तक्रारकर्त्यातर्फे वकील ः- श्री. पी.पी.थेर,
विरूध्द पक्ष क्र. 1 तर्फे वकील ः- श्री. एम.के.गुप्ता
विरूध्द पक्ष क्र. 2 तर्फे वकील ः- श्री. जयेश बुच
विरूध्द पक्ष क्र. 3 तर्फे ः- तालुका कृषी अधिकारी
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 25/03/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि व क्रं-2) इंन्शुरंन्स ब्रोकींग लि. कं. व इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत स्वतःच्या अपघातामूळे एक अवयव निकामी होणे संबधात विमा दावा फेटाळल्याने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून स्वतः व्यवसायाने शेतकरी होता व आहे व त्याचे मालकीची मौजा सुब्रायटोला, तालुका- देवरी जिल्हा- गोंदिया येथे भूमापन क्रं. 17/1 ज्याचा एरिया 2.85 हे.आर. ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि क्रं-2) इंन्शुरंन्स ब्रोकींग लि. कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ता स्वतःचा एक अवयव महणजे उजवा हात पूर्ण निकामी झाल्यामूळे शेतकरी विमा योजनेअंतर्गत रुपये-1,00,000/-एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने तो कायदेशीर “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-21/05/2016 रोजी आपले शेतीवरील बोरचे पाणी शेतात बागबगीचेकरीता सकाळी 7.00 वाजताच्या सुमारास गेले असता, त्यांचेवर रानडुकराने प्राणघातक हमला केला. त्यामुळे तक्रारकर्त्याचा उजवा हात पूर्ण निकामी झाला. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने त्याने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 यांचे कार्यालयात दिनांक-31/01/2017 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक दस्ताऐवज दिल्यानंतरही तक्रारकर्त्याने दाव्याबाबत दि. 18/05/2018 रोजी विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना कायदेशीर प्रस्तावाबाबत माहिती मागीतली. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आजपर्यंत तक्रारकर्त्याचा दावा खारीज केला किंवा त्याचा दावा मंजूर केला त्याबद्दलचा खुलासा न केल्यामूळे शेवटी तक्रारकर्त्याने सदरची तक्रार या मंचात दाखल केली.
विरूध्द पक्ष क्र 1 यांनी असे कथन केले की, सदरची तक्रार हि कालबाहय असल्यामूळे ती खारीज करण्यात यावी. तसेच त्यांचा तक्रारकर्त्यासोबत कोणताही संबध नाही आणि तक्रारकर्त्याने कृषी आयुक्ताला पक्षकार म्हणून सम्मीलीत करावयाचे होते. परंतू त्यांनी कृषी आयुक्ताला पक्षकार न केल्यामूळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी. त्यांचेनुसार तक्रारकर्त्याने सादर केलेली कथा, कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना त्याचे कथन ग्राहय धरता येत नाही. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना जे कथन केले आहे त्यावरून असे दिसून येते की, रानडुकराने त्यांचेवर हल्ला केला नाही. याउलट तक्रारकर्ता हा स्वतः रानडुकराचा शिकार करण्याकरीता गेले असतांना रानडुकाराने आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला केलेला असेल तसेच तक्रारकर्त्याने विमा दावा मिळण्यासाठी हे सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. कारण की, तक्रारकर्त्याचा अपघात शेतीचा काम करीत असतांना झालेला नाही. तसेच सक्षम अधिका-याने दिलेले अंपगत्व दाखल्यामध्ये तक्रारकर्त्याची स्वाक्षरी किंवा अंगठयाचा छाप नसल्यामूळे अंपगत्व दाखल हा ग्राहय धरता येणार नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानूसार विरूध्द पक्ष क्र 1 ने घेतलेले आक्षेप कायदेशीर नसल्यामूळे त्यांची फसवणुक केली आहे व पैसे दयायची इच्छा नसल्याने विरूध्द पक्ष असे करत आहे. ज्या उद्देशाने शासनाने मृतक शेतक-यांसाठी हि योजना सुरू केली त्या उद्देशालाच विरूध्द पक्ष तडा देत आहे. त्यामुळे सदर विरूध्द पक्ष हे सेवेमध्ये त्रृटी देत आहे. तसेच दावा फेटाळून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली आहे. म्हणून तक्रारकर्त्याने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/-(तक्रारीत प्रार्थना खंडमध्ये रू. 2,00,000/-,नमूद आहे.) अपघात झाल्यापासून म्हणजे दिनांक-21/05/2016 पासून द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-5,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1) यांनी आपल्या लेखीकैफियतीमध्ये असे कथन केले की, सदरची तक्रार हि कालबाहय असल्यामूळे ती खारीज करण्यात यावी. तसेच त्यांचा तक्रारकर्त्यासोबत कोणताही संबध नाही आणि तक्रारकर्त्याने कृषी आयुक्ताला पक्षकार म्हणून सम्मीलीत करावयाचे होते. परंतू त्यांनी कृषी आयुक्ताला पक्षकार न केल्यामूळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी. त्यांचेनुसार तक्रारकर्त्याने सादर केलेली कथा, कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना त्याचे कथन ग्राहय धरता येत नाही. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना जे कथन केले आहे त्यावरून असे दिसून येते की, रानडुकराने त्यांचेवर हल्ला केला नाही. याउलट तक्रारकर्ता हा स्वतः रानडुकराचा शिकार करण्याकरीता गेले असतांना रानडुकाराने आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला केलेला असेल
विरूध्द पक्ष क्र. 2) ब्रोकरेज कंपनी असून त्यांचा काम फक्त तक्रारकर्त्याचा दस्ताऐवज घेऊन विरूध्दपक्ष क्र 1 कडे पाठवायचे तसेच विमा दावा स्विकारणे किंवा नाकारणे हे विरूध्द पक्ष क्र 1 इंन्शुरंन्स कंपनीचे योग्य अयोग्य ठरविण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. तसेच तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला नाही अथवा मंजूर केला नाही अशी सदरची तक्रार हि वेळेपूर्वी दाखल केलेली असून त्यावर सुनावणी करणे योग्य होणार नाही. तक्रारकर्ता हा त्ंयाचा ‘ग्राहक’ नाही आणि विरूध्द पक्ष क्र 1 सोबत त्यांचा संबध हा “Principal To Principal basis” या तत्वावर असून विम्याचा दावा देण्याचा अधिकार फक्त विरूध्द पक्ष क्र 1 कडे असल्याने त्यांची कोणतीही चुक नाही. हे सर्व माहित असून सुध्दा तक्रारकर्त्याने त्यांचा पक्षकार केले यामूळे मिस जॉईंडर ऑफ पार्टीज या तत्वानूसार खारीज करण्यात यावा.
विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी सुध्दा आपली लेखीकैफियत या मंचात सादर करून, तक्रारकर्त्याने विमा दाव्याचे अर्ज त्यांचे कार्यालयात दि. 11/09/2017 रोजी सादर केले असून त्यांनी मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे दि. 12/09/2018 रोजी सादर केले आहे.
04. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्ठर्थ दस्ताऐवज यादी पृष्ट क्रं- 13 नुसार एकूण-11 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये पोलीस स्टेशन देवरी यांचे चौकशी अहवाल, वनविभागातर्फे पोलीस निरीक्षक देवरी यांना देण्यात आलेले सूचनापत्र, वनविभागाचे माहिती अहवाल, विमा दावा प्रस्ताव, शेतीचे कागदपत्रे, पोलीस दस्तऐवज, कायदेशीर नोटीसची प्रत व आधार कार्ड असे दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच आपले शपथपत्र दाखल केले असून, त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
05. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. विरूद पक्ष क्र 2 व 3 यांनी लेखीयुक्तीवाद सादर केलेले नाही.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1 व 2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्यातर्फे विद्वान वकील श्री. पी.पी.थेर आणि विरुध्दपक्ष क्र. 1 विमा कंपनी तर्फे विद्वान वकील श्री. एम.के.गुप्ता यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्ता हा शेतकरी होता व आहे. त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या विमा दाव्याबद्दल लेखी स्वरूपात त्यांचा निर्णय तक्रारकर्त्याला कळविला नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेली सदरच्या तक्रारीत वनविभागाच्या माहिती अहवालानूसार तक्रारकर्त्याची सांगीतलेली घटना खरी असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासन यांनी सुध्दा तक्रारकर्त्याला दि.22/09/2016 रोजी अंपगत्वाचा दाखला दिलेला आहे. त्यानूसार Disability physical impairment, affected part of body – Rt. U/L, Diagnosis- right sided post traumatic forearm and wrist contracture wrist and elbow stiffness. Disability percentage – 47% (1) the above condition is – Permanent, non-progressive, not likely to improve. असे नमूद आहे.
महाराष्ट्र शासन यांनी राबविलेली ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ अंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य अनुसार अपघातामूळे 1) अपघाती मृत्यु रक्कम रू. 2,00,000/- 2) अपघातामूळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे त्याकरीता रक्कम रू. 2,00,000/- 3) अपघातीमूळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रक्कम रू. 2,00,000/- 4) अपघातीमूळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रक्कम रू. 1,00,000/- यात अशी तरतुद आहे. सदरची तक्रारीमध्ये तक्रारकर्त्याचा उजवा हात पूर्ण निकामी झाला असे अंपगत्व दाखल्यावरून सिध्द होत आहे. म्हणून वरील अर्थसहाय्य क्र. 4 च्या तरतुदीनूसार तक्रारकर्ता रक्कम रू. 1,00,000/-मिळण्यास पात्र आहे. विरूध्द पक्ष क्र 1 यांनी कालबाहयचा घेतलेला मुद्दा या तक्रारीत बसत नाही कारण की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारकर्त्याचा विमा दाव्याबद्दल मान्य किंवा अमान्य केले असे तक्रारकर्त्याला कळविले नाही. म्हणून हि तक्रार कालबाहय नाही. तसेच कृषी आयुक्ताला पक्षकार करणे महत्वाचा नसल्यामूळे विरूध्द पक्ष क्र 1 ने घेतलेले आक्षेप चुकीचे आहे असे स्पष्ट करण्यात येते. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्याच्या कथनाला खोटे सिध्द करण्याकरीता स्वतंत्र प्रत्यक्ष साक्षपुरावा सादर करणे गरजेचे असून त्यांनी तसे न केल्यामूळे तसेच त्यांनी कोणतेही दस्ताऐवज सादर न केल्यामूळे फेटाळण्यात येत आहे. विरुध्दपक्ष क्र 1 विमा कंपनीला सदरहु घटना संशयास्पद अपघात वाटत असले तरी कल्पना किंवा धारणावर भिस्त ठेवू शकत नाही. त्या संबधात त्यांनी कोणताही भरभक्कम पुरावा (Substantial & Cogent evidence) मंचा समक्ष दाखल केलेला नसल्याने केवळ कल्पना किंवा धारणाच्या आधारे संशयास्पद अपघात आहे हे ठरविणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र 1 विमा कंपनीने त्यांचे जवळ कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना तक्रारकर्त्याचा रानडुकराच्या हल्यात झालेला अपघात हा संशयास्पद अपघातामूळे झाला असा निष्कर्ष काढून विनाकारण आजपर्यंत विमा दाव्याबद्दल माहिती न देणे यावरून विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांचा कार्य फक्त विमा दाव्याचे दस्ताऐवज स्विकारणे व विरूध्द पक्ष क्र 1 कडे पाठविणे तसेच विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याची जबाबदारी फक्त विरूध्द पक्ष क्र 1 कडे असल्याने विरूध्द पक्ष क्र 2 व 3 च्या विरूध्द तक्रार खारीज करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे.
08. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/-(अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-13/06/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, गेांदिया, जिल्हा गेांदिया यांच्या पुढे विमा प्रस्ताव दाखल न केल्यामूळे, त्यांना पक्षकार करणे न्यायोचित नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
9. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला अपघात संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-13/06/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्ताला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्र 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष –(2) व (3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन केल्यास द.सा.द.शे 12 टक्के व्याज देय राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.