नि. ३६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६४६/०९
-------------------------------------------
तक्रारनोंद तारीख : ९/३/२००९
तक्रार दाखल तारीख : २६/३/२००९
निकाल तारीख : २७/९/२०११
--------------------------------------------------------------
१. श्री जयवंत नाना लाड,
व.व.५५, व्यवसाय – शेती व नोकरी
रा.कुंडल, ता.पलूस जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
जैन बोर्डींग, हायस्कूल रोड, सांगली
२. कार्यकारी अधिकारी,
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.
सांगली, मुख्य कार्यालय –
कर्मवीर भाऊराव चौक, सांगली
३. कुंडल वि.का.स. संस्था लि.कुंडल
मु.पो.कुंडल, ता.पलूस जि.सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷श्री एम.एन.शेटे
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷ श्री बी.बी.खेमलापुरे
जाबदार क्र.२ तर्फे: +ìb÷.श्री व्ही.जी.शेटे
जाबदार क्र.३ : स्वत:
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज हा अपघात विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद असून जाबदार क्र.२ व ३ यांचे कर्जदार आहेत. जाबदार क्र.३ यांच्या कर्जदार सभासदासाठी जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी विमा करार केला आहे. तक्रारदार यांना दि.१४/१०/२००४ रोजी मोटारसायकलवरुन जात असताना अपघात झाला. सदर अपघातामध्ये तक्रारदार यांच्या डाव्या पायावर दोनदा शस्त्रक्रिया करावी लागली. तक्रारदार यांनी सदर विमायोजनेचे लाभार्थी म्हणून जाबदार क्र.३ यांचेकडे डिसेंबर २००४ मध्ये क्लेम प्रपोजल तयार करुन दिलेले आहे व त्याबाबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दिली आहेत. सदर क्लेमबाबत जाबदार क्र.३ यांनी योग्य ती चौकशी करुन जाबदार क्र.१ यांचेकडे अहवाल दिला आहे. जाबदार यांचेकडे विमा क्लेम दाखल करुनही जाबदार यांनी विमादाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.२ यांनी याकामी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. तसेच जाबदार क्र.३ यांचेकडून विमा प्रस्ताव आलेनंतर योग्य त्या कागदपत्रांसह जाबदार क्र.१ यांचेकडे विमादावा दाखल केला आहे. तक्रारदार यांना विमादाव्यापोटी रक्कम देण्याची जबाबदारी जाबदार क्र.१ यांची आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे जाबदार क्र.२ विरुध्दचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.२ यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१२ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. जाबदार क्र.३ यांनी नि.१५ ला आपले म्हणणे दिले आहे. जाबदार क्र.३ यांनी तक्रारदारांचा तक्रारअर्ज मान्य केला आहे. तक्रारदारांचा अपघात झालेनंतर योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार क्र.२ यांचेकडे सादर केली आहेत. जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांचेकडे विमादावा मिळणेसाठी कागदपत्रे पाठविली आहेत. जाबदार क्र.३ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१६ ला प्रतिज्ञापत्र व नि.१७ च्या यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
५. जाबदार क्र.१ यांनी नि.१८ ला आपले प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांना त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली इ. मजकूर नाकारला आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद आहेत तसेच ते शेतकरी आहेत या सर्व बाबी जाबदार क्र.१ यांनी नाकारल्या आहेत. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये पुढे असे नमूद केले आहे की सदरची विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजना ही केवळ शेती करणा-या कर्जदार शेतक-यांसाठीच असून सदर शेतक-यास अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास लागू होते व सदरची योजना दि.२/१२/२००२ पूर्वीच्या वि.का.स. सोसायटीच्या कर्जदारांना लागू आहे. तक्रारदाराचा विमादावा जाबदार यांचेकडे मुदतीत दाखल झाला नाही. तसेच तक्रारदार यांचा तक्रारअर्ज हा मुदतीत नाही. त्यामुळे तो फेटाळणेस पात्र आहे असे जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२० च्या यादीने २ कागद दाखल केले आहेत.
६. जाबदार क्र.२ यांनी नि.२२ च्या यादीने ३ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.२३ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार क्र.१ यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.२६ चे यादीने १ कागद दाखल केला आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.२८ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.२९ च्या यादीने निवाडे दाखल केले आहेत. जाबदार क्र.१ यांनी नि.३० ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.३१ ला निवाडे दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.३३ ला निवाडा दाखल केला आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.३४ वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३५ वर काही निवाडे दाखल केले आहेत.
७. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेला लेखी युक्तिवाद व तक्रारदार व जाबदार क्र.१ यांचे विधिज्ञांनी केलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार ग्राहक म्हणून सदरहू तक्रारअर्ज
दाखल करु शकतात का ? होय.
२. विमा कंपनीने तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे का ? व तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष
मिळणेस पात्र आहे का ? होय.
३. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
८. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.३ यांच्या सभासदांसाठी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे. जाबदार क्र.३ यांचे तक्रारदार हे सभासद आहेत. त्यामुळे सदर विमा योजनेनुसार तक्रारदार हे लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या शब्दाचे व्याख्येनुसार तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे लाभार्थी या नात्याने ग्राहक ठरतात असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
९. मुद्दा क्र.२ -
तक्रारदार व जाबदार क्र.२ व जाबदार क्र.१ यांचेमध्ये झालेल्या विमापॉलिसीची प्रत जाबदार क्र.२ यांनी नि.२२ ला दाखल केली आहे. सदर विमा पॉलिसीवरुन पॉलिसीचा कालावधी हा दि.२/१२/२००२ ते १/१२/२००७ असा आहे. सदर पॉलिसी कालावधीमध्ये तक्रारदार यांना दि.१४/१०/२००४ रोजी अपघात झाला असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.३ यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार हे त्यांचे कर्जदार सभासद आहेत व त्यामुळे ते लाभार्थी आहेत असे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी त्यांचे म्हणणेमध्ये सदरची योजना ही केवळ २००२ पूर्वीच्या कर्जदार सभासदांसाठी होती व आहे असे नमूद केले आहे. परंतु तसे दर्शविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही अथवा पॉलिसीमधील अटी व शर्ती काय आहेत हे दर्शविण्यासाठी पॉलिसीची प्रत जाबदार क्र.१ यांनी याकामी दाखल केलेली नाही. तक्रारदार हे दि.२/१२/२००२ पूर्वीचे कर्जदार नाहीत हे दर्शविण्यासाठीही जाबदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. याउलट जाबदार क्र.३ यांनी नि.१७/३ वर पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये दि.२/१२/२००२ रोजी कर्जदाराचा विम्यापोटी रु.९०/- विमा कंपनीस वर्ग केले आहेत असे नमूद केले आहे. त्यामुळे जाबदार यांचे सदरच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी आपले म्हणण्यामध्ये तक्रारदारास अपघात झाला होता ही बाब नाकारली आहे. परंतु जाबदार यांनी केवळ म्हणण्यामध्ये असे नमूद करण्यापलीकडे कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही. त्यामुळे जाबदार यांच्या सदरच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सदरची योजना ही कायमचे अपंगत्व आल्यासच लागू होते असे नमूद केले आहे. परंतु सदरची योजना काय आहे, त्यामध्ये कोणत्या अटी शर्ती आहेत, हे दर्शविण्यासाठी जाबदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही. जाबदार क्र.२ यांनी नि.२२ च्या यादीने दाखल केलेले जाबदार क्र.२ यांचे परिपत्रक याचे अवलोकन केले असता विमाधारक व्यक्तीचे एक हात किंवा एक पाय संपूर्णत: गमावणे याबाबत पॉलिसीधारकास रु.२५,०००/- देणेबाबत नमूद केले आहे. सदरचे परिपत्रक आधारभूत धरुन सदर विमादाव्याचा निर्णय घेताना तक्रारदार यांच्या सदर अपघातामध्ये तक्रारदार यांनी वैद्यकीय दाखल्याची प्रत नि.२६/१ वर दाखल केली आहे. त्यामध्ये Permanent physical disablement 55% असे नमूद केले आहे. तसेच shortening 7 cm असे दर्शविले आहे. यावरुन तक्रारदार यांचा डावा पाय अपघातामध्ये गमावला आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदरचे अपंगत्व किती टक्के होईल याबाबतअनेक निवाडे दाखल केले आहे. सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा निवाडाही दाखल केला आहे. परंतु सदरचे निवाडे हे कामगाराबद्दल असल्यामुळे ते संपूर्णत प्रस्तुत प्रकरणास लागू होणार नाहीत. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या विमादाव्याबाबत मुदतीत कोणताही निर्णय न घेतल्याने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे व त्यामुळे तक्रारदार हे सदर परिपत्रकात नमूद केलेप्रमाणे केवळ रु.२५,०००/- मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तक्रारदारांच्या विमादाव्याबाबत जाबदार यांनी वेळत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे सदरचे रकमेवर अपघात तारखेपासून द.सा.द.शे.९ टक्के दराने व्याज मंजूर करणेत येत आहे.
१०. मुद्दा क्र.३
जाबदार यांनी याकामी मुदतीबाबत आक्षेप घेतला आहे व तक्रारदार यांचा विमादावा दि.२/३/२००५ रोजी फेटाळला आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांचा विमादावा फेटाळला हे दर्शविण्यासाठी नि.२०/१ वर विमादावा फेटाळल्याचे पत्र दाखल केले आहे. सदर पत्र झेरॉक्स पत्र आहे व ते तक्रारदार यांना न लिहिता जाबदार क्र.२ यांना पाठविले आहे. सदरचे पत्र दि.२/३/२००५ चे आहे असे जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. सदर पत्राच्या झेरॉक्सप्रतीचे अवलोकन केले असता पत्रावर ता.२/३/२००५ नमूद आहे व त्याच्या बाजूच्या कोप-यात पत्र क्र.जनरल/जी/१७८३ दि.१०/२/२००५ असे नमूद आहे. यावरुन पत्राच्या तारखेमध्ये तफावत दिसून येते व सदरचे पत्र तक्रारदार यांना पाठविले नसल्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला हे तक्रारदार यांना माहित होते हे जाबदार क्र.१ पुराव्यानिशी शाबीत करु शकले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे या जाबदारांच्या युक्तिवादामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
११. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत जाबदार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मंचामध्ये धाव घ्यावी लागली, ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे विमा सेवा मिळणेसाठी ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असलेने सदरचा आदेश जाबदार क्र.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये २५,०००/-(अक्षरी रुपये पंचवीस हजार माञ) अपघात तारखेपासून म्हणजे दि.१४/१०/२००४ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक १०/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २७/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदारयांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११