( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 22, आक्टोबर, 2010 ) प्रस्तुत तक्रारकर्तीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या व ज्यांच्या नावे शेती आहे अशा कुटुंबाच्या भविष्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना राबविली. या योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे विमा रक्कम अदा करुन विमा काढलेला होता. तक्रारकर्तीचे मयत पती जयराम सदरशिव देशमुख त्यांचे नावे मौजा नेरी तह.मोहाडी, जिल्हा भंडारा येथे सामाईक कुटुंबाची शेती होती. दिनांक 22.7.2007 रोजी शेतामध्ये काम करीत असतांना अचानक अंगावर वीज पडल्याने मयताचा जळुन जागीच मृत्यु झाला. पोलीसांनी सदर घटना मर्ग क्रं.84/2007 अंतर्गत नोद केली आहे. तसेच मृतकाचे शवविच्छेदन अहवालात देखिल त्याचा जळुन मृत्यु झाला अशी नोद केली आहे. सदर अपघाती मृत्युची नोद पटवारी यांचेकडे करण्यात आली. त्यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे तक्रारदाराने कागदपत्रांची जुळवाजुळवा करुन दावा प्रपत्र सोबत संपुर्ण कागदपत्रे तसेच बँकचे खाते क्रं.व त्यासोबत पासबुकची सत्यप्रत तहसीलदारामार्फत दिनांक 12.20.2007 रोजी गैरअर्जदारक्रं. 2 यांचेकडे सादर केली. गैरअर्जदाराने मृतकाच्या वयाचा लेखी पुरावा सादर करण्याची सुचना तक्रारदारास केली. तक्रारदाराने दिनांक 21.9.2008 रोजी मयताच्या वयाचा पुरावा तहसीलदारामार्फत सादर करण्यात आला. त्यावरुन मयत हे 60 वर्षाचे होते. सदर वयाचा पुरावा सादर केल्यानंतर गैरअर्जदार क्रं. 2 यांनी सदर दावा बंद केल्याचे तहसीलदार यांनी तोडी सांगीतले. दिनांक 12.3.2010 रोजी गैरअर्जदार यांनी राजु मासुरकर यांचे प्रकरण क्रं. 13/2010 मध्ये दावा नाकारलेल्या व्यक्तिंची यादी लावलेली आहे. सदर यादीमध्ये तक्रारदाराचा दावा बंद करुन दावा खारीज केलेला आहे असे स्पष्ट दिसुन येते. वास्तविक सदरचा दावा संपुर्ण दस्तऐवज प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत निकाली काढावयास पाहीजे होते. परंतु गैरअर्जदार यांनी दोन वर्षानंतर सदरचे दावा प्रकरण बंद केले. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचा विमा दावा रक्कमेचे भुगतान केलेले नाही. ही गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन शेतकरी अपघात विमा रक्कम रुपये 1,00,000/- व सदर रक्कमेवर अपघात झाल्यापासुन 15 टक्के दराने रक्कम मिळेपर्यत व्याजाची मागणी केली आहे. तसेच मानसिक,आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 30,000/- व प्रकरणाचा खर्च रुपये 5,000/- इत्यादी मागण्या केल्या आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार प्रकरणात हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदाराने क्रं.1 ने तक्रारदाराचे नावे मौजा नेरी,तह. मोहाडी,जिल्हा भंडारा येथे सामाईक शेती असल्याचे तसेच महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या शेतक-यांसाठी सदर योजने अंतर्गत विमा काढल्याचे तक्रारदाराचे म्हणणे मान्य केलेले आहे. परंतु तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांचे कथनानुसार जरी सदरचा विमा शेतक-यांच्या हितासाठी/मदतीसाठी काढलेला असता तरी त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणुन काही अटी व नियम घालुन दिलेले आहे. गैरअर्जदाराने दिनांक 26.5.2008 चे पत्रान्वये विमा दावा आवश्यक कागदपत्रांची पुर्तता 30 दिवसाचे आत करण्यात यांवी असे तक्रारकर्तीस सांगीतले होते तरीसुध्दा दिनांक 21.8.2008 रोजी तक्रारकर्तीन उत्तर पाठविले व त्यात संबंधीत 6 क च्या अर्जाची मुळ प्रत तक्रारदाराने सादर केलेली नाही. तसेच गैरअर्जदाराने वयाच्या दाखल्याची मागणी केल्यावर दिनांक 21.9.2008 रोजी तक्रारदाराने मृतकाचे वय 60 वर्षे असल्याचा पुरावा तहसिलदारामार्फत सादर केला. कुठलेही ठोस पूरावे तक्रारदाराने वेळेत सादर केले नाही. म्हणुन तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नाही. गैरअर्जदार जरी कंपनी असली तरी नियमांचे पालन करणे हे कुठल्याही कायद्याप्रमाणे गुन्हा ठरत नाही म्हणुन तक्रारकर्तीची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली. गैरअर्जदार क्रं. 2 यांच्या कथनानुसार गैरअर्जदार क्र.2 ही विमा विनीयामक आणि विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञाप्ती प्राप्त विमा सल्लागार कंपनी असुन महाराष्ट्र सरकारला सदर विमा राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करते. गैरअर्जदार क्रं.2 यांचे कार्य केवळ तालुका कृषी अधिंकारी/ जिल्हाधिकारी यांच्याकडुन आलेल्या विमा दाव्याचा अंर्ज पडताळणी करणे तसेच विमा कंपनीने मागणी केलेले दस्तावेज त्यास जोडली आहे किंवा नाही हे पाहुन, ते नसल्यास त्यांची पुर्तता करुन सदर विमा दावा गैरअर्जदार कंपनीला पाठविणे, दावा मंजूर होऊन अंतिम धनादेश संबंधीत वारसांना देणे एवढेच आहे. तक्रारकर्तीने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार कागदपत्रे दाखल केलीत. तर गैरअर्जदार क्रं.1 यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला तसेच गैरअर्जदार क्रं. 2 यांचा लेखीजवाब 3 कागदपत्रासह पोस्टाने प्राप्त झाला. तक्रारदार व गैरअर्जदार क्रं.1 ने पुरसीस दाखल केले. -: कारणमिमांसा :- प्रकरणातील वस्तुस्थितीवरुन असे निर्देशनास येते की, निर्वीवादपणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात वास्तव्य करणा-यांना शेतक-यांकरिता व त्यांचे कुटुंबाचा विचार करुन गैरअर्जदार यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम अदा करुन शेतकरी अपघात विमा काढला होता. निर्वीवादपणे तक्रारकर्तीचे मयत पती यांचे सामाईक खात्यात शेत दर्शविलेले आहे. दाखल दस्तऐवजावरुन ते शेती करीत होते असे निर्दशनास येते. गैरअर्जदाराचे म्हणणे की त्यांनी मागणी करुनही तक्रारदाराने 6 क चा दाखल्याची मुळ प्रत गैरअर्जदाराकडे सादर केली नाही. तसेच मयताच्या वयाचा लेखी पुरावा सादर करण्यास सांगीतल्यावर दिनांक 21/9/2008 रोजी तक्रारकर्तीने मयताच्या वयाचा पुरावा तहसीलदारामार्फत सादर केला. त्यानुसार मृतकाचे वय 60 वर्षे होते हे खोटे आहे. तसेच तक्रारकर्तीने ठोस कागदपत्रे वेळेच्या आत सादर केले नाही म्हणुन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्यात आला. कागदपत्र क्रं वर तक्रारदाराने सादर केलेले दिनांक 28.5.2008 रोजी इंन्श्युरन्स कंपनीचे पत्र, तसेच गैरअर्जदाराचे कथनाचा विचार करता गैरअर्जदाराने इतर कागदपत्रासोबत 6 क ची मुळ प्रतीची मागणी तक्रारकर्तीकडे केली होती. तहसीलदार मोहाडी यांनी सदर पत्राचे उत्तरात (कागदपत्र क्रं.35) वर असे नमुद केले आहे की तक्रारकर्तीने मयत पतीचे नावे मौजा नेरी येथे सामाईक खात्यात शेती दर्शविली आहे व सदर जमिन सामाईक असल्याने तक्रारदाराचे नावे फेरफार झालेली नसल्याने 6 क उपलब्ध नाही. तहसिलदार खैरनार यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांना पाठविलेले दिनांक 21/1/2008 चे अवलोकन करता असे निर्देशनास येते की दिनांक 21/09/2008 रोजी गैरअर्जदार यांनी तहसीलदाराकडे इतर कागदपत्रांसह वयाच्या दाखल्याची मागणी केलेली होती. सदर दस्तऐवज दिनांक 21.9.2008 रोजी गैरअर्जदार क्रं.2 यांना प्राप्त झालेले आहे. तक्रारकर्तीने (कागदपत्र क्रं22.) सादर केलेल्या मृतकाच्या शाळा बदलल्याचे प्रमाणपत्राचे अवलोकन करता असे लक्षत येते की, मृतकाची जन्म तारीख दिनांक 12.1.1957 असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. ते पाहता मयताचे वय अपघाताचे वेळी 51 वर्षाचे होते. गैरअर्जदार क्रं.2 यांनी आपल्या कथनासोबत गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचा दावा नाकारल्याचे दिनांक 13.3.2009 रोजीचे पत्र दाखल केले आहे. ते तक्रारदारास मिळाल्याचा पुरावा दिसुन येत नाही. विमा दावा नाकरल्याचे तसे पत्र पाठविल्याचा कुठलाही उल्लेख गैरअर्जदार क्रं. 1 इन्श्युरन्स कंपनीच्या प्रतिज्ञापत्रावरील जबाबात केलेला दिसुन येत नाही. एवढेच नव्हे तर कागदपत्र क्रं. 35 व 36 वरुन गैरअर्जदार यांनी मागणी केलेले दस्तावेज गैरअर्जदारांना दिनांक 13.3.2009 पुर्वीच प्राप्त झालेले दिसुन येते. वरील वस्तु आणि परिस्थिती पाहता असे लक्षात येते की गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विमा दावा कोणत्याही आधाराशिवाय अयोग्यरित्या नाकारलेला आहे. तसेच दावा नाकारल्याची लेखी सुचना न देता केवळ तोंडी सुचना तहसीलदारा मार्फत तक्रारदारास दिलेली आहे. तीही ब-याच विलंबाने तक्रारकर्तीस मिळालेली आहे. यावरुन गैरअर्जदार क्रं. 1 च्या सेवेत कमतरता दिसुन येते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दिलेल्या सेवेत कमतरता दिसुन येते नाही म्हणुन त्यांना तक्रारदाराच्या नुकसान भरपाईस जबाबदार धरता येणार नाही. म्हणुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. 2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 1,00,000/- अदा करावे. सदर रक्कमेवर दिनांक 21.9.2008 पासुन प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यत 9 टक्के दराने द.सा.द.शे व्याज द्यावे. 3. मानसिक व शरिरिक त्रासापोटी रुपये 5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- गैरअर्जदार क्रं.1 ने तक्रारकर्तीस द्यावा. 3. 4. गैरअर्जदार क्रं.2 विरुध्द कुठलाही आदेश नाही. 4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Mrs.Jayshree Yangal] Member[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs. Jayshree Yende] MEMBER | |