::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/10/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता विमल जैन हे मे. सी.बी.अॅग्रो इंडस्ट्रीज, या नांवाने तुरदाळ, चनादाळ इत्यादीचे ऊत्पादन करणारे कारखानदार आहेत. तक्रारकर्ता हे मागील बरेच वर्षापासुन विरुध्द पक्षाकडे कारखाना, मशिनरी, रॉ मटेरीयलचा दरवर्षी लाखो रुपये देऊन विमा काढतात. अशाप्रकारे सन 2013-14 करिता तक्रारकर्त्याने कागदपत्रे व विम्याचा प्रिमियम 1,17,963/- चा धनादेश विरुध्द पक्षाचे अभिकर्ता श्री. डोनगांवकर यांना दिला, तो धनादेश व कागदपत्रे अभिकर्ता यांनी स्विकारुन, ती त्यांनी दिनांक 25/04/2013 ला विरुध्द पक्ष क्र. 1 – अमरावती यांना पाठविले, ते विरुध्द पक्ष क्र. 1 ला 26/04/2013 ला प्राप्त झाले. अशाप्रकारे रक्कम प्राप्त झाल्याबरोबर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची जबाबदारी सुरु होते. विरुध्द पक्ष क्र. 1 ने पॉलिसी क्र. 280500/11/133300000223 ही पाठवली आणि त्यामध्ये 00 अवर 29/04/13 पासून मध्यरात्री 28/04/13 पावेतोचा कालावधी नमुद केलेला आहे.
त्यानंतर दिनांक 29/04/2013 चे जवळपास 1 ते 1.30 चे सुमारास तक्रारकर्त्याच्या कारखान्याला आग लागली व त्यामध्ये तक्रारकर्त्याचे अतोनात नुकसान झाले. वरील आगीची माहिती विरुध्द पक्षाला देण्यात आली. त्यानंतर सर्व्हेअर यांनी दिनांक 30/04/2013 व दिनांक 04/5/2013 ला कारखान्यास भेट दिली. त्यांनी वस्तुस्थितीनुसार झालेले नुकसान न दाखवता अतिशय कमी नुकसान दाखविले. आगीमध्ये तक्रारकर्त्याचे रुपये 21,25,000/- चे नुकसान झाले परंतु तक्रारकर्ता रुपये 19,25,000/- ची मागणी करीत आहे.
तक्रारकर्त्याने, क्लेम मिळावा म्हणून विरुध्द पक्षाकडे बराच पाठपुरावा केला व कागदपत्रे, चार्टर्ड अकाउंटंटचा अहवाल, स्टॉक स्टेटमेंट, बॅलन्सशिट, इतर समरीज पाठविल्या. परंतु विरुध्द पक्षाने गैरकायदेशिरपणे दिनांक 25/03/2015 ला क्लेम नाकारला व क्लेम नाकारल्याचे कारण जेंव्हा आग लागली तेंव्हा त्या आगीची जबाबदारी नव्हती, असे नमुद केले. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेला आहे. त्यामुळे, तक्रारकर्ता यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाला व होत आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे वैयक्तीकरित्या व संयुक्तरित्या नुकसानीची रक्कम तक्रारकर्त्याला देण्यास जबाबदार आहेत. सदरहू तक्रार ही मुदतीत आहे व न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, तक्रार मंजूर करण्यात यावी व आगीमध्ये झालेल्या नुकसानी बद्दल रुपये 19,25,000/- व मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रुपये 70,000/- असे एकूण रुपये 19,95,000/- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला द्यावेत तसेच तक्रारीचा खर्च वसुल करुन देण्यात यावा, अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 33 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) या प्रकरणात दिनांक 31/07/2015 रोजी आदेश पारित करण्यांत आला की, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ने मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही. तरी प्रकरण विरुध्द पक्षांविरुध्द लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्यात यावे.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तोंडी युक्तिवाद, यावरुनच मंचाला निर्णय द्यावा लागला. कारण सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 तर्फे अधिवक्ता हजर झाले, परंतु त्यानंतर त्यांनी संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही. त्यामुळे हे प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्यात आले.
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले एकंदर 33 दस्त यादी निशाणी-3 चे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, असे दिसते की, तक्रारदार यांचा मे. सी.बी.अॅग्रो इंडस्ट्रीज, या नांवाने तुरदाळ, चनादाळ ऊत्पादन करण्याचा कारखाना आहे. तक्रारदाराने कारखान्याचा, बिल्डींग, मशिनरीज, व मालाचा विमा विरुध्द पक्ष क्र. 1 कडून काढलेला असून, त्याचा कालावधी 00.00 hours on 29/04/13 ते मध्यरात्र दिनांक 28/04/13 पर्यंत होता, असे पॉलिसी प्रत दस्त क्र. 3 वरुन दिसते. सदर पॉलिसी ही सर्व मिळून एकंदर रुपये 6,63,95,000/- ( रुपये सहा कोटी त्रेसष्ट लाख पंचान्नव हजार ) ईतक्या रक्कमेची ( सम इन्शुअर्ड ) होती व त्यापोटीची प्रिमियम रक्कम रुपये 1,04,987/- ईतकी होती, असे पॉलिसी प्रत या दस्तावरुन दिसते. तक्रारकर्त्याने दस्तऐवज दाखल करुन, असे कथन केले की, सदर पॉलिसी प्रिमीयमचा धनादेश विरुध्द पक्षाचे अभिकर्ता एच.आर. डोनगांवकर यांचेमार्फत दिनांक 25/04/2013 रोजी विरुध्द पक्षाला सिटीलँन्ड एक्सप्रेस कुरीअरव्दारे पाठविला व तो विरुध्द पक्षाला दिनांक 26/04/2013 रोजी प्राप्त झाला होता, ही बाब दाखल दस्त क्र. 1 व 2 वरुन देखील स्पष्ट होते. परंतु सदर पॉलिसी प्रत या दस्तावरुन असा बोध होतो की, विरुध्द पक्षाने विमा प्रिमीयमची रक्कम मिळाल्याबाबतची रसिद ता. 29/04/2013 अशी सदर पॉलिसी प्रतीवर नमुद केली. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त क्र. 4 व 5 वरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याच्या कारखान्याला दिनांक 29/04/2013 रोजी आग लागली होती व ती विझविण्याकरिता नगर परीषद, कारंजा यांची अग्नीशमन गाडी वापरण्यात आली. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त क्र. 7 ते 11 यावरुन असे स्पष्ट होते की, या आगीत तक्रारदार कारखान्याचे व ईतर विमा पॉलिसीनुसार मालाचे नुकसान झाले. त्याबद्दलची सुचना व विमा रक्कम मिळणेकरिता दावा फॉर्म तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे भरुन दिला होता. त्यानुसार एन.एच.खत्री, सर्व्हेअर व लॉस असेसर यांनी विरुध्द पक्षाच्या निर्देशानुसार कारखान्याचा सर्वे करुन, फायनल असेसमेंट हे रुपये 6,02,032.00 ईतक्या रक्कमेचे काढले होते. तक्रारकर्त्याच्या मते सदर आगीत नुकसान हे रुपये 19,25,000/- ईतक्या रक्कमेचे झाले. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावरुन असा बोध होतो की, विरुध्द पक्षाने तक्रारदाराचा विमा दावा देणेसाठी, पत्रे देवून पाठपुरावा केला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 25/03/2015 रोजी तक्रारदाराचा विमा दावा, दस्त क्र. 12 नुसार खालील कारण देवून नाकारला, “ Since at the time of fire loss we were not on the risk ”. विरुध्द पक्षाने सदर कारण हे कसे संयुक्तीक आहे ? हे व सर्वेअरचा रिपोर्ट, हे दस्त मंचात सिध्द केले नाही, अगर तक्रारकर्त्याच्या कथनाला कोणतेही नकारार्थी कथन विरुध्द पक्षाकडून उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेले वरीलप्रमाणे दस्तांवरुन, मंचाचे असे मत आहे की, सदर पॉलिसीबद्दलचा प्रिमीअम विरुध्द पक्ष क्र.1 ला दिनांक 26/04/2013 रोजी प्राप्त होवुनही विरुध्द पक्षाने सदर पॉलिसी 00.00 hours on 29/04/2013 ते Midnight of 28/04/2014 पर्यंत काढली होती. मात्र तरीही सदर पॉलिसी ही दिनांक 28/04/2013 च्या मध्यरात्रीपासुन (00.00) म्हणजे रात्री 12.00 वाजेपासुन सुरु झाली होती व घटना ही दिनांक 29/04/2013 रोजी दुपारी 12.30 ते 1.00 च्या दरम्यानची आहे. त्यामुळे “ At the time of fire loss O.P. No. 1 & 2 were on the risk ” अशी परिस्थिती होती. म्हणूनच विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सर्वे करुन घेतला होताव ब-याच उशिरा विमा नाकारणारे पत्र तक्रारदाराला दिले. ही विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 च्या बाबतीत सेवा न्युनता ठरते, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेले नुकसान झाल्याबद्दलचे दस्त क्र.13 ते 18 तपासले असता, मंचाला तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य वाटते. याउलट विरुध्द पक्षाने सर्वे रिपोर्ट कसा योग्य आहे, हे सांगण्याची मंचात हजर होवुनही, तसदी घेतली नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारदार यांना विमा पॉलिसीनुसार कारखान्यात लागलेल्या आगीमुळे जे नुकसान रुपये 19,25,000/- ईतक्या रकमेचे झाले, ते ईतर नुकसान भरपाई व प्रकरणाच्या खर्चासह दिल्यास न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारदाराला विमा पॉलिसीनुसार आगीमध्ये झालेल्या संपूर्ण नुकसानीची विमा रक्कम रुपये 19,25,000/- ( रुपये एकोणवीस लाख पंचवीस हजार फक्त ) व शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटीची नुकसान भरपाई रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तसेच या प्रकरणाचा न्यायिक खर्च रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावा.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
s.v.Giri