निकालपत्र :- (दि.04/11/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – तक्रारदाराचे वडील हे कै.आनंदराव जाधव विकास सोसायटी, कसबा सांगाव ता.कागल जि.कोल्हापूर या संस्थेचे सभासद होत. यातील तक्रारदार यांनी उपरोक्त संस्थेव्दारे सामनेवाला विमा कंपनीकडून जनता अपघात विमा पॉलीसी योजनेअंतर्गत विमा पॉलीसी घेतली होती. तक्रारदार यांचे वडील आप्पाजी बसाप्पा भोजे दि.14/01/2005 रोजी शेतातून काम आटपून घरी येत असताना बजाज बॉक्सर मोटर सायकलने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले.त्याबद्दल कागल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहे. तक्रारदाराने आपल्या वडीलांच्या मृत्यूनंतर सर्व कागदपत्रांसह क्लेमफॉर्म भरुन सामनेवाला विमा कंपनीकडे दिला.परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम अदयापही मंजूर केला नाही किंवा त्याबद्दल काही कळवलेही नाही.त्यामुळे वरील क्लेमची पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- वसुल होऊन मिळावी तसेच त्यावर 18 टक्के व्याजही मिळावे म्हणून प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने दाखल केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म मागणी अर्ज, सामनेवाला यांचे पत्र, क्लेम फॉर्म, खबरी जबाब, पंचनामा, जबाब, पत्र, पावती, मेडिकल सर्टीफिकेट, पोलीस अहवाल, फिजीकल फिटनेस अर्ज, इन्क्वेस्ट पंचनामा, मृत्यूप्रमाणपत्र, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रतिज्ञापत्र, तहसिलदार कार्यालयाकडील पत्र, रहिवाशी दाखला, तक्रारदाराचे ओळखपत्र, पेपरमधील बातमी, वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, पोष्टाची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (03) यातील सामनेवाला विमा कंपनीने आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवालांनी आपल्या कथनात प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले आहेत. (1) तक्रारदाराच्या वडीलांचा मृत्यू दि.14/01/2005 रोजी झाला. तक्रारदाराचे क्लेम फॉर्म सामनेवालांकडे दाखल झाल्यानंतर तक्रारदाराच्या वडीलांचे अपघाती निधन झाले त्यावेळी त्यांचे वय (तक्रारदाराने दाखल केलेल्या निवडणूक ओळखपत्राच्या आधारे) सुमारे 75 वर्षे असावे. जनता अपघात विमा योजनेअंतर्गत पॉलीसीधारकाचे मृत्यूसमयी वय 12 ते 70 पर्यंत असेल तरच त्यांना क्लेमची रक्कम मिळू शकते. त्यामुळे तक्रारदारांना सदर विमा योजनेअंतर्गत विमा क्लेम देता येत नाही. (2) सामनेवाला विमा कपंनीने तक्रारदाराचा विमा क्लेम उपरोक्त कारणामुळे नामंजूर केला असल्याचे पत्र त्यांना दि.30/06/2005 रोजीच पाठवले होते. त्यामुळे तक्रारदाराचे विमा कंपनीने क्लेमबाबत आपल्याला काहीच कळवले नाही हे तक्रारदाराचे म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. तक्रारदाराचा विमा क्लेम सन 2005 साली नामंजूर केल्यानंतर सन 2010 पर्यंत तक्रारदाराने त्याबद्दल कुठलीही तक्रार केली नाही. त्यामुळे सदरची तक्रार ही पूर्णपणे कालबाहय आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात की, वरील दोन्हीं बाबींचा विचार करुन तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळून टाकावी. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत विमा धारकाचे निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्राची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. (05) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रही तपासले. (06) तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीचे पॉलीसीधारक ग्राहक आहेत ही निर्विवाद आहे. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या मयत आप्पाजी भोजे यांच्या निवडणूक ओळखपत्रावरुन त्यांचे मृत्यूसमयी वय सुमारे 75 वर्षे असावे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पॉलीसी अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाला विमा कंपनी तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम देय लागत नाही हे सामनेवाला यांचे म्हणणे हे मंच ग्राहय धरत आहे. ग्राहक संरक्षण कायदयातील कलमाप्रमाणे तक्रारीला कारण घडल्यानंतर जास्तीत जासत दोन वर्षाच्या अवधीत तक्रारदार तक्रार दाखल करु शकतो. प्रस्तुत तक्रारीत सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम दि.30/06/2005 रोजी नामंजूर केला आहे. परंतु तक्रारदाराने तक्रार दि.14/08/2009 रोजी दाखल केली आहे. त्यामुळे सदर तक्रारीस लिमिटेशनची बाधा येत आहे. या बाबींचा विचार करुन हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते. 2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |