(मंचाचा निर्णयः- श्रीमती वृषाली गौ. जागीरदार – सदस्या यांचे आदेशान्वये)
& आदेश &
(आदेश पारीत दिनांक – 24/08/2018)
तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्तीची संक्षिप्त तक्रार पुढीलप्रमाणे –
1. तक्रारकर्ती श्रीमती प्रिती विलास राऊत हिचे मृतक पती विलास हिरामण राऊत व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा-जमनापूर, ता.साकोली, जि.भंडारा येथे भूमापन क्र. 398 ही शेतजमीन होती.
महाराष्ट्र शासनाने सन 2015-2016 करिता गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत विरुद्ध पक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडे सर्व शेतक-यांचा अपघात विमा काढला होता व मृतक विलास हिरामण राऊत हे शेतकरी असल्याने सदर विम्याचे लाभ धारक होते. दि.08.02.2016 रोजी मृतक विलास हिरामण राऊत यांना दुस-या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावला.
गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत विमा दावा तक्रारकर्तीने आवश्यक दस्तऐवजांसह वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांच्याकडे रितसर अर्ज सादर केला. विमा दावा छाननी करुन पूर्ततेसह विरुध्द पक्ष क्र. 1 कडे पाठविण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र. 2 ची होती. विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 14/09/2016 रोजी पत्र पाठवून दिलेल्या कागदपत्रामध्ये मयत व्यक्तिकडे वाहन परवाना नाही. सबब दावा नामंजूर करण्यात येत आहे. हे कारण दाखवून तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला. विमा कंपनीची कृती ही सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, म्हणून तक्रारकर्तीने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1. अपघात विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- दि. 27/04/2016 पासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याज देण्याचा विरुध्द पक्षाविरुध्द आदेश व्हावा.
2. शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.30,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्याचा विरुध्द पक्षास आदेश व्हावा.
तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारकर्तीने गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना 2015-16 शासन निर्णय, विमा दावा फेटाळल्याचे पत्र, विमादाव्याची प्रत, 7/12 चा उतारा, एफ. आय. आर. व पोलिस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र, तलाठी प्रमाणपत्र इ. दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
3. विरुद्ध पक्ष क्र. 2 विमा कंपनीने लेखी उत्तर दाखल करुन तक्रारीस प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्राकर्तीच्या पतीचा मृत्यु हा रस्ता अपघातामध्ये झाला असून वाहन क्रमांक टाटा एम.एच.-40 वाय/4803 चे चालक श्री. आशिष बिजू मेश्राम राहणार माटोरा ह्यांचेविरुध्द दिनांक 08/02/2016 रोजी कलम 279,304(अ) भा.दं.वि. तसेच 184, 3(181) 177 कलम मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपराध क्रमांक 12/2016 अन्वये पोलीस स्टेशन, कारधा जिल्हा भंडारा येथे मृतक विलास हिरामण राऊत ह्यास वाहनाचा धक्का दिल्याने मृत्यु झाल्याबद्दल रिपोर्ट देण्यात आली आहे. तसेच आशिष बिजू मेश्राम विरुध्द मा. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, भंडारा यांचेविरुध्द विलास हिरामण राऊत रा. शिवाजी वार्ड, साकोली ह्याचे मृत्युस कारणीभुत असल्या संबंधात आरोपपत्र पण दाखल केले आहे. तक्रारीमध्ये मृतक विलास हिरामण राऊत ह्यांचे मृत्युचे कारण खोटे लिहिलेले आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत खोटे कारण देऊन मंचाची जाणूनबुजून दिशाभूल केली असल्याने सदरची तक्रार प्राथमिक आक्षेपावरच तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
4. वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांना नोटीस मिळाल्यावर त्यांनी लेखी जवाब दाखल करुन कळविले की, तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु दि.08.02.2016 रोजी झाल्यावर त्याबाबत विमा प्रस्ताव दि.21.03.2016 रोजी त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यावर त्यांनी तो दिनांक 22.03.2016 रोजी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालय भंडारा यांचेकडे पाठविला. सदर प्रकरण मंजूर किंवा नामंजूर करणे ही बाब विरुध्द पक्ष क्रमांक 3 च्या कक्षेत येत नाही. करीता खुलासा मान्य करण्यात यावा.
5. तक्रारकर्तीची तक्रार तसेच विरुध्द पक्षाच्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
अ.क्रं. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | वि.प.क्रं.1 व 2 यांनी सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय. |
2 | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः होय. |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
6. मुद्दा क्र. 1 बाबत – सदरच्या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने वि.प.क्र. 1 व 2 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचेकडे सन 2015-2016 या कालावधीसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतक-यांचा ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा’ उतरविला होता ही बाब उभय पक्षांना मान्य आहे. तक्रारकर्तीचे पती विलास हिरामण राऊत यांच्या नावाने मौजा जमनापूर त.सा.क्र. 19, ता. साकोली, जि. भंडारा येथे भू.क्र.398 क्षेत्रफळ 0.86 हे. आणि 0.86 हे. एकूण 1.70 हे. शेतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा, फेरफाराची नक्कल, गाव नमुना सहा-क इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत. त्यावरुन मृतक विलास हिरामण राऊत हे नोंदणीकृत शेतकरी होते व गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते हे सिध्द होते.
7. अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्राकर्तीच्या पतीचा मृत्यु हा रस्ता अपघातामध्ये झाला असून वाहन क्रमांक टाटा एम.एच.-40 वाय/4803 चे चालक श्री. आशिष बिजू मेश्राम राहणार माटोरा ह्यांचेविरुध्द दिनांक 08/02/2016 रोजी कलम 279,304(अ) भा.दं.वि. तसेच 184, 3(181) 177 कलम मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपराध क्रमांक 12/2016 अन्वये पोलीस स्टेशन, कारधा जिल्हा भंडारा येथे मृतक विलास हिरामण राऊत ह्यास वाहनाचा धक्का दिल्याने मृत्यु झाल्याबद्दल रिपोर्ट देण्यात आली आहे. तसेच आशिष बिजू मेश्राम विरुध्द मा. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, भंडारा यांचेविरुध्द विलास हिरामण राऊत रा. शिवाजी वार्ड, साकोली ह्याचे मृत्युस कारणीभुत असल्या संबंधात आरोपपत्र पण दाखल केले आहे. तक्रारीमध्ये मृतक विलास हिरामण राऊत ह्यांचे मृत्युचे कारण खोटे “विजेच्या धक्क्याने” असे लिहिलेले आहे त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा वरीलप्रमाणे विरुध्द पक्षाने आक्षेपात नोंदविल्यानुसार मोटार अपघातात झाल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्तीने तिचे तक्रार अर्जात मंचाचे परवानगीने त्यानुसार दुरुस्ती केल्याचे अभिलेखवरुन स्पष्ट होते. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक 2 चा वरील आक्षेप निरस्त ठरतो. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 08/02/2016 रोजी अपघाती मृत्यु झाला हे स्पष्ट होते.
8. तक्रारकर्तीने दि.21.03.2016 रोजी सर्व कागदपत्रांसह विमा दावा वि.प.क्र. 3 मार्फत वि.प.क्र.1 व 2 यांच्याकडे त्यांनी दिनांक 14/09/2016 रोजी पत्र पाठवून दिलेल्या कागदपत्रामध्ये मयत व्यक्तिकडे वाहन परवाना नाही. सबब दावा नामंजूर करण्यात येत आहे. हे कारण दाखवून तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला असल्याचे पृष्ठ क्रमांक 17 वरुन दिसून येते. तक्रारकर्तीच्या वकीलांनी त्यांच्या युक्तिवादात असे नमूद केले आहे की, तिच्या पतीजवळ वाहन चालविण्याचा परवान असल्याचा व अपघाताचा काहीही संबंध नाही. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु रस्त्याच्या बाजुला आपल्या बंद व स्टॅडवर उभ्या वाहनावर बसला असतांना दुस-या टाटा एस झीप या वाहनाने घडक दिल्याने जखमी होऊन झाला होता. तक्रारकर्तीच्या पतीचे वाहन हे अपघाताचे वेळी अचल स्थितीत होते. अपघात हा दुस-या वाहनाच्या चुकीने झाला असल्याने तक्रारकर्तीच्या पतीकडे वाहन चालविण्याचा परवाना असण्याची बाब विमा दावा मंजूर करण्यासाठी आवश्यक नाही असा तक्रारकर्तीच्या वकीलांनी युक्तिवाद केला. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत पृष्ठ क्रमांक 28 वर प्रथम खबरी,पृष्ठ क्रमांक 34 वर घटनास्थळ पंचनामा व पृष्ठ क्रमांक 38 नुसार अंतिम अहवाल नमूना दाखल केले आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचा पती मृतक विलास राऊत हा वाहन चालवित नव्हता तो रस्त्याच्या बाजुला मोटारसायकल स्टॅडवर लावून बसला असता दुस-या वाहनाने घडक दिल्यामुळेच तो जखमी होऊन मरण पावला आहे.
तक्रारकर्तीच्या वकीलांनी असा ही युक्तिवाद केला की, सदर अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचा पती हा वाहन चालवित नव्हता तसेच त्याचे वाहन अचल (Stationery) स्थितीत होते, त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा अपघातात कुठलाही दोष नसून तो अपघात घडण्यासाठी कारणीभूत नव्हता अश्या परिस्थितीत वाहन चालविण्याचा परवाना नसणे ह्या कारणावरुन तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करणे ही विरुध्द पक्ष कंपनीच्या सेवेतील त्रृटी आहे. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीच्या समर्थनार्थ मा. वरिष्ठ न्यायालयांचे खालील न्यायनिवाड्यावर आपली भिस्त ठेवली आहे.
- Hon’ble Supreme Court of Appeal No. (Civil) 4647 of 2003 Jitendrakumar Vs The Oriental Insurance Co. Ltd. & Anr.
सदर अपिलीय प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, वाहनास झालेला अपघात हा वाहनातील तांत्रिक दोषामुळे झालेला होता, वाहन चालकाचे चुकीमुळे झालेला नव्हता. त्यामुळे विमा कंपनीने वाहन कायदा-149 (2) (a) (ii) मधील तरतुदी नुसार अपघाताचे दिवशी वाहन चालका जवळ वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता त्यामुळे विमा दावा देय होत नसल्याची घेतलेली भूमीका योग्य नसून अपघात हा वाहन चालकाचे निष्काळजीपणा मुळे झालेला नव्हता तर तो वाहनातील तांत्रिक दोषामुळे होता, त्यामुळे येथे वाहन चालका जवळ अपघाताचे दिवशी वाहन चालविण्याचा वैध परवाना होता किंवा नाही या गोष्टीचा प्रश्नच उदभवत नसल्याचे नमुद केले.
हातातील प्रकरणात सुध्दा मृतक हा अपघाताचे वेळी वाहन अचल स्थितीत रस्त्याचे बाजुने स्टॅडवर लावले असताना आणि मृतक वाहनावर मागे बसलेला असताना अन्य दुस-या वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. थोडक्यात मृतक हा अपघाताचे वेळी वाहन चालवित नसल्याने तसेच त्याचा अपघात घडण्यास त्याचा दोष नाही. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीकडे वैध वाहन चालक परवाना होता किंवा काय या बाबीचा प्रश्नच उदभवत नाही.
- Hon’ble High Court of Gujrat in Appeal No. (Civil) 119 of 2011 ICICI Lombard General Insurance Co. Ltd Vs Saktisinh Bacchubhai Jadeja & 7 Ors.
सदर न्यायनिवाडयात मा. उच्च न्यायालयाने सदर अपीलमध्ये न्यानिवाडा देत असतांना वाहन चालविण्याचा परवाना बाबतचा मुद्या अपघाताचे वेळी मृतकाचे वाहन हे अचल स्थितीत असल्यामुळे अनावश्यक व असंबंधीत (immaterial & irrelevant) आहे असे मत मांडले आहे.
- Hon’ble High Court of Punjab & Haryana in Appeal No. (Civil) 2690 of 2010 Kor singh Vs Chaur Lal And Ors.
- Hon’ble National Consumer Dispute Redressal Commission in Appeal No. RP 3425 of 2011 Kuldeepsingh Rana Vs National Insurance Co. Ltd.
- Hon’ble National Consumer Dispute Redressal Commission in Appeal No. 3605 of 2012 United India Insurance Co. Ltd. Vs Paramjit Kumar
- Hon’ble National Consumer Dispute Redressal Commission in Appeal No. 2715 of 2014 Bajaj Allianze General Insurance Co. Vs Santosh Singh
सदर न्यायनिवाडयात मा. राट्रीय आयोगाने सदर प्रकरणांत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाडयांचा आधार घेतला असून त्यातीत मतीतार्थ हे हातातील प्रकरणाला तंतोतंत जुळतात. वरीलप्रमाणे विवेचणाच्या आधारे मंच या निष्कर्षाप्रत पोहचते की, अपघाताच्या वेळी तक्रारकर्तीच्या पतीजवळ मोटार वाहन परवाना नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केला आहे. त्यानुसार मुद्या क्रमांक 1 ला होकारार्थी देण्यात येते.
9. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत - विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा अयोग्य कारणाने नामंजूर करुन सेवेत त्रृटी केली आहे. त्यामुळे तक्रारकर्ती विमा कंपनीकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे. 09 टक्के व्याज दाराने मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे अयोग्य कारणाने विमा दावा नामंजूर केल्यामुळे सदरची तक्रार मंचात दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारकर्तीला सहाजीकच मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला आहे. म्हणून तिला झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्ती तक्रारीचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 कडून मिळण्यास हक्कदार आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
- वि.प.क्र. 1 व 2 नॅशनल इन्शुरन्स कं.लि.यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रु.2,00,000/- तक्रार दाखल दि.09.11.2016 पासून द.सा.द.शे. 09 टक्के व्याजासह प्रत्यक्ष अदायगी पर्यंत तक्रारकर्तीला द्यावी.
- वि.प.क्र. 1 व 2 नॅशनल इन्शुरन्स कं.लि.यांनी तक्रारकर्तीस शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी आदेश क्रमांक 2 व 3 ची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे तारखेपासून 30 दिवसाचे आंत करावी.
- विरुध्द पक्ष क्र. 3 यांना रक्कम देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते.
6) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य द्यावी.
7) तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.