Maharashtra

Bhandara

CC/18/36

VINA SURENDRA GOTEPHODE - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv Uday Kshirsagar

17 Jul 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/36
( Date of Filing : 07 Jul 2018 )
 
1. VINA SURENDRA GOTEPHODE
R/O NAGARDHAN TA.RAMTEK DISTT.NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd through Divisional Manager
DIVISIONAL OFFICE BHAUSAHEB SHIROLI BHAVAN. 4TH FLOOR. P.M.T. BUILDING. DEKKAN GYMKHANA. SHIVAJINAGAR. PUNE 4310004
Pune 4310004
Maharashtra
2. National Insurance Co.Ltd through Branch Manager
BRANCE MANAGER SAKET. LAXMI BHAVAN. DHARAMPETH. NAGPUR 440012
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari
TALUKA. PAVANI. DISTT.BHANDARA
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv Uday Kshirsagar, Advocate
For the Opp. Party:
Dated : 17 Jul 2019
Final Order / Judgement

                                        (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार)

                                                                                           (पारीत दिनांक– 17 जुलै, 2019)   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 यांचे विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम न मिळाल्‍या संबधात दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचे मृतक पती श्री सुरेंद्र नथ्‍थुजी गोटेफोडे यांचे मालकीची मौजा-पवनी, तालुका-पवनी, जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं-330/1 ही शेत जमीन आहे. तिचा पती हा शेतकरी होता आणि शेतीवरच त्‍यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा  स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे मृतक पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा शेतकरी अपघात विमा सरकाद्वारे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा मृत्‍यू दिनांक-27/06/2016 रोजी घरच्‍या छतावरुन पडल्‍याने  जख्‍मी होऊन  झाला. तिने तिच्‍या पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्‍याने  आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-14/06/2017 रोजी दाखल केला व वेळोवेळी विरुध्‍दपक्षा तर्फे मागणी केलेले दस्‍तऐवजांची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधीचे विमा दाव्‍या बाबत तो मंजूर झाला किंवा नामंजूर झाला या बाबत विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे तिला कळविण्‍यात आले नाही म्‍हणून  तिने वकीलांचे मार्फतीने दिनांक-17.11.2017 रोजी माहिती अधिकार कायद्दाखाली कृषी आयुक्‍त यांचेकडे माहिती मागविली असता त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा “Rejected due to other reason” असे कारण दर्शवून विमा कंपनीने नामंजूर केल्‍याचे कळविले.

     या संदर्भात तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत आहे, ज्‍या उद्देश्‍याने शासनाने मृतक शेतक-यांच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देश्‍यालाच विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तडा देत आहेत आणि दोषपूर्ण सेवा दिलेली आहे,    म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील मागण्‍या विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केल्‍यात-

(01)  विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा राशी रुपये-2,00,000/- द्दावी आणि सदर रकमेवर विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-14/06/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्‍याज द्दावे.

(02)  तिला झालेल्‍या  मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-15,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)   या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी  पुणे यांना मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित न झाल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने प्रकरणात पारीत केला.

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे लेखी उत्‍तर पान क्रं 59 व 60 वर मंचा समक्ष दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारीतील त्‍यांचे विरुध्‍द केलेली सर्व विपरीत विधाने ते अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद करुन नामंजूर केलीत. आपल्‍या विशेष कथनात त्‍यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संदर्भात संबधित पोलीस विभागाकडून घटनेचा तपास करण्‍यात आला आणि त्‍यांनी संपूर्ण चौकशी करुन आकस्‍मीक मृत्‍यू समरी क्रं-41/2016 पोलीस स्‍टेशन रामटेक येथे तयार करण्‍यात आली. पोलीसांचे मर्ग समरी मध्‍ये तपास करणारे पोलीस अधिकारी यांनी असे नमुद केले की, मृतक हा आपल्‍या घराचे कवेलू लावत असताना त्‍याचा लाकडी फाटयावरुन पाय घसरुल्‍याने तो खाली पडला व त्‍याच्‍या डोक्‍याला व पाठीवर जबर मार लागला. तो वैद्दकीय उपचारा दरम्‍यान मेडीकल कॉलेज नागपूर येथे मरण पावला.  या संबधात विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे असे नमुद करण्‍यात आले की, घरावरील कवेलु लावत असताना मृतकाचा मृत्‍यू झालेला आहे त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी पात्र नाही कारण घरावरील कवेलू लावणे ही बाब शेती व्‍यवसायात येत नाही आणि विमा योजने मधील तरतुदी प्रमाणे हा अपघात शेती व्‍यवसायाचे अनुषंगाने झालेला नाही म्‍हणून त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला, त्‍यांनी ही केलेली कृती योग्‍य आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, पवनी, तालुका पवनी, जिल्‍हा भंडारा यांनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 56 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्तीचे पती श्री सुरेंद्र नत्‍थू गोटेफोडे, मौजा नगरधन, तालुका रामटेक, जिल्‍हा नागपूर यांचा अपघाती मृत्‍यू दिनांक-27.06.2016 रोजी झाला होता, त्‍या अनुषंगाने तक्रारकर्तीने त्‍यांचे कार्यालयात आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा प्रस्‍ताव दिनाक-14/06/2017 रोजी दाखल केला होता व त्‍यांनी सदर विमा प्रस्‍ताव पुढे दिनांक-15/06/2017 रोजी त्‍वरीत पुढील कार्यवाहीसाठी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात पाठविला होता. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे सर्वस्‍वी विमा कंपनीचे अधिकाराखालील बाब येते. सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांनी केली.

06.    तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ठ क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2015-16 शासन निर्णय, तक्रारकर्तीने वकीलांचे मार्फतीने कृषी आयुक्‍त महाराष्‍ट्र शासन यांचेकडे माहिती अधिकारा खाली विचारलेली माहिती, तक्रारकर्तीने विहित नमुन्‍यात दाखल केलेला  विमा दावा अर्ज,  तिचे पतीचे शेती संबधाने 7/12 उतारा व अन्‍य  दस्‍तऐवज, तिचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍या बाबत अकस्‍मात मृत्‍यू समरी व इतर पोलीस दस्‍तऐवज, शवविच्‍छेदन अहवाल, तिचे पतीचे मृत्‍यूचे प्रमाणपत्र, तिचे पतीचे आधारकॉर्ड व तिचे आधारकॉर्ड  अशा दसतऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 63  व 64 वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले तसेच लेखी युक्‍तीवाद  पान क्र 65 व 66 वर दाखल केला.

07.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वरिष्‍ठ शाखा प्रबंधक श्री प्रविण बा‍बुराव हुंगे यांचे शपथपत्र पान क्रं 61 व 62 वर दाखल करण्‍यात आले. तसेच लेखी युक्‍तीवाद पान क्र 67 वर दाखल केला.

08.   तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्री विनय भोयर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

09.   तक्रारकर्तीची तक्रार, लेखी युक्तिवाद व तिने दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीतर्फे लेखी उत्‍तर व लेखी युक्‍तीवाद, विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे लेखी उत्‍तर इत्‍यादीचे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे. 

                                   :: निष्‍कर्ष ::

10.   महाराष्‍ट्र शासना तर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन-2015-16 संबधी दिनांक-26 नोव्‍हेंबर, 2015 रोजीचे परिपत्रकाची प्रत तक्रारकर्तीने दाखल केली, त्‍यानुसार सदर योजने मध्‍ये संबधित शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास रुपये-2,00,000/- कायदेशीर वारसदारांना विमा रक्‍कम देण्‍याची तरतुद आहे.

11.   तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर यांना, माहिती अधिकार अधिनियम 2005 खाली माहिती अधिकारी तथा कृषी उपसंचालक, कृषी आयुक्‍तालय, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांचे दिनांक-17 नोव्‍हेंबर, 2017 रोजीचे दिलेल्‍या दाखल पत्राचे प्रतीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री सुरेंद्र नथ्‍थुजी गोटेफोडे यांचे अपघाती मृत्‍यू संबधात केलेला विमा दावा विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने “Rejected due to other Reason” असे कारण दर्शवून नामंजूर केलेला आहे.

12.  विरुध्‍दपक्ष क्रं-2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संदर्भात पोलीस स्‍टेशन रामटेक येथे आकस्‍मीक मृत्‍यू समरी क्रं-41/2016 तयार करण्‍यात आली.  सदर पोलीस मर्ग समरी मध्‍ये तपास करणारे पोलीस अधिकारी यांनी असे नमुद केले की, मृतक हा आपल्‍या घराचे कवेलू लावत असताना त्‍याचा लाकडी फाटयावरुन पाय घसरुन तो खाली पडला व त्‍याच्‍या डोक्‍याला व पाठीवर जबर मार लागला. तो वैद्दकीय उपचारा  दरम्‍यान मेडीकल कॉलेज नागपूर येथे मरण पावला. या संबधात विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तरात असे नमुद करण्‍यात आले की, घरावरील कवेलु लावत असताना मृतकाचा मृत्‍यू झालेला आहे आणि घरावरील कवेलू लावणे ही बाब शेती व्‍यवसायात येत नाही. विमा योजने मधील तरतुदी प्रमाणे हा अपघात शेती व्‍यवसायाचे काम करताना झालेला नाही म्‍हणून त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे उपरोक्‍त नमुद लेखी उत्‍तरावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारकर्तीचा विमा दावा हा तिचे पतीचा घरावरील कवेलू लावताना पाय घसरुन पडल्‍याने व त्‍यात जखमी होऊन वैद्दकीय उपचारा दरम्‍यान मरण पावल्‍याने oव तो शेतीचे काम करीत नसल्‍याचे कारणावरुन  नामंजूर केलेला आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍यानुसार मृतकाचा  अपघाती मृत्‍यू हा शेतीचे काम करीत नसताना झाल्‍याने विमा दावा रक्‍कम देय नाही. 

13.      तक्रारकर्तीने तिचे मृतक पती श्री सुरेंद्र नथ्‍थुजी गोटेफोडे यांचे मृत्‍यू नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-14/06/2017 रोजी विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दाखल केल्‍या बाबत विमा दावा प्रस्‍तावाची व आवश्‍यक दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केल्‍यात व ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी सुध्‍दा उत्‍तरात मान्‍य केलेली आहे. महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य विभाग यांचे मृत्‍यू प्रमाणपत्रावरुन मृतकाचा मृत्‍यू 27/06/2016 रोजी झाल्‍याची बाब नमुद आहे. निवासी वैद्दकीय अधिकारी, रासायनिक प्रयोगशाळा, शासकीय वैद्दकीय महाविद्दालय नागपूर (Resident Doctor, Department Of Forensic Medicine GMC, Nagpur) यांचे दिनांक-27.06.2016 रोजीचे शवविच्‍छेदन अहवाला नुसार मृतकाचे मृत्‍यूचे कारण हे “Septicemia in case of Head Injury” असे नमुद केल्‍याचे दिसून येते. पोलीस स्‍टेशन, रामटेक, जिल्‍हा नागपूर ग्रामीण तर्फे मृतकाचे आकस्‍मीक मृत्‍यू समरी क्रं 41/16 चे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये असे नमुद आहे की, मृतक हा दिनांक-19.06.2016 रोजी दुपारी घराचे कवेलू लावत असता त्‍याचा लाकडी फाटयावरुन पाय घसरलयाने तो खाली पडला, त्‍याचे डोक्‍याला व कमरेला जबर मार लागल्‍याने त्‍याचेवर प्रथम वैद्दकीय उपचार करण्‍यात आले व त्‍यानंतर शासकीय रुग्‍णालय, नागपूर येथे वैद्दकीय उपचारा दरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. पोलीस घटनास्‍थळ पंचनामा, गुन्‍हयाच्‍या तपशिलाचा नमुना, मरणान्‍वेषन इतिवृत्‍त या सर्व दस्‍तऐवजा वरुन मृतकाचा घराचे कवेलू लावताना अपघात होऊन मृत्‍यू झाल्‍याची बाब सिध्‍द होते.

14.    तक्रारकर्तीने तिचे मृतक पती श्री सुरेंद्र नथ्‍थु गोटेफोडे यांचे मालकीची शेत जमीन होती हे दर्शविणारा 7/12 उतारा दाखल केला, त्‍यानुसार मृतक व ईतर यांचे नावे मौजा पवनी, तालुका पवनी जिल्‍हा भंडारा येथे भूमापान क्रं 330/1 शेती असल्‍याची बाब सिध्‍द होते. सदर 7/12 उतारा हा सन-2014-15 व 2016-17 वर्षातील आहे. दाखल फेरफार पत्रका वरुन सुध्‍दा मृतकाचे नावे शेती असल्‍याची बाब सिध्‍द होते. गावनमुना 6 मध्‍ये मृतक श्री सुरेंद्र नथ्‍थु गोटेफोडे याचे मृत्‍यू नंतर श्रीमती  विणा, अभिषेक आणि कु.निकीता हे त्‍याचे कायदेशीर वारसदार असल्‍याची बाब नमुद आहे.  

15.   प्रस्‍तुत प्रकरणात विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे एकच वादातीत मुद्दा असा आहे की, तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संदर्भात पोलीस स्‍टेशन रामटेक येथे आकस्‍मीक मृत्‍यू समरी क्रं-41/2016 तयार करण्‍यात आली.  सदर पोलीस मर्ग समरी मध्‍ये तपास करणारे पोलीस अधिकारी यांनी असे नमुद केले की, मृतक हा आपल्‍या घराचे कवेलू लावत असताना त्‍याचा लाकडी फाटयावरुन पाय घसरुल्‍याने तो खाली पडला व त्‍याच्‍या डोक्‍याला व पाठीवर जबर मार लागून पुढे तो वैद्दकीय उपचारा दरम्‍यान मेडीकल कॉलेज नागपूर येथे मरण पावला. घरावरील कवेलू लावणे ही बाब शेती व्‍यवसायात येत नाही.

16.   ग्राहक मंचा समोरील दाखल दस्‍तऐवजां वरुन मृतक हा अपघाताचे वेळी शेतकरी होता, त्‍याचे राहते घरी कवेलू लावत असताना छतावरुन पाय घसरुन पडल्‍याने अपघात झाला होता व त्‍यात तो गंभिर जखमी झाला होता, पुढे त्‍याला वैद्दकीय उपचारार्थ शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथे भरती करण्‍यात आले होते व वैद्दकीय उपचारा दरम्‍यान त्‍याचा दिनांक-27.06.2016 रोजी मृत्‍यू झाला या बाबी उभय पक्षां मध्‍ये विवादास्‍पद नाहीत आणि सदर बाबी या दाखल पुराव्‍यां वरुन सिध्‍द होतात. फक्‍त विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा वादातील मुद्दा संक्षीप्‍त स्‍वरुपाचा असा आहे की, मृतकाचा मृत्‍यू हा शेतीचे काम करीत असताना अपघातामुळे झालेला नसल्‍याने तक्रारकर्तीला विमा राशी देय नाही.  

17.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उपरोक्‍त नमद आक्षेपाचे संदर्भात हे न्‍यायमंच महाराष्‍ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, महाराष्‍ट्र शासन मुंबई यांचे दिनांक-26 नोव्‍हेंबर, 2015 रोजीचे शासकीय परिपत्रकावर आपली भिस्‍त ठेवीत आहे, सदर शासन निर्णया प्रमाणे शेती व्‍यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्‍यादी नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अपघात, रस्‍त्‍यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्‍य कोणत्‍याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्‍यू ओढवतो, त्‍यामुळे अपघातग्रस्‍त कुटूंबास आर्थिक लाभ देण्‍या करीता सदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2015-16 मध्‍ये रुपये-2.00 लक्ष विमा संरक्षणासह सुरु करण्‍यात येते.

18.     सदर शासन निर्णयाचे ग्राहक मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये असे कुठेही नमुद नाही आहे की, संबधित शेतक-याचा अपघाता मुळे मृत्‍यू हा केवळ शेतीमध्‍ये काम करीत असताना झाला तरच विमा राशी देय राहिल.  याउलट, एखाद्या शेतक-याचा अन्‍य कोणत्‍याही कारणांमुळे अपघाती मृत्‍यू झाल्‍यास विमा संरक्षणाची तरतुद असल्‍याची बाब सदर शासन निर्णयास स्‍पष्‍टपणे नमुद केलेली आहे.  महाराष्‍ट्र शासनाने उद्दात हेतूने शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास त्‍याचे कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विमा योजना सुरु केलेली आहे. महाराष्‍ट्र शासन आणि विमा कंपनी यांचे मध्‍ये जो विमा करार झालेला आहे त्‍यानुसार अपघाताचे दिवशी मृतक हा शेतकरी असला पाहिजे व अपघातामुळे त्‍याचा मृत्‍यू झालेला असला पाहिजे अशी तरतुद आहे परंतु तो अपघात हा केवळ शेतीचे काम करीता असतानाच झाला पाहिजे अशी कोणतीही तरतुद नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिचा दावा नामंजूर केल्‍या बाबत सुध्‍दा कळविले नाही. तक्रारकर्तीने माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागविल्‍याने तिचा विमा दावा नामंजूर केल्‍याची बाब तिला समजली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची चुकीचे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा अस्‍सल विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती ही विमा दावा रक्‍कम देण्‍यास केलेली चालढकल असून काहीतरी कारण पुढे करुन विमा दाव्‍याची रक्‍कमच न देणे हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा हेतू असल्‍याचे सकृत दर्शनी दिसून येते आणि ही त्‍यांनी तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. 

19.  तक्रारकर्ती ही मृतक शेतकरी श्री सुरेंद्र नथ्‍थु गोटेफोडे याची पत्‍नी व कायदेशीर वारसदार आहे. महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रका प्रमाणे सर्वप्रथम विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी, यांचे कार्यालयात दाखल केल्‍याचे दिनांका पासून  संबधित विमा कंपनीने  60 दिवसात निर्णय घ्‍यावा अशी स्‍पष्‍ट तरतुद आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीला  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी, पवनी यांचे कार्यालयात दाखल केल्‍याचा दिनांक-14.06.2017 पासून ते विमा दावा निश्‍चीतीसाठी 60 दिवसांचा कालावधी सोडून म्‍हणजे दिनांक-14.08.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तिचा अस्‍सल विमा दावा असतानाही केवळ क्षुल्‍लक चुकीचे कारणा वरुन तिचा विमा दावा फेटाळल्‍याने तिला झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे. त्‍याच प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, पवनी,  तालुका पवनी जिल्‍हा भंडारा  यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍याने व त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

20.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                :: आदेश ::

(01)  तकारकर्तीची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे नॅशनल  इनशुरन्‍स कंपनी कार्यालय, पुणे आणि नागपूर यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते  की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाक्ष फक्‍त) द्दावेत आणि सदर रकमेवर दिनांक-14.08.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला द्दावे.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, पवनी, तालुका पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी न केल्‍यास, अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- दिनांक-14.08.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.