नि. २८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २०९९/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०२/०९/२००९
तक्रार दाखल तारीख : २२/०९/२००९
निकाल तारीख : २९/०९/२०११
---------------------------------------------------------------
१. श्री.प्रताप केशव पाटील
रा.भिलवडी, ता.पलूस, जि.सांगली. ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
जैन बोर्डींग, हायस्कूल रोड, सांगली.
२. कार्यकारी अधिकारी,
सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक लि.,
सांगली, मुख्य कार्यालय – कर्मवीर भाऊराव चौक,
सांगली.
३. उत्तरभाग भिलवडी वि.का.स.सोसा.लि.
मु.पो.भिलवडी, ता.पलूस, जि.सांगली. .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.एन.शेटे
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री.बी.बी.खेमलापुरे
जाबदार क्र.२ तर्फे : +ìb÷.श्री.पी.जी.देशमुख
जाबदार नं. ३ : व्यक्तिश:
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज हा अपघात विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद असून जाबदार क्र.२ व ३ यांचे कर्जदार आहेत. जाबदार क्र.३ यांच्या कर्जदार सभासदासाठी जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी विमा करार केलाआहे. तक्रारदार यांचा दि.२६/०२/२००६ रोजी अपघात झाला. तक्रारदार हे विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी असल्याने त्यांनी मार्च २००६ मध्ये जाबदार क्र.३ यांचेकडे क्लेम प्रपोजल तयार करुन दिलेले आहे व त्याबाबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दिली. सदर क्लेमबाबत जाबदार क्र.३ यांनी योग्य ती चौकशी करुन जाबदार क्र.२ यांचेमार्फत जाबदार क्र.१ यांचेकडे विमाप्रस्ताव पाठविला. जाबदार यांचेकडे विमा क्लेम दाखल करुनही जाबदार यांनी विमादाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ८ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.३ तर्फे नि.१५ वर म्हणणे दाखल करण्यात आले आहे. जाबदार क्र.३ यांनी तक्रारदारांच्या अपघाताबाबतचा मजकूर मान्य केला आहे तसेच तक्रारदार यांनी एप्रिल २००६ मध्ये क्लेम प्रपोजल तयार करुन दिले आहे. सदरचे प्रपोजल जाबदार क्र.१ यांच्याकडे पाठविले आहे. तक्रारदार यांचे विम्याची रक्कम मंजूर करण्याची जबाबदारी जाबदार क्र.१ यांची आहे असे जाबदार क्र.३ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
४. जाबदार क्र.२ यांनी याकामी हजर होवूनही आपले म्हणणे दाखल केले नाही त्यामुळे त्यांचेविरुध्द नो-से आदेश नि.१ वर करण्यात आला. सदरचा आदेश रद्द करुन घेवून जाबदार क्र.२ यांनी नि.२१ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांचेकडे योग्य त्या कागदपत्रांसह विमाप्रस्ताव पाठविला आहे. सदर जाबदारांना विनाकारण या तक्रारअर्जात पार्टी केले आहे. तरी जाबदारविरुध्दचा विमा दावा फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.२ यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.२२ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
५. जाबदार क्र.१ यांनी नि.१६ ला शपथपत्राच्या स्वरुपात आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार हे शेतकरी आहेत, ते जाबदार क्र.३ चे कर्जदार आहेत या सर्व बाबी जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नाकारल्या आहेत. तक्रारदार यांनी जाबदार यांच्याकडे विमा प्रस्ताव पाठविला होता हे दाखविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मुदतबाहय झाला आहे. तक्रारदार यांनी या मंचाखेरीज इतरत्र अन्य ठिकाणी विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला नाही असे तक्रार अर्जात नमूद केले नाही त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यास पात्र आहे.
६. तक्रारदार यांनी नि.१९ ला आपले प्रतिउत्तर शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यांचे प्रतिउत्तरामध्ये जाबदार क्र.१ यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.२३ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व जाबदार क्र.१ यांनी नि.२४ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.२ यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही.
७. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार ग्राहक म्हणून सदरहू तक्रारअर्ज
दाखल करु शकतात का ? होय.
२. विमा कंपनीने तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे का ? व तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष
मिळणेस पात्र आहे का ? होय.
३. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
८. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.३ यांच्या सभासदांसाठी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद आहेत. त्यामुळे सदर विमा योजनेनुसार तक्रारदार हे लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या शब्दाचे व्याख्येनुसार तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे लाभार्थी या नात्याने ग्राहक ठरतात असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
९. मुद्दा क्र.२ -
जाबदार क्र.२ व जाबदार क्र.१ यांचेमध्ये झालेल्या विमापॉलिसीची प्रत प्रस्तुतकामी तक्रारदार अथवा जाबदार यांनी दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.५/३ वरील जाबदार क्र.३ यांच्या पत्रावरुन तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद आहेत व तक्रारदार यांचेकडून दि.०२/१२/२००२ रोजी रु.९०/- विमा पॉलिसीपोटी भरुन घेतले असल्याचे नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसी ही सन २००२ पासून पाच वर्षांसाठी होती असे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनीही आपल्या म्हणण्यामध्ये विष्णूआण्णा पाटील विमा करार हा सोसायटीच्या कर्जदार सभासदांसाठी होता असे नमूद केले आहे. जाबदार क्र.३ यांनी दिलेल्या दि.१७/०७/०९ च्या नि.५/३ वरील पत्रावरुन तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे कर्जदार सभासद होते व आहेत ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांना दि.२६/०२/२००६ रोजी अपघात झाला आहे हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. जाबदार क्र.१ यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे परंतु जाबदार यांनी पॉलिसीसारखा महत्त्वपूर्ण पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे पॉलिसीमध्ये काय अटी व शर्ती होत्या ही बाब मंचासमोर स्पष्टपणे येत नाही. त्यामुळे जाबदार यांच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांचा अपघात झाला आहे व अपघातामध्ये त्यांना अपंगत्व आले आहे. सदरचे अपंगत्व हे कायमचे असल्याबाबत व ३५% असल्याचे नि.५/८ वरील वैद्यकीय दाखल्यावरुन दिसून येते. अपघातामध्ये तक्रारदार यांच्या डाव्या पायास दुखापत झाली आहे. अपघातामध्ये दुखापत झाल्यास नेमकी किती रक्कम देय आहे हे ठरविण्यासाठी तक्रारदार यांनी याकामी पॉलिसीची प्रत हजर केली नाही. त्यामुळे सदरची रक्कम ठरविणे अवघड झाले आहे. जाबदार यांनी नि.२४ वर दिलेल्या लेखी युक्तिवादामध्ये पॉलिसीमधील अटी व शर्ती नमूद केल्या आहेत त्यामध्ये Rs.25,000/- to the Policy Holder in case of complete loss of one hand or one leg or one eye. जाबदार यांनी म्हणण्यामध्ये नमूद केलेले पॉलिसीमधील अटीबाबतचा मजकूर पहाता तक्रारदार यांच्या एका पायास पूर्णत; अपंगत्व आले आहे त्यामुळे तक्रारदार रक्कम रु.२५,०००/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी सदरचे अपंगत्व १००% ग्राहय धरण्यात यावे असे नमूद केले व त्यासाठी काही निवाडेही दाखल केले आहेत परंतु सदर प्रकरणांतील वस्तुस्थिती व या प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी असल्याने ते याकामी लागू होणार नाहीत असे या मंचाचे मत आहे.
१०. मुद्दा क्र.३
जाबदार क्र.१ यांनी याकामी मुदतीबाबत आक्षेप घेतला आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला अथवा मंजूर केला हे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. जाबदार यांचे विधिज्ञांनी विमा दाव्यास कारण घडल्यापासून दोन वर्षांच्या आत विमा दावा दाखल करणे गरजेचे आहे असे नमूद केले व ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी विमा दाव्यास कारण घडले असेही नमूद केले व जाबदार यांनी सदर म्हणण्याच्या पृष्ठयर्थ सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा २००९(६) महाराष्ट्र लॉ जर्नल पान नं.९२५ Kandimalla Raghavaiah & Company V/s. National Insurance Company हा निवाडा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा III (2011) CPJ 507 Lakshmibai & Ors., V/s. ICICI Lombard Gen.Insurance Co., हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सन्मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयाचा उहापोह करुन मुदतीबाबत काही निकष ठरविले आहेत. जाबदार कंपनीकडे घटना घडल्यापासून दोन वर्षांच्या आत विमा दावा पाठविणे गरजेचे आहे. जाबदार कंपनीने विमा दाव्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही तर तक्रार अर्जास सातत्याने कारण घडत राहिल व विमा दावा नाकारला तर नाकारल्या दिवसापासून तक्रार अर्जास कारण राहील असे नमूद केले आहे. तक्रारदार यांना दि.२६/०२/२००६ रोजी अपघात झाला आहे. जाबदार क्र.३ यांचेकडे तक्रारदार यांनी मार्च २००६ मध्ये विमा प्रस्ताव पाठविला आहे. जाबदार क्र.३ यांनी तात्काळ जाबदार क्र.१ यांच्याकडे जाबदार क्र.२ मार्फत प्रस्ताव पाठविला आहे हे त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये नमूद केलेले आहे. तसेच जाबदार क्र.२ यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये जाबदार क्र.१ यांचेकडे विमा प्रस्ताव पाठविल्याचे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांच्या विमादाव्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सदर तक्रारअर्जास सातत्याने कारण घडेल असेही मंचाचे मत आहे. जाबदार क्र.१ यांनी त्यांच्याकडे विमाप्रस्ताव पाठविला होता ही बाब माहितीअभावी नाकारली आहे. परंतु जाबदार यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही अथवा आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे जाबदार यांच्या सदरच्या म्हणण्यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार क्र.२ व ३ शपथपत्राच्या द्वारे जाबदार क्र.१ यांच्याकडे विमाप्रस्ताव पाठविला असे नमूद करीत असतील तर जाबदार क्र.१ यांनी याबाबत योग्य तो कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणणे गरजेचे होते. परंतु तसा कोणताही पुरावा किंवा प्रयत्न जाबदार क्र.१ यांनी केला असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मुदतीबाबत जाबदार यांनी घेतलेल्या आक्षेपामध्ये तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
११. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत जाबदार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मंचामध्ये धाव घ्यावी लागली, ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे. तसेच तक्रारदार यांनी अथवा जाबदार यांनी जाबदार यांच्याकडे विमाप्रस्ताव नेमका किती तारखेला पाठविला याबाबत योग्य तो पुरावा आणला नसल्याने तक्रारदार यांना मंजूर केलेल्या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून व्याज देण्यात येत आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे विमा सेवा मिळणेसाठी ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असलेने सदरचा आदेश जाबदार क्र.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये २५,०००/-(अक्षरी रुपये पंचवीस हजार माञ) तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.२/९/२००९ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ३,०००/- (अक्षरी रुपये तीन हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक १४/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò:२९/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११