श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 11 नोव्हेंबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे.
1. तक्रारकर्त्याच्या मालकीचे अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया येथे ‘चेतन बुट हाऊस’ नावाने चप्पल जोडयांचे दुकान आहे. सदर दुकानासाठी तक्रारकर्त्याने 2012 साली वि.प.क्र. 2 बँक ऑफ इंडिया, शाखा अर्जूनी मोरगाव, जि. गोंदिया यांच्याकडून रु.60,000/- चे कर्ज घेतले. सदर दुकानासाठी तक्रारकर्त्याने अशोक एजंसी, गोंदिया, सिंध शू मार्ट नागपूर, सिंध बुट हाऊस गोंदिया व ओम फुटवेअर चंद्रपूर, एस.के.बुट हाऊस अर्जूनी मोरगाव, जि. गोंदिया या होलसेल विक्रेत्यांकडून अंदाजे साडे तीन ते चार लाख रुपयांचे चप्पल, जोडे व इतर साहित्य घेऊन दुकान थाटले.
दुकानातील माल, फर्निचर इ. चे चोरी, घरफोडी व आगीमुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्त्याच्या वतीने वि.प.क्र. 2 ने वि.प.क्र. 1 नॅशनल इंशुरन्स क.लिमि., शाखा भंडारा यांच्याकडे रु.320/- प्रव्याजी देऊन 17.10.2012 ते 16.10.2013 या कालावधीसाठी पॉलिसी क्र. 28/303/48/12/980000/230 अन्वये रु.1,00,000/- चा विमा काढला आणि मुळ विमा पॉलिसी स्वतःकडे ठेऊन झेरॉक्स प्रत तक्रारकर्त्यास दिली.
वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याच्या दुकानाचा विमा काढतांना आवश्यक असलेली माहिती वि.प.क्र.1 ला दिली. मात्र अर्जदाराच्या दुकानाचे नाव चेतन बुट हाऊस ऐवजी चुकीने एस.के.बुट हाऊस असे दिले आणि प्रोप्रायटर म्हणून तक्रारकर्ता नंदेश्वर शंकर खोब्रागडे यांचे नांव नमूद केले. तक्रारकर्ता प्रत्यक्षात ‘एस.के.बुट हाऊस’चा मालक नसून ‘चेतन बुट हाऊस’चा प्रोप्रायटर आहे.
दि.19.11.2012 रोजी तक्रारकर्त्याच्या दुकानाला अचानक आग लागून दुकानातील चप्पल जोडयांचा साठा व इतर साहित्य जळून तक्रारकर्त्याचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची फिर्याद पो.स्टे. अर्जूनी मोरगाव येथे देण्यांत आली आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला.
तक्रारकर्त्याने सदर आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती वि.प.क्र. 1 व 2 ला दिली. वि.प.क्र. 1 चे सर्व्हेयर संतोष कुळकर्णी यांनी दि.23.11.2012 रोजी तक्रारकर्त्याच्या दुकानाची पाहणी केली व तक्रारकर्त्याचे व साक्षीदारांचे बयान नोंदविले आणि तक्रारकर्त्याकडून इतर दस्तऐवज प्राप्त करुन वि.प.क्र. 1 कडे जमा केले. मात्र वि.प.क्र. 1 ने आजपर्यंत अर्जदाराच्या नुकसान भरपाईपोटी विमा दावा मंजूर केला नाही आणि टाळाटाळीचे उत्तर दिले.
तक्रारकर्त्याने दि.23.09.2013 रोजी वि.प.क्र. 1 व 2 यांना अधिवक्ता श्री. अवचटे यांचेमार्फत नोटीस पाठविली. मात्र सदर नोटीसला वि.प.क्र. 1 व 2 यांनी खेटे व टाळाटाळीचे उत्तर देऊन वि.प.क्र. 2 च्या चुकीमुळे विमा दावा मान्य करता येत नाही असे कळविले. तक्रारकर्त्याकडून विमा प्रव्याजी घेऊनही विमा दावा नाकारण्याची वि.प.क्र. 1 व 2 ची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, म्हणून सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- विमा पॉलिसी क्र. 28/303/48/12/980000/230 प्रमाणे विम्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रारकर्त्यस देण्याचा वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द आदेश व्हावा.
- सदर विमा रकमेवर विमा दावा दाखल केल्याच्या तारखेपासून (दि.23.11.2012) पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज मिळावे.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रार खर्च रु.10,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत पॉलिसीची प्रत, वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यास दिलेले पत्र, सर्व्हेयरचा चौकशी अहवाल, पोलिसांनी केलेला घटनास्थळ पंचनामा, जळालेल्या सामानाची यादी, अर्जदाराने विविध होलसेल विक्रेत्यांकडून चप्पल, बुट व इतर वस्तू खरेदी केल्याबाबतची बिले, वि.प.ला पाठविलेला नोटीस व त्याचे उत्तर, पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांनी स्वतंत्र लेखी जवाब दाखल करुन तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 बँक ऑफ इंडिया, शाखा अर्जूनी मोरगाव कडून चेतन बुट हाऊससाठी रु.60,000/- चे कर्ज घेतले व वि.प.क्र. 2 ने ‘चेतन बुट हाऊस’ च्या नावाने वि.प.क्र. 1 कडे प्रव्याजी भरुन रु.1,00,000/- विमा काढल्याचे नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी एस.के.बुट हाऊसच्या नावाने घेतली आहे. तक्रारकर्त्याने सादर केलेले कागदपत्र व वृत्तपत्रातील बातमीवरुन आग चेतन बुट हाऊस या दुकानास लागली होती. तक्रारकर्त्याकडून आगीच्या घटनेची माहिती प्राप्त होताच वि.प.ने नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी सर्व्हेयरची नियुक्ती केली होती. सर्व्हेयरने मोक्यावरील वस्तुस्थितीप्रमाणे वि.प.क्र. 1 कडे अहवाल सादर केला आहे. तक्रारकर्त्याने मंचाची दिशाभूल करुन खोटी तक्रार दाखल केली आहे.
विशेष जवाबाबत वि.प.क्र. 1 ने म्हटले आहे कि, सर्व्हेयर संतोष कुळकर्णी यांनी दि.30.01.2013 रोजी सादर केलेल्या अहवालाप्रमाणे आग मे. चेतन बुट हाऊसला लागलेली होती. परंतू पॉलिसी एस. के. बुट हाऊसच्या नावाने काढली होती व त्या दुकानाला आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते. त्यामुळे वि.प.क्र. 1 ने विमित नसल्याने चेतन बुट हाऊसला लागलेल्या आगीबाबत विमा दावा नामंजूर करण्याची कृती पूर्णतः कायदेशीर असून त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने दाखल केलेली खोटी तक्रार रु.15,000/- खर्च बसवून खारीज करण्याची विनंती केली आहे.
3. वि.प.क्र. 2 बँक ऑफ इंडिया, शाखा अर्जूनी मोरगाव यांनी स्वतंत्र लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याने अर्जूनी/मोरगाव येथील चप्पल जोडे दुकानाकरीता त्यांचेकडून रु.60,000/- चे कर्ज घेतले असल्याचे व सदर दुकानाकरीता त्यांचेकडून रु.1,00,000/- चा विमा दि.17.10.2013 रोजी वि.प.क्र. 1 कडे उतरविला अल्याचे आणि त्याची विमा प्रव्याजी तक्रारकर्ता नंदेश्वर शंकर खोब्रागडे याच्या वैयक्तीक खात्यास नावे टाकून ती वि.प.क्र. 1 कडे भरणा केल्याचे मान्य केले आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने कर्ज मागणी अर्जासोबत एस. के. बुट हाऊस व इतर दुकानांचे चप्पल जोडयांचे कोटेशन जोडले होते. पॉलिसी काढतांना कोटेशन असलेल्या एस.के.बुट हाऊसचे नांव चुकीचे नमूद करण्यांत आले मात्र प्रोप्रा. म्हणून तक्रारकर्ता नंदेश्वर शंकर खोब्रागडे असेच नमूद केले आहे. तक्रारकर्त्याला वैयक्तीक नावाने कर्ज देण्यांत आले होते व दुकानाचे नाव तक्रारकर्त्याने दिलेले नव्हते.
तक्रारकर्त्याचे दुकान आगीत जळून झालेल्या नुकसानीची विमा कंपनीकडून चौकशी करण्यांत आली, त्यावेळी दुकानाच्या नावातील चुक लक्षात आली. वि.प.क्र. 2 ने त्याबाबत वि.प.क्र. 1 शी दि.16.03.2013 व 17.05.2013 रोजी पत्र व्यवहार करुन एस.के.बुट हाऊसच्या नावाने तक्रारकर्त्यास कर्ज देण्यांत आले नसल्याने एस.के.बुट हाऊसचे नाव विमा पॉलिसीत चुकीने आले असून तक्रारकर्त्याचा वैयक्तिक नावाने कर्ज दिले असल्याने त्याच्या दुकानाचे नांव विमा पॉलिसीसाठी ग्राह्य धरण्याची गरज नसल्याने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर करण्याची विनंती केली. परंतू वि.प.क्र. 1 ने सदर विनंती मानली नाही.
वि.प.क्र. 2 ने विमा दावा मिळावा म्हणून तक्रारकर्त्यास सर्वतोपरी मदत केली आहे, परंतू वि.प.क्र. 1 विमा पॉलिसीची रक्कम देण्यांस हेतूपुरस्सर टाळाटाळी करीत आहे. विमा प्रव्याजीची रक्कम वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 2 मार्फत तक्रारकर्त्याच्या वैयक्तिक खात्यातून घेतली असल्याने पॉलिसीप्रमाणे विम्याची रक्कम देण्यांस वि.प.क्र. 1 संपूर्णपणे जबाबदार आहे. सदर प्रकरणात वि.प.क्र. 2 कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने त्यांचेविरुध्दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
4. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय अंशतः.
3) अंतिम आदेश अंशतः मंजूर.
- का र ण मि मां सा -
5. मुद्दा क्र. 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीची प्रत दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केली आहे. त्याप्रमाणे एस. के. बुट हाऊसचा रु.1,00,000/- विमा दि.17.10.2012 ते 16.10.2013 या कालावधीसाठी रु.320/- देऊन बँक ऑफ इंडिया, अर्जूनी मोरगाव मार्फत नुतनीकृत केला होता. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यास बूट हाऊससाठी कर्ज दिले असल्याने दुकानातील माल सदर कर्जासाठी नजरतारण होता व तशी नोंद पॉलिसीमध्ये आहे. तक्रारकर्त्याच्या वतीने वि.प.क्र. 2 ने दिलेल्या कर्जाच्या सुरक्षेसाठी सदर विमा काढला आणि विमा प्रव्याजीची रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यास नावे टाकून वसूल केली आहे. म्हणजे सदर पॉलिसीबाबतची माहिती वि.प.क्र. 2 ने वि.प.क्र. 1 ला पुरविली आहे. वि.प.क्र. 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने त्याच्या दुकानाचे नांव कर्ज मागणी अर्जात दिले नव्हते. मात्र एस. के. बुट हाऊस, अर्जुनी/मोरगांवचे कोटेशन दिले होते. सदरचे कर्ज हे तक्रारकर्ता नंदेश्वर शंकर खोब्रागडे यांस वैयक्तिक नावाने दिले असल्याने एस. के. बुट हाऊसचा सदर कर्ज व्यवहार व विमा पॉलिसीशी कोणताही संबंध नाही. तक्रारकर्त्याचे दुकान चेतन बुट हाऊस आगीत जळाल्याने त्यास विमा पॉलिसीची रक्कम मिळणे आवश्यक आहे.
तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 2 प्रमाणे कर्ज मंजूरी पत्राची प्रत दाखल केली आहे. त्याप्रमाणे नंदेश्वर शंकर खोब्रागडे यांना रु.60,000/- चे कर्ज बुट हाऊससाठी मंजूर केले असून सदर कर्ज एस.के.बुट हाऊससाठी असल्याला कोणताही उल्लेख नाही. तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 4 प्रमाणे घटनास्थळ पंचनाम्याची प्रत दाखल केली आहे. त्याप्रमाणे दि.19.11.2012 चे रात्री 8.00 ते 9.00 वा.चे सुमारास तक्रारकर्त्याच्या चेतन बुट हाऊसला आग लागल्याबाबत तक्रारकर्त्याच्या फिर्यादीवरुन सान्हा क्र. 30/12 दि.19.11.2012 चे 23.15 वा. नोंद घेऊन पो.स्टे. अर्जूनी/मोरगांव येथे अकस्मात जळीत रजि. क्र. 03/12 प्रमाणे दि.19.11.2012 चे 23.20 वा. नोंद घेण्यांत आल्याचे व दि.20.11.2012 रोजी घटनास्थळ पंचनामा केला तेव्हा स्विच बोर्ड, वायरिंग व चप्पल जोडे जळालेले आढळून आल्याचे आणि तक्रारकर्त्याने रु.4,00,000/- चे नुकसान झाल्याचे चौकशी अधिका-यास सांगितल्याचे नमुद आहे. जळालेल्या चप्पल जोडे व इतर सामानाची यादी दस्तऐवज क्र. 5 वर दाखल केली आहे. त्याप्रमाणे रु.1,23,855/- चा माल जळून नुकसान झाल्याचे दर्शविले आहे. तसेच माल खरेदीचे बिल्सदेखिल तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 6 वर दाखल केले आहेत. दैनिक लोकमतमध्ये दि.21.09.2012 रोजी चेतन बुट हाऊस शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 4 लाख रुपयाचा माल जळाल्याची बातमी दस्तऐवज क्र. 10 वर आहे.
वि.प.ने 1 वर्षापासून विमा दावा मंजूर केला नाही म्हणून तक्रारकर्त्याने अधिवक्ता बा.गो.अवचटे यांचेमार्फत दि.23.09.2013 रोजी दिलेल्या नोटीसची प्रत दस्तऐवज क्र. 11 वर आहे. सदर नोटीसला वि.प.क्र. 1 ने अधिवक्ता सुषमा सिंग मार्फत दि.03.10.2013 रोजी दिलेले उत्तर दस्तऐवज क्र. 12 वर आहे. त्यांत तक्रारकर्ता नंदेश्वर खोब्रागडे यांनी काढलेला विमा मे. एस. के. बुट हाउसचा असल्याने व त्या दुकानाचे आगीत कोणतेही नुकसान झाले नसल्याने विमित नसलेल्या चेतन बुट हाऊसचे आगीमुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणताही विमा देण्यास वि.प.क्र. 1 जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.
वि.प.क्र.2 ने तक्रारकर्त्याच्या नोटीसला दि.23.10.2013 रोजी अधिवक्ता गौरीशंकर अवचटे यांचेमार्फत पाठविलेले उत्तर दस्तऐवज क्र. 13 वर आहे. त्यांत म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने बँकेकडून रु.60,000/- चे वैयक्तिक कर्ज बुट हाऊससाठी घेतले होते. कर्ज मागणी अर्जासोबत एस.के.बुट हाऊसचे कोटेशन जोडले होते. वि.प.क्र. 2 कडून वि.प.क्र.. 1 कडे विमा काढतांना कोटेशन बिलावरील एस.के.बुट हाऊसच्या नावाची माहिती चुकीने देण्यांत आली. तक्रारकर्त्याच्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची सखोल चौकशी सर्व्हेयरने केली. मात्र वि.प.क्र. 1 ने विमा दावा न देता दुकानाच्या नावातील फरकाचा मुद्दा उपस्थित केला. वि.प.क्र. 2 ने दि.16.03.2013 व 17.05.2013 रोजी वि.प.क्र. 1 ला पत्र पाठवून विमा काढतांना एस.के.बुट हाऊसचे नांव चुकीने दर्शविण्यांत आल्याचे व कर्ज वैयक्तिक असल्याने दूकानाचे नावाचा विचार न करता विमित व्यक्तीचा विमा दावा मंजूरीची विनंती केली. मात्र वि.प.क्र. 1 ने तो मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याचे नमूद केले आहे. उपरोल्लेखित पत्रांच्या प्रतीदेखिल वि.प.क्र. 2 ने दाखल केलेल्या आहेत.
वि.प.क्र. 2 ने दि.16.03.2013 च्या पत्रात नमूद केले आहे कि, ‘‘बँक रेकॉर्डके हिसाबसे श्री.नंदेश्वर शंकर खोब्रागडे इनको चप्पल जूता व्यवसायके लिए लोन दिया गया था| इनका दुकान अर्जूनी/मोरगांव यहापर है| 19.11.2012 को दुकानमे आग लगनेसे नुकसान हुआ है| बादमे पता चला कि, पॉलिसी S.K.Boot House के नामसे बना हुआ है| S.K.Boot House के नामसे पॉलिसी गलतीसे बनाया गया है जबकी पॉलिसी श्री. नंदेश्वर शंकर खोब्रागडे, अर्जूनी/ मोरगाव के नामसे होना था| कृपया क्लेम मिलनेसंबंधी उचित कार्यवाही करनेकि कृपा करे|’’
दि.17.05.2013 च्या पत्रात तर स्पष्टपणे म्हटले आहे की, एस.के.बुट हाऊसचे कोटेशन तक्रारकर्त्याच्या कर्ज फाईलमध्ये होते. त्यामुळे नजर चुकीने ते नांव विमा प्रस्तावात दर्शविले गेले.
वि.प.ने सर्व्हेयर संतोष कुळकर्णी यांनी तक्रारकर्त्याच्या दुकानास लागलेल्या आगीबाबत झालेल्या सर्व्हेचा दि.30.01.2013 चा अहवाल दाखल केला आहे. त्यांत
पॉलिसीधारक – मे.एस.के.बुट हाऊस, प्रोप्रा. नंदेश्वर शंकर खोब्रागडे असे नमूद आहे.
सर्व्हेयरने नमूद केले आहे कि, तक्रारकर्ता नंदेश्वर शंकर खोब्रागडेचे दुकान मे.एस.के.बुट हाऊस अर्जूनी मोरगांव येथे 17 वर्षापासून आहे.
त्यांनी एक वर्षापूर्वी दुस-या इमारतीतील चेतन बुट हाऊस नावाने स्वतंत्र दुकान सुरु केले आहे. सदरचे दुकान एकनाथ शंकर खोब्रागडे आणि विश्वनाथ शंकर खोब्रागडे हे चालवितात. दि.19.11.2012 रोजी दुकानास आग लागल्याबाबत आणि चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याबाबत नंदकीशोर खोब्रागडे यांनी पो. स्टे. अर्जूनी मोरगांव येथे रीपोर्ट दिला. सर्व्हेयरने दि.23.11.2012 रोजी तक्रारकर्त्याच्या दुकानास भेट दिली तेंव्हा तक्रारकर्ता हजर होता. आगीत जळालेले दुकान मे. चेतन बुट हाऊस होते व ते एकनाथ आणि विश्वनाथ खोब्रागडेचे होते. एस. के. बुट हाऊस या दुकानाचा विमा काढला होता व त्या दुकानाचे कोणतेही नुकसान झाले नव्हते. सदरची आग इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे लागली होती.
सर्व प्रकारच्या वजावटी करुन दुकानातील स्टॉकचे मुल्यांकन रु.2,19,000/- दर्शवून तक्रारकर्त्याने केवळ रु.1,00,000/- चा विमा काढल्याने under insurance मुळे नुकसानीचे मुल्यांकन रु.85,000/- ठरविले आहे.
मात्र मे. चेतन बुट हाऊसचा आगीचा विमा काढला नसल्याने सदर नुकसानीबाबत विमा दावा देय नसल्याचे अहवालात नमुद केले आहे.
उभय पक्षांनी दाखल दस्तऐवजांचा विचार करता असे दिसून येते की, एस.के.बुट हाऊस हे दुकान 17 वर्षापासून अस्तित्वात आहे आणि शंकर खोब्रागडे हे त्या दुकानाचे मालक आहेत. याउलट चेतन बुट हाऊस हे दुकान आगीच्या घटनेच्या 1 वर्षाआधी सुरु झालेले आहे. तक्रारकर्ता नंदेश्वर याचे म्हणण्याप्रमाणे त्याने वि.प.क्र. 2 बँक ऑफ इंडियाकडून रु.60,000/- कर्ज घेऊन ते स्वतंत्रपणे सुरु केले. यांस वि.प.क्र. 2 ने देखिल दुजोरा दिला आहे. कर्ज मंजूरीपत्रात कर्जदार म्हणून नंदेश्वर शंकर खोब्रागडेचे नांव आहे आणि कर्जाचा हेतू बुट हाऊससाठी नमुद आहे. त्यांत एस.के.बुट हाऊसचे नाव नाही. मात्र तक्रारकर्त्याने एस.के.बुट हाऊसचे कोटेशन दिले होते व विमा काढतांना माहिती देत असता वि.प.क्र. 2 ने नजर चुकीने सदर कोटेशनवरील दुकानाचे नांव तक्रारकर्त्याच्या दुकानाचे नांव समजून वि.प.ला माहिती दिली. परंतु कर्ज एस.के.बुट हाऊसला नव्हे तर नंदेश्वर शंकर खोब्रागडे यांना दिले होते व त्यांच्याच नावाने विमा काढला होता व विमा प्रव्याजी त्यांच्या खात्यास नावे टाकून वसूल केल्याने तक्रारकर्त्याच्या आगीत जळालेल्या चेतन बुट हाऊसचा विमा दावा मंजूर करावा अशी विनंती वि.प.क्र. 2 ने केलेली आहे.
सर्व्हेयरने मात्र एस.के.बुट हाऊस हे दुकान तक्रारकर्त्याच्या मालकीचे असून त्याचा विमा बँकेने काढला होता आणि आगीमुळे सदर दुकानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याने विमा दावा देय नसल्याचा अभिप्राय दिल्यावरुन वि.प.क्र. 1 ने वरील कारण देऊन तक्राकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला आहे. चेतन बुट हाऊस हे दुकान तक्रारकर्त्याचे नसून त्याचे अन्य दोन भाऊ एकनाथ व विश्वनाथ खोब्रागडे यांच्या मालकीचे असल्याबाबत सर्व्हेयरने सदर दोन भावांचे बयान अगर अन्य पुरावा दाखल केलेला नाही.
वरील वस्तुस्थिती विचारात घेता एस.के.बुट हाऊस हे दुकान शंकर खोब्रागडेचे असून तक्रारकर्त्याने घटनेच्या 1 वर्षाआधी वि.प.क्र. 2 कडून कर्ज घेऊन चेतन बुट हाऊसचे दुकान सुरु केल्याने दिलेल्या कर्जासाठी बँकेने तक्रारकर्त्याच्याच दुकानाचा विमा काढावयाचा हेतू असतांना कर्ज मंजूरीच्या फाईलमध्ये एस.के.बुट हाऊसचे कोटेशन असल्याने नजर चुकीने तक्रारकर्त्याच्या दुकानाचे नांव एस.के.बुट हाऊस नमुद केले असले तरी विमा प्रत्यक्षात तक्रारकर्त्याच्या नव्याने सुरु केलेल्या दुकानाचाच काढला असल्याने त्या दुकानाचे आगीत झालेल्या नुकसानीबाबत विमा दावा देण्याची वि.प.क्र. 1 ची जबाबदारी आहे मात्र नावातील चुकीमुळे विमा दावा नामंजूर करणे ही निश्चितच सेवेतील न्युनता आहे.
वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याच्या चेतन बुट हाऊसला भेट देऊन देय नुकसानीचे मुल्यांकन रु.85,000/- इतके दर्शविले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता किमान रु.85,000/- इतक्या रकमेचा विमा दावा मिळण्यास पात्र आहे. तसेच सदर रकमेवर वि.प.क्र. 1 ने दि.03.10.2013 च्या नोटीस उत्तराने विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे.
याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्यास देखिल तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम रु.85,000/- दि.03.10.2013 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
2) शारिरीक, व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.5,000/- वि.प.क्र.1 ने तक्रारकर्त्यास द्यावा.
3) वि.प.क्र.1 ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
4) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.