Maharashtra

DCF, South Mumbai

100/2007

Mr. Morrice Fernandes, Partner, - Complainant(s)

Versus

National Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

C. Venkatachalam

03 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. 100/2007
 
1. Mr. Morrice Fernandes, Partner,
Siddhivinayak Services, VLT Block, Dambar Compound, Mukund Nagar, Dharavi, Sion Bandra Link Road,
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co. Ltd.
Nation Insurance Co. Ltd., D.O.No.260301,Sterling Cinema Bldg, 6th floor,65, Murzban Road, Fort,
2. Desai and Deshpande, Surveyors,
Mumbai
Mumbai
Maharastra
3. The Chief Manager, Bank of India
Mumbai
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष

     ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
1) तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांच्‍याकडून त्‍यांच्‍या व्‍यवसायासाठी रक्‍कम रु.4,463/- चा प्रिमीयम देवून Standard Fire & Special Perils Policy क्रं.260301/11/04/3101317 दि.22/02/2005 ते दि.21/02/2006 या कालावधीसाठी घेतलेली होती. सदर पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी ‘अ’ ला सादर केली आहे. सामनेवाला 2 बँकेकडून कर्ज घेतले असून त्‍या कर्जासाठी तक्रारदारांनी त्‍यांच्‍या कारखान्‍याच्‍या आवारातील माल तारण गहाण म्‍हणून ठेवला होता. सामनेवाला 3 ह‍े सामनेवाला 1 चे सर्व्‍हेअर आहेत.

2) दि.26/07/2005 रोजी अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे पुराचे पाणी तक्रारदारांच्‍या कारखान्‍याच्‍या गोडाऊनमध्‍ये शिरले व पुराच्‍या पाण्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमधील मालाचे फार मोठे नुकसान झाले. तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांना सर्व्‍हेअर पाठवून झालेल्‍या नुकसानीची पाहणी करावी असे सांगितले. IRDA च्‍या मार्गदर्शक तत्‍वाप्रमाणे नुकसानीची माहिती मिळाल्‍यानंतर 72 तासाच्‍या आत सर्व्‍हेअरनी झालेल्‍या नुकसानीची पाहणी करणे आवश्‍यक असते परंतु सामनेवाला 1 चे सर्व्‍हेअर सामनेवाला 3 यांनी IRDA मार्गदर्शक तत्‍वानुसार सर्व्‍हे मुदतीत केला नाही व अंतिम अहवाल सुध्‍दा मुदतीत सादर केला नाही. सामनेवाला 3 यांच्‍या मागणीप्रमाणे तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे उपलब्‍ध करुन दिली असताना सुध्‍दा सामनेवाला 3 यांनी तक्रारदारांची मुद्दामहून अडवणूक केली..

3) दि. 26/07/2005 च्‍या अतिवृष्‍टीमुळे पुराचे पाणी तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमध्‍ये शिरल्‍यामुळे रु.16,93,800/- चे नुकसान झाले त्‍याची माहिती व कागदपत्रे सर्व्‍हेअरला दिली असतानासुध्‍दा सामनेवाला 3 यांनी सामनेवाला 1 यांना तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दिली नाही असे मुद्दामहून कळविले. त्‍यामुळे सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांचा क्‍लेम दि.20/03/2006 च्‍या पत्राने नाकारला.

4) सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या विमा पॉलिसीमध्‍ये आश्‍वासित रक्‍कम रु.18,00,000/- दिली होती. सामनेवाला 1 व सामनेवाला 3 यांनी संगनमत करुन तक्रारदारांचा खरा क्‍लेम नाकारला आहे असा तक्रारदारांनी आरोप केलेला आहे.

5) चुकीच्‍या कारणावरुन सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारल्‍यामुळे तक्रारदारांना आर्थिक अडचण निर्माण झाली. अतिवृष्‍टीपूर्वी सामनेवाला 2 बँकेनी तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमधील मालाची तपासणी करुन तो माल रु.19,83,475/- चा असल्‍याचे प्रमाणपत्र दिलेले होते. तक्रारदार आकर्ष इंजिनीअरींग या नावाचा दूसरा व्‍यवसाय करतात. सिध्दिविनायक सर्व्हिसेसने त्‍यांच्‍या व्‍यवसायासाठी खरेदी केलेल्‍या मालाची किंमत देण्‍यासाठी आकर्ष इंजिनीअरीगकडून रु.12,00,000/- कर्ज घेतले होते. वास्‍तविक विमा पॉलिसीप्रमाणे सामनेवाला 1 यांनी तक्रारदाराना झालेल्‍या नुकसानीची भरपाई देणे आवश्‍यक होते. सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांच्‍या क्‍लेम संबंधी निर्णय घेण्‍यास विलंब केला व शेवटी चुकीच्‍या कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला म्‍हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केला. सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.16,93,800/- द्यावेत व त्‍यावर 18 टक्‍के दराने व्‍याज द्यावे. तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.50,000/- नुकसान भरपाई, या अर्जाचा खर्च म्‍हणून 25,000/- सामनेवाला यांच्‍याकडून वसूल करुन द्यावेत अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्‍या पृष्‍ठयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे.

6) सामनेवाला 1 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली. तक्रार अर्ज गैरसमजूतीवर आधारीत असून तक्रार अर्जात केलेले आरोप खोटे असल्‍याने तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्‍यात यावा असे सामनेवाला 1 यांचे म्‍हणणे आहे. तक्रारदारांनी महत्‍वाच्‍या बाबी या मंचापासून लपवून ठेवल्‍या असून या मंचाची दिशाभूल करण्‍यासाठी खोटी विधाने केलेली आहेत.

7) सामनेवाला 1 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी पुराच्‍या पाण्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या झालेल्‍या नुकसानीची माहिती सामनेवाला 1 यांना 15 दिवसाच्‍या कालावधीनंतर दि.11/08/2005 रोजी दिली. तक्रारदारांकडून माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाला 1 यांनी सामनेवाला क्रं. 3 यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली त्‍याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी सर्व्‍हे करुन त्‍याबाबतचा सविस्‍तर अहवाल सामनेवाला 1 यांना सादर केला. सदर अहवालामध्‍ये त्‍यांनी झालेल्‍या नुकसानीची प्रत्‍यक्ष पाहणी केली त्‍यावेळी तक्रारदारांचे नुकसान फक्‍त रु.10,86,825/- झाल्‍याचे दिसुन आले. सर्व्‍हेअरनी नुकसान झालेल्‍या मालाची साल्‍वेजची किंमत रु.2,46,825/- अशी निश्चित केलेली आहे. प्रत्‍यक्ष तक्रारदारांकडे असलेल्‍या मालाचा साठा हा रु.17,00,000/- चा होता परंतु तक्रारदारांनी त्‍यांच्‍या स्‍टॉक स्‍टेटमेंटमध्‍ये रु.19,20,725/- असल्‍याचे म्‍हटले आहे. सामनेवाला 1 यांनी सर्व्‍हेअरनी सादर केलेल्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये तक्रारदारांचे जे नुकसान झाले त्‍या संबंधीचा तपशील कैफीयत परिच्‍छेद क्रं.3 मध्‍ये नमूद केला असून सर्व्‍हेअरनी तक्रारदारांचे झालेले नुकसान रु.7,06,296/- झाले असल्‍याचे म्‍हटले आहे.

8) सामनेवाला 1 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांना नुकसान झालेल्‍या मालाची मालकी सिध्‍द करता आली नाही. तक्रारदारांनी सर्व्‍हेअरला मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांना दि.29/03/2005 च्‍या रु.20,00,000/- दिलेल्‍या बिलाची छायांकित प्रत दिली. सदरचे बिल तक्रारदारांच्‍या नावाचे नसून ते सिध्‍दीविनायक इंटरप्राइजेस यांच्‍या नावाचे होते. तक्रारदारांनी सदर बिलांची रक्‍कम मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि यांना दिली या बद्दलचा काहीही पुरावा सादर केला नाही. तक्रारदारांनी याकामी पुराव्‍याचे शपथपत्र निशाणी ‘इ’ ला दाखल केले असून त्‍यामध्‍ये तक्रारदार फर्मचे एक भागीदार मोरीसफर्नांडीस हे आकर्ष इंजिनीअरींग चे प्रोप्रायटर आहेत. आकर्ष इंजिनीअरींगने तक्रारदारांना रक्‍कम रु.12,00,000/- कर्ज म्‍हणून दिले व ते कर्ज मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि यांनी सिध्‍दविनायक सर्व्हिसेसला पुरविण्‍यात आलेल्‍या मालाची किंमत म्‍हणून घेतले होते असे म्‍हटले आहे. परंतु, तक्रारदारांनी मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि यांना प्रत्‍यक्षात तथाकथित मालाची खरेदीसाठी पैसे दिले होते हे दाखविता आले ना‍ही. ज्‍या धनादेशाने मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि यांना पैसे दिले होते असे तक्रारदारांनी कथन केले आहे ते धनादेश मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि च्‍या नावे तक्रारदारांनी दिलेले नाहीत. सामनेवाला यांनी मे. आकर्ष इंजिनीअरच्‍या हिंदुस्‍तान को-ऑ. बँक लि.,धारावी यांच्‍याकडे असणा-या खात्‍याची माहिती काढली तेव्‍हा धनादेश क्रं.739360 दि.17/03/2004 चा रु.1,00,000/- चा केशव मित्‍तल या नावाने दिला होता. तर दूसरा धनादेश क्रं.739361 दि.28/03/2005 चा रु.3,00,000/-चा युनायटेड लाइनर एजन्‍सी यांना दिला होता व तिसरा धनादेश क्रं.739365 दि.04/04/2005 चा रु.8,00,960/- चा आर.एन.ट्रेडर्स यांच्‍या नावे तक्रारदारांनी दिला होता असे आढळून आले. चौकशीच्‍या वेळी मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि.यांच्‍याकडून ज्‍या मालाचे नुकसान झाले तो माल विकत घेतला होता असा काही पुरावा तक्रारदारांनी सादर केलेला नाही. अशा परिस्‍ि‍थतीत ज्‍या मालाचे नुकसान झाले त्‍याची मालकी तक्रारदारांना सिध्‍द करता आली नाही त्‍यामुळे नुकसान झालेल्‍या मालामध्‍ये तक्रारदारांना Insurable Interest होता हे सिध्‍द करता आले नाही. नुकसान झालेल्‍या मालासंबंधीची मालकी सिध्‍द केल्‍याशिवाय त्‍या मालाची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मागता येत नाही. तक्रारदारांनी पुराव्‍याच्‍या शपथपत्रामध्‍ये काहीही म्‍हटले असले तरी ते सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदारांना कागदोपत्री पुरावा दाखल करता आला नाही.


9) सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत देसाई आणि देशपांडे यांची दि.15/01/2006 च्‍या सर्व्‍हे रिपोर्टची प्रत जोडली आहे.


10) सामनेवाला 1 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी सर्व्‍हेअरला एक बिना तारखेचे पत्र पाठविले होते व त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी स्‍पष्‍टपणे कबूल केलेले आहे की, सुरुवातीला त्‍यांच्‍या मॅनेजरनी तक्रारदारांचे झालेले नुकसान रु.2,50,000/- असल्‍याचे तोंडी सामनेवाला 2 यांना सांगितले होते त्‍यानंतर 3 महिन्‍याच्‍या कालावधीने तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांच्‍याकडे रु.17,00,000/- नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून अर्ज केला होता. तक्रारदारांनी लिहीलेले बिना तारखेचे पत्र सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत निशाणी ‘2’ ला सादर केलेले आहे. नुकसान झालेल्‍या मालाचे तक्रारदार मालक होते हे तक्रारदारांना पुराव्‍यानिशी सिध्‍द न करता आल्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे.


11) सामनेवाला 1 यांनी तक्रार अर्जात केलेले सर्व आरोप नाकारलेले आहेत. तक्रार अर्जामध्‍ये झालेल्‍या नुकसानासंबंधी सामनेवाला यांना ताबडतोब कळविले होते असे तक्रारदारांनी मोघमपणे विधान केले असले तरी प्रत्‍यक्ष किती तारखेला त्‍यांनी सामनेवाला यांना पत्र पाठविले व त्‍यातील तपशील मुद्दामहून या मंचाच्‍या निदर्शनास आणलेला नाही. सामनेवाला यांनी IRDA च्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार 72 तासाच्‍या आत झालेल्‍या नुकसानीची सर्व्‍हेअर मार्फत पाहणी केली नाही हा तक्रारदारांनी केलेला आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. सामनेवाला 1 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी झालेल्‍या नुकसानीची माहिती सामनेवाला 1 विमा कंपनीला खूप उशिराने दिली व दिलेली माहिती बरोबर दिली नाही. तक्रारदारांनी त्‍यांचे रु.16,93,800/- नुकसान झाले असे खोटे विधान केले आहे. नुकसान झालेल्‍या मालासंबंधीचा हक्‍क व त्‍यामध्‍ये Insurable Interest होता हे तक्रारदारांना सिध्‍द करता आले नाही त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे. त्‍यामुळे ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे असे म्‍हणता येणार नाही. वरील कारणावरुन तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्‍यात यावा असे सामनेवाला 1 यांचे म्‍हणणे आहे.

12) सामनेवाला 2 यांनी स्‍वतंत्र कैफीयत दाखल करुन तक्रार अर्जात जो वाद नमूद केला आहे त्‍याच्‍याशी सामनेवाला 2 यांचा काहीही संबंध नाही असे म्‍हटले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला 2 यांच्‍या विरुध्‍द तक्रार अर्ज करण्‍यास काहीही कारण घडले नसून तक्रार अर्जात सामनेवाला 2 यांच्‍या विरुध्‍द काहीच मागणी केलेली नाही. सामनेवाला 2 यांना विनाकारण या कामी पक्षकार करण्‍यात आलेले आहे. सबब सामनेवाला 2 यांचे नाव तक्रार अर्जातून कमी करण्‍यात यावे अशी सामनेवाला 2 यांनी विनंती केलेली आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊन मधील माल सामनेवाला 2 बँकेकडे तारण गहाण ठेवला असून सामनेवाला 2 हे सदर मालाच्‍या साठयाची वेळोवेळी तपासणी करतात हा तक्रार अर्जात दिलेला मजकूर सामनेवाला 2 यांनी मान्‍य केला. तसेच, सामनेवाला 2 यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या मालाच्‍या साठयाबाबत प्रमाणपत्र दिलेले आहे हे सुध्‍दा सामनेवाला 2 यांनी मान्‍य केले आहे. तथापि, सामनेवाला 2 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रार अर्जातील वादाशी काहीच संबंध नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार अर्ज रद्द करण्‍यात यावा. सामनेवाला 2 यांनी कैफीयतीच्‍या पृष्‍ठयर्थ त्‍यांचे मॅनेजर, जी.एन.सावंत यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सामनेवाला 3 यांच्‍यावर नोटीस बजावूनसुध्‍दा ते या मंचासमोर हजर न राहिल्‍यामुळे दि.04/06/2008 रोजी सामनेवाला 3 यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.


13) तक्रारदारांनी दि. 29/08/2008 रोजी यादीसोबत कागदपत्रे दाखल केली असून त्‍यामध्‍ये भागीदार पत्राची छायांकित प्रत तसेच बँक ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र, केशव ए. मित्‍तल मॅनेजिंग डायरेक्‍टर, मे. अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि यांचे शपथपत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी पुराव्‍याचे शपथपत्र सादर करुन लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच, सामनेवाला 1 यांनी पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.

14) तक्रारदारांच्‍या वतीने अडव्‍होकेट सरपते व सामनेवाला 1 यांच्‍या वतीने अडव्‍होकेट एस.के.शेट्टी यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.


15) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-

मुद्दा क्रं. 1 – तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करता आले काय?

उत्तर – होय. 

मुद्दा क्रं. 2 – तक्रारदारांना तक्रार अर्जात मागितल्‍याप्रमाणे रु.16,93,800/-, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई, या अर्जाचा खर्च मागता येईल काय? 
उत्त‍‍र       अंतिम आदेशाप्रमाणे.
 
कारण मिमांसा :-
 
मुद्दा क्रं. 1 - तक्रारदारांनी सामनेवाला 1 विमा कंपनीकडून Standard Fire & Special Perils Policy दि.22/02/2005 ते दि.21/02/2006 या कालावधीसाठी घेतली होती ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. सदरची पॉलिसी सिध्‍दीविनायक सर्व्हिस यांच्‍या नावाने असून पॉलिसीमध्‍ये दिलेली अ‍ाश्‍वासित रक्‍कम रु.18,00,000/- आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.26/07/2005 रोजी मुंबईत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पुराचे पाणी तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमध्‍ये शिरले व त्‍यामुळे त्‍या ठिकाणी असणा-या त्‍यांच्‍या मालाच्‍या साठयाचे फार मोठे म्‍हणजेच रु.16,93,800/- चे नुकसान झाले. सदरची नुकसान भरपाई Standard Fire & Special Perils Policy अंतर्गत सामनेवाला 1 यांच्‍याकडून मिळण्‍यासाठी तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रार अर्जात तक्रारदारांनी म्‍हटल्‍याप्रमाणे पुराचे पाणी त्‍यांच्‍या कारखान्‍याच्‍या गोडाऊनमध्‍ये शिरल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानीबाबत सामनेवाला 1 यांना ताबडतोब माहिती दिली असून सामनेवाला 1 यांनी सामनेवाला 3 यांना सर्व्‍हेअर म्‍हणून नेमले. सदर सर्व्‍हेअरच्‍या मागणीप्रमाणे तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे देवूनसुध्‍दा सदर सर्व्‍हेअरनी तक्रारदारांना मुद्दामहून त्रास दिला. सामनेवाला 1 यांनी कैफीयतीमध्‍ये सामनेवाला 3 यांना सर्व्‍हेअर म्‍हणून नेमले होते हे मान्‍य करुन कैफीयतीसोबत सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर रिपोर्टमध्‍ये सर्व्‍हेअरनी मालाच्‍या झालेल्‍या नुकसानातून साल्‍वेजची किंमत, under insurance, Excess 5 टक्‍के वजा करता निव्‍वळ नुकसान रु.7,06,296/- आहे असे नमूद केले आहे. सदर सर्व्‍हेअरनी त्‍यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केलेला आहे की, “Although, the damages have been caused due to flood but just only on the physical verification of damages and also the documents submitted in support of claim which are not co-related to the subject claim to prove the insurable interest of the Insured, we are of the opinion that there is no liability on the part of the underwriters for the claim and we therefore recommend repudiation of the claim”या कामी सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांचा क्‍लेम खालील पुढील कारणावरुन नाकारलेला आहे – Claim close as “No Claim, Since Insurable Interest not Exist”
 
            सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रार अर्जात मोरीसफर्नांडीस यांनी सिध्‍दीविनायक सर्व्हिस चे प्रोप्रायटर असे तक्रारदारांचे वर्णन केले होते. त्‍यानंतर प्रोप्रायटर हा शब्‍द खोडून त्‍या ऐवजी पार्टनर हा शब्‍द हाताने लिहीला. तक्रार अर्जाचे शिर्षक पाहता मोरीसफर्नांडीस यांचे नाव प्रोप्रायटर सिध्‍दीविनायक सर्व्हिस असे सुरुवातीला दिसते आता प्रोप्रायटरच्‍या ऐवजी पार्टनर हा शब्‍द लिहीलेला आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सिध्‍दीविनायक सर्व्हिस ही तक्रारदारांची पार्टनरशि फर्म आहे. तक्रारदारांनी दि. 01/01/1997 ची पार्टनरशिप डीडची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. सदरच्‍या पार्टनरशिप डीडमध्‍ये मोरीसबी. फर्नांडीस आणि सुरेश एस. अमिन हे पार्टनर असल्‍याचे तक्रारदारांच्‍या वतीने सांगण्‍यात आले. सदरची पार्टनरशिप ही नोंदणीकृत पार्टनरशिप नाही हे तक्रारदारांना मान्‍य आहे.
 
            सामनेवाला 1 यांनी त्‍यांच्‍या लेखी युक्तिवादामध्‍ये मे. सिध्‍दीविनायक सर्व्हिस ही नोंदणीकृत भागीदारी संस्‍था नाही असे म्‍हटले आहे. जी भागीदारी संस्‍था नोंदणीकृत नाही अशा भागीदारी संस्‍थेला त्‍यांच्‍या नावाने दावा किंवा तक्रार अर्ज करता येत नाही असे सामनेवाला तर्फे सांगण्‍यात आले. तक्रारदारांच्‍या वतीने दाखल केलेल्‍या पुराव्‍याच्‍या शपथपत्राध्‍ये मोरीसफर्नांडीस यांनी असे म्‍हटले आहे की, त्‍यांनी व त्‍यांचा मेव्‍हणा श्री.सुरेश एस.अमीन यांनी 1997 साली सिध्‍दीविनायक सर्व्हिसेस ही भागीदारी संस्‍‍था सुरु केली तसे भागीदारपत्र तयार करण्‍यात आले. परंतु, त्‍यांचा मेव्‍हणा सुरेश यांच्‍याशी घनिष्‍ठ संबंध असल्‍यामुळे सिध्‍दीविनायक सर्व्हिसेस ही भागीदारी संस्‍था रजिस्‍टर करण्‍यात आली नाही. तक्रारदारांचे वकील सरपते यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे भागीदारी संस्‍था नोंदणीकृत नसजी तरी अशी भागीदारी संस्‍था ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीप्रमाणे तक्रार अर्ज ग्राहक मंचासमोर दाखल करु शकते. आपल्‍या वरील म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ तक्रारदारांच्‍या वकिलांनी मा.राष्‍ट्रीय आयोगाचा तेज मोहन प्रोप्रायटर सचदेव इंडस्ट्रिस विरुध्‍द दीप अग्रवाल पार्टनर मे.बी.एन.अग्रवाल 2010(1) CPR 94 (NC) या निकालाचा आधार घेतला. वरील खटल्‍यातील मा.राष्‍ट्रीय आयोगने असे नमूद केले आहे की, “Consumer Protection Act, 1986 Section 2(1) (d) (m) and 13-Complaint-Institution of complaint by a Partner of a firm cannot be questioned-Even if a firm is not registered, it does not suffer disqualification as a ‘person’ as defined in section 2(1) (d) (m) also includes a firm whether registered or not.”
 
           सामनेवाला यांच्‍या वतीने सांगण्‍यात आले की, तक्रार अर्जात तक्रारदारांनी सिध्‍दीविनायक सर्व्हिस ही भागीदारी संस्‍‍था आहे असे म्‍हटले असले तरी तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्‍यामध्‍ये त्‍या संस्‍थेच्‍या दि.31/03/2003 ते 31/03/2005 या कालावधीच्‍या टाळेबंदच्‍या छायांकित प्रती दाखल केल्‍या त्‍यामध्‍ये मे. सिध्‍दीविनायक सर्व्हिस ही श्री.सुरेश एस. अमीन हे प्रोप्रायटर आहेत असे म्‍हटले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा एकमेकांशी विसंगत आहे. सुरेश अमीन यांना या कामी पक्षकार केलेले नाही त्‍यामुळे सदरचा अर्ज रद्दबातल होण्‍यास पात्र आहे.
 
           तक्रारदारांच्‍या वतीने असे सांगण्‍यात आले की, सदरचा अर्ज हा सिध्‍दीविनायक या भागीदारी संस्‍‍थेच्‍या वतीने केलेला असून सुरेश अमीन हे त्‍या भागीदार संस्‍‍थेचे भागीदार असल्‍यामुळे त्‍यांचे नाव स्‍वतंत्रपणे तक्रारदार म्‍हणून लिहीण्‍याचे कारण नव्‍हते. या कामी सामनेवाला 1 यांनी उपस्थित केलेल्‍या वरील बाबींमध्‍ये फारसे तथ्‍य नाही कारण सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांना तक्रार अर्जासोबत दाखल केलेली पॉलिसीStandard Fire & Special Perils Policy ही सिध्‍दीविनायक सर्व्हिस यांच्‍या नावानेच दिलेली आहे. त्‍यामध्‍ये सिध्‍दीविनायक सर्व्हिस ही भागीदारी संस्‍था आहे किंवा प्रोप्रायटर कन्‍सलटंट आहे असे कुठेही नमूद केलेले नाही. सिध्‍दीविनायक सर्व्हिस ही विमा धारक असून त्‍यांनीच सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी उपस्थित केलेल्‍या आरोपांमध्‍ये तथ्‍य वाटत नाही.
 
             तक्रारदारांनी दि.26/07/2005 च्‍या पुराच्‍या पाण्‍यात त्‍यांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमधील मालाचे नुकसान झाले म्‍हणून सामनेवाला यांच्‍याकडून रक्‍कम रु.16,93,800/- नुकसान भरपाई म्‍हणून मागितले आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांना नुकसान झालेल्‍या मालासंबंधी मालकी हक्‍क सिध्‍द करता आला नाही. तक्रारदारांनी नुकसान झालेल्‍या मालामध्‍ये Insurable Interest नाही या कारणावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे.
 
            तक्रारदारांचा क्‍लेम मिळाल्‍यानंतर सामनेवाला यांनी देसाई आणि देशपांडे यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली होती. त्‍या सर्व्‍हे रिपोर्टची प्रत सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत निशाणी ‘अ’ ला दाखल केलेली आहे. सदरच्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये सर्व्‍हेअरनी तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमध्‍ये जावून प्रत्‍यक्ष पाहणी करुन तक्रारदारांकडे याबाबत चौकशी केली. तक्रारदारांच्‍या मागील 3 वर्षाच्‍या कालावधीतील टाळेबंद पाहिला. तक्रारदारांनी सर्व्‍हेअरला मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांच्‍याकडून माल खरेदीचे बिल दाखविले. सर्व्‍हेअरनी प्रत्‍यक्ष पाहणी केल्‍यानंतर तक्रारदारांचे एकूण रु.10,86,825/- किंमतीच्‍या मालाचे नुकसान झाले असून त्‍यातून salvage, under insurance व 5 टक्‍के Excess ची रक्‍कम वजा करुन तक्रारदारांचे एकूण झालेले नुकसान रु.7,06,296/- असल्‍याचे नमूद केले. तथापि, सर्व्‍हेअरच्‍या मताप्रमाणे तक्रारदारांनी क्‍लेमसोबत जी कागदपत्रे दाखल केली ती तक्रारदारांनी केलेल्‍या क्‍लेमशी संबंधीत नाही. तक्रारदारांना नुकसान झालेल्‍या मालामध्‍ये Insurable Interest सिध्‍द करता आला नाही. सर्व्‍हेअरच्‍या वरील रिपोर्टच्‍या आधारे सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांचा क्‍लेम दि.20/03/2006 रोजी नाकारला.

             सामनेवाला 1 यांनी या कामी सर्व्‍हेअर अभय देशपांडे यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले असून त्‍यामध्‍ये सर्व्‍हेअर देशपांडे यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारदारांना मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांना मालाच्‍या खरेदीपोटी दिलेल्‍या पैशासंबंधीचा तपशील त्‍यांनी बँकेच्‍या स्‍टेटमेंटशी पडताळणी करुन पाहीले असता तो चुकीचा असल्‍याचे आढळून आले. देशपांडे यांनी पुराव्‍याच्‍या शपथपत्राबरोबर आकर्ष इंजिनीअरींग वर्कच्‍या हिंदुस्‍तान को-ऑप बँकेतील खाते उता-याच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.


             तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.26/07/2005 पूर्वी मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांच्‍याकडून रु.20,00,000/- चा माल विकत घेतला होता व सदरचा माल त्‍यांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमध्‍ये पडलेला होता. तक्रारदारांनी दि.26/07/2005 रोजी त्‍यांच्‍या गोडाऊनमध्‍ये असलेल्‍या मालाचा तपशील तक्रार अर्जासोबत दिलेला असून एकूण माल रु.16,93,800/- चा होता असे म्‍हटले आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदार मोरीस फर्नांडीस यांचा आकर्ष इंजिनीअरींग या नावाचा दूसरा व्‍यवसाय असून आकर्ष इंजिनीअरींगने तक्रारदारांच्‍या सिध्‍दीविनायक सर्व्हिसला वरील माल खरेदी करण्‍यासाठी रु.12,00,000/- चे कर्ज दिले होते. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या टाळेबंदात आकर्ष इंजिनीअरकडून रु.12,00,000/-चे कर्ज घेतल्‍याची नोंद नाही. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी मालाच्‍या किंमतीपोटी मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांना मालाचे पैसे दिल्‍याचा विश्‍वासहार्य पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी याकामी मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि.चे व्‍यवस्‍थापक श्री.केशव ए.मित्‍तल यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. केशव मित्‍तल यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांनी सिध्‍दीविनायक सर्व्हिसला दि.26/07/2005 च्‍या अति वृष्‍टीपूर्वी रु.20,00,000/- चा माल विकला त्‍या मालाचे पैसे ते सिध्‍दीविनायक सर्व्हिसकडे मागत होते. आकर्ष इंजिनीअरींगने सिध्‍दीविनायक सर्व्हिसला रु.12,00,000/- चे कर्ज दिले. केशव मित्‍तल यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ज्‍यावेळी मोरीस फर्नांडीस सिध्‍दीविनायक सर्व्हिसच्‍या वतीने त्‍यांना धनादेशाने रक्‍कम देण्‍यास आले त्‍यावेळी त्‍यांनी मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांना प्रत्‍यक्ष पैसे न देता धनादेशाने काही रक्‍कम आर.एन.ट्रेडर्स यांना द्या असे सांगितले कारण, मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. ही आर.एन.ट्रेडर्सना पैसे देणे लागत होती. त्‍याप्रमाणे मोरीस फर्नांडीस यांनी रु.3,00,000/- दि.28/03/2005 तारखेचा धनादेश क्रं.739361 व दूसरा धनादेश दि.04/04/2005 चा क्रं.739365 चा रक्‍कम रु.8,00,000/- चा आर.एन.ट्रेडर्सला दिला व तिसरा धनादेश रक्‍कम रु.1,00,000/- त्‍यांच्‍या नावे दिला असे म्‍हटले आहे. मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. व्‍यवस्‍थापक केशव मित्‍तल यांच्‍या प्रतिज्ञापत्रावरुन सिध्‍दीविनायक सर्व्हिस यांनी घेतलेला रु.20,00,000/-च्‍या मालाच्‍या किंमतीपोटी रु.12,00,000/- मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांना दिले असे दिसुन येते. केशव मित्‍तल यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे रु.8,00,000/- मे.सिध्‍दीविनायक सर्व्हिसकडून येणे बाकी आहे.

             सामनेवाला 1 यांच्‍या सर्व्‍हेअरनी ज्‍यावेळी तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील गोडाऊनमध्‍ये भेट दिली व प्रत्‍यक्ष पाहणी केली त्‍यावेळी तेथे त्‍यांना रु.10,86,825/- मालाचे नुकसान झाल्‍याचे आढळून आले. सर्व्‍हेअरनी आपल्‍या रिपोर्टमध्‍ये तक्रारदारांनी सदरचा माल मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांच्‍याकडून खरेदी केल्‍यासंबंधीचे बिल दाखल केले. वर नमूद केल्‍याप्रमाणे मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांना मे. सिध्‍दीविनायक सर्व्हिसकडून मालाच्‍या किंमतीपोटी रु.12,00,000/- मिळाल्‍याचे केशव मित्‍तल मॅनेजिंग डायरेक्‍टर मे.अक्‍मे कॉम्‍प्रेसर रिबिल्‍डर्स प्रा.लि. यांनी शपथपत्रात मान्‍य केले. वरील पुरावा विचारात घेता सामनेवाला 1 यांच्‍या सर्व्‍हेअरच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांना नुकसान झालेल्‍या मालामध्‍ये Insurable Interest सिध्‍द करता आला नाही असा जो निष्‍कर्ष काढला तो चुकीचा असल्‍याचे दिसुन येते. वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम दि.20/03/2006 रोजी नाकारला असल्‍याने ती सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे असे म्‍हणावे लागते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

मुद्दा क्रं. 2 तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांच्‍याकडून दि.26/07/2005 च्‍या पुरामध्‍ये त्‍यांच्‍या मालाच्‍या झालेल्‍या नुकसानापोटी रु.16,93,800/- ची मागणी केलेली आहे. सामनेवाला 2 व 3 यांच्‍याकडून काहीही मागणी केलेली नाही. तक्रारदारांनी दि.26/07/2005 च्‍या पुराच्‍या पाण्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या कारखान्‍याच्‍या गोडाऊनमध्‍ये असलेल्‍या मालाचे नुकसान झाले. तथापि, उपलब्‍ध कागदपत्रांवरुन असे दिसुन येते की, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या झालेल्‍या नुकसानाची माहिती सामनेवाला यांना दि.11/08/2005 रोजी क्‍लेम दाखल केला त्‍यावेळी म्‍हणजेच 15 दिवसाने दिली. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत नुकसान झालेल्‍या मालाची यादी दाखल केली असून त्‍या मालाची किंमत रु.16,93,800/- अशी नमूद केलेली आहे. सदरच्‍या नुकसान झालेल्‍या मालाची यादी दि.07/10/2005 या तारखेची आहे. सामनेवाला 1 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी मागितलेली नुकसान भरपाईची रक्‍कम अवास्‍तव जादा आहे. दि.26/07/2005 च्‍या पूरानंतर सामनेवाला यांच्‍या सर्व्‍हेअरनी दि.14/08/2005 रोजी भेट दिली व नुकसान झालेल्‍या मालाची प्रत्‍यक्ष पाहणी केली. तक्रारदारांच्‍या वतीने सर्व्‍हेअर यांना बिना तारखेचे पत्र दिले असून त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे मॅनेजर वेरबल्‍ली यांनी सामनेवाला 2 बँक ऑफ इंडिया यांना पुराच्‍या पाण्‍यामुळे तक्रारदारांच्‍या मालाचे अंदाजित रु.2,50,000/- नुकसान झाले असे तोंडी सांगितले असे पत्रात नमूद केले आहे. सामनेवाला यांनी सदरच्‍या पत्राची छायांकित प्रत कैफीयतीसोबत हजर केलेली आहे.

             सामनेवाला यांच्‍या सर्व्‍हेअरनी तक्रारदारांच्‍या झालेल्‍या नुकसानीची पाहणी केली होती ही बाब तक्रारदारांना मान्‍य आहे. तक्रारदारांच्‍या नुकसान झालेल्‍या मालाची एकूण किंमत रु.10,86,825/-असल्‍याचे सर्व्‍हेअरनी त्‍यांच्‍या रिपोर्टमध्‍ये नमूद केलेले आहे. वरील नुकसान झालेल्‍या मालाच्‍या किंमतीमधून साल्‍वेज, under Insurance, 5 टक्‍के Excess ची रक्‍कम वजा करता तक्रारदारांचे झालेले नुकसान रक्‍कम रु.7,06,296/- वर निश्चित केले आहे. सर्व्‍हेअरने काढलेल्‍या नुकसानीच्‍या रकमेवर म्‍हणजेच रु.7,06,296/- वर विश्‍वास ठेवण्‍यास हरकत नाही असे वाटते. सबब सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.7,06,296/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल.


             सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम दि.20/03/2006 रोजी नाकारला त्‍या दिवसापासून तक्रारदारांनी 18 टक्‍के दराने व्‍याजाची मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी केलेली व्‍याजाची मागणी जास्‍त दराने केलेली आहे. या प्रकरणातील वस्‍तुस्‍ि‍थतीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.20/03/2006 पासून रक्‍कम रु.7,06,296/- वर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल.

             तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍याकडून त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- व या अर्जाच्‍या खर्चापोटी रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी मागितलेली नुकसान भरपाई अवास्‍तव जादा आहे. सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी 7,000/- व या अर्जाचा खर्च म्‍हणून रु.3,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर त्‍याप्रमाणे देण्‍यात येते.

               वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रार अर्ज अंशतः मंजूर करुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.


 आ दे श

 

1) तक्रार अर्ज क्रं.100/2007 सामनेवाला 1 यांच्या विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येतो.
 
2) सामनेवाला 1 द नॅशनल इन्शुअरन्स‍ कं.लि. यांनी तक्रारदारांना रु.7,06,296/- (रुपये सात लाख सहा हजार दोनशे शहाण्णव फक्त) द्यावेत व वरील रकमेवर दि.20/03/2006 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज 
    संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत.
 
3) सामनेवाला 1 द नॅशनल इन्शुअरन्स कं.लि. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.7,000/- (रुपये सात हजार फक्त) व या अर्जाचा खर्चपोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त‍) द्यावेत.
 
4) सामनेवाला 2 व 3 यांच्‍याविरुध्द तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्यात येतो.
 
5) या आदेशाचे पालन सामनेवाला यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे.
 
6) सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देण्यात यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.