(पारीत व्दारा मा. सदस्य श्री. एम.ए.एच. खान)
(पारीत दिनांक – 27 फेब्रुवारी, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
प्रस्तुत प्रकरणांत तक्रारकर्ता कंपनी धारक असुन त्याने कामगार श्री. लक्ष्मण भगवान नेवारे यांना सन 2009-2010 मध्ये अपघात प्रसंगी कायम स्वरुपी अपंगत्व आल्यामुळे Workman Compensation Act, 1923 च्या तरतुदी नुसार मा. कामगार आयुक्त यांच्या आदेशान्वये दिनांक 30/07/2010 (कागदपत्र क्रं. 4) नुसार कामगाराला रुपये 3,52,666/- रक्कम अदा केलेली आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाद्वारे प्रस्तावीत अश्या घटनेसाठी कामगारांना Workman Compensation Act, 1923 च्या तरतुदी खाली तात्काळ विमा हमी रक्कम अदा करण्याची विमा पॉलीसी काढली होती. त्याचा क्रं. 281303/41/09/8600000113, दिनांक 23/10/2009 ते 22/10/2010 या कालावधीसाठी वैध होता आणि त्याचा 10 कामगाराकरीता एकत्रित विमा हप्ता रुपये 12,000/- प्रत्येक कामगारासाठी विरुध्द पक्षाकडे जमा केलेले होते व घटना ही विम्याच्या वैध कालावधीत घडलेली आहे.
तक्रारकर्त्याने मा. कामगार आयुक्त यांच्या निर्देशानुसार भरपाईपोटी भरणा केलेली रक्कम मा. कामगार आयुक्त यांच्यासमक्ष अदा केलेली असल्याने व या रकमेची विमा कराराप्रमाणे परतफेड व्हावी, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे संपूर्ण दस्तऐवजासह प्रस्ताव दिनांक 29/06/2010 रोजी सादर केला होता. विमा दावा मंजूर करण्या प्रकरणी उचित कार्यवाही केली, परंतु कामगाराला अनुज्ञेय असलेल्या रकमेच्या बाबतीत वाद उपस्थित झाल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विमा दावा पुर्ततेच्या अभावी खारीज केला. त्याला बाधीत होऊन तक्रारकर्त्याने उक्त रक्कम व्याजासहीत शिवाय मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी तक्रारकर्त्याला रक्कम परत मिळण्यासाठी या मंचात संपूर्ण दस्तऐवजासह अर्ज दाखल केला आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने Workman Compensation Act, 1923 च्या तरतुदी खाली कामगाराला अनुज्ञेय असलेल्या वेतनावर कामगाराचे वय, त्याचे शिल्लक असलेल्या सेवेचा कालावधी याचा विचार करुन व जिल्हा शल्य चिकित्सक, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी कामगाराला निर्गमित केलेल्या 89 टक्के अपंगत्व असल्याच्या प्रमाणपत्राचा विचार करुन कामगाराला अनुज्ञेय रक्कम मा. कामगार आयुक्त यांच्या मान्यतेने रुपये 3,52,666/- कामगाराला दिनांक 30/07/2010 रोजी अदा केलेली आहे व त्या संबंधीचे सर्व दस्ताऐवज तक्रारकर्त्याने प्रकरणांत सादर केलेले आहे.
ज्याअर्थी तक्रारकर्त्याने कामगाराला ही रक्कम अदा केलेली आहे व या रकमेची विम्याच्या कराराप्रमाणे परताव्याची रक्कम विरुध्द पक्षाकडून मिळण्यासाठी मागणी केली, परंतु विरुध्द पक्षाने विम्याची परतावा रक्कम आजतागायत परत केलेली नाही व त्यासंबंधी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षासोबत केलेला पत्र व्यवहार तसेच कायदेशीर नोटीस बजावलेली आहे व विरुध्द पक्षाने त्यासंबंधी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(C) (i) व (iii) प्रमाणे त्रुटीची सेवा/दोषपुर्ण सेवा आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे घोषित करण्यात यावे व तक्रारकर्त्याने कामगाराला Workman Compensation Act, 1923 च्या कायद्याप्रमाणे अदा केलेली रक्कम व्याज व इतर खर्चासहीत परत मिळण्याची विनंती केली.
तक्रारकर्त्याने या संदर्भात विरुध्द पक्षासोबत झालेल्या पत्र व्यवहारातील दिनांक 20/08/2014 रोजी झालेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्रं. 26 वर दाखल आहे. त्या पत्रातील मजकूराअन्वये उभय पक्षामध्ये झालेल्या विमा करारातील अट विरुध्द पक्षाने आपल्या पत्र व्यवहारात मान्य केलेली आहे. त्याप्रमाणे अपघात प्रसंगी कामगाराला अनुज्ञेय मोबदला Workman Compensation Act, 1923 (सुधारीत) व फटाल अपघात कायदा 1855 खाली करार असल्याने मा. कामगार आयुक्त यांच्या आदेशाने अनुज्ञेय रक्कम अदा केलेली आहे व ही रक्कम विरुध्द पक्षाने विमा कराराअन्वये परत करावी असे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
2 मंचाद्वारे विरुध्द पक्षाला नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्षाने आपले लेखी कथन या मंचात सादर केले. विरुध्द पक्षाद्वारे लेखी कथन विलंबाने प्राप्त झाल्याने तक्रारकर्त्याच्या सुनावणीनंतर विरुध्द पक्षाला विलबांसाठी दंड आकारुन त्यांचे लेखी कथन स्विकृत करण्यात आले.
3. विरुध्द पक्षाने सादर केलेल्या लेखी कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीतील सर्व परिच्छेद निहाय उत्तर सादर करुन तक्रारकर्त्याची मागणी अमान्य केली व अतिरिक्त लेखी कथनात असे सादर केले की, ज्याअर्थी तक्रारकर्त्याने 10 कामगाराकरीता रुपये 1,20,000/- वार्षिक वर्गणी व रुपये 12,000/- प्रत्येक कामगारासाठी या दराने विरुध्द पक्षाकडे जमा केलेले असल्याने Workman Compensation Act, 1923 च्या कलम 4 अन्वये अनुज्ञेय रक्कम फक्त रुपये 88,166/- पर्यंत अपघातग्रस्त कामागाराला अपंगत्वाच्या दाखल्याच्या अनुषंगाने अनुज्ञेय आहे. या संदर्भात विरुध्द पक्षाद्वारे त्यांच्या प्रस्तावाला तक्रारकर्त्याकडे प्रस्तावास मान्यतेसाठी सादर केले. परंतु तक्रारकर्त्याने सदर प्रस्तावाला प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारदाराचा प्रस्ताव नस्ती करण्यांत आला. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपुर्ण सेवा दिलेली नसल्याचे लेखी कथनात म्हटले आहे. तसेच विरुध्द पक्षाद्वारे तक्रारकर्त्यासोबत झालेल्या कराराच्या अटी व शर्तीचा उल्लेख केला परंतु कराराच्या प्रती त्यांच्याकडे उपलब्ध असातांना दाखल केलेल्या नाहीत व त्यातील महत्वाच्या मुद्याला विरोध दर्शविला नाही.
04. उभय पक्षांनी प्रकरणी आपला लेखी युक्तिवाद व आवश्यक दस्ताऐवज शपथपत्रासहीत प्रकरणांत सादर करुन तोंडी युक्तिवाद केला व आपली बाजु मांडली. प्रकरणांत तक्रारकर्ता व विरुध्द यांनी शपथपत्रावर सादर केलेले दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकूण प्रकरणांत निर्णयासाठी खलीलप्रमाणे वादातीत मुद्ये उपस्थित होतात.
अ) तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षासोबत आपातकालीन परिस्थितीत 10 कामगारांना Workman Compensation Act, 1923 व फटाल अपघात कायदा 1855 च्या तरतुदी खाली देय रकमेवर विरुध्द पक्षाने विम्याच्या कराराद्वारे मान्य केल्याचे दिसून येते व विरुध्द पक्षाने त्याला विरोध दर्शविलेला नाही.
ब) प्रकरणांत झालेला अपघात व कामगाराला आलेले अपंगत्व तसेच विम्याचा कालावधी, विम्याच्या थकीत हत्त्याबद्दल व घटनेच्या तारखेत विमा हप्ता इत्यादी बाबी विरुध्द पक्षाने नाकारलेली नाही, त्यामुळे या प्रसंगी कोणताही वाद नाही.
क) विरुध्द पक्षाने फक्त प्रकरणांत तक्रारकर्त्याने कामगाराला अनुज्ञेय रकमेबद्दल वाद उपस्थित केला व तक्रारकर्त्याने चूकीची गणती करुन मोबदल्यात रक्कम वाढविलेली आहे व ही रक्कम रुपये 88,166/- फक्त अनुज्ञेय आहे. तक्रारकर्त्याने मा. कामगार आयुक्ताच्या भीतीपोटी जास्तीची रक्कम गणतीकरुन कामगाराला अदा केली असल्याचे उजर उपस्थित करुन ती रक्कम देण्यास ते बाद्य नाही असा मुद्या मांडला.
ड) प्रकरणांत तक्रारदारांना मा. कामगार आयुक्त यांच्या आदेशान्वये बाधीत कामगारास रक्कम अदा केली आहे आणि त्यासंबंधीची पावती प्रकरणांत दाखल आहे. तक्रारदाराने मा.कामगार आयुक्ता समक्ष रक्कम अदा केलेली असल्याने ती रक्कम विम्याच्या करारानुसार तक्रारकर्त्यास व्याज व इतर खर्चासहीत विरुध्द पक्षाने परत देणे बाद्य ठरते.
या संदर्भात आम्ही Workman Compensation Act, 1923 च्या कलम 4, 4 (ए) व 5 च्या तरतुदीचे अवलोकन केले व मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, न्यु दिल्ली यांनी अपील प्रकरण एफए/1297/2007 आदेश पारीत दिनांक 14/02/2007 चा आधार घेतलेला आहे.
वरील विवेचनावरुन व तक्रारकर्ता तसेच विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद आणि तोंडी युक्तिवादाचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे निष्कर्षास आले आहे.
निष्कर्ष
05. प्रकरणांतील तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाद्वारे झालेल्या पत्र व्यवहारातील वर्णन यादीतील पृष्ठ क्रं. 10 व 11 जे प्रकरणांतील पान क्रं. 26 वर उपलब्ध आहे. त्याला विरुध्द पक्षाने अधोरेखित केल्याप्रमाणे आपातकालीन बाधीत कामगाराला कायद्याने गणती करुन मा.कामगार आयुक्ताच्या देखरेखी खाली कामगाराला रक्कम अदा केली असल्याने या मंचाद्वारे तक्रारकर्त्याचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येते.
विरुध्द पक्षाने प्रकरणांत केलेली गणती व अनुज्ञेय रक्कम बाधीत कामगाराला विम्याच्या कराराद्वारे फक्त रुपये 88,166/- अनुज्ञेय आहे असे लेखी जबाबात कथन केले आहे. रक्कम विरुध्द पक्षाने प्रकरणांत विम्यातील कराराच्या अटी व शर्ती न दाखल केल्याने विरुध्द पक्षाचा हा मुद्या अमान्य करण्यात येते.
06. तक्रारदाराने प्रकरणांत बाधीत कामगागराला प्रत्यक्ष रुपये 3,52,666/- मा.कामगार आयुक्ताच्या आदेशाने व त्यांच्या समक्ष कामगाराला अदा केल्याची पावती इत्यादी बाबी सादर करुन तत्वतद उभय पक्षात आपातकालीन प्रसंगी बाधीत कामगाराला अनुज्ञेय रक्कम Workman Compensation Act व फटाल अपघात कायद्याच्या तरतुदी खाली विम्याचा करार विरुध्द पक्षाने मान्य केले असल्याने मंचाद्वारे खालीप्रमाणे अंशतः आदेश पारीत करण्यात येते.
::आदेश::
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करुन विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी एकत्रित व संयुक्तरित्या ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(C) (i) व (iii) अंतर्गत अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब त्रुटीची सेवा दिल्याचे घोषित करण्यात येत आहे.
(2) तक्रारदाराने Workman Compensation Act, 1923 च्या तरतुदी खाली दिनांक 30/07/2010 रोजी कामगाला अदा केलेली रक्कम रुपये 3,52,666/- विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 यांनी एकत्रीत व संयुक्तरित्या द.सा.द.शे 09 टक्के व्याजदाराने प्रत्यक्ष रक्कम अदायगी पावेतो दोन महिन्याच्या आत (दिनांक 27/04/2019 पर्यंत) तक्रारकर्त्याला अदा करावी.
(03) तक्रारकर्त्याला मानसिक व शारीरीक त्रासापोटी तसेच दाव्याचा खर्च एकत्रीत रक्कम रुपये 20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला एकत्रीत व संयुक्तरित्या दोन महिन्याच्या आत अदा करावे.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 यांनी आदेश दिनांकापासून दोन महिन्याचे आत करावे. अन्यथा आदेशातील मुद्या क्रं. 2 व 3 मधील रक्कम रुपये 3,72,666/- (अक्षरी रुपये तीन लाख बाहात्तर हजार सहाशे सहासष्ट फक्त) मुदतीनंतर म्हणजे दिनांक 28/04/2019 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने प्रत्यक्ष रक्कम अदायगी पावेतो तक्रारकर्त्याला अदा करावे लागेल.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकाराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.