अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1342/2008 तक्रार दाखल तारीखः- 21/10/2008
तक्रार निकाल तारीखः- 23/08/2013
कालावधी 4 वर्ष 2 महिना 15 दिवस ग्राहक
जिजाबाई श्रीकांत पाटील, तक्रारदार
उ.व. सज्ञान, धंदाः घरकाम, (अॅड. बी व्ही साळी)
रा. एकुलती, ता. जामनेर,
जि. जळगांव.
विरुध्द
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
मार्फत शाखा अधिकारी, सामनेवाला
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. (अॅड. चौगुले)
संत कवरराम मार्केट मागे, बळीरामपेठ,
जळगाव.
नि का ल प त्र
श्री. मिलिंद सा. सोनवणे, अध्यक्ष ः प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला यांनी सदोष सेवा दिल्याच्या कारणावरुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार, दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, श्रीकांत शांताराम पाटील हे तिचे पती होते. दि. 16/11/2006 रोजी पहूर – शेंदुर्णी रस्त्यावर झालेल्या अपघातात त्यांचा मुत्यू झालेला आहे. त्याबाबत संबंधीत पोलिस ठाण्यात गु. र. क्र. 137/ 2006 दाखल करण्यात आलेला आहे. तिचे पती शेतकरी होते. गट क्र. 92 व 163 या 163 या शेतजमिनीत त्यांची सामाईक मालकी आहे.
3. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, शासन निर्णय क्र. पी अे आय एस 1205 /प्र. क्र.310/13 अे दि. 7/7/2006 अन्वये महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली. सदर योजनेत रस्त्यावरील अपघात, विज पडून मुत्यू किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतक-याचा मुत्यू झाल्यास रू 1 लाख देण्या बाबत तरतुद करण्यात आलेली आहे. शासनाशी केलेंडर करारा अंतर्गत सदर रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. तक्रारदाराच्या पतीचा मुत्यू दि. 16/11/2006 रोजी म्हणजेच सदर योजनेच्या कालावधीत झालेला आहे. त्याचा पॉलिसी क्रमांक 26000/42/06/8590000002 असा आहे.
4. तकाररदाराचे असेही म्हणणे आहे की, शासकिय परिपत्रकानुसार विमा रक्कम मिळण्यासाठी तिने तहसिलदार जामनेर जि. जळगाव यांच्या मार्फत क्लेम फॉर्म भरून दिलेला आहे. मात्र दि. 23/03/2007 रोजी सामनेवाला यांनी तिच्या पतीचे नाव 7/12 उता-यावर नमुद नाही, या कारणास्तव तिचा विमा दावा फेटाळलेला आहे. वास्तविक तिचे पती शेतकरी होते तरी देखिल सामनेवाला यांनी तिचा क्लेम नाकारून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे विमा रकमेचे रू. 1 लाख व मानसिक त्रासापोटी रू 25,000/- अर्ज खर्चासहीत मिळावेत, अशी मा्गणी तिने केलेली आहे.
5. आमच्या पुर्वाधिकारी मंचाने दि. 12/3/2009 रोजी सामनेवाला हजर होउनही जबाब दाखल करत नसल्याने, प्रस्तुत अर्ज त्यांच्या जबाबाविना चालविण्यात यावा, असा आदेश केला. मात्र त्यानंतर दि. 8/01/2010 रोजी सदरचे आदेश न्यायहितार्थ रू. 750 इतकी कॉस्ट आकारून मागे घेण्यात आले. त्यानंतर देखील सामनेवाला यांनी कॉस्ट भरलेली नाही. त्यामूळे त्यांनी दाखल केलेल्या जबाबास न्यायनिर्णय करतांना वाचता येणार नाही व त्यांच्या विरूध्द पुर्वी केलेला ‘नो से’ चा आदेश पुर्नजिवीत करण्याचा आदेश या मंचाने पारित केला. परिणामी, प्रस्तूत तक्रार सामनेवाला यांच्या जबाबाविना निर्णयीत करावी लागत आहे.
6. तक्रारदारातर्फे अॅड. बी. पी. साळी यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यांनी नि. 3 लगत दाखल केलेल्या अकरा कागदपत्रांचा विचार करण्यात यावा, अशी विनंती मंचास केलेली आहे.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? -होय.
2. तकाररदार यांना सामनेवाला यांनी सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? -होय.
3. आदेशाबाबत काय ? - अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दाक्र. 1 बाबतः-
8. तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय, याबाबत तक्रारदाराने निशाणी 3/7 ला तलाठी जामनेर यांनी जारी केलेला वारस दाखला सादर केलेला आहे. त्यात तक्रारदारास श्रीकांत शांताराम पाटील यांची पत्नी म्हणून दर्शविण्यात आलेले आहे. मयत श्रीकांत शेतकरी अपघात योजनेचा लाभार्थी होता. त्यांचा पॉलिसी क्रमांक 26000/42/06/8590000002 असा होता, या तक्रारदाराच्या पुराव्यास सामनेवाला यांनी हजर होउनही आव्हान दिलेले नाही. उलटपक्षी तक्रारदाराने सामनेवाल्यांनी तिचा क्लेम नाकारल्याबाबतचे दि. 23/03/2007 चे पत्र नि.3/10 ला दाखल केलेले आहे. त्यात तक्रारदाराच्या पतीचा वरील विमा पॉलिसी क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे. परिणामी, तक्रारदाराचे पती सामनेवाला यांचे ग्राहक होते व ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1) (ब) (v) च्या तरतुदी अन्वये मयत ग्राहकाचे वारस म्हणून तक्रारदार ठरतात. यास्तव मुददा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दाक्र. 2 बाबतः-
9. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या पतीचे नाव 7/12 उता-यास नाही, असे कारण पुढे करून विमा क्लेम नाकारून सेवेत कमतरता केलेली आहे, असा दावा तक्रारदाराने या मंचा समोर केलेला आहे. तिचे पती शेतकरी होते याबाबत तिने, सन 2006-2007 चे गट क्र. 163/2 व 92 चे 7/12 उतारे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये तका्ररदाराच्या पतीची आई सकुबाई शांताराम पाटील हिला कब्जेदार सदरी दाखविलेले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने फेरफार नोंद 287 नि. 3/8 ला दाखल केलेली आहे. त्यानुसार दि. 03/11/1987 रोजी तक्रारदाराच्या पतीचे वडिल शांताराम ओंकार पाटील मयत झाल्याने वरील गटांना तक्रारदाराचे पती व इतरांची नावे लागलेली आहेत, हे स्पष्ट होते. म्हणजेच तक्रारदाराच्या पतीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सन 1987 पासून वरील शेतमिळकतींचे वारस म्हणून तक्रारदाराच्या पतीचे हक्क निर्माण झालेले आहेत. त्यामुळे तक्रारदाराचे पती शेतकरी होते यात कोणतीही शंका राहत नाही. अशा परिस्थितीत, सामनेवाल्यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारून सेवेत कमतरता केलेली आहे, असाच निष्कर्ष निघतो. यास्तव, मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दाक्र. 3 बाबत ः-
10. मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष होकारार्थी दिलेले आहेत यावरून असे स्पष्ट होते की, तकाररदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सामनेवाल्यांनी तिचा क्लेम नाकारून सेवेत कमतरता केलेली आहे, परिणामी, तकाररदार वर नमूद शासन निर्णयाप्रमाणे रू 1 लाख इतक्या विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरते. कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना सदर दावा सामनेवाल्यांनी नाकारल्यामुळे तक्रारदार रू 1 लाख ही रक्कम विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 23/03/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे, असे आमचे मत आहे. तक्रारदाराचा विमा दावा नाकारल्यामुळे तिला झालेल्या मानसिक त्रासापोटी देखिल रक्कम मागण्याचा अधिकार तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 14(1) (ड) अन्वये आहे. तक्रारदाराने त्यापोटी रू. 25,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. आमच्या मते ती मागणी वाजवी ठरणार नाही. कारण कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना सामनेवाल्यांनी तक्रारदारास लाभापासुन वंचित तर ठेवलेच व सन 2006 ते आजतागायत तिला सदर तक्रार मंचासमोर चालविण्यास भाग पाडले. त्याच कारणास्तव तक्रारदारास प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रू. 5,000/- मंजूर करणे, आमच्या मते, न्यायास धरून होईल. यास्तव मुद्दा क्र. 03 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येत आहे.
2. सामनेवाल्यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास विमा क्लेमपोटी रू. 1,00,000/- (एक लाख मात्र) विमा क्लेम नाकारल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि. 23/03/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने अदा करावेत.
3. सामनेवाल्यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पोटी रू. 25,000/- व अर्ज खर्चापोटी रू. 5,000/- अदा करावेत.
4. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री. सी.एम.येशीराव )
अध्यक्ष सदस्य
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव