(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्षा (प्र.))
तक्रारकर्तीने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ती ही राह. गुरवळा, ता. व जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन तिचे पती श्री. मधुकर मनीराम भोयर यांच्या मालकीची मौजाः हीरापुर, ता. व जिल्हा- गडचिरोली येथे भुमापन क्रमांक 131/2 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती शेतीचे काम करीत असल्यामुळे तो शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटूंबाचे पालन पोषन करीत होता. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने विरुध्द पक्ष क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. तसेच शासनाचे वतीने विरुध्द पक्ष क्र.3 व्दारे तक्रारकर्तीचे पतीने रु.2,00,000/- चा विमा उतरविला होता. त्यामुळे तक्रारकर्ती ही मयत श्री. मधुकर मनीराम भोयर यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू दि.16.01.2016 रोजी आपले मित्रासोबत मोटारसायकलने जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी होऊन झाला असल्याने तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.3 कडे दि.11.04.2016 रितसर अर्ज केला व त्यांनी वेळोवेळी मागितलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली.
2. विरुध्द पक्षांकडे रितसर अर्ज केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्तीला पतीच्या विमा दाव्याबाबत काहीही न कळविल्याने तिने वकीला मार्फत दि.07.10.2017 रोजी माहीतीचा अधिकार कायद्याखाली कृषी आयुक्त महाराष्ट्र यांना अर्ज केला असता तक्रारकर्तीचा दाव्यावर “Rejected due to other reason” असा शेरा असल्याची माहीती दिली. त्यामुळे तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले आहे की, शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना ज्या उद्देशानेसुरु केली त्या उद्देशालाच विरुध्द पक्ष तडा देत असल्याने सदरची कृति ही विरुध्द पक्षांची सेवेतील कमतरता आहे. म्हणून तक्रारकर्तीने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिल प्रमाणे मागणी केली आहे.
3. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- दि.11.04.2016 पासुन 18% व्याजासह मिळावी तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची रक्कम रु.30,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्तीने निशाणी क्र.3 नुसार 9 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्तीची तक्रार नोंदणीकरुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस काढण्यांत आली. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर होऊन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले.
5. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी निशाणी क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्तीने खोटी त्यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अन्वये खारिज होण्यांस पात्र आहे, असे नमुद केले आहे. तसेच निशाणी क्र.15 च्या आदेशानुसार आपल्या लेखीउत्तरात दुरुस्ती करुन असे म्हटले की, मृतकाचा गाडी चालवीत असतांना अपघात होऊन मृत्यू झाला असल्यामुळे त्याचेजवळ वाहन चालक परवाना गरजेचा आहे. जर तक्रारकर्ती हे दाखल करीत असेल तर आम्ही सदर विमा दावा पुन्हा सुरु करुन मेरीटवर निकाली काढू, असे नमुद केले आहे.
6. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी निशाणी क्र.10 वरील लेखीउत्तरात त्यांचा सदर तक्रारीतील मागणीशी कुठलाही संबंध येत नसल्याचे नमुद केले आहे. तसेच अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचे पतीकडे शिकाऊ परवाना असल्यामुळे विमा दावा विरुध्द पक्ष क्र.1 यांनी फेटाळल्याचे म्हटले आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले बयान, तसेच दाखल दस्तावेज, शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्ती ही राह. गुरवळा, ता. व जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन तिचे पती श्री. मधुकर मनीराम भोयर यांच्या मालकीची मौजाः हीरापुर, ता. व जिल्हा- गडचिरोली येथे भुमापन क्रमांक 131/2 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती शेतीचे काम करीत असल्यामुळे तो शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटूंबाचे पालन पोषन करीत होता ही बाब निशाणी क्र.3 वर दाखल दस्त क्र.4 वरुन सिध्द होते. तसेच शासनातर्फे तक्रारकर्तीच्या पतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा काढला असल्याने व तो शेतकरी असल्याने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्योत येत आहे.
8. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- विरुध्द पक्षांच्या म्हणण्यानुसार वाहन परवाना जोडला नसल्यामुळे विमा दावा नामंजूर केलेला आहे. परंतु तक्रारकर्तीने क्लेम अर्जामध्ये संपूर्ण दस्तावेजांसोबत वाहन परवाना सुध्दा जोडलेला आहे. निशाणी क्र.3 मधील दस्त क्र.8 वर दाखल दस्तावेज विरुध्द पक्ष क्र.3 कडे दिल्याचे दिसुन येते. तरीसुध्दा विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केल्याचे स्पष्ट होते. तसेच विरुध्द पक्षांचे हे ही म्हणणे गृहीत धरता येत नाही की, विरुध्द पक्ष विमा कंपनीने वाहन चालक परवाना दाखल करण्यासाठी तक्रारकर्तीस पत्र दिले होते. कारण विरुध्द पक्षांनी त्याबाबत कोणतेही पुरावे दाखल केलेले नाही. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनीचे हे ही म्हणणे गृहीत धरता येत नाही की, तक्रारकर्तीने दाखल केलेले लर्निंग लाइसेंस असल्यामुळे दावा नामंजूर केला आहे. कारण विरुध्द पक्षातर्फे दाखल निशाणी क्र.16, दस्त क्र.1 मध्ये नमुद “Valid Driving License” म्हणजे “Learning License Valid” नाही असे होत नाही. म्हणून विरुध्द पक्ष हे तक्रारकर्तीस विमा देण्यांस पात्र आहे असे या न्याय मंचाचे मत आहे. करीता वरील विवेचनावरुन हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- तक्रार दाखल दि.12.01.2018 पासुन ते प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- अदा करावा.
4. विरुध्द पक्ष क्र. 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
5. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
6. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
7. तक्रारकर्तीस प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.