निकालपत्र
( पारीत दिनांक : 18/06/2013 )
( द्वारा अध्यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे) )
01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा’ योजनेअंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही
18 टक्के व्याजदराने द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.10,000/-
3. तक्रारीचा खर्च रु. 5000/-
अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
अर्जदारांनी सदर तक्रारअर्जामध्ये नमुद केले आहे की, अर्जदार मयत श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार याची पत्नी असून श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार यांचे नावे मौजा गोधणी, ता. कारंजा ,जि. वर्धा येथे भुमापन क्र. 101/1 अंतर्गत शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्त शेतक-यांस व त्याच्या कुटुंबियास लाभ देण्याकरीता 15 जुलै 2006 ते 14 जुलै 2007 या कालावधीकरिता ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना’ काढली.
अर्जदारयांनी नमुद केले आहे की, मयत श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार हे दिनांक 05/11/2006 रोजी दुपारी 1.30 वाजता घराजवळील किराणा दुकानासमोरील ओटयावर बसले होते तेंव्हा पुर्व वैमनस्यातुन त्यांचा बडीची उभारी डोक्यावर मारुन
त्यांचा खून करण्यात आला होता. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यानी ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना’ अंतर्गत राशी मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.2 यांचेतर्फे गैरअर्जदार क्र. 2 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला विमा दाव्यासोबत सर्व कागतपत्रे सादर करुनही आजतागायत गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांचा विमा दावा मंजुरही केला नाही किंवा खारीजही केला नाही. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
02. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, क्लेम जेंव्हा विमा कंपनी नाकारते तेंव्हा त्याची सुचना सरळ अर्जदाराला विमा कंपनी पाठविते व त्या पत्राची प्रत गैरअर्जदार क्र. 2 व 3 ला माहिती करिता पाठविते. विमा कंपनीला पुर्ण अधिकार आहे की लाभार्थीने गैरअर्जदार क्र.2 व 3 मार्फत पाठविलेल्या कागदपत्राचे अवलोकन केल्यानंतर जर तो क्लेम नियमात बसत नसेल तर सरळ त्या क्लेमला विमा कंपनी स्वतः नाकारण्यास समर्थ आहे त्या करिता गैरअर्जदार क्र.2 व 3 ची लेखी सहमती किंवा त्यांचे आदेशाची आवश्यक्ता नसते. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदाराचे मयत पती मारोतराव शेकार यांचा अपघात केंव्हा, कुठे व कोणत्या परिस्थितीत झाला या बाबतची कुठलीही माहिती नाही तसेच त्यांचा मृत्यु झाला किंवा नाही. अर्जदार यांनी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन व ठराविक कालावधीत सदर कागदपत्रे गैरअर्जदार क्र.2 व 3 विमा कंपनीकडे सादर केले ही बाब खोटी असल्याचे गैरअर्जदार क्र.1 यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, सदर तक्रार ही ग्राहक तक्रार संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार 2 वर्षाच्या आंत दाखल करण्यात आली नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे मार्फत कोणताही प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 1 यांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांच्या मार्फत त्यांचे कार्यालयीन कर्मचारी प्रतिनीधी म्हणुन हजर झाले व त्यांनी 2 दस्तावेज मंचासमक्ष सादर केले परंतु त्यांनी त्यांच्या तर्फे कुठलाही लेखी जवाब मा.मचासमोर दाखल केलेला नाही.
गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक आणी विकास प्राइज़ भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ते महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतात. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार याच्यामार्फत आल्यानंतर त्याची सहानिशा व तपासणी केल्यानंतर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडुन दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे ऐवढेच काम गैरअर्जदार क्र.3 यांचे आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे नमुद केले आहे की, वरील सर्व कामांकरीता ते राज्य शासन किंवा शेतकरी यांच्याकडुन कोणताही मोबदला घेत नाही तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमीअम घेतलेला नाही. सदर बाब ही मा.राज्य ग्राहक आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांनी आमचे म्हणणे ग्राहय धरले असुन तसा आदेशही पारीत केलेला असल्याचे गैरअर्जदार क्र.3 यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदरची अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
03. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत मृत्यू प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर, पोस्ट मार्टम रिपोर्ट, गाव नमुना 7/12,गांव, इत्यादी एकुण 7 दस्तावेंजांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहे तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला आहे.
-: कारणे व निष्कर्ष :-
प्रस्तुत प्रकरणात दोन्ही पक्षांतर्फे दाखल करण्यात आलेले सर्व दस्तावेज व प्रतिज्ञालेख बारकाईने पाहण्यात आले.
सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी व त्यांच्या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.
अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्तावेजांवरुन असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार यांचे वारसदार या नात्याने, विमाधारक मयत श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार यांचा दिनांक 05/11/2006 रोजी पुर्व वैमनस्यातुन त्यांचा बडीची उभारी डोक्यावर मारुन
त्यांचा खून झाला व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे दाखल दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक मयत श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार यांचा दिनांक 05/11/2006 रोजी पुर्व वैमनस्यातुन त्यांचा बडीची उभारी डोक्यावर मारुन
त्यांचा खून झाला. गैरअर्जदार क्र. 1 यांचा असा आक्षेप आहे की, अर्जदारातर्फे गैरअर्जदार क्र. 1 यांना दावा मंजुरीकरिता आवश्यक ती कागदपत्रे पुरविली नाहीत. तसेच अर्जदाराचा दावा ग्राहक तक्रार संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार 2 वर्षाच्या आंत दाखल करण्यात आला नाही व त्यामुळे अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य आहे.
प्रस्तुत प्रकरणात दोन्ही पक्षांतर्फे दाखल दस्तवेजांचे बारकाईने अवलोकन केले असता, असे स्पष्टपणे दिसून येते की, अर्जदाराने विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 कडे दावा सादर केला. गैरअर्जदार क्र. 2 तहसिलदार कारंजा यांनी दाखल केलेल्या दस्तावेजावरुन अर्जदाराचा दावा गैरअर्जदार क्र. 3 कडे दिनांक 5/1/2007 च्या पत्रानुसार सादर केलेला आहे तसेच सदर दावा गैरअर्जदार क्र.3 यांना दिनांक 05/1/2007 रोजी प्राप्त झाला. यावरुन असे स्पष्ट दिसून येते की, गैरअर्जदार क्र. 3 यांना सदर प्रकरणात विमा दावा वेळेत प्राप्त झालेला आहे. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर दाव्याबाबत अर्जदाराशी कोणताही पत्र व्यवहार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य नसल्याचे आमचे मत आहे.
उपरोक्त विवेचनावरुन असे दिसून येते की, अर्जदारातर्फे गैरअर्जदार विमा कंपनीस आवश्यक ते सर्व दस्तावेज पाठविण्यात आलेले आहेत. हे सर्व दस्तावेज गैरअर्जदार क्र. 3 यांना प्राप्त झालेले आहेत. म्हणून अशा परिस्थितीत आम्ही या निर्णयास आलो आहोत की, मयत श्री मारोतराव गोपाळरावजी शेकार यांचा मृत्यू अपघातामुळे झाला असून, या संदर्भातील सर्व दस्तावेज प्राप्त होऊनही गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदारास दावा रक्कम दिली नाही. यावरुन गैरअर्जदार क्र. 1 कडून सेवेत त्रुटी झाली
उपरोक्त सर्व दस्तावेजांवरुन अर्जदार विमा रक्कम मिळणेस पात्र असूनही, गैरअर्जदार क्र. 1 कडून अर्जदारास विमा रक्कम प्राप्त झाली नाही, म्हणून आम्ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार विमा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून दरसाल दरशेकडा 15 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रार खर्च रुपये 500/- मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
// आदेश //
1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 नॅशनल इंशुरंस कंपनी यांनी निकाल प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत, अर्जदार यांना विमा रक्कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) द्यावे. तसेच या रक्कमेवर दिनांक 17/11/2012 (तक्रार दाखल दिनांक) पासून ते पुर्ण रक्कम अदा करे पर्यंत दरसाल दरशेकडा 15 टक्के दराने होणा-या व्याजाची रक्कम अर्जदार यांना देण्यात यावी. अन्यथा मुदतीनंतर उपरोक्त रुपये 1,00,000/- व या रक्कमेवर दिनांक 17/11/2012 पासून ते पुर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत दरसाल दरशेकडा 18 टक्के दराने दंडणिय व्याजासह रक्कम देण्यास गैरअर्जदार क्र. 1 जवाबदार राहतील.
3) अर्जदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास रुपये 1000/- ( रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 500/- ( रुपये पाचशे फक्त) सदर निकाल प्राप्ती पासून तीस दिवसांचे आंत द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन जाव्यात.
5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.
6) गैरअर्जदार क्र. 2व 3 विरुध्द आदेश नाही.