आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याचा विमा दावा विरूध्द पक्षाने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने TATA NANO CX चेसिस क्रमांक MAT612232CKK72322, नोंदणी क्रमांक MH-35-P-3677 ही कार दिनांक 18/03/2013 रोजी मेसर्स ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांचेकडून खरेदी केली. सदर कारचा Comprehensive (सर्वसमावेशक) विमा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा कार्यालय, गोंदीया यांचेकडून रू. 6,543/- विमा प्रव्याजी देऊन दिनांक 18/03/2013 ते 17/03/2014 या कालावधीकरिता पॉलीसी क्रमांक 25331031120150050869 प्रमाणे काढला.
3. दिनांक 13/08/2013 रोजी तक्रारकर्त्याची वरील कार त्याच्या घरासमोर उभी करून ठेवली असता मागील बाजूने आलेल्या अज्ञात मोटरसायकल स्वाराने तक्रारकर्त्याच्या कार ला धडक दिल्याने कारचे डाव्या बाजूचे पुढील दार क्षतिग्रस्त झाले. त्याबाबत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष विमा कंपनीला ताबडतोब कळविले.
4. तक्रारकर्त्याने क्षतिग्रस्त वाहन दुरूस्तीकरिता ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांच्याकडे नेले आणि त्याकरिता दुरूस्तीचा खर्च रू. 4,438/- त्यांना दिला. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या वाहनाला कराव्या लागलेल्या दुरूस्तीची पाहणी करण्यसाठी सर्व्हेअरची नियुक्ती केली व त्यासाठी तक्रारकर्त्याला रू. 1,135/- सर्व्हेअरची फी द्यावी लागली.
5. ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांनी तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या दुरूस्तीबाबत झालेला खर्च मिळावा म्हणून विरूध्द पक्ष विमा कंपनीकडे तक्रारकर्त्याच्या वतीने प्रस्ताव पाठविला. परंतु विरूध्द पक्षाने तो मंजूर केला नाही. म्हणून विरूध्द पक्षाच्या सल्ल्यावरून तक्रारकर्त्याने स्वतः सप्टेंबर 2014 मध्ये विमा दावा मंजूर करावा म्हणून प्रस्ताव विरूध्द पक्षाकडे पाठविला. परंतु 24 महिने होऊनही विरूध्द पक्षाने तो प्रस्ताव मंजूर केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 15/04/2015 रोजी आपल्या वकिलामार्फत नोटीस पाठवून विमा दाव्याची रक्कम देण्याची विनंती केली. सदर नोटीसला विरूध्द पक्षाने दिनांक 21/04/2015 रोजी नोटीस पाठवून ए. के. गांधी कार्स यांनी पाठविलेल्या विमा प्रस्तावातील अपघाताची घटना आणि तक्रारकर्त्याने पाठविलेल्या विमा प्रस्तावातील घटना यामध्ये फरक असल्याने त्याचे स्पष्टीकरण करावे म्हणून तक्रारकर्त्यास कळविले. दिनांक 14/05/2015 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला त्याबाबतचे स्पष्टीकरण पाठविले. परंतु तरीही विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर केलेला नाही. म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
अ. वाहन दुरूस्तीचा खर्च आणि सर्व्हेअर फीची रक्कम रू. 5,573/- द.सा.द.शे. 24% व्याजासह देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश द्यावा.
ब. सेवेतील न्यूनतेबाबत रू. 15,000/- देण्याचा विरूध्द पक्षाविरूध्द व्हावा.
क. शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- मिळावी.
ड. तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठयर्थ तक्रारकर्त्याने वाहनाची विमा पॉलीसी, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन दुरूस्तीचे इन्व्हॉईस, सर्व्हेअरचे बिल, कायदेशीर नोटीस, विमा दावा अर्ज इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्याच्या नॅनो कारची विमा पॉलीसी विरूध्द पक्षाकडून काढल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दिनांक 13/08/2013 रोजी तक्रारकर्त्याची कार त्याच्या घरासमोर उभी ठेवली असतांना मागून आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने तिला धडक दिली व त्यामुळे कारच्या डाव्या बाजूचा पुढील दरवाजा क्षतिग्रस्त झाला व तो दुरूस्त करण्यासाठी तक्रारकर्त्याने ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांना रू. 4,438/- दिले हे माहितीअभावी नाकबूल केले आहे. तसेच सर्व्हेअरला रू. 1,135/- सर्व्हे फी म्हणून दिल्याचे देखील माहितीअभावी नाकबूल केले आहे.
दिनांक 21/04/2015 रोजीच्या पत्रान्वये विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दोन विमा प्रस्तावातील घटनेमध्ये असलेल्या फरकाबाबतचे स्पष्टीकरण मागितले होते हे मान्य केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, दोन वेळा केलेल्या विमा प्रस्तावात घटनेबाबत जो फरक दिसून आला त्याबाबत तक्रारकर्त्याने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने तक्रारकर्त्याचा विमा दावा खोटा व बनावट असल्याचे विमा कंपनीला दिसून आल्याने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर करण्यात आला नाही. तक्रारकर्त्याचा विमा दावा खोटा व बनावट असल्याने तक्रारकर्ता तक्रारीतील कोणतीही मागणी मिळण्यास पात्र नाही म्हणून सदर विमा दाव्याची रक्कम न दिल्यामुळे विरूध्द पक्ष यांच्याकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
8. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने त्याची नॅनो कार नोंदणी क्रमांक MH-35/P-3677 ही विरूध्द पक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा गोंदीया यांच्याकडे विमा पॉलीसी क्रमांक 25331031120150050869 अन्वये 18/03/2013 ते 17/03/2014 या कालावधीकरिता रू. 6,543/- प्रव्याजी देऊन सर्वसमावेशक (Comprehensive) विमा पॉलीसी अन्वये विमाकृत केल्याची बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. विमा पॉलीसीची प्रत तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 1 वर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने शपथपत्रावर सांगितले आहे की, त्याची वरील कार घरासमोर उभी करून ठेवली असतांना मागून आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने तिला धडक दिली. त्यामुळे सदर कारचे डाव्या बाजूचे समोरील दार क्षतिग्रस्त झाले. सदरील कार दुरूस्तीकरिता ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांच्या वर्कशॉपमध्ये नेण्यात आली व तेथे कराव्या लागलेल्या दुरूस्तीबाबतचा खर्च रू. 4,438/- तक्रारकर्त्यास द्यावा लागला. त्याबाबतचे बिल तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 3 वर दाखल केलेले आहे. याशिवाय दुरूस्त केलेल्या वाहनाचे अंतिम सर्व्हे करण्यासाठी विरूध्द पक्षाने नियुक्त केलेले सर्व्हेअर मनिष शुक्ला यांनी तक्रारकर्त्याकडून स्विकारलेल्या सर्व्हे फी रू. 1,135/- ची पावती तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 4 वर दाखल केलेली आहे. सदर दुरूस्ती नंतर दुरूस्ती खर्चाचा दावा ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांनी तक्रारकर्त्याच्या वतीने विरूध्द पक्ष विमा कंपनीकडे सादर केला होता. त्यात दिनांक 13/08/2013 रोजी तक्रारकर्त्याची कार प्रतितास 30 ते 40 कि. मी. एवढ्या कमी वेगात असतांना डावीकडून आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने कारला धडक दिली व कारचे डाव्या बाजूकडील पुढील दार क्षतिगस्त झाल्याचे नमूद आहे. मात्र तक्रारकर्त्याने त्यानंतर सादर केलेल्या विमा दाव्यामध्ये त्याची कार घरासमोर उभी करून ठेवली असता मागून आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने डाव्या बाजूने धडक दिल्याने कारचे डाव्या बाजूकडील पुढील दार क्षतिगस्त झाल्याचे नमूद आहे.
वरील दोन्ही विमा प्रस्तावातील विसंगतीबाबत खुलासा करावा म्हणून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कळविले. सदरच्या पत्राची प्रत दस्त क्रमांक 7 वर आहे. त्यास तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 8 प्रमाणे स्पष्टीकरण पाठवून तक्रारकर्त्याने स्वतः सादर केलेल्या प्रस्तावात दिनांक 17/08/2013 रोजी कार घरासमोर उभी करून ठेवली असता मागून आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने कारला डाव्या बाजूने धडक दिल्याने कारचे डाव्या बाजूचे पुढील दार क्षतिग्रस्त झाले असे नमूद केले असून तीच घटना खरी व बरोबर आहे असे कळविले. मात्र सदर स्पष्टीकरणानंतर देखील विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर केलेला नाही.
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे काढलेली त्याच्या कार ची पॉलीसी ही सर्वसमावेशक (Comprehensive) असल्यामुळे तक्रारकर्ता त्याच्या कार ला अज्ञात इसमाने धडक दिल्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रतिपूर्ती मिळण्यासाठी पात्र आहे. त्यासाठी जरी ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांनी तक्रारकर्त्याच्या वतीने पाठविलेल्या विमा प्रस्तावात कार 30 ते 40 कि. मी. प्रतितास अशा कमी वेगात असतांना मागून आलेल्या मोटरसायकलस्वाराने डाव्या बाजूला धडक दिल्याने कारचे डाव्या बाजूकडील पुढील दार क्षतिग्रस्त झाले असे नमूद असले किंवा तक्रारकर्त्याने नंतर स्वतः दाखल केलेल्या विमा प्रस्तावात त्याची कार घरासमोर उभी असतांना मागून आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने कारला डाव्या बाजूने धडक दिल्याने कारचे डाव्या बाजूचे पुढील दार क्षतिग्रस्त झाले असे नमूद केले तरी विमा दावा मंजुरीकरिता वरील दोन्ही कथनातील फरकाचा कोणताही परिणाम होत नाही. कारण कार वरीलपैकी कोणत्याही कारणाने क्षतिग्रस्त झाली असली तरी सर्वसमावेशक विमा पॉलीसी अंतर्गत तक्रारकर्ता झालेल्या नुकसानीची क्षतिपूर्ती मिळण्यास पात्र आहे. असे असतांना केवळ दोन विमा प्रस्तावात घटनेबाबत जरासा फरक आहे एवढ्या कारणाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्षाची कृती ही निश्चितच विमा ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याच्या विमाकृत वाहनाला झालेल्या क्षतीची दुरूस्ती करण्यासाठी त्याने ए. के. गांधी कार्स, गोंदीया यांना रू. 4,438/- आणि विरूध्द पक्षाने नियुक्त केलेल्या सर्व्हेअरला सर्व्हे फी म्हणून रू. 1,135/- दिल्याबाबतची पावती अनुक्रमे दस्त क्रमांक 3 व 4 वर दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता वाहन दुरूस्ती खर्चाची रक्कम व सर्व्हे फी ची रक्कम असे एकूण रू. 5,573/- तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 22/09/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबतची नुकसानभरपाई रू. 3,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 2,000/- मिळण्यास देखील तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या विमाकृत वाहनाच्या दुरूस्तीसाठी आलेल्या खर्चाची रक्कम रू. 4,438/- व सर्व्हे फी ची रक्कम रू. 1,135/- असे एकूण रू. 5,573/- तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 22/09/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह अदा करावी.
3. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 3,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 2,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.