Maharashtra

Bhandara

CC/19/56

GAURISANKAR K WANJARI - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO. LTD - Opp.Party(s)

MR.V.W.GUPTA

13 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/56
( Date of Filing : 02 May 2019 )
 
1. GAURISANKAR K WANJARI
PLOT NO.62, GURUNANAK WARD NEAR GANESH MANDIR SHASTRINAGAR BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. PRAVIN K. WANJARI
PLOT NO 62 GURUNANAK WARD NEAR GANESH MANDIR SHASTRINAGAR BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO. LTD
BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. I.K.F.FINANCE LTD. THROUGH MANAGER
GULHANE PLOT NO.148 PRASHANT NAGAR AJANI CHOWK WARDHA ROAD NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Aug 2021
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योग, मा.अध्‍यक्ष)

                                                                                                             (पारीत दिनांक-13 ऑगस्‍ट, 2021)

 

01.  उभय तक्रारदारांनी  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष विमा कंपनी आणि इतर यांचे विरुध्‍द विमाकृत वाहन चोरीला गेल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍यासाठी तसेच इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

    उभय तक्रारदार हे  उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहतात. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी असून विरुध्‍दपक्ष क्रं 2  ही कर्ज पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारदार क्रं 1 हा वाहतुकीचा व्‍यवसाय करतो. तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून एकूण रुपये-7,80,000/- रकमेचे कर्ज टाटा ट्रक खरेदी करण्‍यासाठी घेतले होते आणि 41 समान हप्‍त्‍यांमध्‍ये ते कर्ज परतफेड करावयाचे होते. सदर कर्ज प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्ता क्रं 1 हा मूळ कर्जधारक आहे तर तक्रारकर्ता क्रं 2 हा सहकर्जधारक आहे.  सदर टाटा ट्रकचा क्रमांक-एम.एच.-36/एफ-1675 असा होता व त्‍याचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कपंनी कडून उतरविला होता. सदर विमा पॉलिसीचा क्रमांक-2281303/31/15/6300012837 असून  पॉलिसीचा कालावधी दिनांक-20.03.2016 पासून ते दिनांक-19.03.2017 पर्यंत होता. सदरचा विमाकृत ट्रक हा नेहमी प्रमाणे खात रोड, अयोध्‍या नगर जवळ, भंडारा येथे पार्कींगच्‍या मोकळया जागे मध्‍ये उभा ठेवलेला असता होता. विमा पॉलिसीचे वैध कालावधीत दिनांक-08 ऑगस्‍ट, 2016 रोजी रात्री  अज्ञात ईसमाने सदर ट्रक चोरुन नेला. सदर पार्कींगच्‍या जागेत अन्‍य व्‍यवसायी सुध्‍दा त्‍यांचे वाहन ठेवीत होते. दिनांक-09 ऑगस्‍ट, 2016 रोजी तक्रारकर्ता क्रं 1 हा सकाळी 09.00 वाजता पार्कींगच्‍या जागेतून विमाकृत ट्रक काढण्‍या करीता गेला असता तो त्‍या ठिकाणी आढळून आला नाही, त्‍याने आसपासचे परिसरात शोध केला, चौकशी केली परंतु ट्रक मिळाला नाही. सदर विमाकृत ट्रक हा दिनांक-08.08.2016 रोजीचे मध्‍यरात्री दिनांक-09.08.2016 उजाडता चोरीस गेला. त्‍यानंतर तक्रारकर्ता क्रं 1 याने पोलीस स्‍टेशन भंडारा येथे चोरीचा रिपोर्ट केला असता पोलीसांनी रिपोर्ट घेण्‍यास नकार दिला, त्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं 1 याने प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी, भंडारा यांचे न्‍यायालयात दिनांक-03.09.2016 रोजी फौजदारी प्रक्रिये संहिते अंतर्गत भा.दं.वि.चे कलम-379, 34 खाली फौजदारी प्रकरण क्रं-377/16 दाखल केले. न्‍यायालयाने पोलीस स्‍टेशन अधिकारी  भंडारा यांना दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजीचे आदेशान्‍वये प्रकरणात सखोल चौकशी करण्‍याचे आदेशित केले, त्‍यानुसार त्‍याच दिवशी पोलीस स्‍टेशन अधिकारी यांनी अज्ञात चोरा विरुध्‍द भा.दं.वि.चे कलम 379 अनुसार गुन्‍हा नोंद केला. पोलीसांनी एफ.आय.आर. नोंदविल्‍या नंतर गुन्‍हयाचा तपशिलाचा नमुना/घटनास्‍थळ पंचनामा तयार करुन कार्यवाही सुरु केली. सदर कार्यवाहीची प्रत तक्रारकर्ता क्रं 1 याला दिनांक-18.02.2017 रोजी प्राप्‍त झाली. दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी पोलीसांनी गुन्‍हा नोंदविल्‍या नंतर तक्रारकर्ता क्रं 1 याने सदरची बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27 मार्च, 2017 रोजी कळविली होती.   तक्रारकर्ता क्रं 1 याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला कडे क्‍लेम इन्‍टीमेशन फार्म व मोटर ईन्‍शुरन्‍स क्‍लेम फार्म दिनांक-24 मार्च, 2017 रोजी भरुन दिला जो विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27 मार्च, 2017 रोजी प्राप्‍त झाला तसेच आवश्‍यक ते सर्व दस्‍तऐवज सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे  सादर केलेत.

        तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विमाकृत वाहन चोरी संबधात सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणारी कंपनी आणि आर.टी.ओ. कार्यालय भंडारा यांना नोंदणीकृत डाकेने अनुक्रमे दिनांक-01 मार्च 2017 व दिनांक-03 मार्च, 2017 रोजी देण्‍यात  आली होती.  विमाकृत ट्रकचे चोरीचा शोध पोलीसांनी सखोल तपास करुन सुध्‍दा लागला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने उभय तक्रारदारांना दिनांक-29.12.2017 रोजी नोटीस पाठवून कर्जाची रक्‍कम रुपये-14,56,213/- थकीत असल्‍याचे नमुद केले. सदर नोटीसला तक्रारदारांनी दिनांक-08 मार्च, 2018 रोजी उत्‍तर पाठविले.  विमा पॉलिसी मध्‍ये वाहनाची किम्‍मत (Insured Declared Value-I.D.V.) रुपये-11,70,000/- दर्शविलेली आहे. शेवटी तक्रारदारांनी दिनांक-24.08.2018 रोजी नोंदणीकृत डाकेले विरुध्‍दपक्षांना नोटीस पाठवून पाठविली. सदर नोटीस दोन्‍ही विरुध्‍दपक्षांना प्राप्‍त झाली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-02 सप्‍टेंबर, 2018 रोजी नोटीसला दिलेल्‍या उत्‍तरात असे कळविले की, तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहनाचे चोरी संबधीची माहिती देण्‍यास विलंब केल्‍यामुळे त्‍याचे विमा क्‍लेमचे प्रकरण बंद केले असून विमा कंपनी कुठलीही रक्‍कम देणे लागत नाही, सदर नोटीसचे उत्‍तर तक्रारकर्ता याचे अधिवक्‍ता यांना दिनांक-30 सप्‍टेंबर, 2018 रोजी प्राप्‍त झाले. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे तक्रारदारांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

 

(अ)     विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारदारांना विमाकृत ट्रॅक्‍टरचे चोरीचा तपास न लागल्‍यामुळे विमा पॉलिसी प्रमाणे विम्‍याची रक्‍कम देण्‍याचे आदेशित व्‍हावे. किंवा पर्यायाने विमा रक्‍कम परस्‍पर विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीला कर्जाची रक्‍कम म्‍हणून परतफेड केल्‍या नंतर उर्वरीत शिल्‍लक रक्‍कम तक्रारदारांना दयावी असे आदेशित व्‍हावे.

(ब)      विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने तक्रारदारां कडून  घेणे असलेल्‍या थकीत कर्जाचा हिशोब जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावा व सदर रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून प्राप्‍त करुन घ्‍यावी. किम्‍बहुना विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणारी कंपनी, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून सदरची थकीत कर्जाची रक्‍कम प्राप्‍त करुन घेण्‍या करीता पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाने घोषीत करुन तसे दिशानिर्देश दयावेत.

(क)    विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने तक्रारदार हे  थकीत कर्जाची रक्‍कम देण्‍यास बाध्‍य असल्‍याचे जे दर्शविले आहे ती थकीत रक्‍कम देण्‍यास तक्रारदार हे पात्र नाहीत असे  जिल्‍हा ग्राहक आयोगाने आदेशित करावे.

(ड)        प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना देण्‍याचे आदेशत व्‍हावे.

(इ)   तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(ई)         या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी  उत्‍तर जिल्‍हा ग्राहक  आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 1 ते 3, क्रं-7 ते 9, क्रं 11 ते 16 तसेच 22 ते 24 हा अभिलेखाचा भाग असल्‍याने उत्‍तर देण्‍याची गरज नसल्‍याचे  तसेच तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 4 व 5 तसेच 17 ते 21 मधील मजकूर नामंजूर असल्‍याचे नमुद केले. परिच्‍छेद क्रं 10 मधील विमा पॉलिसी व कालावधी मान्‍य असल्‍याचे नमुद केले. आपल्‍या विशेष कथनात नमुद केले की, विमाकृत वाहन दिनांक-08.08.2016 रोजी चोरीस गेले आणि प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-12.04.2019 रोजी  दाखल केलेली असल्‍याने ती ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे मुदतीत नसल्‍याने खारीज करण्‍यात यावी, केवळ नोटीस दिल्‍याने कालमर्यादा वाढत नाही. दिनांक-08.08.2016 चे मध्‍यरात्री विमाकृत ट्रक चोरीस गेलेला असताना तक्रारकर्त्‍याने प्रथम माहिती रिपोर्ट (First Information Report –FIR) पोलीसांकडे दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी म्‍हणजे जवळ जवळ 05 महिने उशिराने नोंदविला तसेच तक्रारकर्त्‍याने विमाकृत ट्रकचे चोरीची सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27 मार्च, 2017 रोजी म्‍हणजेच चोरी झाल्‍याचे दिनांका पासून 07 महिने उशिराने  दिली. आपले या कथनाचे पुष्‍टयर्थ The Indian Motor Tariff Advisory Committee & Insurance Regulating Development Authority (IRDA) यांनी विमाकृत वाहनाचे विम्‍या संबधी जे कायदे, नियम व शर्ती केलेल्‍या आहेत त्‍यावर भिस्‍त ठेऊन विमा कायदयातील एकाही अटी व शर्तीचा भंग झाल्‍यास विमा रक्‍कम देय नसल्‍याचे नमुद केले. विमा पॉलिसीचे अट क्रं 1 प्रमाणे विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍याची लेखी सुचना त्‍वरीत (Immediately) विमा कंपनीला देणे आवश्‍यक आहे. विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर विमाधारकाने त्‍याची सुचना पोलीसांकडे कोणताही विलंब न लावता त्‍वरीत देणे बंधनकारक आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे दिनांक-14 मार्च, 2018 रोजीचे पत्रान्‍वये  कळविले की, विमाकृत ट्रकचे चोरीची सुचना पोलीस आणि विमा कंपनीला उशिराने दिल्‍यामुळे विमा अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने विमा दाव्‍याची रककम मिळण्‍यास पात्र नाही तथापी काही स्‍पष्‍टीकरण हवे असल्‍यास 07 दिवसाचे आत मागावे असेही नमुद केले होते परंतु तक्रारकर्त्‍याने कोणतेही उत्‍तर दिले नाही त्‍यामुळे विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-26 मार्च, 2018 रोजीचे पत्रान्‍वये तक्रारकर्त्‍या कडून कोणतेही स्‍पष्‍टीकरण न आल्‍यामुळे त्‍याचा विमा दावा देय नसलयाचे तक्रारकर्त्‍याला कळविले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा विम्‍याचे अटी व शर्ती नुसार नाकारलेला असल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी असे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने नमुद केले.

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 आय.के.एफ.फायनान्‍स लिमिटेड या कर्ज पुरवठा करणा-या कंपनीचे नाव आणि पत्‍त्‍यावर जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली असता सदर नोटीस दिनांक-30.10.2019 रोजी वि.प.क्रं 2 ला  मिळाल्‍या बाबत रजि. पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु नोटीस मिळाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 2 तर्फे कोणीही जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही व लेखी उत्‍तर दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनी विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-02.12.2019 रोजी जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे पारीत करण्‍यात आला.

05.  तक्रारदारांनी तक्रारी सोबत प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी भंडारा यांचेकडे ट्रक चोरी संबधात केलेली फीर्याद, पोलीसांनी नोंदविलेला एफ.आय.आर, घटनास्‍थळ पंचनामा, गुडस कॅरेज परमीट, योगयता प्रमाणपत्र, विमा पॉलिसी प्रत, रजि.पोस्‍टाच्‍या पावत्‍या व पोच, विमा दावा प्रपत्र, क्‍लेम इंटीमेशन, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दिलेला अर्ज, वाहनाचे नोंदणीचा दस्‍तऐवज, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केलेले दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीचे नोटीसला तक्रारकर्त्‍याने दिलेले उत्‍तर, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांना रजि.पोस्‍टाने पाठविलेली नोटीस, रजि.पावत्‍या व पोच, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍ता यांना पाठविलेले पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तक्रारकर्ता क्रं 1 याने आपला शपथे वरील पुरावा तसेच लेखी युक्‍तीवाद  दाखल केला.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरा सोबत नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी भंडारा येथील शाखाधिकारी श्री आशिष जनार्दन कुटेमाटे यांचे शपथपत्र तसेच लेखी युक्‍तीवाद  दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दस्‍तऐवज यादी प्रमाणे कमर्शियल व्‍हेईकल पॅकेज पॉलिसी, Note to HuCC, विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं 1 याला दिलेली पत्रे अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे दाखल केलेत.

07.    प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारदारां तर्फे वकील श्री व्‍ही.डब्‍लु. गुप्‍ता यांचा तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील कु.ए.व्‍ही.दलाल यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

08.  तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे दाखल दस्‍तऐवज साक्षी पुरावे तसे लेखी  व मौखीक युक्‍तीवाद यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्दा

      उत्‍तर

01

तक्रादारांची जिल्‍हा ग्राहक आयोगा समोरील तक्रार मुदतीत आहे काय?

     होय

02

वि.प. क्रं 1 विमा कंपनीने त.क. क्रं 1 चा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

      -होय-

03

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                          

                                                                                   -कारणे व मिमांसा-

मुद्दा क्रं 1 ते 3

09.   या तक्रारीचे खोलात जाण्‍यापूर्वी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे घेतलेल्‍या प्राथमिक आक्षेपावर प्रथम विचार होणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे आक्षेपा नुसार तक्रारकर्ता क्रं 1 याच्‍या विमाकृत ट्रॅकची चोरी दिनांक-08 ऑगस्‍ट, 2016 चे मध्‍यरात्री  झाली आणि तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दिनांक-02.05.2019 रोजी दाखल केली, त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे तक्रारीचे कारण घडल्‍या पासून दोन वर्षाचे आत जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल केलेली नसल्‍याने ती मुदतबाहय आहे. यासंदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं 1 याचा  विमा दावा त्‍याचे दिनांक-26 मार्च, 2018 रोजीचे पत्रान्‍वये नाकारला आणि प्रस्‍तुत ग्राहक तक्रारीची नोंदणी जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समक्ष दिनांक-02.05.2019 रोजी झालेली असल्‍याने दोन वर्षाचे आत ग्राहक तक्रार दाखल झालेली आहे कारण प्रस्‍तुत तक्रारीचे कारण हे विमा दावा नामंजूरीचे दिनांकास घडलेले आहे त्‍यामुळे तक्रार मुदतीत आहे, सबब आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर  होकारार्थी नोंदवित आहोत. विमा दावा नामंजूरीचे पत्रा पासून तक्रारीचे कारण घडत असते या बाबत वेळोवेळी मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी निवाडे पारीत केलेले आहेत त्‍या न्‍यायनिवाडयांचा आधार जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे येथे घेण्‍यात येत आहे, ते मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे खालील प्रमाणे आहेत-

I)     Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-  Revision Petition No. 3118-3144 of 2010  Lakshmi Bai &Ors.-Verus- ICICI Lombard General Insurance Company” Order   Dated- 05 August, 2011

  II)   Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-   “PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”- I (2006) CPJ-53 (NC)       

III)   Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others”

 

    10.   तक्रारकर्ता क्रं 1 याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून कर्ज घेऊन ट्रक खरेदी केला होता आणि त्‍याचा नोंदणी क्रं-MH-36-F-1675असा असून, सदर ट्रॅकची विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा पॉलिसी पॉलिसी क्रमांक-281303/31/15/6300012837 अन्‍वये काढली होती आणि विम्‍याचा कालावधी हा दिनांक-20/03/2016 ते दिनांक-19/03/2017 चे मध्‍यरात्री पर्यंत होता या बाबी उभय पक्षांना मान्‍य आहेत. विम्‍याचे वैध कालावधीत म्‍हणजे दिनांक-08-09 ऑगस्‍ट, 2016 रोजी तक्रारकर्त्‍याचे नेहमीचे पार्कींगचे जागे मधून विमाकृत ट्रकची चोरी रात्रीचे वेळेस अज्ञात व्‍यक्‍तीने केली आणि त्‍या संबधात त्‍याने त्‍वरीत पोलीस स्‍टेशन भंडारा येथे तक्रार केली असता पोलीसांनी गुन्‍हयाचा रिपोर्ट घेण्‍यास नकार दिला होता म्‍हणून तक्रारकर्ता क्रं 1 याने प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी, भंडारा यांचे न्‍यायालयात दिनांक-03 सप्‍टेंबर, 2016 रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेच्‍या कलम-156 (3) अनुसार फौजदारी प्रकरण क्रं-377/2016 दाखल केले होते त्‍यानुसार न्‍यायालयाने दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजीचे आदेशान्‍वये पोलीसांना वाहन चोरी संबधात अज्ञात चोराचे बाबतीत सखोल चौकशी करण्‍याचे आदेशित केले होते, त्‍यानुसार दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी पोलीसांनी गुन्‍हा नोंदविला होता, या बाबी प्रकरणात दाखल न्‍यायालयीन फौजदारी प्रकरण क्रं -377/2016 ची प्रत, दाखल एफ.आय.आर.ची प्रत, घटनास्‍थळ पंचनामा इत्‍यादी दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द होतात. न्‍यायालयाचे आदेशा नुसार पोलीसांनी एफ.आय.आर. नोंदविल्‍या नंतर तक्रारकर्ता क्रं 1 याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमाकृत ट्रकचे चोरीच्‍या घटने बाबत दिनांक-27 मार्च, 2017 रोजी कळविले होते ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरात तसेच शपथे वरील पुराव्‍यात मान्‍य केलेली आहे. तसेच दाखल क्‍लेम इंटीमेशन वरुन सुध्‍दा चोरीची सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला 27 मार्च, 2017 रोजी कळविल्‍याची बाब सिध्‍द होते.

11.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा युक्‍तीवाद असा आहे की, दिनांक-08.08.2016 चे मध्‍यरात्री विमाकृत ट्रक चोरीस गेलेला असताना तक्रारकर्त्‍याने प्रथम माहिती रिपोर्ट (First Information Report –FIR) पोलीसांकडे दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी म्‍हणजे जवळ जवळ 05 महिने उशिराने नोंदविला तसेच तक्रारकर्त्‍याने विमाकृत ट्रकचे चोरीची सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27 मार्च, 2017 रोजी म्‍हणजेच चोरी झाल्‍याचे दिनांका पासून 07 महिने उशिराने  दिली. या संदर्भात त्‍यांनी  The Indian Motor Tariff Advisory Committee & Insurance Regulating Development Authority (IRDA) यांनी विमाकृत वाहनाचे विम्‍या संबधी जे कायदे, नियम व शर्ती केलेल्‍या आहेत त्‍यावर भिस्‍त ठेऊन विमा पॉलिसीचे अट क्रं 1 प्रमाणे विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍याची लेखी सुचना त्‍वरीत (Immediately) विमा कंपनीला देणे आवश्‍यक आहे. परंतु वर नमुद केल्‍या नुसार चोरीची सुचना 07 महिने उशिराने दिल्‍यामुळे  आणि विमा पॉलिसीतील अट क्रं 1 चा भंग झाल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं 1 चा विमा दावा दिनांक-26 मार्च, 2018 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर करण्‍यात आला.

 12.   प्रकरणातील दाखल न्‍यायालयीन दस्‍तऐवजा वरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्ता क्रं 1 म्‍हणतो त्‍या प्रमाणे पोलीसांनी पहिल्‍यांदा एफ.आय.आर. नोंदविण्‍यास नकार दिला होता म्‍हणून त्‍याने न्‍यायालयात प्रकरण दाखल केले होते आणि न्‍यायालयीन आदेशा नंतर पोलीसांनी दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी एफ.आय.आर.नोंदविल्‍या नंतर विमाकृत ट्रक चोरी संबधाने क्‍लेम इन्‍टीमेशन लेटर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27 मार्च, 2017 रोजी दिले, ज्‍यावर ते मिळाल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची सही व शिक्‍का आहे. बहुतांश वेळी असे दिसून येते की, वाहन चोरीस गेल्‍या नंतर पोलीस विभागाव्‍दारे पहिल्‍यांदा वाहनाचा शोध घेण्‍यास वाहन मालकाला सांगितल्‍या जाते व त्‍वरीत एफ.आय.आर. नोंदविल्‍या जात नाही. हातातील प्रकरणात पोलीसांनी एफ.आय.आर. नोंदविल्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे क्‍लेम इंटीमेशनची सुचना दिल्‍याचे दिसून येते.

13.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कपंनीचे विदवान वकील कु.ए.व्‍ही.दलाल यांनी असा मौखीक युक्‍तीवाद  केला की, विमाकृत ट्रकचे चोरीची सुचना त्‍यांना घटने पासून 07 महिने उशिराने दिली, जेंव्‍हा की, विमा पॉलिसीतील अट क्रं 1 प्रमाणे चोरीच्‍या घटनेची सुचना त्‍वरीत (Immediately) देणे बंधनकारक आहे.या संदर्भात त्‍यांनी आपली भिस्‍त खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर ठेवली-

(2009) 7 Supreme Court Cases 768- “ KandimallaRaghavaiah& Company-Versus- National Insurance Company”

सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडया प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे तंबाखूचे गोडाऊनला दिनांक-22-3-1988/23-3-1988 ला आग लागून मालाचे नुकसान झाले होते आणि तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार नऊ वर्षा नंतर उशिराने दाखल केली
होती आणि तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब क्षमापित करण्‍यासाठी अर्ज सुध्‍दा केला नव्‍हता. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम-24 प्रमाणे तक्रार मुदतीत नसल्‍या कारणा वरुन तक्रार  खारीज करण्‍याचा मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा योग्‍य असल्‍याचा निर्वाळा दिला होता.

    या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं 1 याचा  विमा दावा त्‍याचे दिनांक-26 मार्च, 2018 रोजीचे पत्रान्‍वये नाकारला आणि प्रस्‍तुत ग्राहक तक्रारीची नोंदणी जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समक्ष दिनांक-02.05.2019 रोजी झालेली असल्‍याने तक्रारीचे कारण घडल्‍या पासून दोन वर्षाचे आत ग्राहक तक्रार दाखल झालेली आहे. विमा दावा नामंजूरीचे दिनांकास तक्रारीला कारण घडलेले असल्‍याने तक्रार मुदतीत आहे. करीता उपरोक्‍त नमुद मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडयाचा लाभ विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला होणार नाही.

    या शिवाय विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विदवान वकील कु.ए.व्‍ही.दलाल यांनी खालील मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालावर युक्‍तीवादाचे वेळी आपली भिस्‍त ठेवली-

(2018) 9 Supreme Court Cases 798- “ Oriental Insurance Company-Versus- parvesh Chander Chadha”

    सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडया प्रमाणे विमाधारकाने विमा कंपनीला त्‍याची विमाकृत कार चोरी गेल्‍या बाबतची सुचना दिनांक-22 मे, 1995 पर्यंत दिली नव्‍हती जेंव्‍हा की, पोलीसांनी एफ.आय.आर. दिनांक-20 जानेवारी, 1995 रोजी नोंदविला होता. विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार विमाधारकाने चोरीचे घटने बाबत त्‍वरीत  (Immediately) विमा कंपनीला सुचना देणे आवश्‍यक होते, परंतु उशिराने विमा कंपनीला कळविल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द पारीत झालेला आदेश रद्द करुन विमाधारकाची तक्रार खारीज केली होती. हातातील प्रकरणात हा मा.सर्वोच्‍च
न्‍यायालयाचा निवाडा लागू होत नाही असे जिल्‍हा आयोगाचे मत आहे, याचे कारण असे आहे की, विमाकृत ट्रक चोरीस गेल्‍याची सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला देण्‍यास तक्रारकर्ता क्रं 1 याला जो काही उशिर झालेला आहे त्‍यासाठी तो जबाबदार नसून त्‍यासाठी पोलीस विभाग जबाबदार आहे कारण त्‍यांनी त्‍वरीत त्‍याचा एफ.आय.आर.नोंदविला नाही त्‍यामुळे शेवटी त्‍याला न्‍यायालयात जावे लागले व त्‍यानंतर न्‍यायालयाचे आदेशा नंतर पोलीसांनी एफ.आय.आर.नोंदविला या बाबी दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द झालेल्‍या आहेत.

14.    या संदर्भात प्रस्‍तुत जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे मा.सर्वोच्‍च न्‍यायालय, दिल्‍ली यांनी अपिल क्रं- 653/2020 “Gurshinder Singh-Versus-Shriram General Insurance Company” या प्रकरणात दिनांक-24 जानेवारी, 2020 रोजी पारीत केलेल्‍या निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येते.

     सदर प्रकरणात अपिलार्थी विमाधारक गुरुशिंदर सिंग याचे विमाकृत वाहन दिनांक-28.10.2010 रोजी चोरीस गेले होते आणि त्‍याच दिवशी पोलीस विभागात वाहन चोरी संबधात एफ.आय.आर.नोंदविला होता.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा हा दिनांक-15.12.2010 रोजी सादर केला होता परंतु सदरचा विमा दावा हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने वाहन चोरीची घटना घडल्‍याचे दिनांका पासून 52 दिवस उशिराने सुचित केल्‍याचे कारणावरुन नामंजूर केला होता. मूळ तक्रारकर्ता श्री गुरुशिंदरसिंग याची तक्रार जिल्‍हा ग्राहक तक्रार मंच, जालंधर पंजाब यांनी मंजूर केली होती. ग्राहक मंचाचे निकालाचे विरुध्‍द मा.राज्‍य ग्राहक आयोग, पंजाब यांचेकडे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केलेले अपिल नामंजूर झाले होते परंतु मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे अपिल मंजूर केले होते. त्‍या संबधात अपिलार्थी विमाधारक श्री गुरुशिंदर सिंग याने मा.सर्वोच्‍च न्‍यायालयात सदरचे अपिल दाखल केले.

    मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने सदर निवाडयात निकाल देताना मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पूर्वीचे व्दिपक्षीय पिठाने  “Om Prakash-Versus-Reliance General Insurance & Anr.1” या प्रकरणात पारीत केलेल्‍या निवाडयावर प्रकाश टाकला. ओमप्रकाश- विरुध्‍द- रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स या प्रकरणात वाहन चोरी झाल्‍या नंतर त्‍याच दिवशी पोलीस विभागात वाहन चोरीची तक्रार नोंदविली होती आणि वाहन चोरी झाल्‍याची लेखी सुचना मागाहून उशिराने विमा कंपनीला दिली होती. ओमप्रकाश-विरुध्‍द- रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी या प्रकरणात विमाकृत वाहन दिनांक-23 मार्च, 2010 रोजी  चोरी गेले होते आणि घटनेच्‍या दुस-या दिवशी दिनांक-24 मार्च, 2010 रोजी एफ.आय.आर.पोलीस विभागात नोंदविण्‍यात आला होता परंतु विमा दावा विमा कंपनीकडे दिनांक-31 मार्च, 2010 रोजी नोंदविला होता आणि विमाधारक ओमप्रकाश याचा विमा दावा हा 08 दिवस उशिराने वाहन चोरीची सुचना दिल्‍याचे कारणा वरुन विमा कंपनीने नामंजूर केला होता. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍याचे अटी व शर्तीवर भिस्‍त ठेऊन असा युक्‍तीवाद केला होता की, विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या बरोबर ताबडतोब (Immediately) त्‍याची लेखी सुचना विमा कंपनीस देणे आवश्‍यक व बंधनकारक होते.

    मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने विमा दाव्‍या संबधी निर्णय देताना मुख्‍यतः दोन मुद्दांवर विचार केला, त्‍यातील प्रथम भाग म्‍हणजे विमाकृत वाहनास झालेला अपघात संबधात विचार केलेला आहे, अपघात प्रकरणात विमा कंपनीला अपघाता नंतर त्‍वरीत सुचना देणे आवश्‍यक आहे, जेणे करुन विमा कंपनी ही वाहनास झालेल्‍या नुकसानीचे निर्धारण सर्व्‍हेअर यांची नियुक्‍ती करुन करु शकेल.

   परंतु दुसरा भाग हा विमाकृत वाहनास झालेल्‍या चोरी संबधीचा असून ते एक फौजदारी स्‍वरुपाचे प्रकरण असल्‍याचे नमुद केले. चोरी गेलेले वाहन शोधून काढण्‍यात पोलीस विभागाची महत्‍वाची भूमीका असल्‍याने त्‍वरीत पोलीस विभागात वाहन चोरी संबधात एफ.आय.आर.नोंदविणे आवश्‍यक असल्‍याचे नमुद केले. वाहन चोरीचे फौजदारी प्रकरणात विमा सर्व्‍हेअर यांची भूमीका मर्यादित स्‍वरुपाची आहे कारण वाहन चोरीचा तपास हा पोलीसांना करावयाचा आहे. ओमप्रकाश विरुध्‍द रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी या प्रकरणात त्‍याने विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍वरीत पोलीस विभागामध्‍ये वाहन चोरी संबधात एफ.आय.आर.नोंदविला होता ओमप्रकाश या प्रकरणात विमाकृत वाहन चोरी गेल्‍या बाबत विमा कंपनीस उशिराने सुचना दिल्‍या बाबतचा भाग हा एक तांत्रीक स्‍वरुपाचा भाग असल्‍याचे नमुद करुन मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पूर्वीचे व्‍दीपक्षीय पिठाने विमाधारक ओमप्रकाश यांचा अस्‍सल विमा दावा विमाकृत वाहन चोरी झाल्‍या नंतर केवळ  विमा कंपनीला उशिराने त्‍याची सुचना दिली या कारणास्‍तव नामंजूर करणे हे योग्‍य होणार नाही असे निवाडयात नमुद केलेले आहे. विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍वरीत एफ.आय.आर.नोंदविल्‍या गेला असेल आणि पोलीसांनी वाहनाचा शोध न लागल्‍याने अंतीम अहवाल दाखल केलेला असेल. तसेच विमा कंपनीने सर्व्‍हेअर यांची नियुक्‍ती  नंतर विमाकृत वाहन चोरी गेल्‍या बाबत सर्व्‍हेअरने तसा अहवाल दिलेला असेल तर केवळ विमाकृत वाहन चोरी झाल्‍याची लेखी सुचना विमा कंपनीला उशिराने दिली या कारणास्‍तव विमा दावा विमा कंपनीला नामंजूर करता येणार नाही असे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने निवाडयात स्‍वयंस्‍पष्‍ट केले. मा.सर्वोच्‍च न्‍यायालया समोरील गुरुशिंदर सिंग –विरुध्‍द- श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी या प्रकरणात विमाकृत वाहन दिनांक-28.10.2010 रोजी चोरीस गेल्‍या नंतर पोलीस विभागात त्‍याच दिवशी एफ.आय.आर.नोंदविण्‍यात आला होता तसेच सर्व्‍हेअरने दिनांक-25.02.2011 रोजी अहवाल देऊन वाहन चोरी गेल्‍याची पुष्‍टी दर्शविली, त्‍यामुळे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने मूळ विमाधारक श्री गुरुशिंदर सिंग यांनी श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द केलेले अपिल मंजूर करुन विमा कंपनीला विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास आदेशित केले असल्‍याचे सदर निवाडया वरुन दिसून येते.

15.   आमचे समोरील हातातील प्रकरणात मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा उपरोक्‍त नमुद निवाडा तंतोतंत लागू होतो. आमचे समोरील प्रकरणात तक्रारकर्ता क्रं 1 याचे विमाकृत ट्रकची विम्‍याचे वैध कालावधीत म्‍हणजे दिनांक-08-09 ऑगस्‍ट, 2016 रोजी चोरीस गेल्‍या नंतर त्‍या संबधात  पोलीस स्‍टेशन भंडारा येथे तक्रार केली असता पोलीसांनी गुन्‍हयाचा रिपोर्ट घेण्‍यास नकार दिला होता म्‍हणून त्‍याने प्रथमश्रेणी न्‍यायदंडाधिकारी, भंडारा यांचे न्‍यायालयात दिनांक-03 सप्‍टेंबर, 2016 रोजी फौजदारी प्रकरण क्रं-377/2016 दाखल केले होते व न्‍यायालयाने दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी आदेशित केल्‍या नंतर पोलीसांनी  दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी  गुन्‍हा नोंदविला होता, या बाबी दाखल दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द होतात. यावरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्ता क्रं 1 म्‍हणतो त्‍या प्रमाणे पोलीसांनी पहिल्‍यांदा एफ.आय.आर. नोंदविण्‍यास नकार दिला होता. पोलीसांनी दिनांक-14 जानेवारी, 2017 रोजी एफ.आय.आर.नोंदविल्‍या नंतर विमाकृत ट्रक चोरी संबधाने क्‍लेम इन्‍टीमेशन लेटर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27 मार्च, 2017 रोजी दिले, ज्‍यावर ते मिळाल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची सही व शिक्‍का आहे. बहुतांश वेळी असे दिसून येते की, वाहन चोरीस गेल्‍या तर पोलीस विभागाव्‍दारे पहिल्‍यांदा वाहनाचा शोध घेण्‍यास वाहन मालकाला सांगितल्‍या जाते व त्‍वरीत एफ.आय.आर. नोंदविल्‍या जात नाही. या घटनाक्रमा वरुन असे दिसून येते की, वाहन चोरीची घटना लपविण्‍याचा तक्रारकर्ता क्रं 1 याचा हेतू नव्‍हता, उलट त्‍याने त्‍वरीत (Immediately) पोलीस स्‍टेशन भंडारा येथे तक्रार नोंदविण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु पोलीसांनी एफ.आय.आर. न नोंदविल्‍यामुळे शेवटी त्‍याला प्रथमश्रेणी न्‍यायदंडाधिकारी भंडारा यांचे न्‍यायालयात फौजदारी प्रकरण दाखल करावे लागले व त्‍यानंतर त्‍याची एफ.आय.आर.पोलीसांनी नोंदविली, यामध्‍ये जो काही उशिर झालेला आहे, तो पोलीस विभागा कडून झालेला आहे आणि पोलीसांनी उशिराने एफ.आय.आर. नोंदविल्‍या नंतर त्‍याने विमा दाव्‍याची सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिलेली आहे असे दिसून येते. जो पर्यंत  तक्रारकर्ता क्रं 1 याचे चोरी गेलेल्‍या ट्रकचा पोलीस एफ.आय.आर नोंदवित नाही तो पर्यंत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला चोरीच्‍या घटनेची सुचना तो देऊ शकत नाही व तसे सर्वसाधारण व्‍यवहारात अभिप्रेत नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

16.     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं 1 चा  अस्‍सल विमा दावा (Genuine Insurance Claim) असताना उशिराने सुचना दिली या केवळ तांत्रीक कारणास्‍तव विमा दावा नामंजूर करुन त्‍याला निश्‍चीतच दोषपूर्ण सेवा दिलेली असून त्‍यामुळे त्‍याला आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून  आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविल्‍यामुळे
तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारकर्ता क्रं 1 याचा विमाकृत ट्रॅक नोंदणी क्रं-MH-36-F-1675 संबधात विमा पॉलिसी क्रमांक-281303/31/15/6300012837 अन्‍वये विमाकृत वाहनाची घोषीत विमा रक्‍कम (Insured Declared Value-IDV) अनुसार रक्‍कम रुपये-11,70,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-26 मार्च, 2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याजासह मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-अशा रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

17.   जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करणे आवश्‍यक आहे की, तक्रारदारांनी आपले तक्रारी मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून विमाकृत ट्रक खरेदी संबधात घेतलेल्‍या कर्ज  रकमे संबधी विवाद केलेला आहे.  तक्रारदारांनी ज्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी कडून विमाकृत ट्रकचे कर्ज घेतले त्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 2 वित्‍तीय कंपनीला जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळून देखील कंपनी तर्फे कोणीही जिल्‍हा आयोगाचे समक्ष उपस्थित झाले नाही व आपली बाजू मांडली नाही तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा राशी प्राप्‍त झाल्‍या नंतर  सदर विमा रकमे मधून थकीत कर्जाची रक्‍कम समायोजित करावी अशी मागणी सुध्‍दा केलेली नाही. तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणारी कंपनी यांचे मध्‍ये जो कर्ज करार झालेला आहे आणि त्‍यातील अटी व शर्तीचे अनुपालन उभय पक्षांवर बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांचे प्रलंबित कर्जाची रक्‍कम परस्‍पर विमा कंपनीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी मध्‍ये जमा करावी असा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगास देता येणार नाही याचे कारण असे आहे की, सदर कर्जा संबधीचा झालेला करार, त्‍यातील नमुद अटी व शर्ती तसेच कर्ज खात्‍याचा उतारा जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर आलेला नाही. तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा रक्‍कम  प्राप्‍त झाल्‍या नंतर ते विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीची थकीत असलेली कर्जाची रक्‍कम भरु शकतील, अशा परिस्थितीत  तक्रारदारांचे तक्रारीतील मागणी प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीला जिल्‍हा ग्राहक आयोग कोणताही आदेश देऊ शकत नाही करीता विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनी विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणा-या कंपनीने कर्ज खात्‍याचा उतारा तक्रारकर्ता क्रं 1 याला पुरवावा असे निर्देशित करण्‍यात येते.

18. उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

                                                                         -अंतिम आदेश-

(01)    उभय तक्रारदारांची विरुध्‍दपक्ष  क्रं 1 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे वरिष्‍ठ  शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा- जिल्‍हा परिषद चौक, भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)    वि.प. क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ता क्रं 1 यास  त्‍याचे विमाकृत वाहनाचे विमा पॉलिसी पोटी घोषीत विमा रक्‍कम (Insured Declared Value-IDV) रुपये-11,70,000/- (अक्षरी रुपये अकरा लक्ष सत्‍तर हजार फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-26 मार्च, 2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला अदा करावे. सदर आदेशाचे अनुपालन वि.प.विमा कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीमध्‍ये आदेशाचे अनुपालन न केल्‍यास सदर घोषीत विमा रक्‍कम रुपये-11,70,000/- विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-26 मार्च, 2018  पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने दंडनीय व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्ता क्रं 1 याला  देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची राहिल.

(03)     वि.प. क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार  अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा तक्रारदारांना अदा कराव्‍यात.

(04)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा जिल्‍हा परिषद चौक, भंडारा तर्फे वरिष्‍ठ शाखा व्‍यवस्‍थापकानीं प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

(05) तक्रारदारांची विरुध्‍दपक्ष क्रं-2 आय.के.एफ. फायनान्‍स लिमिटेड मार्फत ऑथोराईज्‍ड सिग्‍नेटरी कार्यालय विजयवाडा/शाखा कार्यालय नागपूर यांचे विरुध्‍दची खारीज करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष क्रं 2 संबधात तक्रारदारांनी केलेल्‍या मागण्‍या योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी नामंजूर करण्‍यात येतात.

(06)   सदर निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 (07)  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेले अतिरिक्‍त संच उभय पक्षकारांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.