गत विमा लाभ दिला नाही याबाबत.
8. अपघात किंवा आजारपण हे अचानक उद्भवत असते व अश्या प्रसंगी आपल्या करुणा किंवा सदिच्छा पुरेशा ठरत नसतात तर त्यावेळी प्रामुख्याने गरज असते ती आर्थिक मदतीची. अर्जदार मुळात सुशिक्षीत व संवेदनशील तरुण असल्याने भविष्यात जर आजारपणाला किंवा कोणत्याही शारीरिक पिडेला समोरे जावे लागेल तर त्यावेळी आपली फजीती व्हायला नको म्हणुन त्याने आरोग्य विषयक विमा पॉलिसी काढली होती. जानेवारी 2011 मध्ये अचानकपणे अर्जदाराला झोपेतच छातीत दुखू लागले म्हणुन त्यांना डॉ.सरोदे यांचे दवाखान्यात भरती केले व नंतर ‘अवंती हॉस्पीटल’ नागपुर येथे पुढील योग्य उपचाराकरीता भरती करण्यात आले व तेथे दिनांक 13/1/2011 रोजी एन्जीयोग्राफी व एन्जीयोप्लास्टी करण्यात आली व त्यामुळे दिनांक 12/01/2011 ते 17/01/2011 पर्यंत ‘अवंती हॉस्पीटल’ नागपुर येथे भरती होते हे नि.क्र.10/5 वरील डॉ.माहुरकर यांचे डिस्चार्ज कार्डवरुन दिसुन येते. सदर उपचाराबाबत सुध्दा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आक्षेप नाही. आक्षेप आहे तो सदर उपचाराचे कागदपत्रे त्यांचे कडे न देता ते गैरअर्जदार क्र.3 कडे दिले व सदर विमा पॉलिसी काढते वेळी पुर्वीचे आजाराचे व उपचाराची माहिती दिली नाही याबाबत व तोच तोच मुद्दा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पुढे केला आहे व अर्जदार यांचा विमा दावा नाकारला आहे. याबाबत नि.क्र.4/2 वरील अर्जदाराच्या भावाने गैरअर्जदार विमा कंपनीला दिलेल्या पत्राचे बारकाईने अवलोकन केले असता नि.क्र.4/1 प्रमाणे विमा प्रपत्र अर्जदार यांचे बंधुने मागवला व त्या सोबत सर्व कागदपत्रे, रिपोर्ट जोडुन तो गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना गैरअर्जदार क्र.3 मार्फत दिले आहेत व सदर कागदपत्रे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पोहचते झाले आहेत हे नि.क्र.4/2 वरील अर्जदार यांचे पत्रावर पोच म्हणुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा शिक्का आहे. यावरुन सदर अर्जदार यांची विम्या दाव्याची कागदपत्रे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पोहचली आहेत हे सिध्द होते. एवढेच नव्हे तर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे वरीष्ठ कार्यालयाने सुध्दा अर्जदार यांचे कडुन ब-याच वेळा सर्व कागदपत्रे वेळोवेळी मागविली आहे. नि.क्र.4/3 वरील अर्जदार यांचे पत्रावरुन अर्जदार यांनी त्याबाबत माहिती गैरअर्जदारांना दिल्याचे दिसुन येते.
9. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे कार्यालयाच्या नि.क्र.4/5, 4/6, 4/7 वरील पत्रावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारा कडुन वेळोवेळी नव्याने पुन्हा कागदपत्रे मागविली परंतु त्यानंतर नि.क्र.4/9 प्रमाणे सदर विमा दावा नाकारल्याचे दिसुन येते. अर्जदार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली तेंव्हा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे विभागीय कार्यालयाने पुन्हा दिनांक 24/1/2012 रोजी अर्जदार यांना पत्र पाठवुन कागदपत्राच्या सर्व प्रती मागविल्या हे नि.क्र.4/13 वरील गैरअर्जदार यांचे विभागीय कार्यालयाचे पत्रावरुन दिसुन येते. तसेच त्यानंतर दिनांक7/2/2012 रोजी गैरअर्जदाराचे डिव्हीजनल मॅनेजर यांनी अर्जदार यांना पत्र पाठवुन सदर विमा दाव्याबाबत अर्जदाराकडुन कागदपत्रे मागीतली हे नि.क्र.4/17 वरुन दिसुन येते व त्याच प्रमाणे नि.क्र.4/18 वरील पत्रवरुन अर्जदार यांनी पत्र पाठवुन पुर्तता केल्याचे गैरअर्जदार यांना कळविल्याचे दिसुन येते. तसेच पुन्हा नि.क्र.4/19 प्रमाणे गैरअर्जदार यांनी दिनांक 10/02/2012 रोजी पत्र पाठवुन त्यांनी अर्जदाराचा विमा दावा नाकारल्याचा निर्णय योग्य आहे असे कळविले. अश्या प्रकारे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांच्याशी विमा दाव्याबाबत फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार केला असल्याचे सिध्द होते. अखेर विमा दावा नाकारुन अर्जदाराला दुषित व त्रुटीची सेवा दिली आहे.
10. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा दावा नाकारण्याबाबत पुढे केलेले महत्वाचे कारण म्हणजे अर्जदार यांनी विमा पॉलिसी काढतांना त्यांचेवर 2009 साली त्यांना सरवाईकल लॅमिनेकटॉमिया झाला होता व शस्ञक्रीया करण्यात आली होती ही बाब विमा फॉर्म भरतांना लपवुन ठेवली होती. या बाबत बारकाईने कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, जरी अर्जदार यांना 2009 साली सरवाईकल लॅमिनेकटॉमिया झाला होता तरी त्याचा व 2011 साली अर्जदाराला झालेल्या आजाराचा काही सुध्दा संबंध नाही व हे नि.क्र.4/26 वरील अवंती हॉस्पिटलचे पत्रावरुन सिध्द होते. सदर पत्रात स्पष्टपणे नमुद केले आहे की, सदर सरवाईकल लॅमिनेकटॉमिया या व जानेवारी 2011 मधील अर्जदाराचे आजाराचा काहीही संबंध नाही. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची 2009 सालाची माहिती लपवुन ठेवेली हे कारण सांगुन विमा दावा नाकारला ही सदर बाब बेकायदेशीर आहे हे सिध्द होते. जर सदर 2009 सालाच्या आजाराचे व 2011 मधील ऑपरेशनचा काही संबंध असता तर त्याबाबतचा तज्ञांचा अहवाल (Expert Opinion) गैरअर्जदार यांनी मागविणे गरजेचे होते. परंतु तसे गैरअर्जदार यांनी केले नाही. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराची पॉलिसी काढण्यापुर्वी त्यांचे पॅनलवरील डॉक्टरांकडुन योग्य तपासणी करुन घेणे गरजेचे होते, परंतु तसे केल्याचा कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांना 2009 साली सरवाईकल लॅमिनेकटॉमिया आजार होता व तो त्यांनी लपवुन ठेवला म्हणुन विमा दावा फेटाळण्यात आला ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते व त्यामुळे 2011 मधील उपचारापोटीचा विमा दाव्याची रक्कम मिळण्यास अर्जदार हे पात्र ठरतात असे वि.मंचाचे मत आहे. या बाबत मा.राज्य ग्राहक आयोगाने...
1) 2010(1)CPR 129(Maharashtra State Commission, Mumbai)
Life Insurance Corporation of India …..V/s…….Smt.Chhaya Hanmayya Ghante.
“ Consumer Protection Act, 1986—Sec 2(1)(g)(o)—Repudiation of insurance claim—On ground of suppression of material fact—Constention that insured was suffering from ailment before taking the policy which he did not declare—Life assured died due to jaundice—No nexus between cause of death and the ailment from which he was suffering previously—Before taking the policy he was checked by penal of doctors—Not found to be suffering from any disease at the time of taking the policy—he was completely cured from his earlier ailment—Pre-existing disease not only should have existed before taking of the policy but also at the time of taking thereof ---District Forum rightly allowed the claim.”
3) 2010(1) CPR 322 (Himachal Pradesh State Commission,
Shimla)
Manager Claims LIC of India …..V/s…….Mrs.Amara Vati Devi and Anr.
“ Consumer Protection Act, 1986—Sec 12 and 17--- Insurance Act, 1938--- Section 45—Life Insurance Policy claim—Policy was taken on 24/8/2003 and insured died on 3/10/2003 due to heart failure—claim was repudiated on ground that insured had undergone by pass surgery and fact was concealed—District Forum allowed complaint directing appellant to pay policy amount with interest at 9% p.a.—Appeal—No cogent, convincing and reliable evidence was placed by appellant to point out that insured had taken treatment for heart ailment or had undergone by pass surgery—Prescription slips filed by appellant showed only that deceased was suffering high blood pressure of it would not establish case for concealment of material facts of fraud by policy holder—Heart failure had no nexus with deceased suffering from hypertension—No reason to interfere.”
11. वरील दोन्ही न्याय निवाडयात पुर्वीचे आजार किंवा उपचाराचा व नवीन आजाराचा काहीही संबंध नसल्यास विमा दावा नाकारता येत नाही असे नमुद केले आहे व हे दोन्ही न्याय निवाडे या प्रकरणात लागु पडतात. प्रस्तुत प्रकरणात सुध्दा नि.क्र.4/26 नुसार 2009 व 2011 मधील उपचाराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही हे सिध्द झाले आहे.
4) IV(2011) CPJ 112 (Rajasthan State Commission, Jaipur)
Aviva Life Insurance Co.India Ltd…V/s…Manohar
Bhogawat.
“ Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(g), 15—insurance (Life)—Pre-existing illness—Claim repudiated—Forum allowed complaint—Hence appeal – Contention, no affidavit of agent that each and every condition of policy had duly been explained to insured or to her attendant—Accepted—Once accepting premium and having entered into an agreement without verifying the facts, Insurance Company can not rigged out of liability merely by saying that contract was made by misrepresentation and concealment—Insurance policies should not be issued and repudiated in such a casual and mechanical manner—Agent of Insurance Company Is required to explain all details and conditions of insurance policy sought by the customer—Impugned order calls for interference.”
या निवाडयामध्ये एकदा पॉलिसी घेतल्यानंतर त्यांचे अटी व शर्ती नुसार लाभ देणे विमा कंपनीवर बंधनकारक ठरते असे नमुद आहे. तसेच पॉलिसी मधील सर्व अटी एजंटने समजावुन सांगणे गरजेचे असते असे नमुद आहे.
12. अशा त-हेने वरील विवचनावरुन दिसुन येते की, निसर्गातील प्रक्रियेमुळे भौगोलीक व नैसर्गीक वातारणात सातत्याने परिवर्तन होत राहतात व त्याचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मानवी शरीरावर व आरोग्यावर होत असतात. प्रत्येक आजाराची माहिती व्यक्तिला असतेच असे नाही किंवा तो आजर केंव्हा उद्भवेल ते सुध्दा माहित नसते. परंतु तो उद्भवलाच तर त्याला तोंड देण्यासाठी आर्थिक तरतुद असणे गरजेचे ठरते. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार यांनी आपली व्यावसायीक कौश्यल्याने म्हणा किंवा संवेदना अभावी म्हणा वर नमुद निवाडयामध्ये उल्लेखीत तसेच परिवर्तनाचे प्रक्रियेतील बदल हया दोन्ही न्यायोचित व नैसर्गीक आणी वैज्ञानिक तत्वाला तिलांजली देवुन अर्जदाराचा विमा दावा नाकारला. खरे तर ही वेळ अर्जदाराला मदत करण्याची होती, परंतु गैरअर्जदार यांनी ज्यावर विश्वास ठेवुन अर्जदार यांनी विमा काढला त्याला तिलांजली देवुन विमा दावा नाकारला ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे.
13. विमा काढण्यासाठी गैरअर्जदार यांचे एजंट अर्जदार यांचे सारखे ग्राहकांचे शोधात असतात. वेगवेगळी आश्वासने व विमा पॉलिसीबद्दल माहिती सांगून ग्राहकांना भूरळ पाडतात व विमा पॉलिसी घेण्यास भाग पाडतात. ग्राहक सुध्दा भविष्याची चिंता यांचा विचार करुन वेळ प्रसंगी विमा उपयोगी पडेल याचा विचार करुन मोठया रक्कमेचा विमा हप्ता भरुन विमा पॉलिसी घेतो. परंतु ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी त्यांना विमा पॉलिसीचा खूप मोठा आधार वाटतो. मात्र गैरअर्जदार यांचे सारख्या विमा कंपन्या काही तरी कारणे व सबबी सांगून विमा धारकांना वेठीस धरतात व विमा प्रस्ताव नाकारतात. पर्यायाने विमा धारकांना न्यायालयाचे दार ठोठावे लागते. अशाप्रकारे विमा कंपनीची नितिमुल्य ही लोक कल्याणकारी शासन व्यवस्थमध्ये नक्कीच चुकिची व अन्यायकारक ठरते हे प्रस्तुत प्रकरणातून दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी विमा धारकास दिलेली त्रृटीच्या व दुषित सेवेसाठी नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित ठरेल असे या मंचास वाटते.
14. अर्जदार यांनी आपला विमा क्लेम मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पोलीसात तक्रार केली, वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली हे नि.क्रं. 4/22 वरील नोटीसवरुन दिसून येते. तरीही त्यास गैरअर्जदार यांनी कोणतेही विमा लाभ दिला नाही व उलटपक्षी अर्जदार यांचा विमा प्रस्ताव नाकारला यावरुन गैरअर्जदार यांची ग्राहकांबद्दलची नकारात्मक मानसिकता स्पष्ट दिसून येते. यावरुन अर्जदार हे आपल्या न्याय हक्कासाठी व विमा रक्कम मिळविण्यासाठी किती झगडत आहेत हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे अर्जदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- ( रु.एक लाख फक्त) व त्यावर विमा दावा नाकारण्यापासुन म्हणजे दिनांक 10/01/2012 पासुन द.सा.द.शे 10% दराने व्याज देणे न्यायोचित ठरेल असे या वि.मंचास वाटते.
15. अर्जदार यांनी आपल्या आरोग्याची काळजी म्हणुन विमा उतरविला होता परंतु ती विमा रक्कम त्यांना वेळेत उपयोगी पडली नाही. त्यामुळे त्यांना पैश्याची जुळवाजुळव करुन सदर उपचार करावे लागले. एवढेच नव्हे तर सदर विमा दावा मिळविण्यासाठी वारंवांर गैरअर्जदार यांचेकडे हेलपाटे मारावे लागले, वकिलामार्फत नोटीसा पाठवाव्या लागल्या व अखेर वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली. यावरुन विमा काढूनही त्याच्या उपभोगापासून अर्जदार यांना वंचित राहावे लागले. त्यामुळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1500/- तक्रारकर्ता यांना मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचास वाटते.
16. एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या अर्जदार यांचे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- व सदर रक्कमेवर विमा दावा नाकारण्यापासुन म्हणजे दिनांक 10/01/2012 पासुन अर्जदाराला प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत त्यावर द.सा.द.शे. 10% दराने व्याज अदा करावे..
(3) गैरअर्जदार क्र. 1 व २ यांनी अर्जदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,500/- अदा करावे.
(4) वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व २ यांनी आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावी अन्यथा उपरोक्त कलम-2 नमूद केलेल्या देय रक्कमेवर द.सा.द.शे. 10% ऐवजी 12%दराने व्याज अदा करावे.
(5) गैरअर्जदार क्र.3 यांच्या विरुध्दा कुठलाही आदेश नाही.
(6) आदेशाची प्रत संबंधितानां पाठविण्यात यावी.