नि.33
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
मा.सदस्या - श्रीमती मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 379/2010
तक्रार नोंद तारीख : 04/08/2010
तक्रार दाखल तारीख : 05/08/2010
निकाल तारीख : 30/07/2013
----------------------------------------------
श्री विठ्ठल काशिनाथ कुंभार
रा.मांजर्डे, ता.तासगांव जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. नॅशनल इन्शुरन्स कं.लि.
जैन बोर्डींग, हायस्कूल रोड, सांगली
2. मुख्य कार्यकारी अधिकारी,
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
सांगली, मुख्य कार्यालय –
कर्मवीर भाऊराव चौक, सांगली
3. मांजर्डे (नवी) वि.का.स.(विकास) सेवा संस्था
मर्या. मांजर्डे, ता.तासगांव जि. सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड श्री ए.बी.खेमलापुरे
जाबदारक्र.2 तर्फे : अॅड श्री पी.ए.सावंत
जाबदारक्र.3 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा क्लेम अदा न केलेने दाखल करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवाला क्र.1 ते 3 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला क्र.1 व 2 हे वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले. नि.14 वर सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले तर नि.24 वर सामनेवाला क्र.2 ने लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.3 हे नोटीस बजावणी होऊनही हजर नसलेने त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. नि.21 वर तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केला आहे तर नि.27 वर सामनेवाला क्र.2 यांचा लेखी युक्तिवाद व नि.29 वर सामनेवाला क्र.1 चा लेखी युक्तिवाद दाखल आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी -
तक्रारदार हे मांजर्डे ता.तासगांव जि. सांगली येथील रहिवासी असून ते शेतकरी आहेत. सामनेवाला क्र.1 विमा कंपनी व सामनेवाला क्र.2 ही सहकारी बँक व सामनेवाला क्र.3 हे प्राथमिक सेवा संस्था आहे.
तक्रारदाराचे वडील मयत काशिनाथ यशवंत कुंभार हे सामनेवाला क्र.3 चे कर्जदार सभासद होते. सांगली जिल्हयातील प्राथमिक वि.का.स. सोसायटी संस्थांच्या कर्जदार सभासदांसाठी विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा संरक्षण योजना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेबरोबर कर्जदारांची जोखीम पत्करण्यासाठी विमा करार केला आहे. सामनेवाला क्र.3 या प्राथमिक सेवा संस्थेने कै.काशिनाथ यशवंत कुंभार या कर्जदाराच्या कर्जखात्यास रक्कम रु.90/- दि.20/1/2003 रोजी नांवे टाकलेले आहेत. त्याप्रमाणे जमा झालेली कर्जदारांची विमा संरक्षणाची सर्व रक्कम सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे जमा केलेली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी मयत कर्जदारांचे वारसाकरिता रक्कम रु.50,000/- व जखमी कर्जदारांना अपंगत्व आल्यास रक्कम रु.50,000/- देण्याचे मान्य केले आहे. सदरचा विमा हप्ता व करार पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे असेही कबूल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.3 च्या कर्जदार सभासदांचा विमा सामनेवाला क्र.1 कडे उतरवून विमापत्र घेतले आहे.
विमाधारक काशिनाथ यशवंत कुंभार हे दि.18/4/04 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठले असता, पाणी घेण्यासाठी कळशी घेत असता, कळशी जवळ बसलेल्या विषारी सर्पाने हाताला दंश केला. त्यांना लागलीच डॉ जाधव हॉस्पीटल अॅण्ड आय.सी.यू. तासगांव येथे पुढील उपचाराकरिता घेवून गेले असता, संध्याकाळी 7.00 वा. त्यांचे निधन झालेले आहे. मयत काशिनाथ यशवंत कुंभार यांचे तक्रारदार हे वारस असल्यामुळे त्या हक्काने विष्णूआण्णा शेतकरी कर्जदार व्यक्तीगत दुर्घटना विमा दावेची रक्कम मिळणेबाबत सदरचा अर्ज तक्रारदाराने दाखल केला. तक्रारदार हे लाभधारक आहेत. वडीलांचे अपघाती मृत्यूनंतर तक्रारदाराने मे 2004 मध्ये सामनेवाला क्र.3 कडे क्लेम प्रपोजल तयार करुन सही करुन दिले आहे. तसेच त्यासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रेही जोडली आहेत. प्रस्तुत क्लेमफॉर्म हा सामनेवाला क्र.3 मार्फत सामनेवाला क्र.2 कडे पाठविला व सामनेवाला क्र.2 यांने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे पाठविला. क्लेम मागणीचा प्रस्ताव मिळालेपासून सामनेवाला क्र.3 यांनी योग्य चौकशी करुन अहवाल देवून सामनेवाला क्र.1 कडे सूपूर्द केला. 30 दिवसांचे आत रक्कम रु.50,000/- मृताचे खात्यावर जमा करणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 ते 3 यांची आहे. तरीही विमा रक्कम मंजूर केली नाही. मृताचे वारसाचे खातेवर रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब रक्कम रु.50,000/- व त्यावर दि.18/4/2004 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज, विमा दावा फेटाळला म्हणून रक्कम रु.50,000/- व मानसिक त्रासापोटी रु.40,000/- सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडून मिळावी अशी तक्रारदाराने मागणी केली आहे.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.5 फेरिस्तसोबत 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.20/1 ला तक्रारदारतर्फे डॉक्टरांचे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच नि.31 चे फेरिस्तसोबत दि.22/7/13 रोजी तक्रारदारतर्फे एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने नि.14 वर आपले लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार, मान्य केले कथनाखेरीज, परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, प्राथमिक सोसायटीच्या शेतकरी सभासदांसाठी, ज्यांनी अशा सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहेत, अशा कर्जदार सभासदांसाठीच विष्णूआण्णा योजना असे नाव सुचवले आहे. सदर योजना संबंधीत क्रेडीट सोसायटीचे कर्जदार सभासदांसाठी होती. सदर जिल्हयातील सदर सोसायटीचा कर्जदार सभासदांनी घेतलेल्या कर्जरकमेच्या सुरक्षेच्या हमीपोटी सदर योजना अस्तित्वात आणली होती. कर्जदार मृत्यू पावला अथवा तीव्र जखमी (grave injuries) झालेस कर्ज थकीत जाऊन अशा संस्थांचा कारभार ठप्प होऊ नये म्हणून सदर योजना अस्तित्वात आणली होती. सदर योजना फक्त कर्जदार सभासदांसाठीच होती. जर सामनेवाला क्र.3 ने कर्जदारांच्या यादीची पडताळणी न करता, संबंधीत कर्जदाराचा या योजनेमध्ये समावेश नाही याची खात्री न करता त्याच्या कर्ज खात्यात विमा प्रिमिअमची रक्कम वर्ग केली असेल तर अशा कर्जदारांना विमा संरक्षण मिळात नाही. सदरची योजना ही फक्त शेतकरी कर्जदार सभासदांसाठी होती. तक्रारीस कारणच घडलेले नाही. वादाकरिता मे 2004 मध्ये तक्रारीस कारण घडले असे गृहीत धरले तरी प्रस्तुत तक्रार मुदतीत नाही. विमाप्रस्तावच सामनेवाला विमा कंपनीस प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तक्रारीस कारणच घडलेले नाही. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी.
7. सामनेवाला क्र.1 यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.16 चे फेस्तिप्रमाणे विमा पॉलिसी, अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत.
8. सामनेवाला क्र.2 यांनी नि.24 ला दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार, मान्य केले कथनाखेरीज, परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे कथन करतात की, काशिनाथ कुंभार दि.18/4/2004 रोजी मयत झाल्याचे बँकेस समजून आलेले आहे. सामनेवाला क्र.2 विकास सेवा सोसायटी कर्जाचे वितरण करतात. विमा संरक्षणाची जमा झालेली सर्व रक्कम सामनेवाला क्र.1 कडे जमा केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडलेली आहे, त्यामुळे सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदारांनी प्रपोजल पाठविल्यास त्याबाबत विमा रक्कम देणेची सर्वस्वी जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची आहे. सामनेवाला क्र.2 पुढे असेही प्रतिपादन करतात की, सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे योग्य त्या टिपणीसह प्रस्ताव पाठविला व सामनेवाला क्र.2 ने सामनेवाला क्र.1 कडे विमादावा दाखल केला हे कथन बरोबर आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 या विमा कंपनीकडे विमाप्रस्ताव पाठविल्याचे मान्य केले आहे. हे तक्रारदाराने मान्य केलेने सामनेवाला क्र. 2 यांनी त्यांची योग्य ती जबाबदारी पार पाडलेने त्याचेविरुध्द तक्रारीस कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी. सामनेवालास नाहक पक्षकार केलेने कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रु.10,000/- देणेबाबत तक्रारदारास हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.2 ने केली आहे.
9. सामनेवाला क्र.2 यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.25 ला शपथपत्र दाखल केले आहे.
10. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेचे म्हणणे, उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल पुरावे यांचा विचार करता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक आहे काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय. सामनेवाला
क्र.1 यांनी
3. तक्रारदार विमा रक्कम तसेच अन्य मागणी केलेल्या रकमा
मिळणेस पात्र आहेत काय ? होय. सामनेवाला
क्र.1 यांचेकडून.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
11. सामनेवाला क्र.1 याने नि.16/1 वर दाखल केलेल्या विमा पॉलिसीच्या प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता पॉलिसी नं. 270802/47/02/9600001779 आहे तसेच विमा धारकाचे नाव म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली नमूद आहे. दि.2/12/2002 रोजी पॉलिसी प्रभावित झाली आहे. विमा हप्ता रक्कम रु.10,66,500/- दिसून येते तसेच रिसीट नंबरही नमूद केलेला आहे. प्रस्तुत रक्कम ड्राफ्ट क्र.160939 दि.2/12/2002 द्वारे दिलेली आहे ही वस्तुस्थिती दाखल पॉलिसीवरुन निर्विवाद आहे. तसेच नि.17 वर पॉलिसी शेडयूल दिलेले असून वरीलप्रमाणेच मजकूर नमूद आहे. तसेच यादीप्रमाणे 11850 सभासदांच्यासाठी विमा संरक्षित रक्कम रु.59,25,00,000/- असून प्रत्येक सभासदास रु.50,000/- इतके विमा संरक्षण आहे तसेच प्रतिसभासद हप्ता रु.90/- नमूद केलेले आहे. सदर शेडयुलप्रमाध्णे सामनेवाला क्र.2 यांनी विमा हप्ता रक्कम अदा केलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच नि.31/1 वरील दाखल परिपत्रकावरील पान क्र.2 प्रमाणे विमाहप्ता हा 5 वर्षासाठी रु.90/- म्हणजेच प्रतिवर्षी रु.18/- इतका नाममात्र असल्याबाबत नोंद आहे. परिपत्रकातील पान नं.3 योजनेची कार्यवाही बँक पातळीमध्ये संस्थेने दिलेल्या सभासद यादीनुसार रु.90/- मात्र प्रमाणे होणारी विमाहप्त्याची एकूण रक्कम शाखांना संस्थेच्या पिककर्ज खात्यास दि.2/12/2000 रोजी ason पध्दतीने नावे टाकणेची आहे. सदर जमा खर्च दि.2/12/2002 रोजी संस्था आपले कर्जखाती नावे लिहून हेड ऑफिसकडील इतर येणी अपघात विमा खातेस जमेस वर्ग करावयाचे आहे. त्याप्रमाणे योजनेची कार्यवाही संस्था पातळीवर हप्ता व सभासदांची यादी देवून करणेची आहे. त्यामुळे सदर तक्रारदाराच्या वडीलांचा विमा हप्ता त्यांचे सामनेवाला क्र.3 सोसायटीने सामनेवाला क्र.2 कडे पाठविलेला आहे व सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे जमा केला आहे ही वस्तुस्थिती नि.5/6 वरील दाखल कागदपत्रांनुसार निर्विवाद आहे. तसेच नि.31/3 वर दाखल कागदानुसार सदर योजनेअंतर्गत सांगली जिल्हयातील तालुकानिहाय सभासद विमा हप्ता रक्कम व पॉलिसी नंबर नमूद केलेचे दिसून येते. त्यानुसार तासगांव तालुक्यातील 11850 सभासदांचा रु.10,66,500/- इतका विमा हप्ता रक्कम अदा केलेली असून त्याचा पॉलिसी नंबर 02/9601779 असल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
सदर सांगली जिल्हयातील प्राथमिक सेवा सोसायटयांतील कर्जदार सभासदांचा विमा विष्णू आण्णा शेतकरी विमा संरक्षण योजनेअंतर्गत उतरविलेला होता हे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने मान्य केलेले आहे. त्याअनुषंगाने सामनेवाला क्र.1 विमा कंपनी व सामनेवाला क्र.2 बँक यांचेमध्ये विमा करार झालेला आहे ही वस्तुस्थिती तक्रारदाराने नि.31 फेरिस्तसोबत दाखल केलेल्या 31/1 वरील परीपत्रकावरुन निर्विवाद आहे. सदर परिपत्रकाप्रमाणे अनुक्रमांक 1 ते 5 मध्ये विमा संरक्षणबाबतच्या तरतुदी नमूद केलेल्या आहेत. त्याप्रमाणे अनुक्रमांक 1 वर विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास रक्कम रु.50,000/- कायदेशीर वारसांना, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच अपघाती मृत्यू झाल्यास पान नं.2 कलम अ मध्ये 1 ते 7 अन्वये द्यावयाच्या कागदपत्रांची नोंद आहे.
तक्रारदार हे सामनेवाला क्र.3 प्राथमिक सेवा सोसायटीचे कर्जदार सभासद होते. याबाबत वाद नाही. त्यांचा दि.18/4/2004 रोजी सकाळी लवकर उठले असता, पाणी घेण्यासाठी कळशी घेत असता कळशीजवळ बसलेल्या विषारी सर्पाने हाताला दंश केला तदनंतर डॉ जाधव हॉस्पीटल अॅण्ड आय.सी.यू.तासगांव येथे उपचारादरम्यान सदर दिवशी सायंकाळी 7.00 वा. त्यांचे निधन झाले ही वस्तुस्थिती नि.5 फेरिस्तसोबत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता निदर्शनास येते. नि.5/1 ला गाव नमुना 6 हक्कपत्र आहे. नि.5/2 ला काशिनाथ यशवंत कुंभार यांचा मृत्यू सर्पदंशाने झालेबाबत डॉ विजय जाधव, एम.डी.मेडीसीन, रजि.नं.68159, स्टेशन रोड तासगांव-416312 यांनी दिलेल्या दि.8/5/04 च्या मृत्यू प्रमाणपत्रावरुन निर्विवाद आहे. तसेच नि.20/1 वर नमूद डॉक्टरांचे शपथपत्रही दाखल आहे. नि.5/3 वर नमूद गावचे सरपंच व गावकामगार तलाठी पंचाचे साक्षीसहीत पंचनामा केलेला आहे. यावरुन नमूद कर्जदार सभासद काशिनाथ कुंभार यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची वस्तुस्थिती निर्विवादपणे स्पष्ट होते. सबब, त्यांचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मयताचे शवविच्छेदन केले गेलेले नाही ही वस्तुस्थितीही तक्रारदाराचे वकीलांनी युक्तिवादाचे वेळी प्रतिपादन केलेले आहे व त्या अनुषंगिक काही पूर्वाधार दाखल केलेले आहे.
2006(3) CPR 291 Rajasthan State Commission,
State Insurance & P.F. Dept. Vs. Parmali
When the cause of death is written in death certificate as snake bite, for its reliability for group insurance, post mortem report is not necessary.
2009 CPR 154 Mumbai State Commission
The Divisional Manager, United India Insurance Co.Ltd. Vs.
Smt. Vithal Bai Sukhdev Patil & ors.
Snake bite can be proved by Doctor’s certificate and village admn. officer even though post mortem is not conducted. Certificate of doctor is sufficient.
तसेच नि.31/1 वरील परिपत्रकातील कलम अ मधील अनुक्रमांक 6 मध्ये - ग्रामीण दुर्गम भागांमध्ये ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना अथवा शवविच्छेदनाची सोय नसेल त्याठिकाणी सर्पदंश, झाडावरुन पडणे, भूकंप, वादळ, बॉम्बस्फोट या कारणामुळे मृत्यू झालेस शवविच्छेदन अनिर्वाय असणार नाही त्याऐवजी तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय अहवालावरुन उपचार प्रमाणपत्रावरुन शवविच्छेदन दाखल्याची अट शिथील करण्यात येईल.
वरील दाखल पुरावा व पूर्वाधारांचा विचार करता तक्रारदारांच्या वडीलांचा म्हणजेच सामनेवाला क्र.3 यांच्या कर्जदार सभासद काशिनाथ यशवंत कुंभार याचा अपघाती मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सदर विमाधारक काशिनाथ कुंभार यांचा अपघाती मृत्यू झालेनंतर तक्रारदाराने, मयताचा मुलगा या नात्याने नमूद योजनेअंतर्गत वडीलांच्या अपघाती मृत्यू विमादावा सामनेवाला क्र.3 मार्फत योग्य त्या कागदपत्रांसह पाठवून दिला. सदर कागदपत्रे नि.5 फेरिस्त अन्वये 5/1 ते 5/6 ला दाखल आहेत. सदर आवश्यक कागदपत्रांसहीत सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमादावा सामनेवाला क्र.2 यांचेकडे पाठविला. सामनेवाला क्र.2 यांनी योग्य त्या टिपणीसहीत प्रस्तुत दावा सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे पाठविला ही कथने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने नाकारलेली आहेत. मात्र नि.31/2 वर दि.10/9/2008 रोजी जा.क्र.430 अन्वये सामनेवाला क्र.1 विमा कंपनीस दाखल केलेल्या विमादाव्यातील प्रलंबित प्रकरणासंदर्भात कार्यवाही करणेबाबत कळविलेले आहे. सदर पत्रासोबत 30 प्रलंबित दाव्यांची यादी दिलेली आहे. सदर यादी नि.31/3 वर दाखल आहे. सदर यादीवरील अनुक्रमांक 9 वर सामनेवाला क्र.3 सोसायटीचे नांव तर काशिनाथ यशवंत कुंभार दि.18/4/04 सर्पदंशाने मृत्यू असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच सदर पत्रामध्ये दावे मंजूर करण्यास अपूर्ण बाबींची यादी संबंधीतांना कळवून त्याची प्रत त्या त्या कार्यालयास पाठविण्यास विनंती केली आहे, की जेणेकरुन अपूर्ण बाबींच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करता येईल असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
यावरुन सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे सामनेवाला क्र. 2 या बँकेने सेवा सोसायटींच्या मयत कर्जदार सभासदांचे अपघाती मृत्यू विमेदावे पाठविले होते, त्यापैकी 30 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असून ज्यामध्ये तक्रारदारांचे वडीलांचे नावाचा समावेश आहे, त्याची निर्गत करणेसंदर्भात कार्यवाही केलेली दिसून येते. सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला क्र.2 कडे विमादावा पाठविल्याचे यावरुन सिध्द होते. सबब सामनेवाले क्र.2 व 3 यांनी सदर योजनेच्या त्यांच्या त्यांच्या पातळीवरील करावयाच्या कार्याची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
याउलट सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने केवळ प्रस्ताव मिळाला नाही, त्यामुळे तक्रारीस कारणच घडलेले नाही हे त्यांचे कथन व तक्रारदार म्हणतो, त्याप्रमाणे तसेच सामनेवाला क्र.2 म्हणतात त्याप्रमाणे विमादावा सामनेवाला क्र.1 कंपनीकडे पाठविलेला आहे ही वस्तुस्थिती वर दाखल पुराव्याचा साकल्याने विचार करता निर्विवाद आहे. याउलट सामनेवाला क्र.1 यांनी कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. केवळ प्रस्ताव मिळाला नाही एवढया सामनेवाला क्र.1 कंपनीने केलेल्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
वस्तुतः प्रस्तुत विष्णूआण्णा शेतकरी विमा संरक्ष्ण योजना या नावाने सामूहिक अपघात विमा योजना राबविलेली आहे. परिपत्रकाप्रमाणे सदर योजनेचा मूळ हेतू हा शेतक-यांच्या दैनंदिन योजनांमध्ये कोणते ना कोणते अपघात सतत घडू लागले आहेत, त्यामुळे अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व याने अशा घटना आकस्मिकरित्या ओढवून शेतक-यांचे संसार उध्वस्त होतात. अशा अपघातातून तळागाळातील संस्थेच्या कर्जदार सभासदांना संरक्षण मिळावे व पैशाच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई मिळावी या एकमेव हेतूने बँकेने पुढाकार घेवून शेतक-याच्या हिताच्या दृष्टीने सामूहिक अपघात विमा योजना राबविलेली आहे व त्या अनुषंगाने विमा कंपनीशी करार केलेला आहे. सदर हेतूबरोबरच कर्जदार सभासदांचा मृत्यू झाल्यानंतर प्राथमिक सेवा सोसायटींचे कारभार ठप्प होवू नयेत हाही एक महत्वाचा हेतू यामागे दिसून येतो. सदर योजनेच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करणे सामनेवाला क्र.1,2 व 3 यांचेवर बंधनकारक आहे. त्याप्रमाणे कर्जदार सभासदाच्या अपघाती मृत्यूनंतर मृत्यू विमा दाव्याचे जलद गतीने निर्गत करणे क्रमप्राप्त असतानाही सामनेवाला क्र.1 कंपनीने त्यांना प्रस्ताव प्राप्त होवूनही तसेच सदर प्रस्ताव त्यांचेकडे प्रलंबित असून त्यावर जलद गतीने कार्यवाही करण्याबाबत सामनेवाला क्र.2 यांनी लेखी सूचना देवूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच प्रस्तुत दाखल पुराव्यांवरुन नमूद सामनेवाला क्र.3 चा कर्जदार सभासद काशिनाथ कुंभार यांचा सर्पदंशाने अपघाती मृत्यू झालेची वस्तुस्थिती निर्विवाद असतानाही विमा दावा मंजूर केलेला नाही अथवा नामंजूरही केलेला नाही ही त्यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. प्रस्तुत तक्रार दाखल झालेपासूनही त्यांना प्रस्तुत विमादावा निर्गत करण्याची संधी प्राप्त झाली होती. त्याबाबतही त्यांनी काहीही कार्यवाही केलेली नाही. सबब वरील पुराव्यांचा साकल्याने विचार करता सदर योजनेअंतर्गत विमाधारक काशिनाथ यशवंत कुंभार याचा सर्पदंशाने अपघाती मृत्यू झाल्यामुळे कायदेशीर वारस या नात्याने तक्रारदार अपघाती मृत्यूनंतर मिळणारी विमा रक्कम रु.50,000/- व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहे तसेच तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटीही रक्कम मिळणेस पात्र आहेत. वस्तुतः प्रस्तुत प्रकरणी प्रस्तुत मृत्यू दावा मागणी केलेबाबत स्पष्ट तारीख समोर नसलेने तसेच त्याबाबत स्पष्टता नसलेने नि.31/2 अन्वये सामनेवला क्र.2 यांनी दि.10/9/2008 रोजी जा.क्र. 430 च्या पत्राने मयत काशिनाथ कुंभार यांचा मृत्यू विमा दावा प्रलंबित असून तातडीने निर्गत करणेचे कळविलेचे दिसून येते. सबब सदर तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे.
16. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन केलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदार हे व्याजासह होणारी विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या कृतीमुळे विनाकारण शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. सबब त्यापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी सुध्दा रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 50,000/-
दि.10/9/2008 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह अदा करावी.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी शारीरिक आर्थिक, मानसिक ञासापोटी नुकसान
भरपाई रक्कम रुपये 10,000/- अदा करावी.
4. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 2,000/- अदा
करावी.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
6. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 30/07/2013
( मनिषा कुलकर्णी ) ( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्या अध्यक्ष