(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 04 नोव्हेंबर 2016)
1. तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रार थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता हे मय्यत धरमचंद छंगनियाराम शर्मा यांची पत्नी असून तक्रारकर्ता क्रमांक 2 व 3 हे मय्यत धरमचदं शर्मा यांचे मुले आहेत. तक्रारकर्त्याचा टाटा ट्रक रजिस्ट्रेशन क्रमांक CG-04/J-9731 हा मय्यत श्री धरमचंद छंगनियाराम शर्मा याचे नावे होता व सदरच्या ट्रकचे विरुध्दपक्ष यांचेकडून विमा पॉलिसी काढलेली होती. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 ही विमा कंपनी असून विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून काढलेली होती, ज्याचा पॉलिसी क्रमांक 281108/31/09/6300002909 अंतर्गत असून त्याचा कालावधी दिनांक 28.8.2009 ते 27.8.2010 पर्यंतचा होता. तक्रारकर्ती व तिचे मुले यांचा उदरनिर्वाह त्या वाहनावर अवलंबून होता.
2. तक्रारकर्ती पुढे नमूद करते की, दिनांक 15.9.2009 रोजी राञी 10-00 वाजताचे सुमारास जैतूर शिवार, सावनेर-नागपूर रोडवर सारंगीवरुन बुट्टीबोरी कडे मनसर व्हाया जात असतांना सदरील ट्रक हा दुस-या ट्रकच्या पाठोपाठ रस्त्यावरुन धावत असता समोरील ट्रक ड्रायव्हरने आकस्मिक ब्रेक लावले व तक्रारकर्त्याचा ट्रक त्याचे मागे असल्यामुळे चालकाला सुध्दा आकस्मिक ब्रेक लावावा लागला, परिणामी ट्रक ड्रायव्हरच्या उजव्या दिशेने उलटला त्यामुळे त्याचे बरेचशे नुकसान झाले. ट्रक चालकाकडे त्याचा वैध परवाना सुध्दा होता. सदरची बातमी लगेच तक्रारकर्ता क्रमांक 2 यांनी विरुध्दपक्ष यांना कळविली, त्यावरुन मनिष पन्नासे यांनी दिनांक 19.9.2009 रोजी वाहनाचे स्थळनिरिक्षण करुन स्थळ निरिक्षण सर्व्हे रिपोर्ट विरुध्दपक्षाकडे सादर केला. तसेच, श्री एन.ए. चांडक यांना सुध्दा सर्व्हेअर म्हणून नेमण्यात आले होते व त्यांनी पहिला सर्व्हे रिपोर्ट विरुध्दपक्षाकडे सादर केला. तसेच, तक्रारकर्ता यांनी ट्रक दुरुस्तीकरीता येणारा खर्च रुपये 4,13,800/- व लागणारे स्पेअरपार्टचा खर्च रुपये 24,000/- असा एकूण रुपये 4,37,800/- खर्चाचे अंदाजपञक बाबा इंजिनियरींग यांचेकडून घेवून दिनांक 30.11.2009 पूर्वी विरुध्दपक्ष यांचेकडे सादर केला. तक्रारकर्ता यांनी ट्रक दुरुस्ती खर्चाकरीता लागणारे सर्व सामान वेळोवेळी खरेदी करुन एकूण बिल रुपये 2,86,675/- व रुपये 12,150/- चे बिल दिनांक 13.2.2010 रोजी विरुध्दपक्षाचे मौखीक आदेशानुसार त्याचेकडे सादर केले व लागणारे सर्व दस्ताऐवज विरुध्दपक्षाकडे सादर केले. तसेच, दावा पुर्तीकरीता सर्व्हेअरने वाहनाचे पुर्नःनिरिक्षण केले व आता कोणतेही दस्ताऐवज तक्रारकर्ताकडे राहिलेले नव्हते व दावा मंजूर करण्याकरीता कोणत्याही दस्ताऐवजाची पुर्तता राहिली नव्हती.
3. तक्रारकर्ती पुढे नमूद करते की, तक्रारकर्तीचे वाहन हे सिटी बँक यांचेकडून कर्ज काढून घेतले होते, त्यामुळे त्यांनी कर्जाचे हप्ते सुध्दा फेडले होते व ट्रक दुरुस्तीला लागणारा खर्च रुपये 2,86,675/- एवढी मोटी रक्कम सुध्दा जवळून खर्च केली होती, त्यामुळे तक्रारकर्ती विरुध्दपक्ष यांचे वर्धमानस्थित कार्यालयात जावून वारंवार चौकशी केली. विरुध्दपक्ष यांनी मौखीकरित्या सांगितले की, तुमचा दावा मंजूर झाला आहे व तुमचे सेटलमेंट केलेली रक्कम देण्यात येईल.
4. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, तक्रारकर्तीला कोणत्याही प्रकारची माहिती न देता श्री एस.आर.चोपडे, मनिष पन्नासे, विशाल पाटील व अतुल गुजर हे तक्रारकर्तीने सदर वाहन पार्क केलेल्या जागेत आले व ट्रकचे छायाचिञ घेण्यास सुरुवत केली, तेंव्हा तक्रारकर्तीने असे करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही कागदपञ दाखविण्यास नकार दिला व त्यांना विचारणा केली की, तुम्हीं पुन्हा ट्रकचा सर्व्हे कां करीत आहात, त्यावर विरुध्दपक्षा यांनी धमकी देवून म्हटले की, तुम्हीं ग्राहक तक्रार क्रमांक 209/2008 दिनांक 18.4.2009 रोजी मंचाने दिलेल्या आदेशात रुपये 90,000/- विरुध्दपक्षाकडून स्विकारावेत असा आदेश करुन घेतला, त्यामुळे आता तुम्हीं अतिरिक्त दावा पुढे करुन व केल्यास तुमचा सदरचा दावा मंजूर करणार नाही व तुम्हीं तक्रार काढून घेतली नाही तर तुम्हांला जिवे मारु अशी धमकी सुध्दा दिली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 26.3.2010 रोजी जरीपटका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली काढला नाही, करीता वारंवार विरुध्दपक्ष यांचे कार्यालयात जावून विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सरते शेवटी विरुध्दपक्ष यांचे सदरच्या वागण्यामुळे व सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्याला सदरची तक्रार मंचात दाखल करावी लागली. त्यापूर्वी तक्रारकर्त्याने दिनांक 28.3.2010 रोजी विरुध्दपक्ष यांना वकीला मार्फत नोटीस बजावून व नोटीसाचे उत्तर देवून दिनांक 8.8.2010 रोजी विरुध्दपक्ष यांना मय्यत धरमचंद शर्मा यांचे नावे तुमचा दावा अमान्य करण्यात आला आहे, अशाप्रकारचे पञ पाठविण्यात आले आहे. तक्रारकर्ती पुढे नमूद करते की, धरमचंद शर्मा हे दिनांक 13.2.2009 रोजी मरण पावले व पॉलिसी विमा दिनांक 28.8.2009 रोजी त्याच्या सहीचे प्रपोजलवरुन म्हणजेच त्याचे निधनानंतर 6 महिण्यानी करण्यात आला, त्यामुळे तक्रारकर्तीने ही बाब लपविली करीता दावा मंजूर करण्यात आला. तक्रारकर्तीने त्याच्या कार्यालयात जावून माहिती घेतली असता, त्यावर विरुध्दपक्ष यांनी सांगितले की, तुम्हीं विरुध्दपक्षाकडून या पूर्वी सुध्दा ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन आमच्या विरुध्द आदेश घेतला आहे म्हणून तुम्हांला हा दावा कधापि मंजूर करणार नाही. सदरच्या या विरुध्दपक्षाच्या वागण्यामुळे तक्रारकर्तीला अतिशय शारिरिक, मानसिक व आर्थिक ञास झाला ही विरुध्दपक्षाचे सेवेत ञुटी आहे, हे सिध्द होते. करीता तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष यांनी संगनमताने हेतुपुरस्परपणे व पध्दतशीपणे तक्राकर्त्याबरोबर अप्रामाणिक व्यापार क्रीया केली असून तक्रारकर्तीचा दावा मंजूर न करुन तक्रारकर्तीची फसवणूक केली असे मंचाने आदेशीत करावे.
2) तक्रारकर्त्याला गाडी दुरुस्ती करण्याकरीता लागलेला खर्च रुपये 2,86,675/- व त्यावर दिनांक 1.12.2009 पासून 12 टक्के व्याजासह विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीला द्यावे असे आदेशीत व्हावे.
3) तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- द्यावे व त्यावर दिनांक 1.12.2009 पासून 12 टक्के व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास द्यावी.
4) तक्रारकर्त्याचा तक्रारीचा खर्च व नोटीस खर्च असे मिळून रुपये 1,15,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
5. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. तक्रारकर्तीच्या तक्राररीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 यांनी निशाणी क्र.5 वर आपले लेखीउत्तर सादर करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्तीचा पती श्री धरमचंद शर्मा याचे निधन दिनांक 13.2.2009 रोजी झाले, परंतु विमा पॉलिसी दावा हा दिनांक 28.8.2009 रोजी त्याच्या प्रपोजल फॉर्मवर सही करुन म्हणजेच त्याच्या निधनानंतर अवघ्या 6 महिण्यानी करण्यात आला. तक्रारकर्तीने महत्वाच्या बाबी अधिक्रमण/निष्प्रभावन केले किंवा तिने महत्वाची वस्तुस्थिती विरुध्दपक्षापासून लपवून ठेवली त्यामुळे पॉलिसी ही मुळात काढल्या पासून null & voidable आहे. तसेच कमर्शियल व्हेईकल पॅकेजचे अट क्रमांक 10 चे उल्लंघन केले असल्यामुळे तक्रारकर्त्याया दावा अमान्य करण्यात आला. यावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने सदर गाडीचा विमा काढत असतांना विरुध्दपक्षाला संबंधीत ट्रक ज्या व्यक्तीच्या नावाने आहे ती व्यक्ती जवळ-जवळ 6 महिने अगोदर मृत झाले आहे, ही बाब तक्रारकर्तीने विरुध्दपक्षापासून लपवून ठेवली होती. तसेच श्री धरमचंद शर्मा यांचा मृत्युनंतर तक्रारकर्त्याने सदरचा ट्रक ताबडतोब सर्व वारसांचे नाहरकत घेवून एका वारसाचे नावे आर.टी.ओ. कार्यालयात रजिस्टर्ड करावयास हवे होते, परंतु तसे न करता सदर ट्रक मय्यत व्यक्तीच्या नावाने ठेवून आपला व्यवसाय करीता होते व तसेच त्यांनी विरुध्दपक्षाची दिशाभूल करुन मय्यत व्यक्तीच्या नावाने सदर ट्रक बाबतची विमा पॉलिसी काढली, ही बाब अतिशय गंभीर आहे. तसेच, मय्यत व्यक्तीचे नावाने सदरचे वाहन चालवीत आहे, त्यामुळे तक्रारकत्याची तक्रार ही बेकायदेशिर असून ती खारीज होण्यास पाञ आहे व तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या वाहनाचे खर्चाबाबत तपशिल विरुध्दपक्ष नाकबूल करीत आहे व सदर तक्रारकर्ती ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही करीता तक्रारकर्तीची तक्रार रुपये 10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी.
6. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपला लेखी जबाब निशाणी क्र.8 वर दाखल करुन त्यात प्राथमिक आक्षेप घेवून असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीने तिच्या मृतक पतीच्या नावे वाहनाचा विमा काढून विमा कंपनीची फसवणूक केली आहे व तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केले आहे, एवढेच नव्हेतर तक्रारकर्तीने मृतक व्यक्तीचे नावे खोटी सही करुन क्लेम फॉर्म सुध्दा भरला आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे तक्रारकर्ती ही स्वच्छ हाताने न्याय मागण्यासाठी आलेला नाही, त्यामुळे सदरची तक्रार विद्यमान मंचासमोर चालू शकत नाही, करीता तक्रारकर्तीच्या या खोट्या तक्रारीला रुपये 10,000/- दंडासह खारीज करण्यात यावी, बाकी सर्व विरुध्दपक्षावर लावलेले आरोप, प्रत्यारोप व दोषारोपन विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात खोडून काढले व तक्रारकर्ता हा ग्राहक होत नाही, करीता तक्रार खारीज करण्यात यावी असे नमूद केले.
7. तक्रारकर्तीने सदरची तक्रारीबरोबर 1 ते 25 दस्ताऐवज दाखल केलेले असून, त्यात प्रामुख्याने वाहनाचाच्या पॉलिसीची प्रत, घटनास्थळ पंचनामा, बाबा इंजिनियरींग वर्क्स यांचे इस्टीमेटची प्रत, प्रिमिअर मोटर्स बिल, कॅश मेमो, दुरुस्तीसाठी लागेलेल्या खर्चाचे बिल, पोलीस स्टेशनच्या तक्रारीची प्रत, विरुध्दपक्ष यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत व उत्तर इत्यादी दस्ताऐवज दाखल केले आहे.
8. तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आले व मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केला नाही व मौखीक युक्तीवादाकरीता संधी मिळूनही केला नाही. तसेच दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांची ग्राहक होतात : नाही
काय ?
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्तीला सेवेत ञुटी किंवा : नाही
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झाला आहे ही बाब स्पष्ट
होते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
9. तक्रारकर्तीची सदरची तक्रार ही तिच्या टाटा ट्रकचा झालेल्या अपघाताचा विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष यांचेकडून काढली होती व ट्रकच्या दुरुस्तीसाठी लागलेला खर्च हा विमा कंपनीकडून क्लेम दाखल झाल्यानंतर रितसर घेण्याचा होता. परंतु, विरुध्दपक्षाने तो नाकारल्यामुळे सदाची तक्रार तक्रारकर्त्याने मंचात दाखल केली आहे. विरुध्दपक्षाने आपल्या प्राथमिक आक्षेपात ही स्पष्टपणे नमूद केली आहे की, तक्रारकर्तीच्या वाहन हे टाटा ट्रक ज्याचा रजिस्ट्रेशन क्र. CG-04/J-9731 हा तिचे पती श्री धरमचंद छंगनियाराम शर्मा याचे नावाने होता व वाहनाची पॉलिसी ही दिनांक 28.8.2009 ते 27.8.2010 या कालावधीकरीता होती. परंतु, महत्वाची बाब अशी की, तक्रारकर्तीचे पती याचा मृत्यु दिनांक 13.2.2009 रोजी झाला व सदरच्या वाहनाचा अपघात हा दिनांक 15.9.2009 रोजी सावनेर-नागपूर रोडवर झाला व तक्रारकर्तीने विमा दावा हा दिनांक 19.9.2009 रोजी दाखल केला. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तराबरोबर दाखल केलेल्या दस्ताऐवज क्लेम फॉर्मचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दिनांक 27.9.2009 रोजी दाखल क्लेम फॉर्मवर विमा धारक यांची खोटे हस्ताक्षर केलेले दिसून येते, यावरुन ही बाब स्पष्ट होते की, विमा धारक धरमचंद शर्मा यांचा मृत्यु दिनांक 13.2.2009 रोजी झालेला होता, परंतु दिनांक 27.9.2009 रोजी क्लेम फॉर्मवर खोटी सही दिसून येते. महत्वाची बाब व तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचा क्लेम हा मृतक पतीच्या सहीने विरुध्दपक्षाकडे दाखल केला, ही बाब अतिशय गंभीर आहे. तसेच विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात असे म्हटले आहे की, जर पॉलिसी धारकाचा मृत्यु झाल्यानंतर वारसांनी ती बाब ताबडतोब कळविली पाहिजे होती व आवश्यक ती कार्यवाही करुन वारसाचे नांव नोंदविले पाहिजे होते. परंतु तक्रारकर्तीने व तिच्या वारसांने असे कोणतेच पाऊल न उचलता, उलट मृतक व्यक्तीच्या सहीने दावा दाखल केला, ही बाब बेकायदेशिर आहे त्यामुळे पॉलिसी ही मुळातच null & void आहे. त्याचबरोबर पॉलिसीच्या अटी व शर्त क्रमांक 10 चे उल्लंघन झालेले स्पष्ट दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्ती ही विमा दावा मागण्यास पाञ नाही, असे मंचाला वाटते, त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार रुपये 2,000/- खर्चासह खारीज करण्यात येते.
(2) तक्रारकर्तीने खर्चाची रक्कम मंचात जमा करावी.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 04/11/2016