नि.३२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१६८४/०९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २४/०३/२००९
तक्रार दाखल तारीख : ०६/०४/२००९
निकाल तारीख : ०५/११/२०११
----------------------------------------------------------------
श्रीमती सुनिता किसन वडेर
वय वर्षे – २९, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.ब्रम्हनाळ, ता.पलूस, जि.सांगली. ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.,
जैन बोर्डिंग, हायस्कूल रोड, सांगली.
२. कार्यकारी अधिकारी,
सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक लि., सांगली
मुख्य कार्यालय – कर्मवीर भाऊराव चौक, सांगली.
३. ब्रम्हनाळ सर्व सेवा सह.सोसा.लि., ब्रम्हनाळ
रा.ब्रम्हनाळ, ता.पलूस, जि.सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.एन.शेटे
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री.एम.डी.वाघ
जाबदार क्र.२ तर्फे : +ìb÷.श्री.व्ही.जी.शेटे
जाबदार नं. ३ : व्यक्तिश:
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज हा अपघात विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद आहेत. जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.३ यांचे कर्जदार सभासदांसाठी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी विमा करार केलाआहे. तक्रारदार यांचे पती यांचा दि.०९/०४/२००३ रोजी विषारी साप चावून मृत्यु झाला आहे. तक्रारदार हे विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी असल्याने त्यांनी मे २००३ मध्ये जाबदार क्र.३ यांचेकडे क्लेम प्रपोजल तयार करुन दिलेले आहे व त्याबाबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दिली. सदर क्लेमबाबत जाबदार क्र.३ यांनी योग्य ती चौकशी करुन जाबदार क्र.२ यांचेमार्फत जाबदार क्र.१ यांचेकडे विमाप्रस्ताव पाठविला. जाबदार यांचेकडे विमा क्लेम दाखल करुनही जाबदार यांनी विमादाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.२ यांनी याकामी नि.१० वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. तसेच जाबदार क्र.३ यांचेकडून विमा प्रस्ताव आलेनंतर योग्य त्या कागदपत्रांसह जाबदार क्र.१ यांचेकडे विमादावा दाखल केला आहे. तक्रारदार यांना विमादाव्यापोटी रक्कम देण्याची जबाबदारी जाबदार क्र.१ यांची आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे जाबदार क्र.२ विरुध्दचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.२ यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.११ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. जाबदार क्र.३ यांनी नि.१४ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांचे पतीचे निधन झालेनंतर जाबदार यांनी जाबदार क्र.१ यांच्याकडून लेखी कळवून फॉर्म मागवून घेतला व तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन दिल्यानंतर दि.११/०९/२००३ रोजी जाबदार क्र.१ यांना क्लेम फॉर्म भरुन पाठविला, तो जाबदार क्र.१ यांना मिळाला आहे. जाबदार क्र.१ यांनी अद्याप विमा दावा मंजूर केला नाही. विमा दाव्याची रक्कम देण्याची पूर्ण जबाबदारी जाबदार क्र.१ यांच्यावर आहे. जाबदार क्र.३ यांचेविरुध्द कोणताही हुकूम होऊ नये असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१५ ला शपथपत्र व नि.१६ च्या यादीने एक कागद दाखल केला आहे.
५. जाबदार क्र.१ यांनी नि.१७ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तक्रारदार यांचे पती यांचा दि.०९/०४/२००४ रोजी साप चावून मृत्यु झाला ही गोष्ट जाबदार यांनी अमान्य केली आहे. सदर जाबदार यांनी जाबदार क्र.३ यांना दि.०८/०५/२००३ रोजी कागदपत्रे सादर करण्याबाबत कळविले होते. परंतु जाबदार क्र.३ यांचेकडून काही कागदपत्रे दाखल झाली परंतु महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. प्रस्तुतकामी मयताचा शवविच्छेदन अहवाल नाही. त्यामुळे मृत्युचे कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे सदर जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा दि.३०/०९/२००४ रोजी फेटाळला आहे. विमा पॉलिसीतील अटी व शर्तींनुसार मृत्यु झाल्यानंतर एक महिन्याच्या आत जाबदार यांना सदर घटनेबाबत कळविले नाही. त्यामुळे विमा दावा मंजूर होणेस पात्र नाही. विमा क्लेम नाकारलेपासून एक वर्षाच्या आत प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला नसल्याने तक्रार अर्ज मुदतबाहय झाला आहे. त्यामुळे तक्रार अर्ज मंजूर होणेस पात्र नाही, सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. जाबदार यांनी नि.१८ ला शपथपत्र व नि.१९ चे यादीने एक कागद दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांनी नि.२० ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे व नि.२१ ला प्रतिउत्तराच्या पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यांचे प्रतिउत्तरामध्ये जाबदार क्र.१ यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे.
७. तक्रारदार यांनी नि.२२ ला दुरुस्तीचा अर्ज सादर केला आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.२५ च्या यादीने साक्षीदारांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.२६ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.२७ च्या यादीने निवाडे दाखल केले आहेत. जाबदार क्र.२ यांनी नि.२९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३१ च्या यादीने एक कागद दाखल केला आहे. जाबदार क्र.१ व ३ यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही व तोंडी युक्तिवादाचेवेळी जाबदार क्र.१ व ३ उपस्थित राहिले नाहीत.
८. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, तक्रारदार व जाबदार क्र.२ यांचा लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार ग्राहक म्हणून सदरहू तक्रारअर्ज
दाखल करु शकतात का ? होय.
२. विमा कंपनीने तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे का ? व तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष
मिळणेस पात्र आहे का ? होय.
३. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
९. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.३ यांच्या सभासदांसाठी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे. तक्रारदार यांचे पती हे जाबदार क्र.३ यांचे सभासद आहेत. त्यामुळे सदर विमा योजनेनुसार तक्रारदार हे लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या शब्दाचे व्याख्येनुसार तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे लाभार्थी या नात्याने ग्राहक ठरतात असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
१०. मुद्दा क्र.२ -
तक्रारदार व जाबदार क्र.२ व जाबदार क्र.१ यांचेमध्ये झालेल्या विमापॉलिसीची प्रत जाबदार क्र.१ यांनी नि.१९/१ ला दाखल केली आहे. सदर विमा पॉलिसीवरुन पॉलिसीचा कालावधी हा दि.२/१२/२००२ ते १/१२/२००७ असा आहे. सदर पॉलिसी कालावधीमध्ये तक्रारदार यांचे पती यांचा दि.०९/०४/२००३ रोजी मृत्यु झाला आहे असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यु सर्पदंशाने झाला आहे त्याबाबत डॉक्टरांचा दाखला याकामी नि.५/४ वर दाखल आहे. तसेच गावकामगार पोलीस पाटील यांचाही दाखला याकामी दाखल आहे. सदरकामी तक्रारदार यांनी डॉ.विश्वनाथ पाटील यांचे शपथपत्र नि.२५/१ ला दाखल केले आहे. डॉक्टर यांनी तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यु सर्पदंशाने झाला असल्याचे शपथपत्रानुसार नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी सदरची बाब नाकारली आहे. तक्रारदार यांचे पती यांचा शवविच्छेदन अहवाल याकामी दाखल नाही त्यामुळे तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यु सर्पदंशाने झाला ही बाब सिध्द होत नाही असे जाबदार यांनी कथन केले आहे. तक्रारदार यांनी याकामी सन्मा.राज्य आयोग, महाराष्ट्र यांचा औरंगाबाद पीठाचा 2009(1) CPR Page No.154 Divisional Manager, United India Insurance Company V/s. Smt.Vitthabai Patil हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये सन्मा.राज्य आयोग यांनी पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढला आहे. Snake bite can be proved by doctor’s certificate and village administration officer, even though post-mortem is not conducted, certificate of doctor is sufficient. सदर निष्कर्षाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यु सर्पदंशाने झाला हे दाखविण्यासाठी तक्रारदार यांनी डॉक्टर यांचे सर्टिफिकेट व शपथपत्र दाखल केले आहे. त्यावरुन सदरची बाब स्पष्ट होते.
११. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा दि.३०/०१/२००४ रोजी नाकारला असे नमूद केले आहे. परंतु सदर विमा दावा नाकारल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सदरच्या म्हणण्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत जाबदार यांनी कोणताही निर्णय न घेवून तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. दाखल पॉलिसीचे अवलोकन केले असता सदरची विमा पॉलिसी ही रक्कम रु.५०,०००/- साठी असल्याने व मयत किसन वडेर यांच्या तक्रारदार या कायदेशीर वारस असल्याने तक्रारदार हे रक्कम मिळणेस पात्र आहेत. सदरची रक्कम तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विमा प्रस्ताव दिलेले तारखेपासून म्हणजे दि.११/०९/२००३ पासून व्याजासह मंजूर करण्यात येत आहे.
१२. मुद्दा क्र.३
जाबदार क्र.१ यांनी याकामी मुदतीबाबत तक्रार अर्ज मुदतीत दाखल केला नाही तसेच घटनेबाबतची माहिती मुदतीत सादर केली नाही असा आक्षेप घेतला आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली होती परंतु कागदपत्रे जाबदार क्र.२ व ३ यांनी सादर केली नाही. जाबदार क्र.२ व ३ यांना लेखी पत्राने कळविले होते हे दर्शविण्यासाठी जाबदार क्र.१ यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही किंवा तक्रारदार यांचा विमादावा नाकारला याबाबतही काही कळविले होते हे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे जाबदार क्र.१ यांनी मुदतीबाबत घेतलेल्या आक्षेपामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी मुदतीबाबत आक्षेप घेताना तक्रारदार यांनी घटना घडलेपासून एक महिन्याच्या आत जाबदार यांना कळविले नाही असे कथन केले आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत सन्मा.राज्य आयोग झारखंड २००९ (२) सीपीआर २०२ Golden Trust Financial Services V/s. Malva Devi हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये सन्मा.राज्य आयोग यांनी पुढील निष्कर्ष काढला आहे. Condition in policy that intimation of accident was not given within a month of accident would not defeat claim under policy. सदर निष्कर्षाचे अवलोकन केले असता जाबदार यांच्या मुदतीबाबतच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
१३. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत जाबदार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मंचामध्ये धाव घ्यावी लागली, ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे विमा सेवा मिळणेसाठी ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असलेने सदरचा आदेश जाबदार क्र.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये ५०,०००/-(अक्षरी रुपये पन्नास हजार माञ) दि.११/०९/२००३ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक २०/१२/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि.०५/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११