Exh.No.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.13/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि.27/03/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि.20/06/2012
श्री गजानन यशवंत निकम
वय 40 वर्षे, व्यवसाय – शेती,
मु.पो.नेरुर कर्याद नारुर,
ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
नॅशनल इंश्युरंस कंपनी लिमिटेड
IX, स्टर्लिंग सिनेमा बिल्डिंग, 6 वा मजला,
65, मर्सबान रोड, मुंबई – 400 001. ... सामनेवाला.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फे – प्रतिनिधी श्री दिलिप राणे
सामनेवालातर्फे - विधिज्ञ श्री एन. आर. भणगे, श्री जी.टी. पडते.
(मंचाच्या निर्णयाद्वारेमा. श्री. एम. डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.20/06/2012)
1) प्रस्तुतची तक्रार स्वीकृत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झालेले आहेत. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. सुनावणीच्या वेळी तक्रारदारांचे प्रतिनिधी श्री दिलिप राणे यांनी युक्तीवाद केलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांचे वकीलांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी युक्तीवाद केलेला आहे.
2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत व ते त्यांच्या कुटूंबियासह शेती करतात. राज्य शासनाने शेतक-यांकरिता शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी उतरविलेली आहे.
3) तक्रारदार तक्रारीत पुढे सांगतात, दि.1/4/2009 रोजी सकाळी 11 वाजता तक्रारदार हे घराची साफसफाई करीत असतांना हातातील केरसुणी घरातील वीज वाहक तारेला लागून सदर तार तुटली व सदर तार तक्रारदारांच्या अंगावर पडली. त्यामुळे तक्रारदारांना वीजेचा जोरदार धक्का बसला व तक्रारदाराचे शरीर भाजले गेले व पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल केले. दि.5/4/2009 रोजी तक्रारदाराच्या उजव्या हाताच्या कोपरापासून पुढे 2 ते 3 इंचावर पुर्ण विच्छेदन केल्याने उजवा हात पूर्ण कापला गेला तसेच डाव्या हाताचा पंजा सदर अपघातात भाजल्याने पूर्णता निकामी झाला.
4) तक्रारदार तक्रारीत पुढे सांगतात, दि.20/8/2009 रोजी सर्व त्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कुडाळ यांचेमार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम मागीतला असता विमा कंपनीने फक्त 40 टक्के अपंगत्व आहे या कारणावरुन क्लेम नाकारला. वास्तविक अपंगत्वाच्या दाखल्यामध्ये 40 टक्के पेक्षा जास्त (Above 40 %) असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे . सबब मूळ दावा रक्कम रु.50,000/- व त्यावर 12 टक्के चक्रवाढव्याजाने होणारी रक्कम रु.20,246/-, तक्रारीचा खर्च रु.9000/-, व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- रक्कम मिळण्यासाठी विनंती केली आहे.
5) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत नि.3 च्या यादीने कागदपत्रे दाखल केलेली आहे.
6) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांची तक्रार अमान्य केलेली आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदाराने अपंगत्वाबाबत वैदयकीय प्रमाणपत्र हजर केलेले आहे. त्यामध्ये (Above 40 %) असे लिहिण्यात आलेले आहे, परंतू कराराच्या अटीनुसार अंशतः अपंगत्व असल्यास त्यास विमा संरक्षण देता येणार नाही. तक्रारदारांना ज्या जखमा झालेल्या आहेत त्यावरुन कायम स्वरुपी अपंगत्व आले असे म्हणता येणार नाही. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे घरातील विजेचा धक्का लागून दुखापत झाली त्याची नुकसान भरपाई मागता येणार नाही. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
7) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केलेले आहे. तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांचा व्यवसाय शेती आहे. ही वस्तुस्थिती सामनेवाला विमा कंपनीस मान्य आहे तसेच राज्य शासनाने राज्यातील शेतक-यासांठी सामनेवाला विमा कंपनीकडून पॉलिसी घेतलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांना त्यांच्या घरी साफसफाई करतांना विजेचा धक्का लागून अपघात झालेला आहे व त्याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशन, कुडाळ याठिकाणी दिलेली दिसून येते. तसेच पोलीसांनी साक्षीदारांचे जबाब घेतलेले आहेत. अपघातानंतर तक्रारदारांना हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेलेले होते व त्यामधील पेपर्स प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. तक्रारदारांच्या उजव्या हाताच्या कोपरापासून पुढे पुर्ण हात काढल्याचा दिसून येतो. तक्रारदार हे सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर होते. सिव्हिज सर्जन, सिंधुदुर्ग यांनी अपंगत्वाचा दाखला हा 40 टक्के पेक्षा जास्त (Above 40 %) दिला असल्याचे दिसून येते. तक्रारदारांचा हात हा पूर्ण काढून टाकला गेला असल्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या शेती व्यवसायाचे कोणतेही काम त्यांना करता येणार नाही ही वस्तुस्थिती सामनेवाला विमा कंपनीने विचारात घेणे आवश्यक होते. अपंगत्वाचा दाखला हा 40 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे तसेच तक्रारदारांना त्यांचा शेती व्यवसाय करणे अशक्य आहे ही बाब विचारात घेतली असता अंशतः अपंगत्व आहे असे म्हणता येणार नाही. सदर बाबींचा विचार करता तक्रारदार हे त्यांनी मागीतलेली क्लेम रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षापत हे मंच येत आहे.
सबब आदेश -
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रकक्म रु.50,000/-(रुपये पन्नास हजार मात्र) दयावेत व सदर रक्कमेवर दि.1/4/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत दयावे.
3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तसेच तक्रार खर्चापोटी रु.2000/- (रुपये दोन हजार मात्र) दयावेत असेही आदेशीत करण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 20/06/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.