(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 09/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 03.05.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्ता हा वाहन क्र. सीजी-04 जे 0299 चा मालक असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. सदर वाहनाचा गैरअर्जदार विमा कंपनीकडे रु.7,50,000/- चा विमा उतरविण्यांत आला होता व त्याकरता गैरअर्जदारांकडे विमा हप्त्याचे रु.18,897/- दिले तेव्हा गैरअर्जदाराने एका पानाची विमा पॉलिसी दिली, जिचा विमा क्रमांक 281108/31/06/6300005048 असुन विमा कालावधी दि.01.03.2007 ते 29.02.2008 हा होता. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याला विमा संदर्भात अटी व शर्ती पॉलिसीसोबत गैरअर्जदाराने दिल्या नव्हत्या. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, विमा कालावधी मधेच सदर वाहनाचा भुवनेश्वर येथे जात असतांना दि.01.10.2007 रोजी रात्री 11.30 वाजता अपघात झाला. सदर अपघातात वाहन चालक व क्लिनर यांचा मृत्यू झाला. सदर अपघात तेलेबंधा, रायपुर पोलिस स्टेशनच्या कक्षेमध्ये घडला व त्यासंबंधीचा एफआयआरची नोंद घेण्यांत आली तसेच अपघाताची सुचना गैरअर्जदारांना देण्यांत आली. त्या अनुषंगाने गैरअर्जदाराने श्री. हितेश चेतालिया यांची घटनास्थळ सर्वेअर म्हणुन दि.04.10.2007 रोजी नेमणूक केली. सदर वाहनाचा सर्वे पोलिस स्टेशन, तेलेबंधा येथे करण्यांत आला, कारण सदर वाहन पोलिसांनी रस्त्यावरील वाहतुक सुरळीत करण्याकरता पोलिस स्टेशनला हलविले होते. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, घटनास्थळ सर्वेअरचे परवानगीनुसार सुरेंद्र इंडस्ट्रीज व इंजिनियरिंग वर्क्स, वंजारी लेआऊट, नागपूर येथे दुरुस्ती करण्याकरता आणण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्म, अंदाजीत खर्च व वाहनाचे इतर कागदपत्रासोबत दि.27.12.2007 रोजी विमा दावा दाखल केला. गैरअर्जदाराने श्री. महेश गांधी, यांना वरीष्ठ सर्वेअर म्हणून दि.01.01.2008 रोजी नुकसानीचा अंतिम अंदाज घेण्याकरीता नियुक्त केले. त्यांनी वाहनाचे सर्वेक्षण केले व वाहनाचे दुरुस्तीला लागणारा खर्च, विमापत्रामधील उल्लेखीत किंमतीपेक्षा जास्त असल्यामुळे अंतिम सर्वेअरने रु.3,50,000/- नष्टशेष शोधन शुल्क वजा जाता रु.7,50,000/- चे नुकसान आकारले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांशी चर्चा केल्यानंतर व परवानगीनंतर नष्टशेष शोधन शुल्क स्विकारण्यांस किंवा त्यावेळी किंमत चांगली येत असल्यास वाहन विकून टाकण्यांस सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून परवानगी घेऊन रु.2,63,000/- ला वाहन विकल्याचे तक्रारीत नमुद आहे. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने विमा दाव्याचे पुर्ततेसंबंधी आवश्यक सर्व कारवाई केल्यानंतर सुध्दा गैरअर्जदाराने 29 महिने होऊन सुध्दा तक्रारकर्त्यास सुचना दिली नाही किंवा त्याचा विमा दावा निकाली काढला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असुन विमा दाव्याचे रु.4,00,000/- व शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.1,50,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु. 25,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजाविण्यांत आली असता गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे वाहन क्र. सीजी-04 जे 0299, हे विमाकृत होते ही बाब मान्य केली आहे. तसेच विमा पॉलिसी सुध्दा मान्य केलेली आहे. त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यास विमा पॉलिसीसोबत अटी व शर्ती दिल्या होत्या तसेच तक्रारकर्त्याचेजवळ चालक ग्राह्य अनुज्ञप्तीधारक होता हे अमान्य केले आहे. तसेच अपघाताची सुचना ही दि.27.12.2007 रोजी विलंबाने दिली व प्रत्यक्षात अपघात हा दि.01.10.2007 रोजी झाला होता. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची इतर सर्व म्हणणे अमान्य केले असुन त्याचे अंतिम सर्वेअर श्री.महेश गांधी यांनी नष्टशेष शुल्क (साल्वेज व्हॅल्यू) रु.3,50,000/- ठरविल्याचे मान्य केले आहे. त्यांनी असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याला वारंवार मागणी करुन सुध्दा आवश्यक दस्तावेज दिले नाही व मंचासमक्ष खोटे कथन केले असुन बहुतांश बाबी लपवुन ठेवल्या आहेत. त्यामुळे सदर प्रकरण खारिज करण्यांची मंचास विनंती केली आहे. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.19.10.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याचे वाहन क्र. सीजी-04 जे 0299 हे गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत होते, त्या संबंधात तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास विमा हप्त्याची रक्कम रु.18,897/- दिले होते ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.5 वरुन स्प्ष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याचे वाहनाला दि.01.10.2007 रोजी अपघात झाला होता, ही बाब सुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.6 वरुन सुध्दा स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्त्याचे वाहनाला विमा कालावधी मध्येच अपघात झाला होता व विम्याचा कालावधी हा दि.01.03.2007 ते 29.02.2008 पर्यंत होता ही बाब सुध्दा उभय पक्षांचे कथनावरुन व दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. 8. तक्रारकर्त्याचे वाहनाला अपघात झाल्यानंतर त्याने सदर अपघाताची सुचना गैरअर्जदाराला दिली होती व त्यांनी श्री.हितेश चेतालिया यांना घटनास्थळ सर्वेअर म्हणून दि.04.10.2007 रोजी नेमणूक केली होती, हे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. याउलट गैरअर्जदारानी तक्रारकर्त्याने अपघाताची सुचना दि.27.12.2007 रोजी दिली असे नमुद केले आहे. तसेच त्यांनी आपल्या उत्तरात कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने जवळपास 2 महिने 27 दिवसांनंतर अपघाताची सुचना दिली. 9. गैरअर्जदारांचे कर्मचा-यांना अपघाताची सुचना दिली ही बाब तक्रारकर्त्याचे दस्तावेज क्र. 1 वरुन स्पष्ट होते. याकरता मंचाने दस्तावेज क्र.1 अवलोकन केले असता त्यावर दि.27.12.2007 ही तारीख नोंदविलेली असुन सदर दस्तावेज RE : INTIMATION OF MOTOR LOSS/ ACCIDENT संदर्भात आहे. यावरुन सदर दस्तावेजानुसार परत गैरअर्जदाराला तक्रारकर्त्याने सुचना दिली हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याचे वकीलांनी युक्तिवादाचे वेळी म्हटले आहे की, त्याने अपघाताची सुचना वेळेवरच गैरअर्जदारांना दिली. तसेच त्यांनी निशाणी क्र.12 वर Notice to Produce Documents दाखल केले त्या विमा दाखल प्रकरण क्र.31/07-80/303 दस्तावेजासह दाखल करण्याची मागणी केली, अशी नोटीस देऊन सुध्दा गैरअर्जदाराने सदर प्रकरणातील दस्तावेज व विम्या दाखल दावा प्रकरण दाखल केले नाही. तक्रारकर्त्याचे वकीलांचे म्हणणे आहे की, सदर विमा दावा प्रकरण दाखल केले असते तर यामध्ये तक्रारकर्त्याने प्रथम सुचना केव्हा दिली हे स्पष्ट झाले असते. मंचाच्या मते गैरअर्जदाराने बचावात्मक मुद्दा घेत असतांना तक्रारकर्त्याने विलंबाने अपघाताची सुचना दिली ही बाब सिध्द करण्याकरता सदर विमा प्रकरण दाखल करणे गरजेचे होते. परंतु तसे न केल्यामुळे गैरअर्जदारास तक्रारकर्त्याने अपघाताची सुचना उशिराने दिली हा आक्षेप व मुद्दा अमान्य करण्यांत येतो. तक्रारकर्ता व गैरअर्जदाराने आपल्या कथनात मान्य केले आहे की, अंतिम सर्वेअर म्हणून श्री. महेश गांधी यांची नेमणूक करण्यांत आली होती व त्यांनी सदर वाहनाचे नष्टशेष शुल्क रु.3,50,000/- ठरविले आहे. तक्रारकर्त्याचे वाहन हे गैरअर्जदाराने रु.7,50,000/- ला विमाकृत केले होते ही बाब सुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. 10. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा विमा दावा हा कालबाह्य असल्याचे म्हटले आहे व त्याकरीता मंचासमक्ष मा. सर्वोच्च् न्यायालयाचा न्याय निवाडा (2009) 7 Supreme Court Cases 768, “Kandimalla Raghavaiah and Company – v/s – National Insurance Company & others”, दाखल केलेला आहे. सदर न्याय निवाडयाचे अवलोकन केले असता सदर न्याय निवाडा हा स्पेशल पॉलिसी म्हणजेच विशेष विम्याकरता आहे. तसेच सदर न्याय निवाडयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने परिच्छेद क्र.18 मध्ये ‘cause of action’, चे संबंधात सदर बाब नमुद केली आहे...In the context of limitation with reference to a fire insurance policy, undoubtedly, the date of accrual of cause of action has to be the date on which the fire break out. यावरुन सद न्याय निवाडा हा फायर विमा पॉलिसी संबंधात आहे, हे स्पष्ट होते. तसेच त्यांनी प्रकरणामध्ये विमा दावा हा सुध्दा 4 वर्षांचे अवधीनंतर दाखल करण्याकरता तक्रारकर्त्याकडून प्रयत्न केल्याचे दिसते, त्यामुळे सदर न्याय निवाडा या प्रकरणाशी सुसंगत नसल्याचे मंचाचे मत आहे. याउलट मा. राष्ट्रीय आयोगाचा न्याय निवाडा क्र.175/2005, United India Insurance Co.Ltd. –v/s- R. Piyarelall Import & Export Ltd.’, यामध्ये विमा दावा नाकारला तेव्हापासुन, तक्रारीचे कारण सुरु होते असा न्याय निवाडा दिलेला आहे व सदर न्याय निवाडा या तक्रारीतील तथ्याशी सुसंगतम असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार कालातीत असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच या तक्रारीमध्ये गैरअर्जदारांनी अजूनपर्यंत विमा दावा निकाली काढल्या संबंधी कोणताही दस्तावेज दाखल केला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा विमा दावा का निकाली काढला नाही, या सबंधाने कोणताही पत्रव्यवहार केला नाही व ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 11. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरामध्ये तक्रारकर्त्याचे वाहन चालकाचा वाहन परवाना हा अवैध होता असे म्हटले आहे. परंतु तशी बाब सिध्द करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदाराची होती व त्यांनी कुठल्याही दस्तावेजाव्दारे सिध्द केली नाही, त्यामुळे गैरअर्जदाराचा सदर आक्षेप अमान्य करण्यांत येत आहे. 12. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये गैरअर्जदाराने त्याला विमा पॉलिसीसोबत अटी व शर्ती दिल्या नव्हत्या असे म्हटले आहे, तर गैरअर्जदाराने पॉलिसीसोबत अटी व शर्ती दिल्या होत्या असे म्हटले आहे. परंतु सदर कथनाचे पृष्ठयर्थ गैरअर्जदारांनी कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. यावरुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास विमा पॉलिसीसोबत अटी व शर्ती दिल्या नव्हत्या असाही निष्कर्ष निघतो. विमा पॉलिसीसोबत अटी व शर्ती न देणे ही सुध्दा सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 13. तक्रारकर्त्याचे वाहन गैरअर्जदाराकडे रु.7,50,000/- करता विमाकृत होते ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते, तसेच अंतिम सर्वेअरच्या अहवालावरुन सुध्दा सदर वाहन हे दुरुस्त होण्याजोगे नव्हते हे स्पष्ट होते. त्यामुळे अंतिम सर्वेअर श्री. गांधी यांनी नष्टशेष शुल्क रु.3,50,000/- ठरविले आहे. मंचाचे असे मत आहे की, विमाकृत मुल्य रु.7,50,000/- मधुन नष्टशेष मुल्य वजा जाता तक्रारकर्ता रु.4,00,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. 14. तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.1,50,000/- ची मागणी केलेली आहे, सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता रु.10,000/- तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.3,000/- मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रु.4,00,000/- विमा दावा दाखल केल्याचे दिनांकानंतर दोन महिने म्हणजेच दि.01.04.2008 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह आदेश पारित झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावी. अन्यथा सदर रकमेवर द.सा.द.शे.12% दराने अतिरिक्त व्याज रक्कम अदा होईपर्यंत देय राहील. 4. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.3,000/- अदा करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |