सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र.1/2013.
तक्रार दाखल दि.12-02-2013.
तक्रार निकाली दि.23-09-2015.
श्री. जवानमल फुलचंद जैन,
रा.प्रोपराईटर रिषभ ट्रेडींग कंपनी,
सातारा, 17/15, जुना हायवे,
मोळाचा औढा, करंजे, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. शाखाधिकारी,
नॅशनल इन्श्यूरन्स कंपनी लि.,
172/2, रविवार पेठ, गणेशचंद्र
बिल्डींग, पोवई नाका,सातारा,
सातारा रिजनल ऑफीस, सातारा.
2. शाखाधिकारी,
नॅशनल इन्श्यूरन्स कंपनी लि.,
पुणे रिजनल ऑफीस,
मोटार क्लेम्स हॉल,
1248 अ, दुसरा मजला,
अस्मानी प्लाझा, गुडलक चौक,
डेक्कन जिमखाना, पुणे 411 004 .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एन.व्ही.रोकडे.
जाबदार क्र.1 व 2 तर्फे– अँड.एस.बी.गोवेकर.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री. श्रीकांत कुंभार, सदस्य यानी पारित केला
1. प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांविरुध्द मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
तक्रारदाराचे तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे-
प्रस्तुत अर्जदार हे मोळाचा ओढा, करंजे, सातारा, ता.जि.सातारा येथील रहिवाशी असून ते व्यवसायाने व्यापारी व्यावसायिक आहेत. त्यांचे स्वतःचे नावे एम. 16-आर.-5010 या क्रमांकाची स्कोडा अँक्टीव्हा चार चाकी वाहन असून ते 2006 चे मॉडेल आहे. या विषयांकित वाहनाचा विमा जाबदार क्र. 1 यांचेकडे उतरविला असून त्याचा पॉलसी नं. 271500/31/12/61/110 असा असून या विम्याचा वैध कालावधी दि.14/4/2012 ते दि.13/4/2013 अखेर आहे. दि.17/6/2012 रोजी प्रस्तुत अर्जदार हे त्यांचे विमा प्रकाश ओसवाल व विनोद विष्णोई यांच्यासोबत परगांवी गेले होते. काम आटोपून परत येत असता काही ठिकाणी रस्ता खराब असलेने गाडीला ब-याच ठिकाणी दणके बसले व दगडही लागले. संध्याकाळी 6 ते 7 च्या सुमारास सदरची गाडी पुसेगांवच्या पुलाजवळ आली असता अचानक बंद पडली. गाडीमध्ये पुरेसे इंधन शिल्लक होते व जवळपास स्कोडा गाडी दुरुस्तीस मेकॅनिक उपलब्ध नसलेने विषयांकित वाहन टो च्या सहाय्याने अर्जदाराची गाडी साता-यात आणली व माहिती घेवून सातारा येथील मोहन वसंत पवार यांच्या आनंद मोटार रिपेअरिंग वर्क्स या गॅरेजमध्ये आणून लावली व सदरची माहिती जाबदार क्र. 1 यांना त्यांचे एजन्ट श्री. वैद्य यांना दिली. यातील आनंद मोटार रिपेअरिंग या गॅरेज मालकांना तक्रारदार भेटले. तेव्हा त्या गाडीचा टाईमींग बेल्ट गाडीला दणका हादरा बसून किंवा दणका बसल्याने मुळातच खराब झालेला टाईम बेल्ट तुटला आहे. त्यामुळे इतर पार्टस् एकमेकांवर आदळून गाडी बंद पडली आहे. त्याप्रमाणे गाडीचे लोअर आर्म (Lower Arm) Stabilizer Bar and A.C. Pipe यांचे नुकसान झालेचे सांगितले. याची माहिती यातील तक्रारदार यांनी जाबदाराचे एजंट श्री. वैद्य यांना दिली. श्री वैद्य यांनी तक्रारदार यांचेकडून क्र. 4 भरुन घेवून गाडीची इन्श्यूरन्स पॉलीसी, वाहनाचे LIC Book, लायसेन्सची प्रत, श्री. वैद्य यांचेमार्फत जाबदारांकडे जमा केली त्यावेळी जाबदारानी याची दखल घेऊन जाबदारांमार्फत पाहणी करण्यास येणा-या सर्व्हेअरला सर्व माहिती देण्यास सांगितले व त्याच्याकडे खर्चाचे Estimate देण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रस्तुत सर्व्हेअर प्रस्तुत तक्रारदार यांच्या दुकानात आले व तक्रारदार यांची नादुरुस्त गाडी श्री. मकानदार यांचे गॅरेजमध्ये लावण्यास सांगितले त्यांचे व सर्व्हेअरचे संबंध चांगले असून, गाडी गॅरंजला लावतील त्यानंतरच ते वाहनाची पाहणी करतील असे तक्रारदारांना सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी गाडी श्री पवार यांचे गॅरेजला ऑलरेडी लावली आहे. पुन्हा हा उपव्द्यापच करणे अवघड आहे. सबब श्री.पवार यांचे गॅरेजमध्ये गाडीची पाहणी करावी असे सुचविले. त्यावर श्री. नवले यांनी वेळ मिळेल तेव्हा पाहणी करतो असे सांगितले व त्याचवेळी गाडीचे इस्टीमेट द्यावे असे तक्रारदार यांना सांगितले व विषयांकित वाहनही पूर्ण दुरुस्त झालेवर अचानक श्री. नवले सर्व्हेअर हे पवार यांचे गॅरंजमध्ये आले व विषयांकित वाहनाची वरवर पाहणी करुन फोटो काढून निघून गेले व गाडी दुरुस्तीनंतर सर्व्हेअरनी फोटो काढण्याचे जाबदार क्र 1 यांना कळविले. तक्रारदार यांचेमते प्रस्तुत सर्व्हेअर यांनी त्यांचे उपस्थितीत दोन साक्षीदारांचे साक्षीने विषयांकित गाडीची पाहणी करणे आवश्यक होते. परंतु ते त्यांनी तक्रारदाराचे अपरोक्ष हे सर्व केले. व अचानक दि.7/8/2012 रोजी जाबदार यांनी तक्रारदार यांना गाडीची नुकसानी (Damage) हे Accidental नसलेचे कळविले व त्यामुळे तक्रारदार यांच्या वाहन नुकसानी दावा नामंजूर केलेचे कळविले. प्रस्तुत तक्रारदार यांचा मे.आनंद मोटर्स कडे विषयांकित वाहन दुरुस्त करुन घेतले त्यावेळी त्यांनी रु.92,925/- इतके खर्चाचे बिल मे. आनंद मोटर्स यांना अदा केले व ते बिल मिळणेसाठी तक्रारदार यांनी दि.20/11/2012 रोजी वकीलांमार्फत जाबदारांना नोटीस पाठवली. तरीसुध्दा जाबदारांनी विषयांकित वाहनाची नुकसानी दिली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार यांनी मंचात जाबदारांविरुध्द दाद मागितली व जाबदाराकडून अपघातग्रस्त वाहनाची नुकसानी रु.92,925/-, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, अर्जाचा खर्च रक्कम रु.15,000/- जाबदारांकडून मिळावा अशी विनंती मागणी मंचास केली आहे.
2. प्रस्तुत तक्रारदार याने नि. 1 कडे त्याचा तक्रार अर्ज, नि. 2 कडे त्याचे पृष्ठयर्थ शपथपत्र, नि.4 कडे तक्रारदाराचे वकिल अँड रोकडे यांचे वकीलपत्र, नि.5 कडे मोहन वसंत पवार या वाहन मॅकेनिकचे शपथपत्र, नि. 6 कडे प्रकाश ओसवाल यांचे शपथपत्र, नि. 7 कडे विनोद विष्णाई यांचे शपथपत्र, नि.8 कडे पुराव्याचे एकूण 10 कागद, नि. 12 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.20 कडे श्री. मोहन वसंत पवार या मॅकेनिकचे जबाबाचे प्रतिज्ञापत्र, नि. 27 कडे वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे त्यांची फक्त यादी व प्रकरण दाखले केलेले पुराव्याचे शपथपत्र, दाखल पुराव्याचे कागदपत्रे याशिवाय काही युक्तीवाद करावयाचा नाही अशी पुरसीस इत्यादी कागदपत्रे न्यायनिवाडयासाठी दाखल केली आहेत.
3. प्रस्तुत प्रकरणाच्या नोटीसा यातील जाबदारांना रजि.पोष्टाने मे.मंचामार्फत पाठवण्यात आल्या. प्रस्तुतची नोटीस जाबदाराना मिळाल्या त्याबाबतची पोष्टाची पोहोच प्रकरणी नि. 9/1, नि.9/2 कडे दाखल आहे. प्रस्तुत जाबदारा क्र.2 तर्फे नि. 12 कडे वकिलपत्राने प्रकरणी हजर झाले. परंतु नि.11 चे अर्जाने त्यांनी दोन्ही संस्था एकच असून जाबदार क्र. 1 व 2 तर्फे हजर होत असलेल्या अर्ज नि.11 कडे दाखल केला. प्रस्तुत जाबदार क्र. 1व 2 यांनी त्यांची कैफियत नि. 14 कडे त्याचे पृष्ठयर्थ नि. 15 कडे शपथपत्र, नि.17 कडे सर्व्हेअर श्री. नवले यांचा विषयांकित गाडीचा सर्व्हे रिपोर्ट, नि. 23 कडे सोबत नि. 23/1 कडे मूळ सर्व्हे रिपोर्ट, नि.23 सोबत नि. 23/1 कडे मूळ सर्व्हे रिपोर्ट फोटोसह व नि. 23/2 कडे विषयांकित वाहनाची पॉलीशीची प्रत प्रकरणी दाखल केली असून नि. 24 कडे प्रस्तुत जाबदारांनी दाखल केलेले म्हणणे, अँफीडेव्हीट व कागदपत्रे हेच पुराव्याचे प्रतिज्ञापत्र समजावे अशी पुरसीस दाखल, नि. 25 कडे तोंडी पुरावा संपलेची पुरसीस, नि. 26 कडे जाबदार यांनी दाखल केलेली कैफियत त्यासोबतचे अँफीडेव्हीट दाखल केलेली संपूर्ण कागदपत्रे हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा अशी पुरसीस दाखल. नि. 28 कडे कैफीयत दुरुस्ती अर्ज, नि. 29 कडे कैफीयत दुरुस्ती प्रत दाखल केलेली असून प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांचे तक्रार अर्जास खालीलप्रमाणे आक्षेप केले आहेत. तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. त्यांचे तक्रारीमधील कलम 3 व 4 व कलम 5 ते 24 ( अ ते फ) मधील मजकूर मान्य व कबूल नाही. सदर वाहनाचे नुकसान हे अपघातामुळे झालेले नसून ते मेकॅनिकल ब्रेकडाऊन या सदरात मोडणारे आहे. त्यामुळे जाबदारांचे विम्याच्या अटी व शर्तीस अनुसरुन तक्रारदाराचा विमादावा फेटाळावा. विषयांकित वाहनाचा टाईमिंग बेल्ट तुटला. तो वाहनाचे आतमध्ये असतो. त्याला बाहेरुन किंवा खालून दगड लागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. टायमिंग बेल्टच्या जुनेपणामुळे तो त्यामधील पार्टसला अंतर्गत धक्का बसला व अर्जात नमूद केलेली दुरुस्ती निर्माण झाली त्यामुळे जाबदारांनी तो भरपाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे आक्षेप प्रकरणी नोंदवलेले आहेत.
4. प्रस्तुत तक्रारदाराचा तक्रार अर्ज त्या अनुषंगाने प्रकरणी दाखल असलेले पुरावे, तक्रारदारांचा युक्तिवाद व जाबदारांची कैफियत, दाखल पुरावे यामधील कथनांचा आशय, व उभयपक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला तो पाहता प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्गत करणेसाठी खालील मुद्दे निर्माण होतात.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष
1. प्रस्तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय ? होय.
2. प्रस्तुत जाबदारांनी या तक्रारदारांना त्यांचा अपघातग्रस्त वाहन
नुकसानीदावा अयोग्य कारणाने नाकारुन तक्रारदार यांना
सदोष सेवा दिली आहे काय ? नाही.
3. प्रस्तुत तक्रारदाराने वाहनाचा अपघात होऊन वाहनाचे
नुकसान झाले व दुरुस्ती करणे भाग पडले
ही बाब शाबीत केली आहे काय ? नाही.
4. अंतिम आदेश काय ? तक्रार नामंजूर.
5. कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 4
प्रस्तुत तक्रारदार हे व्यवसायाने व्यापारी असून ते करंजे, सातारा ता.जि.सातारा येथील रहिवाशी आहेत . त्यांनी MH-16-R-5010 चा RTO नोंद क्रमांकाची स्कोडा, अँक्टीव्हा गाडी स्वतःचे कुटूंबाचे वापरासाठी सन 2006 साली खरेदी केली होती. या वाहनाचा विमा यातील जाबदारांकडे उतरविलेला असून त्याचा पॉलीसी नंबर 271500/31/1261/110 असा असून सदर विम्याचा कालावधी दि.14/04/2012 ते दि.13/4/2013 अखेर होता. म्हणजेच प्रस्तुत जाबदार वाहनधारकांना त्यांच्या वाहनास वार्षिक तत्वावर ग्राहकांचे वाहनाचे प्रकाराप्रमाणे आकारलेला, निर्धारीत केलेला हप्ता (Premium) घेवून त्यांना वाहनाचे सर्वांगीण संरक्षण पुरवण्याचा सेवा व्यवसाय करतात. प्रस्तुत प्रकरणी वरीलप्रमाणे या तक्रारदार यांने जाबदारांकडून त्याचेवरील विषयांकित वाहनासाठी विमा छत्र घेतले होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये विमा सेवा घेणार व सेवापुरवठादार असे नाते प्रस्थापित झालेचे स्पष्ट दिसते. त्यामुळे प्रस्तुत तकारदार हा यातील जाबदारांचा ग्राहक आहे हे निर्विवादरित्या स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उतर आम्ही होकारार्थी देतो.
5(1) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांचे तक्रारीमधील कथन व युक्तीवाद पाहता त्यांच्या कथनाप्रमाणे दि. 17/6/2012 रोजी श्री. प्रकाश ओसवाल व विनोद विष्णाई यांचेबरोबर कामानिमीत्त परगावी जाऊन परत येत असता काही ठिकाणी रस्ता खराब होता. त्यामुळे गाडीला ब-याच ठिकाणी दणके बसणे व दगडही लागणे असा प्रकार होवून विषयांकीत वाहन पुसेगांवजवळ आले असता सदर वाहन बंद पडले. त्यानंतर जवळपास विषयांकित गाडी दुरुस्तीसाठी योग्य मेकॅनिक उपलब्ध न झालेने त्यांनी विषयांकित गाडी टो च्या सहाय्याने साता-यात आणून आनंद मोटार रिपेअरिंग वर्क्स येथे लावली व त्याची माहिती तक्रारदार यांनी जाबदाराचे एजंट श्री. वैद्य व विमा कंपनीस दिली. संबंधीत वर्कशॉपचे प्रमुख श्री. पवार यांनी विषयांकित वाहन तपासून त्याचा टाईमिंग बेल्ट खराब झालेने तो तुटला व गाडीचे आतील पार्टस् एकमेकांवर आदळून गाडी बंद पडली व त्यामुळे Lower are, Stabilizer Bar and A.C. Pipe यांचे नुकसान झाले असे मत दिले व वाहन दुरुस्त करुन देवून त्याचा खर्च रक्कम रु.92,925/- (रुपये ब्यानऊ हजार नऊशे पंचवीस फक्त) तक्रारदारांनी वर्कशॉपला देवून गाडी दुरुस्त करुन घेतली व वरील रकमेचा अपघाती वाहन नुकसानीचा दावा प्रस्तुत तक्रारदार यांनी जाबदारांकडे नि.8/2 प्रमाणे दाखल केला. आता मंचासमोर असा प्रश्न उपस्थित झाला आहे की जाबदारांकडून वरील वाहन दुरुस्ती विमा नुकसानी तक्रारदार याना देय होईल का याचा विचार करता आम्हास प्रस्तुत प्रकरणी खालील बाबी दिसून आल्या.
प्रस्तुत तक्रारदाराचे वाहन हे सन 2006 मॉडेलचे आहे म्हणजे विषयांकीत वाहनाची खरेदी 2006 सालातील आहे तेव्हापासून अखंड 6 वर्षे तो विना तक्रार चालला व दि.17/6/2012 रोजी तो खराब झालेला टाईमींग बेल्ड तुटला व त्यामुळे साहजिकच त्याच्या संपर्कातील काही पार्टस एकमेकांवर आदळले व गाडी बंद पडली असे उपलब्ध पुराव्यावरुन व विषयांकित गॅरेज मालक (आनंद मोटार रिपेअर वर्कस) यांच्या नि.20 चे शपथपत्रातील कथनावरुन स्पष्ट होते. वास्तविक टाईमिंग बेल्ट व इतर पार्टस हे गाडीच्या मध्य अंतरभागात असतात व बंदिस्त असतात. खराब रस्त्यावरील दगड वाहनाचे इंजिनाचे आंतरभागात (टाईमींग बेल्ट) दगड लागून वाहनाचे (टाईमिंग बेल्ट) तुटून व त्यामुळे इतर पार्टस एकमेकांवर आपटून, दगड लागून वाहन अपघात झाला व नुकसान झाले हे तक्रारदाराचे कथन आम्हास शक्य वाटत नाही. प्रामुख्याने ही बाब प्रस्तुत तक्रारदाराने ठोस पुराव्यानिशी शाबीत केलेले नाही. फक्त तक्रारदाराचे तक्रारीतील कथन हा पुरावा होऊ शकत नाही. प्रस्तुत तक्रारदार यांनी नि.8/9 व नि.8/10 कडे दाखल केलेले वाहनाचे दुरुस्तीचे बिल त्यामध्ये नोंदलेल्या जर दुरुस्त्या पाहिल्या तर त्या वाहनाच्या सहा वर्षातील मशिनरीच्या वापरामुळे होणा-या बिघाडाच्या आहेत असेच दिसते वारंवार वापरामुळे त्या निर्माण होतात त्यामुळे सदर दुरुस्त्या या विषयांकित वाहनास बाहेरुन दगड लागून किंवा अपघाताने झालेल्या नाहीत तर त्या वाहन वापरामुळे झालेल्या, साहित्याची झीज, खराबी यामुळे झालेल्या आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराने अपघातामुळे विषयांकित वाहनाची नि. 8/9 व 8/10 कडे प्रकरणी सादर केलेल्या दुरुस्तीची बिले व त्यातील दुरुस्तीचे स्वरुप पाहता ती दुरुस्ती विषयांकित वाहनास झालेल्या अपघाताने निर्माण झालेली नाही हे स्पष्टहोते व ही बाब विषयांकित गाडीचे नि. 23/1 च्या सर्व्हे रिपोर्टच्याबरोबर जाबदारानी दाखल केलेल्या फोटोवरुन स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार याने विषयांकित वाहनाचा अपघात झाला, त्यामुळे वाहनाची दुरुस्ती उद्भवली ही बाब पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. त्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो. वरील कारणमिमांसा पाहता, प्रस्तुत तक्रारदार यांनी नि.8/3 कडे दाखल केलेले जाबदाराने तक्रारदार यांचा विषयांकित वाहन अपघात विमा दावा ‘Mechanical Break Down’ या कारणासाठी नाकारला, ते कारण आम्हास योग्य व संयुक्तिक वाटते व त्यामुळेच या जाबदारांनी तक्रारदार यांना त्यांचा विमा दावा नाकारुन कोणतीही सदोष सेवा दिली नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 व 4 यांचे उत्तर आम्ही नकारार्थी देतो.
6. सबब वरील सर्व कारणमिमांसा व विवेचन यांस अधिन राहून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1. तक्रारदार यांचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात येतो.
2. प्रस्तुत जाबदारांनी यातील तक्रारदारांचा अपघातग्रस्त वाहन नुकसानभरपाई
मागणीचा दावा योग्य त्या कारणाने नाकारलेने कोणतीही सदोष सेवा
तक्रारदार यांना दिलेली नाही असे घोषित करण्यात येते.
3. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
4. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.23-09-2015.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.