निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1012/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः- 11/08/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 11.09.2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-15/10/2009
कै.रामदास आनंदा पाटील (जगताप)
(मयताचे कायदेशीर वारसदार)
1. भिकूबाई रामदास पाटील, (जगताप)
वय- 46 वर्षे,धंदा-घरकाम,
2. प्रदीप रामदास पाटील, (जगताप)
2.वय- 32 वर्षे,धंदा-मजुरी,
3. नितीन रामदास पाटील (जगताप)
3.उ.व.27 वर्षे, धंदा-मजूरी,
3.तक्रारदार क्र. 1 ते 3 रा.उमरदे,
3.ता.एरंडोल, जि.जळगांव.
4. वंदना राजेश पाटील,
4.उ.व.30 वर्षे, धंदा-घरकाम,
4.रा.मोहाडी, ता.पारोळा, जि.जळगांव. .......... तक्रारदार
4.
विरुध्द
1. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि,
विभागीय शाखा जळगांव,
ब्रँच मॅनेजर, नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि,
दुसरा माळी, 299 साई बाबा मार्केट, बळीराम पेठ,
जळगांव, ता.जि.जळगांव.
2. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.,
4 अ, देहमंदीर, सोसायटी, श्रीरंग नगर,
माई लेले श्रवण विकास विद्यालय समोर,
पंपीग स्टेशन समोर रोड, नाशिक 422 013. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 15/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.देवेंद्रसिंह जे.जाधव वकील हजर
सामनेवाला क्रं. 1 तर्फे श्री.के.बी.खिवसरा वकील हजर
सामनेवाला क्र. 2 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार क्र. 1 ही मयत रामदास आनंदा पाटील (जगताप ) यांची पत्नी असुन तक्रारदार क्र. 2 ते 4 हे मयताचे मुले व मुलगी असुन कायदेशीर वारस आहेत. सामनेवाला क्र. 2 मार्फत सामनेवाला क्र. 1 या विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा या योजनेअंतर्गत तक्रारदार क्र. 1 चे मयत पती रामदास आनंदा पाटील यांचा विमा पॉलीसी क्र.26000/42/06/96000002 अन्वये विमा उतरवला होता. रामदास आनंदा पाटील (जगताप) हे दि.11/5/2007 रोजी एरंडोल येथुन उमरदा येथे शेतीसाठी बियाणे घेऊन मोटार सायकलवर जात होते. दुपारी 4 ते 4.30 च्या दरम्यान मयत रामदास पाटील यांचा एरंडोल पोलीस स्टेशनचे हद्यीत मोटार सायकल अपघात होऊन त्यांना गंभीर जखमा झाल्या. रामदास आनंदा पाटील (जगताप)यांना औषधोपचार करण्यासाठी प्रथम जळगांव येथील डॉ.महेश चोपडे यांचेकडे दाखल केलेंडर तथे प्रथमोपचार करुन त्यांना जळगांव सिटी ट्रामा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले त्यानंतर जळगांव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांचेवर औषधोपचार चालु असतांना त्यांचा दि.17/05/2007 रोजी मृत्यु झाला. योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन दाखल केलेला विमा क्लेम सामनेवाला क्र. 1 विमा कंपनीने दि.4/10/2007 रोजी पत्र पाठवुन नामंजुर केला. सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे क्लेम नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा प्रदान केलेली आहे. सबब तक्रारदार क्र. 1 हिचे पतीचे अपघाती निधनाबाबत विम्याची मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख मात्र ) दि.11/5/2007 पासुन 18 टक्के व्याजासह सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडुन वसुल होऊन मिळावेत व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सामनेवाला क्र. 1 विमा कंपनीने तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदारांना प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला विमा कंपनीने नाशिक, नागपुर, अमरावती व औरंगाबाद येथील वय वर्षे 12 ते 75 असलेल्या ज्या व्यक्तींचे नांवे 7/12 उता-याला किंवा 8 ए ला शेत जमीनीची नोंद असेल अशा शेतक-यांसाठी विमा पॉलीसी क्रमांक 260600/47/06/960000002 दि.15/7/2006 ते दि.14/7/2007 या कालावधीसाठी पॉलीसीमध्ये नमुद अटी व शर्ती नुसार उतरवली होती. मयत हा अपघात झाला त्यावेळी त्याचे स्वतःचे मालकी असलेल्या शेतात शेतीकामात व्यस्त होता व अपघातात झालेल्या जखमांमुळेच त्याचा मृत्यु झाला हे तक्रारदारांनी योग्य त्या सक्षम पुराव्यानीशी शाबीत करणे गरजेचे आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांकडे मयताचे मोटार ड्रायव्हींग लायसन्सची संबंधीत पोलीस स्टेशनने साक्षांकीत केलेली प्रत मागणी केली असता तक्रारदाराने लायसन्स संबंधी योग्य तो पुरावा सादर केलेला नाही. केवळ वाहनाचे आर.सी.बुक प्रस्तुतकामी उपयोगी नसुन मयताचे मोटार ड्रायव्हींग लायसन्स दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. तसेच तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या एफ.आय.आर मध्ये देखील मयत रामदास आनंदा पाटील यांचेकडे अपघात समयी वैध ड्रायव्हींग लायसन्स नसल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. मयत रामदास आनंदा पाटील यांनी हयगयीने वाहन चालवुन स्वतःचे मृत्युस कारणीभुत झालेले आहेत. मोटार व्हेईकल ऍक्ट 1988 च्या तरतुदींचा तसेच विमा पॉलीसी अटी व शर्तींचा भंग झालेला असल्याने सामनेवाला विमा कंपनीने कायदेशीररित्या तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 1 विमा कंपनीने केलेली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दोन्ही बाजुंनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
4. तक्रारदार क्रमांक 1 चे पती व तक्रारदार क्र. 2 ते 4 चे वडील मयत रामदास आनंदा पाटील (जगताप) यांनी त्यांचे हयातीमध्ये सामनेवाला क्र. 2 यांचेमार्फत सामनेवाला क्र. 1 विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा या योजनेअतर्गत विमा पॉलीसी क्रमांक 26000/42/06/96000002 अन्वये दि.15/07/2006 ते दि.14/07/2007 या कालावधीसाठी विमा उतरवला होता हे सामनेवाला विमा कंपनीने मान्य केलेले असुन सोबत विमा पॉलीसीची प्रत दाखल केलेली आहे. सबब तक्रारदार क्रमांक 1 ते 4 हे सामनेवाला विमा कंपनीचे ग्राहक होतात या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
5. तक्रारदार क्र. 1 चे पती रामदास आनंदा पाटील हे दि.11/5/2007 रोजी एरंडोल येथून उमरदा येथे शेतीसाठी बियाणे घेऊन मोटार-सायकलने जात असतांना दुपारी 4 ते 4.30 चे सुमारास एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्यीत अपघात होऊन त्यात गंभीर जखमी होऊन रामदास आनंदा पाटील हे जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगांव येथे उपचार घेत असतांना त्यांचा दि.17/05/2007 रोजी मृत्यु झाला ही बाब वादातीत नाही. तक्रारदार क्रमांक 1 यांनी त्यांचे पतीचे अपघाती मृत्युनंतर सामनेवाला यांचेकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दाखल केलेला विमा क्लेम क्रमांक 26000/42/07/9690000814 हा नामंजुर केला व नामंजुर करतांना एफ.आय.आर नुसार मयताकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे कारणावरुन क्लेम नाकारल्याचे नमुद केले. सदर सामनेवाला यांनी बेकायदेशीररित्या तक्रारदाराचा क्लेम नाकारल्याचे नमुद करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल केलेली आहे. प्रस्तुतकामी दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता प्रामुख्याने एक बाब स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी विमा पॉलीसी ची कव्हर नोटची सत्यप्रत सादर केलेली असुन सामनेवाला यांनी विमा पॉलीसीच्या ज्या अटी व शर्ती नुसार तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला त्या या मंचासमोर सादर केलेल्या नाहीत. तक्रारदार क्र. 1 चे पती अपघातात मयत झाले याबाबत तक्रारदारांनी नि.क्र.1 लगत एरंडोल पोलीस स्टेशन चे एफ.आय.आर.ची प्रत, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, मयत रामदास जगताप यांचा पी.एम.रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत व सदर कागदपत्रावरुन तक्रारदार क्र. 1 चे पतीचे अपघातात निधन झाल्याची बाब स्पष्ट होते. केवळ मयताकडे अपघात समयी वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे कारणावरुन विमा क्लेम नाकारणे ही सामनेवाला विमा कंपनीचे सेवेतील त्रृटी असल्याचे तसेच मयत रामदास आनंदा पाटील (जगताप) यांचे कायदेशीर वारस तक्रारदार क्र. 1 ते 4 हे त्यापोटी सामनेवाला विमा कंपनीकडुन विमा क्लेमची रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना विमा क्लेम ची रककम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रु.एक लाख मात्र ) दि.11/8/2008 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
( क ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 500/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्रं. 1 व 2 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( फ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 15/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव