Dated the 30 Nov 2015
तक्रारदारांचे वकील अविनाश मोरे हजर. सामनेवालेचे वकील दाते हजर.
तक्रारदारांचा किरकोळ अर्ज क्र. 49/2015 वर आदेश पारीत करणेत आला.
आदेश (द्वारा मा. सदस्य ना.द. कदम)
1. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून स्वतःसह आपल्या कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती व सदर पॉलिसी दि. 10/05/2010 ते दि. 09/05/2011 या कालावधीसाठी वैध असतांना तक्रारदारांचा मुलगा दि. 23/01/2011 ते दि. 26/01/2011 या कालावधीकरीता औषधोपचाराकीता रुग्णालयात दाखल करण्यात आला. सदर औषधोपचार खर्चाचा प्रतिपूर्ती दावा सामनेवाले यांना पाठविला असता त्यावर सामनेवाले यांनी कोणतीही कृती न केल्याने तक्रारदारांनी सदर तक्रार दाखल करुन प्रतिपूर्ती दावा मिळावा अशी मागणी केली. शिवाय तक्रार दाखल करणेकामी झालेला विलंब क्षमापित व्हावा अशी विनंती केली आहे.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या विलंब माफी अर्जास आक्षेप घेऊन तक्रारदारांचा प्रतिपूर्ती दावा नाकारल्याची बाब त्यांना कळविली असल्याने व त्यानंतर तक्रार दोन वर्षांचे आंत दाखल न केल्यामुळे तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करु नये अशी मागणी केलेली आहे.
3. सामनेवाले यांनी आपल्या कथनाच्यापृष्ठयर्थ दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सामनेवाले यांनी तक्रारदारांचा प्रतिपूर्ती दावा नाकारल्याची बाब तक्रारदारांना कळविल्याबाबत कोणताही पोष्टल अथवा तत्सम पुरावा दाखल केलेला नाही.
4. तक्रारदारांनी आपल्या युक्तीवादाचेवेळी दाखल केलेल्या मा. राष्ट्रीय आयोगाचे युनायटेड इंडिया इन्श्युरन्स विरुध्द आर. प्यारेलाल I(2010) CPJ 22 NC या प्रकरणातील न्यायनिवाडयानुसार जर विमा कंपनीेने तक्रारदारांचा दावा नाकारल्याची बाब तक्रारदारांना कळविली नसल्यास तक्रार दाखल करण्यास सातत्याने कारण राहते.
प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले यांनी तक्रारदारांचा प्रतिपूर्ती दावा नाकारल्याची बाब तक्रारदारांना कळविल्याचा कोणताही पोष्टल अथवा तत्सम पुरावा दाखल केला नसल्याने प्रस्तुत प्रकरणात तक्रार दाखल करण्यास सातत्याचे कारण रहात असल्याने तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येतो. त्यानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
किरकोळ अर्ज क्र. 49/2015 मंजूर करण्यात येतो.
किरकोळ अर्ज निकाली काढण्यात येतो. तो वादसूचीतून काढून टाकण्यात यावा.