:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 29 नोव्हेंबर, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघातामुळे विमा दाव्याची रक्कम मिळण्या बाबत केलेला विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारी प्रमाणे थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तो व्यवसायाने शेतकरी आहे, त्याचे मालकीची मौजा बोंडे, तालुका-साकोली, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-27/3 ही शेत जमीन आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्त्याचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने तो “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-14/05/2016 रोजी थ्रेशर मशीन मध्ये त्याचा पॅन्ट अडकल्याने डावा पाय मशीन मध्ये दबून निकामी झाला व गुडघ्या पासून तो कापावा लागल्याने त्याला 60% अपंगत्व आले. त्याचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने त्याने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-18/08/2016 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. असे असताना विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-24/03/2017 रोजीचे पत्रान्वये प्रथम माहिती अहवाल व 6-ड दसतऐवज दिले नसल्याचे कारणा वरुन त्याचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. अशाप्रकारे त्याचा विमा दावा नाकारुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याला दोषपूर्ण सेवा दिली. ज्या उद्येश्याने शासनाने शेतक-यांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत म्हणून त्याने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षांकडून विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-18/08/2016 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून त्याला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचा अपघात दिनांक-14/05/2016 रोजी थ्रेशर मशीन मध्ये त्याचा पॅन्ट अडकल्याने डावा पाय मशीन मध्ये दबून निकामी झाला व गुडघ्या पासून तो कापावा लागल्याने त्याला 60% अपंगत्व आले ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्या कडे लेखी मागणी करुनही त्याने प्रथम माहिती अहवाल आणि साक्षांकीत-6-ड ची प्रत असे दस्तऐवज पुरविले नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-24/03/2017 रोजीचे पत्रान्वये मागणी केलेले दस्तऐवज पुरविले नसल्याचे कारणा वरुन त्याचा विमा दावा नामंजूर केला होता ही बाब मान्य केली. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याला वारंवार मागणी करुनही त्याने दस्तऐवज पुरविले नसल्याने त्यांना विमा दाव्या संबधाने निर्णय घेता आला नाही, जेंव्हा की सदर दस्तऐवज विमा दावा निश्चीतीसाठी आवश्यक आहेत. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, जिल्हा भंडारा यांनी मंचाद्वारे पाठविलेली नोटीस मिळाल्यानंतर हजर होऊन त्यांनी पृष्ठ क्रमांक 42 आपला लेखी उत्तर दाखल केले आहे. विरुध्द पक्ष 3 यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचे नावे मौजा – बोंडे ता. साकोली येथे शेती असून तो शेतीचा व्यवसाय करीता आहे ही बाब मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 चे कार्यालयात दिनांक 18/08/2016 ला विमा प्रस्ताव सादर केला व त्यांचे कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीकरीता जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, भंडारा यांचेकडे जा.क्र.965, दिनांक 18/08/2016 रोजी पाठविण्यात आला. सदर प्रकरण मंजूर करणे किंवा नामंजर करणे ही बाब विरुध्द पक्ष 3 च्या कक्षेत येत नाही असे लेखी बयानात नमूद केले आहे.
05. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-10 नुसार एकूण-07 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, विमा दावा फेटाळल्या बाबत विमा कंपनीचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, शेतीचे कागदपत्रे, तक्रारकर्त्याचे अपघाता बाबत पोलीस दस्तऐवज, वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज, तक्रारकर्त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं-.59 वर त्याचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-64 नुसार तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे भंडारा येथील वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी पुरावा पृष्ट क्रं-.61 वर त्याचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-66 नुसार तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री. व्ही एम. दलाल .यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचा अपघात दिनांक-14/05/2016 रोजी थ्रेशरमशीन मध्ये चा पॅन्ट अडकल्याने डावा पाय मशीन मध्ये दबून निकामी झाला व गुडघ्या पासून तो कापावा लागल्याने त्याला 60% अपंगत्व आले ही बाब नामंजूर केली.
09. या मधील विवाद अत्यंत संक्षीप्त स्वरुपाचा आहे, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर व शपथपत्रातील कथना नुसार त्यांनी तक्रारकर्त्या कडे वारंवार मागणी करुनही त्याने विमा दावा निश्चीतीसाठी आवश्यक असलेले प्रथम माहिती अहवाल व 6-ड दस्तऐवज पुरविले नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-24/03/2017 रोजीचे पत्रान्वये त्याचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले.
10. या उलट तक्रारकर्त्याचे तक्रारी व शपथपत्रा प्रमाणे त्याने अपघाता बाबत सर्व पोलीस दस्तऐवज, वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज तसेच अंपगत्वाचा दाखला विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिका-यांकडे सादर केले होते त्याच बरोबर तो शेतकरी असल्या बाबतचे प्रमाणपत्र सुध्दा सादर केले होते असे असताना त्याचा विमा दावा जाणीवपूर्वक फेटाळण्यात आल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने त्याचे शपथपत्रात पुढे असेही नमुद केले की, महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयात शेतकरी अपघात विमा योजने संबधात एखादे दस्तऐवज मिळत नसेल तर पर्यायी दस्तऐवजाचा आधार घेऊन विमा दाव्यावर निर्णय घेण्यात यावा असे नमुद केलेले आहे.
11. तक्रारकर्त्याने विमा दावा प्रस्तावाची प्रत अभिलेखावर दाखल केलेली असून त्यासोबत दस्तऐवजाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्यामध्ये तलाठयाने दिनांक-18/08/2016 रोजी दिलेले प्रमाणपत्र असून त्यात असे नमुद आहे की, तक्रारकर्ता हा शेतकरी अपघात योजनेत समाविष्ट असून त्याचे नावे 0.43 हेक्टर आर एवढी जमीन वहिता खाली असून तो बोंडे या गावाचा खोतदार आहे. तसेच तक्रारकर्त्याने दिलेले शपथपत्रात त्याला दिनांक-14/05/2016 रोजी अपघातामुळे अपंगत्व आल्याचे नमुद आहे. 7/12 उता-या प्रमाणे तक्रारकर्त्याचे नावे मौजा बोंडे, तालुका साकोली, जिल्हा भंडारा, तलाठी साझा क्रं-27, भूमापन क्रं-27/3 अनुसार एकूण 0.95 हेक्टर आर शेती असल्याचे नमुद आहे. फेरफार नोंदीचे दस्तऐवजा मध्ये सुध्दा तक्रारकर्त्याचे नावे शेती असल्याचे नमुद आहे. तलाठी साझा क्रं 27 कुंभली, तहसिल साकोली, जिल्हा भंडारा याने दिनांक-12/08/2016 रोजी दिलेल्या दाखल्यात तक्रारकर्त्याचे नावे मौजा बोंडे येथे 0.43 हेक्टर आर जमीन असल्याचे नमुद आहे. पोलीस स्टेशन पालांदुर यांचे दिनांक-29 मे, 2016 रोजी क्राईम डिटेल्स फॉर्म मध्ये नमुद आहे की, परमानंद शामराव कापसे हा दिनांक-14/05/2016 रोजी मौजा पळसगाव येथे विश्वनाथ जवंजार याच्या शेतावर मशीनने धानाचा चुरा करीता असताना सायंकाळी 6.30 वाजताचे सुमारास मशीनमध्ये डावा पाय दबुन जखमी झाल्याचे शुअरटेक हॉस्पिटल, नागपूर येथील वैद्दकीय मेमो वरुन पोलीस स्टेशन धंतोली, नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन आवक क्रं-645/16 दिनांक-29 मे 2016 अन्वये प्राप्त झाल्याने जखमीचा (तक्रारकर्त्याचा) भाऊ उदाराम शामराव कापसे याने पळसगाव येथील घटनास्थळ दाखविले असून पंचनामा केल्याचे नमुद आहे. धान मशीन मध्ये फुलपॅन्ट अडकून डावा पाय मशीन मध्ये दबून तक्रारकर्ता परमानंद जखमी झाल्याचे नमुद आहे. शुअरटेक हॉस्पिटल, नागपूर यांनी दिलेल्या डिस्चॉर्ज कॉर्ड मध्ये तक्रारकर्ता हा सदर हॉस्पीटल मध्ये दिनांक-14 मे, 2016 ते 20 मे, 2016 या कालावधीत भरती असल्याचे नमुद असून त्याचे डावा पायाला जखम असून दिनांक-17 मे, 2016 रोजी त्याचे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील भागात शस्त्रक्रिया केल्याचे (Left below knee amputation) नमुद आहे. शासकीय रुग्णालय भंडारा येथील मेडीकल बोर्डाने दिनांक-14/07/2016 रोजी दिलेल्या अंपगत्वाचे प्रमाणपत्रात (Disability Certificate) तक्रारकर्त्याला Lt.L/L, Amputation B/K Disability 60% अपंगत्व आल्याचे नमुद आहे.
12. मंचाचे मते उपरोक्त नमुद महसुली व पोलीस दस्तऐवजांवरुन तक्रारकर्त्याचा धानमशीन मध्ये पॅन्ट अडकून अपघात झाला होता व त्याचे डाव्या पायाला जखम होऊन त्याला 60% अपंगत्व प्राप्त झाले होते तसेच त्याचे नावे मौजा बोंडे, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथे शेती असून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याचा विमा काढण्यात आला होता या बाबी सिध्द होतात.
13. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन-2015-2016 संबधाने महाराष्ट्र शासनाचे दिनांक-26 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयात अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास रुपये-1,00,000/- नुकसान भरपाईची तरतुद केलेली असून नॅशनल इन्शुरन्स कंपनीने विम्याची जबाबदारी स्विकारलेली आहे. अशी स्थिती असताना आणि तक्रारकर्त्याचे नावे शेती असल्या बाबत 7/12 उतारा, तलाठी प्रमाणपत्र तसेच त्याचे नाव शेतकरी अपघात विमा योजने मध्ये अंर्तभूत असल्या बाबत तलाठयाचे प्रमाणपत्र त्याच बरोबर त्याचा अपघात झाल्या बाबत क्राईम डिटेल फॉर्म आणि तो हॉस्पिटलमध्ये भर्ती असल्या बाबत वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज आणि त्याला अंपगत्व आल्या बाबत मेडीकल बोर्डाचे प्रमाणपत्र इत्यादी पुरावा असताना (Substantial & Cogent evidence) विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याचा अस्सल विमा दावा (Genuine Claim) त्याने प्रथम माहिती अहवाल व 6-ड दस्तऐवज पुरविले नसल्याचे कारणावरुन विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-24/03/2017 रोजीचे पत्रान्वये नामंजूर केला आणि ही त्यांच्या सेवेतील त्रृटी आहे.त्यामुळे तक्रारकर्ता हा विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- त्याचा विमा दावा नाकारल्याचा दिनांक-24/03/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तो विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) विमा दावा नाकारल्याचा दिनांक-24.03.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्दावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.