श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 13 जानेवारी, 2017)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे.
1. तक्रारकर्ता क्र. 2 आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आपल्या गरजू सभासदांना कर्ज देण्याचा व्यवसाय करते. कर्जदार ग्राहकाचा अकस्मात मृत्यु झाल्यास सभासदाच्या वारसानांचा कर्जाचा भार सुसह्य व्हावा म्हणून सदर संस्थेने वि.प. नॅशनल इंशुरंस कंपनी लिमि. यांचेकडून 18 कर्जदार सभासदांचा प्रत्येकी रु.50,000/- चा अपघात विमा दि.26.03.2009 ते 25.03.2014 या कालावधीसाठी पॉलिसी क्र. 28/303/47/08/960000/357 अन्वये काढला होता व एकत्र रु.9,00,000/- च्या विम्यासाठी रु.2,160/- प्रव्याजी वि.प.ला दिली होती. तक्रारकर्ता क्र. 1 आशिषचे वडील राजेंद्र सुर्यभान शामकुंवर यांनीदेखिल तक्रारकर्ता क्र. 2 संस्थेकडून दि.11.09.2000 रोजी रु.15,000/- चे कर्ज घेतले असल्याने वरील पॉलिसी अंतर्गत त्यांचाही रु.50,000/- चा अपघात विमा काढला होता.
दि.05.05.2013 रोजी तक्रारकर्त्याचे वडीलांचा मौजा परसोडी, पो.स्टे.जवाहरनगर, जि. भंडारा येथे अपघात होऊन त्यांत त्यांचे निधन झाले. तक्रारकर्त्याने दि.04.09.2013 रोजी प्रथम सुचना रीपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा, मृत्युचा दाखला इ. आवश्यक दस्तऐवजांसह तक्रारकर्त्याने वि.प.कडे विमा दावा दाखल केला. वि.प.ने दि.03.04.2014 रोजी तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तऐवज दाखल केले नाही असे खोटे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्त्यांनी अधिवक्ता श्री. कैलास भुरे यांचेमार्फत दि. 13 जून, 2014 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून रु.50,000/- विमा रकमेची मागणी केली. वि.प.ला सदर नोटीस दि.16.06.2014 रोजी प्राप्त होऊनही पूर्तता केली नाही. वि.प.ची सदर कृती सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- वि.प.ने तक्रारकर्त्यांना विमा दाव्याची रक्कम रु.50,000/- देण्याचा आदेश व्हावा.
- मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी.
- नोटीसचा खर्च रु.1,200/- मिळावा.
- तक्रार खर्च रु.15,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ मोटार वाहनाची पॉलिसी, मेडीकल प्रमाणपत्र, पॉलिसी, कर्ज घेतलेल्यांची विमा यादी, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मृत्युचा दाखला, मेडीकलची पावती, पोस्ट मॉर्टेम रीपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, प्रमाणपत्र, प्रेत ताब्यात मिळाल्याच्या पावत्या, विमा पावती, नोटीस, पोचपावती, ठरावाची प्रत, आधार कार्ड व मतदान कार्ड यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.ने लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे वि.प.क्र. 1 ने मृतक राजेंद्र शामकुंवर यांचा रु.50,000/- अपघात विमा काढल्याचे कबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, घटनेच्या वेळी मृतक (विमित व्यक्ती) राजेंद्र सुर्यभान शामकुंवर हा मोटार सायकल चालवित असतांना अज्ञात वाहनाने त्यांस धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन मरण पावल्याचे पोलिस चौकशीतील दस्तऐवजांसह दिसून येते. विमित व्यक्ती मोटार सायकल चालवित असतांना झालेल्या अपघातात मरण पावल्यामुळे विमा दावा मंजूरीसाठी मरण पावलेल्यामुळे विमित व्यक्तीचा वैध वाहन चालक परवाना सादर करणे पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे अनिवार्य आहे. वि.प.ने अनेकवेळा विनंती करुनही तक्रारकर्त्यांनी मृतक राजेंद्रचा वैध वाहन चालक परवाना सादर केलेला नाही. मृतकाच्या अनिवार्य असलेल्या वैध वाहन चालक परवान्याअभावी विमा दावा मंजूर करणे पॉलिसीच्या अटी व नियमाप्रमाणे शक्य नसल्याने तक्रारकर्त्याचा विमा दावा बंद करणे वि.प.ला भाग पडले. जर आताही तक्रारकर्त्याने मृतक राजेंद्रचा वैध वाहन चालक परवाना सादर केला तर नियमाप्रमाणे विमा दावा मंजूर करण्यास वि.प. तयार आहे. वरीलप्रमाणे विमा दावा बंद करण्याची वि.प.ची कृती विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीस अनुसरुनच असल्याने त्याद्वारे वि.प.कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नाही, म्हणून तक्रार खरिज करावी.
3. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय होय.
3) अंतिम आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
- का र ण मि मां सा -
4. मुद्दा क्र. 1 बाबत - सदर प्रकरणात तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील मृतक राजेंद्र शामकुंवर हे वि.प.क्र. 2 आदर्श नागरी सह.पतसंस्था भंडाराचे कर्जदार सभासद होते व त्यांच्यासह इतर 17 कर्जदार सभासदांची अपघात विमा पॉलिसी तक्रारकर्ता क्र. 2 ने वि.प. नॅशनल इंशूरंस कंपनी शाखा भंडारा यांचेकडे 26.03.2009 ते 25.03.2014 या कालावधीसाठी पॉलिसी क्र. 28/303/47/08/960000/357 अन्वये काढली होती व सदर पॉलिसीप्रमाणे तक्रारकर्त्याच्या वडीलांसह इतर 17 सभासदांना प्रत्येकी रु.50,000/- चे अपघात विमा संरक्षण देण्यांत आले होते ही बाब उभय पक्षांना मान्य आहे. पॉलिसी प्रव्याजी रु.2,160/- स्विकारुन 18 सदस्यांना एकूण रु.9,00,000/- चे विमा संरक्षण दिल्याबाबत पॉलिसी शेड्युल आणि 18 सभासदांची यादी तक्रारकर्त्यांनी दाखल केली आहे.
वरील पॉलिसी कालावधीत दि.05.05.2013 रोजी तक्रारकर्त्याचे वडील राजेंद्र हे ग्राम परसोडी, पो.स्टे. जवाहरनगर, ता. व जि. भंडारा येथे रस्त्याने मोटार सायकलने जात असता अज्ञात वाहन चालकाने त्याचे वाहन निष्काळजी व हयगयीने चालवून त्यांना धडक दिल्याने गंभीर जखमी झाले याबाबत पोलिस नायक प्रमोद गभणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द पो.स्टे. जवाहरनगर येथे भा.दं.वि.चे कलम 279, 338 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम 184, 134 अन्वये अपराध क्र. 43/2013 नोंदविण्यांत आला. जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला. त्याबाबत प्रथम खबरी आणि घटनास्थळ पंचनाम्याची प्रत तक्रारकर्त्याने दाखल केली आहे.
जखमी राजेंद्र यांस उपचारासाठी शासकीय मेडीकल कॉलेज हॉस्पिटल, नागपूर येथे नेले असता तो दि.06.05.2013 रोजी मरण पावला. त्याचे शवविच्छेदन मेडीकल कॉलेज हॉस्पिटल, नागपूर येथे दि.06.05.2013 रोजी करण्यांत आले. शवविच्छेदन अहवालाची प्रत तक्रारकर्त्याने दाखल केली आहे. त्यांत मृत्युचे कारण रस्ते अपघातात डोक्यात गंभीर इजा असे नमूद आहे. नागपूर महानगर पालिकेने दिलेला मृत्युचा दाखला प्रकरणांत दाखल आहे. त्यांचा राजेंद्रचा दि.06.05.2013 रोजी मृत्यु झाल्याचे नमूद आहे. इन्क्वेस्ट पंचनामादेखिल दाखल केला आहे.
वरील दस्तऐवजांवरुन तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील राजेंद्र शामकुंवर यांचा रु.50,000/- चा अपघात विमा तक्रारकर्ता क्र. 2 कर्ज रकमेच्या सुरक्षेसाठी वि.प.कडे काढला होता व सदर विमाकाळात दि.05.025.2013 रोजी झालेल्या अपघातातील गंभीर दुखापतीमुळे राजेंद्र शामकुंवरचा दि.06.05.2013 रोजी मेडीकल कॉलेज हॉस्पिटल नागपूर येथे म,त्यु झाल्याचे सिध्द होते.
तक्रारकर्त्यांनी राजेंद्रच्या अपघाती मृत्युबाबत विमा दाव्याची रक्कम रु.50,000/- मिळावी म्हणून वि.प.कडे वरील सर्व दस्तऐवजांसह दि.04.09.2013 रोजी विमा दावा दाखल केला, त्याची प्रत प्रकरणांत दाखल आहे.
राजेंद्र शामकुवारचा अपघात हा मोटार सायकल चालवित असतांना झाला परंतू घटनेच्या वेळी त्याच्याकडे वैध वाहन चालक परवाना असल्याबाबत परवान्याची प्रत मागणी करुनही तक्रारकर्त्यांनी सादर केली नाही. म्हणून वि.प.ने तक्रारकर्त्यांचा विमा दावा दि.03.04.2014 च्या पत्राप्रमाणे बंद केल्याचे कळविले. सदर पत्राची प्रत वि.प.ने दाखल केली आहे व ती वि.प.ला मान्य आहे.
पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे विमित व्यक्तीचा वाहन चालवित असतांना दुस-या वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून विकमत व्यक्तीच्या वाहनास धडक दिल्याने मृत्यु झाला तर विमा दावा मंजूरीसाठी विमित व्यक्तीच्या वाहन चालक परवान्याची प्रत दाखल करणे आवश्यक अट आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी वि.प. विमा कंपनीची आहे.
तक्रारकर्त्यास वि.प.ने पुरविलेलया पॉलिसी शेड्युलची प्रत तक्रारकर्त्यांनी प्रकरणांत दाखल केली आहे. त्यासोबत वि.प.ने कोणत्याही अटी व शर्ती तक्रारकर्त्यास पुरविलेलया नाहीत किंवा मंचासमोर देखिल दाखल केलेल्या नाहीत म्हणून अशा पॉलिसीच्या अटीअभावी विमित व्यक्ती राजेंद्र हा अपघाताचे वेळी मोटार सायकल चालवित असल्यामुळे अपघात दावा मंजूर करण्यासाठी त्याचा मोटार वाहन चालक परवाना सादर करणे अनिवार्य आहे या वि.प.च्या म्हणण्याला कोणताही कायदेशीर आधार नाही.
यासंबंधाने मा. महाराष्ट्र राज्य आयोगाचा खालील न्याय निर्णयातील अभिप्राय विचारात घेणे फायदेशीर होईल.
|
|
First Appeal No. A/10/947 | (Arisen out of Order Dated 26/02/2010 in Case No. 362/09 of District Kolhapur) |
| | ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO LTD Versus RANGRAO KESHAV PATIL “4.......................Moreover, possession of license while driving the motor cycle in Group Insurance policy like the one under which claim has arisen does not specify such a condition. Moreover, this Commission has already taken a view that in such Group Insurance Policies which extend cover to large number of insured, license is not at all a necessary condition to settle the insurance claim. The District Forum has appreciated all the evidence placed on record after hearing both the parties and decided the case by allowing the consumer complaint. “ | |
| | | | | | | |
|
|
वरील न्यायनिर्णयांत मा. महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, जर गट विम्याच्या अटी व शर्तीप्रमाणे मोटार वाहन चालवितांना अपघात झाल्यास विमा दावा मंजूरीसाठी विमाकृत व्यक्तीचा वाहन चालक परवाना सादर करण्याची अनिवार्य अट स्पष्टपणे नमूद नसेल तर तक्रारकर्त्याने मृतक विमित व्यक्तीचा वैध वाहन चालक परवाना दाखल केला नाही म्हणून तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूरीची कृती असमर्थनिय असून ती विमा लाभार्थ्याप्रती सेवेतील न्यूनता या सदरात मोडणारी आहे.
वरील न्याय निर्णयातील वस्तुस्थिती मंचासमोरील प्रकरणातील वस्तुस्थितीशी तंतोतंत मिळती जूळती आहे म्हणून मा. महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण आयोगाचे वरील निर्णयाप्रमाणेच मोटार वाहन चालक परवाना सादर करण्याची पॉलिसीत कोणतीही अट नसतांना तो सादर केला नाही असे कारण देऊन तक्रारकर्त्याचा वाजवी विमा दावा नामंजूरीची वि.प. विमा कंपनीची कृती सेवेतील न्युनता आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे पॉलिसीमध्ये मृतकाचा वाहन चालक परवाना दाखल करण्याची कोणतीही अट नसतांना सदर कारणांवरुन तक्रारकर्त्याचा विमा दावा वि.प.ने नामंजूर केला आहे. सदरची बाब सेवेतील न्युनता असल्याने विमा दाव्याची देय रक्कम रु.50,000/- विमा दावा नामंजूरीच्या तारखेपासून म्हणजे दि.03.04.2014 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहेत. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल.
सदर प्रकरणांतील मृतक राजेंद्र शामकुंवर हा तक्रारकर्ता क्र. 2 संस्थेचा कर्जदार सभासद होता आणि कर्ज फेडीच्या सुरक्षेसाठी संस्थेने त्याची अपघात विमा पॉलिसी काढली होती. राजेंद्र याच्या मृत्युमुळे तक्रारकर्ता क्र. 2 यांची राजेंद्रकडे असलेली कर्जाची थकबाकी मिळणा-या विमा रकमेतून वसुलीचा तक्रारकर्ता क्र. 2 यांना प्रथम अधिकार आहे व पॉलिसीची रक्कम तक्रारकर्ता क्र. 2 यांना सरळ देण्यात यावी असा उल्लेखही तक्रारीत आहे. म्हणून वि.प.ने पॉलिसीची वरील रक्कम व्याजासह आणि नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चासह तक्रारकर्ता क्र. 2 आदर्श नागरी सहकारी पतसंस्था भंडारा यांना अदा करावी. सदर रकमेतून मृतक राजेंद्र शामकुंवर यांचेकडून संस्थेला घेणे असलेल्या कर्जाची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारकर्ता क्र. 2 यांनी मृतक राजेंद्रचे वारस तक्रारकर्ता क्र. 1 आशिष राजेंद्र शामकुंवर यांना अदा करावी असे निर्देश देणे योग्य होईल, म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-आदेश-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.ने तक्रारकर्त्यास रु.50,000/- विमा दावा नामंजूरीच्या तारखेपासून म्हणजे दि.03.04.2014 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावे.
2) वि.प.ने तक्रारकर्त्यास शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
3) वि.प.ने पॉलिसीची वरील रक्कम व्याजासह आणि नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चासह तक्रारकर्ता क्र. 2 आदर्श नागरी सहकारी पतसंस्था भंडारा यांना अदा करावी. सदर रकमेतून मृतक राजेंद्र शामकुंवर यांचेकडून संस्थेला घेणे असलेल्या कर्जाची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारकर्ता क्र. 2 यांनी मृतक राजेंद्रचे वारस तक्रारकर्ता क्र. 1 आशिष राजेंद्र शामकुंवर यांना अदा करावी.
4) वि.प.ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
4) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.